anagha jagdale

Others

3  

anagha jagdale

Others

ये तेरा घर ये मेरा घर

ये तेरा घर ये मेरा घर

3 mins
275


लग्न होऊन जेमतेम दोन महिने उलटले अन् राघवच्या हातात नव्या नोकरीचं पत्र आलं.बरेच वर्षांपासून वाट पाहिलेली ही संधी शेवटी त्याच्या आयुष्यात आलीच. खरंतर आपलं गाव सोडून दूर नव्या राज्यात सेटल व्हायचं ही कल्पना शरयूला अजिबात आवडली नव्हती पण आता नवरोबाच्या इच्छेपुढे काय बोलणार त्यामुळे तिनेही आपलं चंबुगबाळ आवरायला सुरवात केली.राघव एकदा जाऊन तिथे घर बघून आला.राजा राणीसाठी छोटंस वनबीएचके घर भाड्याने घेतलं.


सध्या राहत असलेलं पुण्याचं घर म्हणजे आतापर्यंत ब्रम्हचाऱ्याची मठी होती.बायको येणार म्हणून राघवने कपाट,पलंग,स्वयंपाकघरात थोड्या आवश्यक गोष्टी इत्यादी सामान घेतलं होतं आणि थोडफार घरमालकांच सामान होतं.पुढे होणाऱ्या ट्रान्सफरची पूर्वकल्पना असल्याने लग्नातलं आलेलं सामान ही पुरतं उघडलं नव्हतं.आपला छोटासा संसार मांडण्याची शरयूची इच्छा आता फलद्रूप होणार होती.लग्नात रुखवतात माडंलेली भांडी,शोभेच्या वस्तू ज्या सगळ्या खोक्यात बदं करून ठेवल्या त्या आता मांडता येणार म्हणून शरयू सुखावली.आईने रूखवतात ठेवलेली स्वतः भरलेली रेशमी चादर आता अंथरता येईल याचा आनंद होता.


जाण्याचा दिवस जवळ आला तसतसा सामान बांधायला जोर चढला. movers and packers शी बोलून दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे ते लोक आले देखील.पटापटा यादी करत सामान बांधायचं त्याचं कौशल्य वाखाणण्याजोगं होतं.दोन चार तासात सगळं सामान भरून लिस्ट तयार झाली.मिठास वाणीने त्या ट्रान्सपोर्ट वाल्याने इंन्शुरंसचे पेपर तिकडे गेल्यावर मिळतील असं सांगितलं.त्याच्यावर विश्वास ठेवून राघवने मान डोलावली.


पुण्याला साश्रूनयनांनी निरोप देत शरयू आणि राघव नव्या जागी निघाले.दिल्लीसारख्या राजधानीच्या शहरात स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याचा निर्धार मनात होता.सोबत कपड्यांची सुटकेस, खाऊ आणि राघवची बाईक मात्र ट्रेननेच बुक केली होती.


दिल्लीला पोचल्यावर भव्य वाटणाऱ्या शहराचं रेल्वेस्टेशनचं दर्शन अगदीच बकाल होतं.कसंबसं गाडी करुन आपल्या घराकडे ते रवाना झाले.रस्त्यात दिसणाऱ्या इमारती,मोठे रस्ते आणि भरपूर हिरवळ मात्र आवडली.नव्या घरात घरमालकीण बाई वरच्या मजल्यावर आणि राघव अन् शरयू तळमजल्यावर राहणार होते.घरमालकीण बाईंच्या प्रेमळ नजरेत खूप आपले पणा जाणवला.शरयूचा नव्या घरात प्रवेश झाला.सामान पोहचायला तीन -चार दिवस लागणारं म्हणून मालकीणबाईंनी गादी, स्वयंपाकाची शेगडी अशा महत्त्वाच्या गोष्टी सध्या त्यांच्या कडून दिल्या.राघवने आधी आणून ठेवलेली थोडीशी भांडी स्वयंपाकघरात होतीच. ये तेरा घर ये मेरा घर म्हणत राजा राणीचा संसार सुरू झाला.आता सामान आलं की छान सगळं सेट करूया,अशा विचारांत शरयू आणि राघवने ३-४ दिवस काढले.


