STORYMIRROR

रामदास तळपे

Abstract

4  

रामदास तळपे

Abstract

निजामचे आब्बा

निजामचे आब्बा

6 mins
371

ग्रामीण संस्कृती


निजामचे आब्बा


पश्चिम भागात निजामच्या आब्बांना ओळखत नाही असा माणूस शोधुनही सापडणार नाही. निजामचे आब्बा हे मंदोशी सारख्या अतिदुर्गम अशा गावात कधी आले हे कुणालाच आता सांगता येणार नाही.


त्या काळातील मंदोशी गाव म्हणजे अत्यंतिक दारिद्रयाने पिचलेले गाव.९५% घरे दगडमातीची व गवती छप्पर असलेली. प्रत्येकाच्या घरात आठराविश्व दारिद्रय,प्रत्येक कुटुंबाला दररोज खाण्यापिण्याची चिंता.आणि अशा परिस्थितीत निजामचे बाबा पोट भरण्यासाठी दुर शहरात जाण्या ऐवजी अत्यंतिक दारिद्रय असलेल्या मंदोशी गावात का आणि कशाला आले असावेत? हा प्रश्न मला अद्यापही सुटला नाही. 


निजामचे आब्बा जेव्हा ते त्यांच्या पत्नीसह (भाभी)आले तेव्हा त्यांचे नविनच लग्न झाले होते.गावातील त्या काळातील लोकांनी त्यांना कै.महादू जढर यांच्या घराला लागुनच त्यांच्या गुरांच्या गोठ्यात राहण्याची व्यवस्था करून दिली,.एका बाजुला बैल व गाई आणि एका बाजुला निजामचे आब्बा आणि आम्मी.अशी ती राहण्याची व्यवस्था होती.


सुरूवातीला कित्येक वर्षे त्यांनी गावातील लोकांकडे केवळ जेवणावारी कामे केली.बांध बदीस्तीची कामे,सरपण तोडणे भारे वाहून आणने,भात,नाचणी,सावा,लावणी कापणी,भात झोडणे,गुरांसाठी गवत कापणे,गवताच्या पेंढ्याचे भारे वाहून आणने,अशी सर्व प्रकारची कामे ते करत असत.परंतू भाभींला यातली अंग मेहनतीची कामे करता येत नसत.


तरीही अब्बा आणि भाभी जमेल तशी कामे करून त्या आपल्या दारिद्रयाने पिचलेल्या संसाराला ठिगळ लावू पहात.त्याकाळात दारिद्रय पाचविला पुजलेल्या व दोन वेळचे पोटभर अन्न आपल्या पोरांबाळांना घालू न शकणाऱ्या समाजाकडे प्रचंड माणुसकी असायचीआपण उपाशी राहू परंतू आपल्याकडे आलेला पाहुणा किंवा अगंतुक उपाशी रहाता कामा नये अशी प्रत्येकाची तळमळ असायची.


त्याकाळातील अर्थव्यवस्था ही ९०% धान्यस्वरूपात व १०% पैशाच्या स्वरूपात बेतलेली होती. निठवा, आठवा, शेर, आधुली,पायली,मण अशी धान्य मोजन्याच्या साधनावर अर्थव्यवस्था बेतलेली होती.(संसारोपयोगी वस्तू,मजुरी इत्यादी)


पैशाचा सबंध अपवादानेच येत असे.(बैल,दागीने,जमीन घेणे,कपडालत्ता इत्यादी पुरताच पैशाचा उपयोग होत असे.)

अशा ह्या परिस्थितीत निजामचे आब्बा हे काबाडकष्ट करून आपले व बायकोचे पोट भरत होते.कामाला आब्बा जात होते. परंतू संध्याकाळी गरीब लोक अर्धपोटी राहून आम्माचेही जेवण वाढून देत असत.निजामच्या आम्माला सुद्धा कामाची गरज होती. तीलाही आपले पतीचे कष्ट पाहवत नव्हते.ती उघड्या डोळ्यांनी पतीची फरपट पहात होती.परंतू त्या माऊलीला यातले कोणतेच काम येत नव्हते.


एक दिवस स्वतः साठवलेली पै- पै गोळा करूनआब्बा एकटेच पायी पायी वाड्याला (वाडा गाव प्राचीन काळापासूनची फार मोठी बाजारपेठ) गेले व चार आठ दिवसांनी परत आले ते डोक्यावर भले मोठे पोतडे डोक्यावर घेऊन..

त्या पोतडीत काय होते? बोंबील,वाकट!सुकट,खारा मासा, ढोमेली,व एक वजनमाप


दुस-या दिवसापासुन निजामच्या आम्माच्या हाताला काम मिळाले.अशा प्रकारे नविन व्यवसायाचा श्रीगणेशा झाला.

निजामची अम्मा दररोज डोक्यावर पाटी घेऊन जवळच्या गावांमध्ये आपल्या मालाची विक्री धान्य स्वरूपात करू लागली.


