हिरकणी
हिरकणी
खूप उशीर झाला होता,पण तिला घरी पोहचायचेच होते. फक्त अधूनमधून काजव्यांची सोबत होती. डोळ्यात अश्रूंचा महापूर दाटला होता.देवाचे नामस्मरण करीत काट्याकुट्यातू निर्मनुष्य वाट तुडवत ती निघाली होती. किरर् अंधारात श्वापदांनी व्यापलेला जंगलाचा सामसूम रस्ता तिला कधी संपतोय असं झालं होतं. रातकिड्यांची किरकिर आणि मधूनच ओरडत जाणाऱ्या टिटवीमुळे काळजात धस्स झाल होतं.पण तिचा निश्चय कायम होता.कारण डोळ्यासमोर दिसत होता तिच्या कोकराचा चेहरा. तो रडत असेल या जाणीवेने ती चालत होती. तिच्या निर्धारापुढे ती वाट शेवटी हरली.
संकटानां परतवून घराच्या दारातून धावत जाऊन तिने बाळाला कवटाळलं. आज अग्निदिव्य करून परतणाऱ्या त्या माऊलीला त्याक्षणी कल्पनाही नव्हती की ती "हिरकणी "म्हणून आजपासून इतिहासात अजरामर झालीय.
