anagha jagdale

Others

3  

anagha jagdale

Others

पाखरांची किलबील

पाखरांची किलबील

3 mins
357


किलबील बालकमंदिराला सकाळी नऊ वाजता खडबडून जाग आलेली असायची.२-३वर्षे वयोगटातील मुलांना किलबील मध्ये प्रवेश मिळायचा. शाळेच्या मोठ्या गुहेत प्रवेश करण्याआधी मुलांना शाळेचा सराव व्हावा म्हणून ही प्ले ग्रुपची कल्पना.वंदना मावशी आपल्या घरातच ही छोटी शाळा चालवायच्या. २५-३० मुलांचा वर्ग भरायचा.वंदनामावशीच्या मदतीला रेखाताई आणि मीरामावशी असायच्या.छोटी छोटी गोंडस मुले रंगीबेरंगी कपड्यात पाठीवर छोटुकली दप्तर,गळ्यात वॉटरबॉटल,पायात बूटमोजे अशा वेषात आई आणि बाबांचा हात धरून शाळेत यायची.शाळेत जरी उत्साहात आलीत तरी आईबाबा टाटा करून जातांना दिसताच काही मुलं भोकाड पसरायची,आणि त्यांच पाहून इतर मुलांना पण रडायची स्फूर्ती मिळायची. मग नंतर त्या पाखरांचा जो काही किलबिलाट व्हायचा तो शांत करतांना वंदनामावशी, रेखाताई आणि मीरामावशीची तारेवरची कसरत असायची.

स्वतःच्या राहत्या घरात वंदना मावशींनी सुरु केलेलं हे बालकमंदिर आजूबाजूला राहणाऱ्या सगळ्यांना सोयीचं होतं घरगुती स्वरूपाचं हे बालकमंदिर मुलांना शाळेची सवय लावायचं,विद्यादानाचं पवित्र कार्य करायंच त्याचबरोबर घरगुती वातावरणामुळे मुलांना आवडायचं. आधी आधी तिथे जायला रडणारी मुलं नंतर नंतर घरी जायला तयार नसायची.वंदनामावशींचा हसतमुख आणि शांत स्वभाव सगळ्या मुलांना आपलंस करायचा.प्रेम,माया ह्या सोबतच गरज असेल तिथे कठोर बनून त्या मुलांना शिस्त लावत.

आज राघवचा किलबीलमधला पहिलाच दिवस.आपलं गोंडस पाडस ३ तासासाठी का होईना स्वतःपासून दूर राहील,तो कसा राहील शाळेत? नीट खाईल की नाही अशा हजारो शंका अपूर्वाच्या मनात पिंगा घालत होत्या .शाळेत जाईस्तोवर आनंदात असणाऱ्या असणाऱ्या राघवने आईचा हात सोडतांना मात्र रडून रडून गोंधळ घातला.अपूर्वाच्या जीवाची नुसती घालमेल होतं होती. तिथेच थांबाव असं तिला वाटतं होतं पण वंदना मावशींनी मात्र तिला निक्षून जायला सांगितलं.घरी आल्यावरही अपूर्वाचं मन लागेना.घड्याळाचे काटे आज संथगतीने सरकताहेत असं वाटंत होतं.दुपारी शाळेत घ्यायला गेल्यावर राघव महाराज इतके रमले होते की घरी चलायचं नावच नाही.शेवटी उद्या परत येणार ह्या बोलीवर तो घरी यायला तयार झाला. हळूहळू राघवला शाळा आवडू लागली.घरी खाण्यासाठी नखरे करणारा राघव शाळेत मात्र सगळं जेवण संपवायचा.थोडी अक्षर ओळख,अंक ओळख होऊ लागली.कविता म्हणू लागला.

एकदा दुपारी अपूर्वा राघवला घ्यायला गेली तर तो चित्र रंगवण्यात मग्न होता.एका कागदावर रेघोट्या ओढण्यात स्वारी रमली होती.वंदना मावशींनी तिला त्याचं काम होईस्तोवर थांबायला सांगितलं.बोलता बोलता अपूर्वा म्हणाली "मावशी तुम्ही मुलांना किती छान सांभाळता, शिस्त लावता,अभ्यासाची गोडी लावता.एवढ्या मुलांना साभांळायचं म्हणजे तारेवरची कसरत.पण तुम्ही किती समर्थपणे सांभाळता. तुमची मुलं किती लकी असतील ना जी तुमच्यासारख्या वटवृक्षाच्या छायेत जन्मली,वाढली."

हे ऐकून मावशी विषण्णपणे बोलल्या "अगं,देवाने ते दान नाही टाकलं माझ्या पदरात.खूप उपाय केले पण आई होण्याचं सुख नाही लाभलं मला. खूप निराश झाले.आता आयुष्यात काहीच उरलं नाही असं वाटायंच.शेजारच्या निनादची आई नोकरी करायची.त्याला दिवसभर सांभाळायचे,मग हळूहळू अजून दोन तीन मुलं यायची. त्या मुलांनी जगणं शिकवलं मला. मुलं ही देवाघरची फुलं म्हणतात हेच खरं. मग मी मॉन्टेसरीचा कोर्स केला.हे आयुष्यात कधी निराश झाले ना की ते इवले इवले हात पुन्हा उभारी देतात.आज ही सगळी मुलं माझी आहेत. त्यांची किलबील माझ्या घराला गोकुळ बनवतेय.मी देवकी नाही होऊ शकले पण ह्या मुलांमुळे यशोदा झालेय.विद्येच्या ह्या मंदिरात रोज ही टवटवीत फुलं फुललेली पाहून माझं जगण्याचं सार्थक होतं.त्यांना पुढील आयुष्यासाठी तयार करायला माझा हातभार लागतोय ह्याचं समाधान आहे.रोज सकाळी दुमदुमणारी ह्यांची किलबील मला उरलेल्या दिवसभर सोबत करते.नाहीतरं हे शांत घर खायला उठते.सणासुदीच्या निमित्ताने ह्या मुलांसाठी खाऊ बनवतांना मला आईपणांच सुख मिळतं.आज मी स्वतःला नव्याने गवसलेय ते ह्या मुंलामुळेच.ही माझी मुलं माझं जगण्याचं टॉनिक आहे."

त्यांच बोलणं आटोपल्यावर राघवला घेऊन घरी निघालेल्या अपूर्वाने हे किलबील नावाचं मंदिर ह्या देवाघरच्या फुलांनी सतत सुशोभित राहू दे आणि वंदना मावशींना असंच हसत खेळत राहू दे हेच मागणं देवाकडे मागितलं.


Rate this content
Log in