anagha jagdale

Inspirational

4  

anagha jagdale

Inspirational

तथास्तु

तथास्तु

2 mins
389


सुधा आजी एक प्रसन्न हवहवसं वाटणारं व्यक्तिमत्व. सोसायटीतल्या सगळ्या कार्यक्रमामध्ये आजीचा सहभाग असायचाच. त्यांची मुलं जरी दूर परदेशी राहत असली तरी सोसायटीतले लोक त्यांना अजिबात एकटेपणा जाणवू देत नसत. आजीच्या घरी गेल्या गेल्या समोर दिसणारी गणपतीची सुरेख मूर्ती आणि त्याच्या समोर तेवणारा नंदादीप सगळ्या घराला समाधान द्यायचा. ग्राऊंडफ्लोअरला राहणाऱ्या आजीने दारासमोर छान फुलझाडं लावली होती. त्या बागेतल्या फुलझांडाशी मायेनं बोलायच्या. त्यांच्या मायेच्या स्पर्शाने ती झाडपणं तरारून उठायची.


रोजची कामे, झांडांची निगा, वाचन, नेहमीचा फेरफटका आणि संध्याकाळी मैत्रिणींसोबत कट्टयावरच्या गप्पा असा छान दिनक्रम होता. आजी जरीही एकट्या राहत असल्या तरी त्यांची कुठलीही तक्रार नसे. हसतमुख चेहऱ्याने त्यांनी हे आयुष्य पण स्वीकारलं होतं. पण कोरोनाचं संकट उद्भवल. आपल्या सोसायटीत सगळं ठीक आहे म्हणता म्हणता चोरपावलांनी तो सोसायटीत शिरलाच. खबरदारीचे सगळे उपाय करूनही त्याने सुधा आजीला गाठलंच आणि आजीला घरात बंदीवासात धाडलं.


बाहेरही लॉकडाऊन लागलं होतं. कोरोनाच्या भीतीने सगळीच कुटुंब आपापल्या घरात बंदिस्त झाली. माणसाला माणूस दिसेनासा झाला. नशीबाने आजीला फारसा त्रास होतं नव्हता, एक दोन दिवसाच्या तापावर निभावलं होतं. सोसायटीतील लोकं आजीला बाहेरून सामान मागवून देणं, डबा देणं अशी सगळी मदत करतं होती. पण सगळचं पडद्याआडंच जग! नाही म्हणायला आजीला सोबत मिळाली ती खिडकीतून दिसणाऱ्या झाडांची. संवादाची भुकेली सुधाआजी खिडकीतून दिसणाऱ्या त्या झाडांशी हितगुज करायच्या.


कुंडीत फुललेला टवटवीत गुलाब त्यांना देवाने कसं ओंजळ भरून दान दिलयं ते सांगायचा. खिडकीपर्यंत आलेला रातराणीचा वेल रात्रीला आजीला सोबत करायचा. कुंडीत नव्या लावलेल्या झाडाची इवली इवली पानं नवीन जीवाच्या अस्तित्वाचा आभास करून द्यायची. बागेतील मोगरा त्याच्या सुगंधाने मन प्रसन्न ठेवायचा.


आजीच्या या नातवंडानी आजीचा एकटेपणा दूर करायचा जणू चंगच बांधला होता. आजीने लावलेलं जास्वंदाचं झाड आता मोठं झालं होतं. त्याला लागलेली कळी खूप आनंद देऊन गेली. रोज खिडकीतून दिसणारा कळीपासून फुलापर्यंतचा प्रवास बघता बघता तिचा दिवस सरायचा. आधी हिरवी दिसणारी कळी हळूहळू लालिमा पांघरू लागली. अलगद पाकळ्या उमलायला सुरुवात झाली. पाकळ्यांचे पदर दिवसागणिक उमलत होते. लालचुटुक उमललेल्या पाकळ्या आणि त्यातून डोकावणारा परागकणांचा तुरा आज आजीला सुप्रभात म्हणायला तिच्या उठण्याआधीच सज्ज होता.


सकाळी उठून सूर्यनारायणांच दर्शन घ्यायला खिडकीजवळ आलेल्या आजीला खिडकी जवळ डवरणाऱ्या जास्वंदाने सुप्रभात म्हटलं. जणू काही आपल्या घरीच नवीन जीव जन्माला आल्याचा आनंद आजीला झाला. त्या फुलाला पाहून नवीन उर्जा तिच्यात संचारली. खिडकीतून हात घालून तिने ते फुल अलगद तोडलं. गणपतीची पूजा करत देवाला कुंडीतलं पहिलवहीलं फुल अर्पण करतांना आजीने डोळे मिटले आणि ह्या चराचरातील समस्त जीवांच्या कल्याणाची कामना केली. मंद दिव्याच्या प्रकाशात शांत भासणारी, जास्वंदाचं फुल ल्यालेली गणपती बाप्पाची मूर्ती जणू काही तथास्तु म्हणत होती.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational