नूर ( भाग १)
नूर ( भाग १)


आज शाळा लवकर सुटली होती. ' नूर ' फारच खुश दिसत होती. आज अभ्यासाला जास्त वेळ मिळणार होता. बोर्डाची परीक्षा जवळ आली होती. ह्या वर्षी तिने प्रचंड मेहनत घेतली होती. बोर्डात ह्या वेळी पहिला क्रमांक मिळवायचाच हे केव्हाच तिने ठरवले होते. नूर तशी हुशार मुलगी आणि तितकीच कष्टाळूही. आपल्या तीन छोट्या भावंडांना सांभाळून आईलाही घरकामात मदत करावी लागे; परंतु तरीही वेळ काढून, दिवस-रात्र एक करून तिची मेहनत चालली होती.
घरची परिस्थितीशी तशी जेमतेमच. वडील रिक्षा चालवायचे. त्या एकट्याच्या जीवावर संपूर्ण संसार चालत असे. त्यामुळे हवे तितके कष्ट करून आपण कुटुंबाची परिस्थिती सुधारू असे तिचे मत. त्यासाठी ह्या घरातला एक कोपरा अन तिची पुस्तकं तिला पुरेशी होती. डॉक्टर बनण्याची नूरची फार इचछा होती आणि त्यासाठी तिचे कष्टही चालूच होते.
घरात प्रवेश केला आणि मागच्या गल्लीतला हुसेन समोर दिसला. नूरला त्याचा आधीपासूनच राग येई. शाळेत जाता येता दिसणारी त्याची ती घाणेरडी नजर अन बघण्याची पद्धत.... सर्वाचंच त्याला राग येई. गल्लीतल्या सर्वच मुलींकडे तो याच प्रकारे पाही. आज ह्या माणसाला आपल्या घरात पाहून थबकलीच. सरळ आतल्या खोलीत जाऊन बसली. आज मात्र हुसेन फार प्रेमाने सर्वांशी बोलत होता. थोड्या वेळ तिच्या अब्बाशी गप्पा मारून तो निघून गेला. तो गेल्यावर घरचे वातावरण अगदीच बदलून गेले. अम्मी अब्बा आजकल जास्तच खुश दिसू लागले. घरच्या परिस्थितीत सुधारणा होतेय, हेही नूरला जाणवू लागले. हे सर्व पाहून तीही समाधानी होती. बरोबरीने अभ्यासही चालूच होता.
परीक्षा १५ दिवसांवर आली पण घरात वातावरण काहीतरी वेगळेच होते. कसलीतरी जोरात तयारी चालू असल्याचे तिला जाणवले. काही दिवस अशेच गेले आणि मग अम्मीने तिच्या निकाह ची 'बातमी' तिला कळवली .नूर थक्क झाली !!! तिचा स्वप्नांचा महाल कोसळला होता. पण त्याविषयी सांगताना आईच्या चेहऱ्यावरची चमक, गेल्या काही दिवसांपासून वडिलांच्या चेहऱ्यावर दिसणारे हसू ह्या सर्वांचा विचार करत तिनेही आपल्या स्वप्नांना तिलांजली वाहिली....
अम्मीला समजायचे ते तिने समजले. नूरला ती समजाऊ लागली. घरातल्या परिस्थितीची जाणीव करून दिली. मुलगा अतिशय श्रीमंत असल्याचे सांगितले. तो कतारला राहत असल्याचे सांगून परदेशात राहण्याचे आमिषही दाखवले. हे लग्न झाल्यास घराला त्याचा फार हातभार लागेन हेही तिला पटवून दिले. त्यासाठी गेल्या काही दिवसात नव्याने घरात आलेल्या वस्तूंची यादीही ऐकवली. आपल्या घरासाठी वाटेन तो त्याग करण्याची तयारी असलेल्या नूर ने या सर्वावर काहीही उत्तर दिले नाही. तिचे उत्तर अपेक्षितही कोणाला होते !!!
बोल बोल करता तो दिवस उजाडला. आज बोर्डाचा पहिला पेपर होता आणि नूरचे लग्नही !!! ज्या दिवसाची एवढ्या वर्षांत आतुरतेने वाट पहिली होती, त्याचा शेवट हा असा होणार होता. सकाळपासून सर्वांचीच लगबग चालू होती. सर्वजण खुश दिसत होते. थोड्याच वेळात नवरदेवाचे आगमन झाले. त्याच्यासोबत हुसेनही होता. सोबत एक काझीही होता. काही वेळात पाहुणचार उरकल्यावर निकाह सुरु झाला. निकाह काबुल झाल्यावर काझीने दोघांच्या सह्या घेतल्या. समोरील पडदा बाजूला झाला आणि जे दृश्य समोर दिले त्याने नूरचा थरकापच उडाला. समोर बसलेल्या व्यक्तीचे वय अब्बा पेक्षाही खूप जास्त दिसत होते. त्याच्या त्या अवताराकडे पाहून काय समजायचे ते ती समजली. यानंतर समोर येणाऱ्या सर्वच गोष्टी डोळ्यांसमोर तरळू लागल्या. अम्मी अब्बाचा तीव्र राग आला. गरिबीविषयी प्रचंड संताप आला. आत्ता ह्या क्षणाला सर्वकाही सोडून पाळून जावे असे वाटले. परंतु अजून बऱ्याचशा गोष्टींची जाणीवच तिला नव्हती. तिची खरी परीक्षा आता सुरु होणार होती .......