दोघांचाही स्वभाव अत्यंत नम्र,,प्रेमळ,आपुलकी,व सतत दुस-याला मदत करण्याची व संकटात सापडलेल्या लोकांसाठी धाऊन जाण्याची प्रवृत्ती.या मुळे हळूहळू व्यवसायात त्यांचा जम बसू लागला.याच काळात साधारण १९७३-७४ मध्ये निजामचा जन्म झाला.


थोड्याच दिवसात त्यांनी कै.महादू जढर यांच्या घरातील एका कोप-यात छोटेसे दुकान टाकले..दुकानात गोळ्या, बिस्कीट, गुळ,डाळ,चहापत्ती तंबाखू चुना,साबण,जोडीला सुकट, बोंबील,वाकट,खारामासा विक्रीला ठेऊ लागले.


त्यावेळी शिरगाव येथे नविनच दुध डेअरी सुरु झाली. पंचक्रोशीतील लोक डेअरीला दुध घालू लागले.दर पंधरा दिवसांनी दुधाचे पैसे लोकांना मिळू लागले.काळाची पुढची पावले ओळखुन आब्बांनी आडबाजुला मंदोशी येथून शिरगावला स्थलांतर केले.तेथे दुकान टाकले.हळूहळू दुधाचा व्यवसाय वाढू लागला जनावरांनी जास्त दुध देण्यासाठी लोकांना पेंडीची गरज भासू लागली.आणि ही उणिव आब्बांनी भरून काढली.उधारीवर आब्बा लोकांना किराणा सामान व पेंड पुरवू लागले.लोकही प्रामाणिकपणे दुधाचा पगार झाल्यावर आब्बाची उधारी मिटवू लागले.आब्बांनी उधार माल दिला नाही असा माणुस शोधूनही सापडायचा नाही.


हळुहळू दुकानाचा व्याप वाढू लागला.निजामही आता मोठा झाला होता.तोही दुकानात आब्बाला मदत करू लागला. ग्रामीण भागात यात्रेंच्या मोसमात निजाम खेळण्यांचे दुकान व भाभी बांगड्यांचे दुकान टाकुन व्यवसाय करू लागले.शिवाय पाटी डोक्यावर घेऊन आम्मा बोंबील वाकट विकत होतीच. जोडीला निजामही मदत करायचा तर आब्बा दिवसभर दुकानात बसत.


पुढे काही दिवसांतच निजामने M.80 स्कुटर घेतली.पश्चिम भागातील पहिली स्कुटर निजामचीच.डोक्यावर पाटी घेऊन व्यवसायासाठी काबाडकष्ट करणारी आम्मा आता तिच्या मुलासोब या स्कुटरवर व्यवसाय करू लागली..थोड्याच दिवसात याच निजामने नवीन कोरीकट्ट जीपगाडी घेतली..व सीटवाहतुकीचा धंदा करू लागला..नवीन वाडा गावात जागा घेऊन दुमजली घर बांधले.व हे कुटुंब वाडा गावात स्थायीक झाले..निजामच्या लग्नाला पश्चिम भागातील भरपुर लोक उपस्थित होते.


गावाला जाताना सहज कधी वाडागावात निजामच्या वडिलांची भेट झालीच तर ते भरभरून बोलनार.तोंडावर हात फिरवून आल्लाकडे करूना भाकून आशिर्वाद देत.व कितीही नको म्हटले तरी घरी घेऊन जात.व चहापाणी करत,आम्मालाही खुप आनंद होई.प्रेमाने घरची विचारपुस करत.आम्मा व आमच्या आईचे चांगले सबंध होते.आई लवकर गेली याचे आम्माला खुप दुःख होई.आम्मा दरवेळी ते बोलून दाखवते व हळहळ व्यक्त करते.


आब्बांनी प्रचंड दारिद्रय अनुभवले,भोगले,स्थिरसावर झाल्यावर चांगले दिवस आले परंतू श्रीमंतीची हवा कधीही त्यांच्या डोक्यात त्यांनी शिरू दिली नाही..नाहीतर दोन पैसे खिशात खुळखुळू लागल्यावर घराच्या आड्याला लाथा मारणारे समाजात कित्येक आहेत..पुर्वीचे आब्बा व आताचे आब्बा यात तसुभरही फरक पडलेला नाही..असे हे आब्बा मला तर ते साईबाबाच वाटायचे.


अब्बा दरवर्षी आपण जसे आषाढी कार्तिकी वारीला पंढरपूर आळंदीला जातो तसे अब्बा हाजी मलंग गडावर जात. त्यांची हाजीमालंगची वारी कधीही चुकली नाही परंतु एकदा काही अपरिहार्य कारणामुळे खूप इच्छा असूनही हाजी मलंग गडावर जाऊ शकले नाही.त्यादिवशी आबा आपल्या दुकानात बसून होते.मीही त्या दिवशी कॉलेजवरून लवकरच घरी येत होतो. दुपारी दोनच्या दरम्यान मी एसटीतून उतरून घरी चाललो होतो.जाताना मी अब्बाच्या दुकानाच्या समोरून जात असताना त्यांनी मला हाक मारली. राम अरे ये, घडीभर वस. पाणी पिऊन जा.मलाही अब्बाचा आग्रह मोडवेना. मी त्यांच्या दुकानातील लाकडी फळी वर बसलो. त्यांनी मला माठातील थंडगार पाणी दिले. पाणी पिल्यावर 


