STORYMIRROR

anagha jagdale

Others

4  

anagha jagdale

Others

अभिनेत्री

अभिनेत्री

2 mins
258

केसांचा बांधलेला सैलसर शेपटा,अंगावर साधासाच कॉटनचा सलवार कमीज, डोळ्यावर लावलेला जाड फ्रेमचा चश्मा,कपाळावर छोटीशी टिकली अशा आपल्या अवताराला न्याहाळत केतकी आरशासमोर बसली होती. समोरचा आरसा पण तिच्याकडे अनोळखी नजरेने पाहत होता.ती मात्र स्वतःच्या ह्या रूपावर एकदम खुश होती. अशा अवतारात कुणीही ती टिव्हीवरची प्रसिद्ध अभिनेत्री केतकी देशमुख आहे हे ओळखू शकणार नव्हतं.


केतकीला समजायला लागल्या पासूनच ती टिव्ही सीरीयल्स मध्ये बालकलाकार म्हणून काम करत होती. गोरीगोबरी टपोऱ्या डोळ्यांची केतकी टिव्ही सीरीयल्स आणि जाहिरात क्षेत्रातलं खणखणारं नाणं होतं. तेव्हा लहान वयातच मिळालेल्या प्रसिद्धी आणि ओळख खूप हवीहवीशी वाटायची.अजून पैसा मिळवण्याच्या आईबाबांच्या हव्यासापायी तिचं बालपण मात्र साफ हरवलं. ह्या क्षेत्रात सुंदर चेहरा हे महत्त्वाचं भांडवल,त्यामुळे सुंदरता टिकवलीच पाहिजे म्हणून मोजूनमापून खाणं, नियमीत कॉस्मेटिक्स चा वापर,योगा अशा सगळ्या बंधनात केतकी लहानपणापासूनच बांधली गेली.आयुष्यात तिला काय हवयं किंवा काय बनायचयं हा प्रश्न ना कधी तिला पडला ना तिच्या आईवडीलांना.


तारुण्यात पदार्पण करता करता टिव्हीवर सास-बहू सीरीयल्सचा जमाना सुरु झाला. केतकी ला पण एका डेली सोप मध्ये काम मिळालं. दिवसभर भरपूर मेकअप,अंगावर घातलेले बटबटीत दागिने,भरजरी साड्या ही सगळी कथानकाची मागणी होती.उशीरापर्यंत चालणाऱ्या शिफ्ट्स आणि मग सौंदर्य जपण्याची कसरत ह्या सगळ्यात स्वतःला काय हवयं हे मागेच पडलं. केतकीची सीरीयल हीट झाली अन् वेगवेगळ्या कपंन्या आपल्या प्रोडक्टच्या जाहीरातीसाठी मागे लागल्या.केतकी ऐवजी सीरीयलमधली "कुनिका" म्हणूनच तिला जग ओळखत होतं. जाहीरातींमधेही कुनिकाच हवी होती. भरपूर पैसा,यश, पुरस्कार सगळं काही तिच्या पायाशी लोळण घेत होतं. पण........


पण शेवटी ही सगळी चार दिन की चांदनी,जोपर्यंत सीरीयल आहे तोपर्यंतच कुनिका लोकांच्या लक्षात असेल. सीरीयल बंद तर आपणही लोकांच्या विस्मृतीत असू ही गोष्ट तिच्या मनात डोकावून जायची पण लगेच मिळणाऱ्या प्रसिद्धीची झिंग त्या विचारांना झाकोळून टाकायची.कुनिका प्रत्येक वेळी केतकीवर मात करायची.


का कुणास ठाऊक? पण आता केतकीला ह्या सगळ्याचा उबग आला होता. तेच एकाच प्रकारचे खोटी चकाकी असणारे बेगडी आयुष्य आता कंटाळवाणे झाले होते. सगळं सोडून एक साधं आयुष्य जगावं असं प्रकर्षाने वाटत होतं. पण तिच्या पैशाची सवय झालेल्या घरच्यांनाही ते मान्य नव्हतं आणि त्या सीरीयलच्या टीमलाही. तिच्या त्या प्रसिद्धीचा त्यांना अजून वापर करुन घ्यायचा होता, शेवटी त्यांच्या नजरेत ती एक इनवेस्टमेंटच होती.


चक्रव्यूहात अडकलेल्या अभिमन्यूप्रमाणे तिची अवस्था होती.मिळणाऱ्या प्रसिद्धीमुळे हुरळून ह्या क्षेत्रात पडलेल्या तिला आता परतीचा मार्ग नव्हता.


आज कधी नव्हे तर थोडासा निवांत वेळ मिळाला होता. घरीही फारसं कुणीच नव्हतं. रुममध्ये एकटीच असणाऱ्या केतकीने हळूच कपाटात खाली लपवून ठेवलेला कॉटनचा ड्रेस काढला.तो घालून केसांचा सैलसर शेपटा बांधला. चेहऱ्यावर हलकीशी पावडर फिरवली आणि छोटीशी टिकली लावली.आज तिला समोर कुनिका नव्हे तर केतकी देशमुख दिसत होती.स्वतःसाठी आज ती पहिल्यांदा तयार झाली होती.आरशात दिसणाऱ्या आपल्या साध्या सोज्वळ रूपाकडे पाहतांना ती मनातून आनंदित होती.स्वतःशीच गोड हसत ती गुणगुणत होती,


"सजना है मुझे आज अपने लिए".



Rate this content
Log in