ठरलेला दिवस उजाडला तरी सामानाचा पत्ता नव्हता. फोनवर एक दोन दिवसात मिळेल असं सांगण्यात आलं.राघव त्या ट्रान्सपोर्टरच्या दिल्ली ब्रांचला पण जाऊन आला.पण लवकरच येईल सामान एवढंच कळलं.पुन्हा दोन तीन दिवस झाले,रोज फोनवर तो माणूस टाळाटाळ करु लागला.राघवने इन्शुरन्स ची रिसीट मागता त्याने कानावर हात ठेवले,ती तर पुण्याच्या ऑफिसमधून घ्यायला हवी म्हणाला.आता मात्र काहीतरी काळंबेर असल्याचं वाटायला लागलं.जरूरी कपडे आणि थोडंस सामान ह्यात संसाराची सुरवात करतांना शरयू आणि राघवला आपण केलेली प्लानिंग आठवत होती.पोलिस कम्प्लेंट केल्यावर दोन दिवसांनी तो सामानाचा ट्रक कुठेतरी राजस्थान मध्ये लुटला गेल्याचं कळलं.तिथे फक्त एक दोन वस्तू सापडल्या पण बाकी सगळ्याचा ठावठिकाणाही नव्हता.इन्शुरन्स नसल्यामुळे काहीही भरपाई मिळाली नाही.नुकतंच संसाराच्या गाडीवर स्वार झालेल्या राघव आणि शरयूला हा मोठाच झटका होता. असं काही होईल स्वप्नातही वाटलं नव्हतं.नव्या शहरातील पहिल्या वहील्या घराची कहाणी अशी शून्यातून विश्व निर्माण करण्यापासून होईल हे तर ध्यानीमनीही नव्हतं.हौसेने मांडायचा संसार सुरू होण्याआधीच खूप नुकसान झालं होतं.शरयूला लग्नाच्या वेळी मांडलेल्या रुखवतातल्या एक एक वस्तू आठवत होत्या.हौसेने घेतलेल्या,स्वतः बनवलेल्या अशा कितीतरी वस्तू होत्या. राघवने लग्नाआधी खास तिच्यासाठी घेतलेला ड्रेसिंग टेबल,कपाट सगळ्या गोष्टी हरवल्या.घरच्यांचे, नातेवाईकांचे फोन धीर देत होते पण शेवटी परिस्थितीतून मार्ग त्या दोघांनाच काढायचा होता. अनोळखी शहराने दिलेला हा झटका सहन करून पुन्हा नव्याने उभं राहायचं होतं.


या सगळ्यात घरमालकांचाच काय तो आधार होता.त्या माऊलीने अगदी घरच्यासारखं त्यांना हवं नको ते सगळं दिलं.शेवटी डोळे पुसून राघव आणि शरयू नवं घरटं बनवायला सज्ज झाले.एका छोट्या छोट्या चमच्यापासून मोठ्या वस्तू एक एक करत जमवल्या.वेळेनुसार आणि गरजेनुसार थोडी थोडी खरेदी करत पुन्हा नव्या दमानं घरकुल सुसज्जित झालं.आयुष्यात प्रत्येक गोष्ट नीट तपासून करायची,कुणाच्याही बोलण्यावर आंधळा विश्वास ठेवायचा नाही हा जगण्यातला मोठ्ठा धडा दोघांनाही मिळाला.एक मात्र नक्की होतं या सगळ्यात दोघांमधलं प्रेम अजून घट्ट झालं.पुढे संसारात येणाऱ्या सगळ्या चढउतारांना सामोरं जातांना एकमेकांची भक्कम साथ कायम असणारं हे जाणवलं होतं.ह्या सगळ्या अडचणीच्या काळात नवराबायकोचं नात अजून मुरलं होतं. आता थोडं स्थिरस्थावर झालेलं ते घर पुन्हा नव्या आनंदात न्हात होतं कारण त्यांच्या त्या पहिल्यावहिल्या घरात लवकरच इवलीइवली पावलं दुडदुडणारं होती.


Rate this content
Log in