इकडच्या तिकडच्या गप्पा मारत असताना अचानक तिथे उंच शिडशिडीत,शेलाटी बांधा असलेला व भरदार दाढी मिशा असलेला फकीर तेथे आला. त्याच्या एका हातात धुपात्र व एका हातात मोरांच्या पिसाचा कुंचला होता. फकीराने आमच्या दोघांच्या डोक्यावरून आळीपाळीने कुंचला फिरवला. अब्बानी त्याच्या झोळीत दोन तीन रुपयाची चिल्लर नाणी टाकली. फकीर हिंदीत बोलला देखो मेरे पास दो कांच का क्रिस्टल बॉल है! मुझे पच्चीस रुपये दो और काच दो क्रिस्टल बॉल ले लो! 

मुझे हाजी मलंग को जाना है. यावर आब्बा म्हणाले. मी खेळायचे बॉल घेऊन काय करू. याचा मला काय उपयोग. नको मला हे दुसरं कोणालातरी द्या. परंतु फकीर ऐकायला तयार नव्हता. फकीर म्हणाला ठीक है, वीस रुपये दो और ले लो, अब्बाच्या मनात एक विचार चमकून गेला. आपली तर हाजी मलंगची वारी चुकलीच आहे आणि हा बिचारा चालला आहे तर जाऊ दे आपले वीस रुपये कारणी लागतील. असे म्हणून त्यांनी गल्ल्यातून वीस रुपये काढून फकीराला दिले. व ते दोन क्रिस्टल बॉल ठेवून घेतले.


अब्बा नेते काचेची दोन क्रिस्टल बॉल घेऊन त्यातील एक बॉल न्याहाळत असताना त्या काचेच्या क्रिस्टल बॉल मध्ये हाजी मलंगचा डोंगर दिसला आणि तिथून माणसे चालताना दिसत होती. आबा विस्मय चिकित होऊन ओरडले राम अरे बघ या बॉल मध्ये टीव्ही लागलाय. हाजी मलंग चा डोंगर बघ तिथून चालणारे माणसे बघ. मीही त्या बॉल मध्ये काय आहे बघू लागलो. तर काय आश्चर्य. त्या बॉल मध्ये हाजी मलंग चा डोंगर दिसत असून माणसे तेथून चाललेली होती. चावताना माणसाची नुसती रीघ लागली होती. तेवढ्यात आम्ही दुसरा बॉल पाहिला. त्या बॉल मध्ये हाजी मलंग बाबाचे मस्जिद किंवा मंदिरांमधील दृश्य दिसत होते. लोक तिथे दर्शन घेत होते. आम्ही हे दृश्य पाहून खूपच आश्चर्यचकित झालो.


 एवढ्यात आबा मला म्हणाले राम अरे जा तो फकीर कुठे आहे बघ. मी तात्काळ बाहेर जाऊन फकीरा चा शोध घेऊ लागलो. संपूर्ण शिरगाव पायाखाली घातले. परंतु मला कुठेच फकीर दिसला नाही. मी निराश होऊन परत आब्बाच्या दुकानात आलो. आणि आबांना सांगितले.फकीर काही मला भेटला नाही.त्यानंतर आम्ही पुन्हा पुन्हा त्या दोन्ही बॉल मध्ये आलटून पालटून पाहिले.परंतु मघाशी जे दृश्य आम्ही पहिले होते ते कधीच लुप्त झाले होते.आणि सामान्य बॉलमध्ये जे दिसते तेच आम्हाला दिसू लागले.पुन्हा परत काही डोंगर, चालणारी माणसे, हाजी मलंगबाबाचे मंदिर,त्यामध्ये दर्शन घेत असणारी माणसे मला परत दिसलीच नाहीत. त्यानंतर अब्बा रोज क्रिस्टल च्या बॉल मध्ये पाहायचे.परंतु त्यानंतर त्यांना कधीच आम्ही पाहिलेले दृश्य दिसले नाही. अब्बा बोलले राम अरे तो फकीर म्हणजे हाजी मलंग बाबाच असला पाहिजे. मला हाजी मलंगला जायला जमले नाही ना, म्हणून हाजी मलंग बाबाच मला भेटायला आले होते. परंतु मला त्यांना साधी पाणी सुद्धा देता आले नाही. केवढे माझी दुर्दैव.


आब्बा आता हयात नाहीत.परंतू अम्मा अजून आहे.शरीराने जरी ती वर्धाक्याकडे झुकली असली तरी मनाने अजुन तरूण आहे.एक निरक्षर मुस्लिम कुटुंब नेसत्या वस्रानीशी पश्चिम भागात येते काय आणि व्यवसाय करून लोकांचे प्रेम संपादन करते काय.. हे सर्व अश्चर्यकारकच म्हणावे लागेल.


लेखक -श्री.रामदास तळपे. (मंदोशी ता.खेड,जि,पुणे)


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract