STORYMIRROR

रामदास तळपे

Abstract

4  

रामदास तळपे

Abstract

गावठ्यावरची म्हातारी

गावठ्यावरची म्हातारी

4 mins
453

गावठ्यावरची म्हातारी आमच्या गावापासून जवळच असलेल्या गावठ्या वरच्या शेतात अर्धे कौलारू व अर्धे गवत असलेल्या छपरात राहायची. तिच्याकडे गाया म्हशी, शेळ्या आणि बैल देखील होते.दररोज डेअरीला ती दूध घालायची. तांब्याभर दुध आम्हाला आणून द्यायची.तापवून जाडसर खरपूस झालेल्या दुधाबरोबर चपाती व भात खाताना चव म्हणजे काय याची प्रचिती यायची.

मी साधारण एक वर्षाचा होतो तेव्हा चवदार व रुचकर असे तामकुड्याचे तांदूळ गावठ्यावरच्या म्हातारीने आम्हाला दिले होते. दररोज थोडासा भात घालून बाळाला दुधाबरोबर खायला घाल असा सल्ला देखील माझ्या आईला दिला होता. ती जर कधी बाजाराला गेली तर न चुकता आमच्या घरी येत असे.साठे बिस्कीटचा पुडा, किंवा गोडी शेव आम्हाला देत असे.

माझ्याच वयाचा तिचा मुलगा विठ्ठल शिक्षणासाठी आश्रम शाळेत शिकायला होता. तो दिवाळीच्या आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत घरी येई. ती तिचा मुलगा विठ्ठल माझ्यामध्ये पाहत असे. त्यामुळे तिचा जीव माझ्यावर विशेष होता.
 
दुसऱ्या दिवाळीच्या दिवसात माझी आई मला जवळच शेतात राहणाऱ्या गावठ्यावरच्या म्हातारीकडे मला पाठवायची. तिथे गेल्यावर म्हातारी दुधात गूळ टाकून केलेल्या वाफाळलेल्या शेवया मला द्यायची. वाफाळलेल्या शेवया हा तिचा फेवरेट पदार्थ होता.या वाफाळलेल्या शेवयांमध्ये प्रेम,आपुलकीची गोडी ठासून भरलेली होती.मी घरी जाताना निघालो की, ती मोठा डांगर भोपळा, हातभर लांब अशी काकडी,घोसाळी,दोडके,भुईमुगाच्या शेंगा असे काही बाही गाठोड्यात बांधून द्यायची.जाताना तोंडावरून हात फिरवायची आणि कडाकडा बोटे मोडायची.

माझे वडील लहानपणीच गेल्यामुळे आम्ही तेव्हा अगदी अनाथ झालो होतो. माझी आई तीन मुलांचा सांभाळ कशी करणार याची जाणीव होऊन ती तीळ तीळ तुटायची. कसं होणार.. लेकरांचं... बा.. परमेस्वरा तूच बघ रे बाबा यांचं.असं म्हणायची. तेव्हा माझ्याही मनात कालवा कालव व्हायची.तिची घालमेल पाहून मलाही गलबलून यायचं.

उन्हाळ्याच्या दिवसांत क्रिकेट खेळून आम्ही दुपारचे विहिरीवर पोहून परतू लागलो की बाजार घेऊन आलेली म्हातारी मला वाटेवर दिसायची.मला बघून ती आपोआप रस्त्याच्या कडेला थांबायची.सोबतीच्या मित्रांना सोडून मी हळूच रस्त्याच्या कडेला म्हातारीकडं जायचो.मी तिची विचारपूस करतो आहे तेवढ्यात तिच्या डोकीवरची पाटी खाली यायची. मांड्यांवर पाटी तोलून धरून म्हातारी चवळीच्या कोवळ्या शेंगा बचकभर माझ्या ओंजळीत ठेवताना म्हणायची‚आता मोठा झालासा तुमी बाबांनू.कदी माझ्या घराकडे पाय वाकडं व्हत नाईत तुझ.घे! तिनं दिलेल्या चवळीच्या शेंगा भर रस्त्यावरून खात जाताना मला कशाचंच भान उरायचं नाही. वाटायचं‚ या म्हातारीचं आणि आपलं कसलं तरी गुंतवा झालेलं नातं आहे. कसलं ते काही कळायचं नाही.

गावठ्या वरच्या म्हातारीला तीन मुले होती.पैकी दोन मुलांची लग्न झाली होती.विठ्ठल हा सगळ्यात धाकटा माझ्या वयाचा.विठ्ठल या शेंडेफळात म्हातारीचा जीव गुंतलेला असायचा.आपल्या विठ्ठलनं चांगली कापडं घालावी.बुकं वाचावी‚ लई मोट्ट व्हावं असं म्हातारीला वाटायचं. त्यासाठी ती उरात गावरान माया भरून जिवाचा आटापिटा करायची.तिचा नवरा दामूबाबाला सुगावा लागणार नाही अशा बेताने डोक्यावरच्या पाटीत चार-एक पायली भात भरून घेऊन ती माझ्या आईकडं येऊन म्हणायची‚
सखू ! वाईच नड हाय. इठ्ठलला पैकं होवं. एवढं भात घे नी शंभर रुपये द्ये.
तिचं ते‚ पोराच्या काळजीने व्याकुळ झालेले बोल ऐकले की मी कुठंतरी खोलवर गलबलून उठायचो. माझे वडील लवकरच गेल्यामुळे आम्हाला तिने खूपच मानसिक आधार दिला होता.पंधरा दिवस ती आमच्या घरात राहिली देखील होती.
मावशी पैसे घेऊन जा. भात कशाला त्याबद्दल? इठ्ठल काही परका नाही.माझी जशी तीन आहेत तसाच तो चौथा.आई म्हातारीला स्त्रीपणाचा आधार देऊ बघायची.
तसं कसं ? तुझाबी सौंसार हाय.घरात कर्तं मानूस न्हाई. ह्ये भात घानवट ऱ्हाऊ दे होतर तुमच्याकडं.खूप पावसाळे वाहून जाताना बघितलेली म्हातारी‚ वनवासातल्या कुंतीसारखी शहाणपणाचं बोलायची.

गावठ्यावरच्या म्हातारीकडे दरवर्षी अश्विन महिन्यातल्या तिसऱ्या मंगळवारी वरसुबाईचा नैवेद्य असायचा.त्यासाठी भात आमटी, शाकबाजी व बुंदीचे जेवण असायचे.शेणसारवण केलेली पाटी घेऊन गावठ्यावरची म्हातारी वरसु बाईच्या जेवणाचं आमंत्रण द्यायला आमच्या घरी यायची.माझ्या आईशी ती नेहमी खास मनाच्या कप्प्यातलं बोलायची. अंगणात उभी राहून ती आईला हाक घालायची‚ सखू.जरा भाहेर ये.आई बाहेर गेली की त्या दोघींच्या अंगणातच गप्पा जमून जायच्या.म्हातारी वरसुबाईच्या निवदाचं आवतन’ द्यायला आलो आहोत हे विसरायची.आपल्या विठ्ठलच शिक्षान’ कसं करावं याचा सल्ला विचारताना म्हातारी आपली शेतीवाडी घरशेकरणी सारं सारं विसरलेली असायची.आई तिला घरात नेऊन चहा द्यायची.

येते ग सखू म्हणत म्हातारी माझ्या घरासमोरच्या अंगणा पर्यंत जायची आणि पुन्हा परतायची. बघितलासा सखू ध्यानातच ऱ्हात नाई‚ लेकरांस्नी वरसुबाईच्या निवदाला गावठ्यावर लावून दे सांच्याला.

वरसूबाईचं देऊळ दीड-एक मैलावर असल्यामुळं माझी भावंडं जायला कुरकुरायची.मी एखादा जोडीदार घेऊन‚आंब्याच्या डेरेदार झाडांच्या राईतून वरसु बाईच्या देवळाजवळ यायचो.वडाच्या पानांच्या पत्रावळीवरचा आमटीभात शाकभाजी व बुंदीचा निवद घोंगडीवर बसून खाताना कसली तरी आगळीच चव तोंडात रेंगाळू लागायची.

मी लग्न झाल्या वर पत्नीसह गावठ्यावरच्या म्हातारीला भेटायला गेलो.घरातील एका अंधाऱ्या खोलीत म्हातारी लोखंडी खाटावर गोधडी पांघरून आजारपणामुळे निपचित पडली होती.मी बायकोसह म्हातारीच्या अंधाऱ्या घरात गेलो.मी आलोय हे कळताच म्हातारी अंथरुणात उठून बसली.आम्ही दोघांनी तिला नमस्कार केला.मी तिच्या खाटेवरच टेकलो. म्हातारी आपल्या विठ्ठल कडं बघत क्षीण आवाजात म्हणाली‚जोडप्यानं आल्यात.त्वांड गॉड कर बाबा त्येचं.विठ्ठलने आमच्या हातांवर साखरेचे चमचे पालथे केले.ब्येस क्येलंस ल्येका मास्तरच नाव राकलंस.माझे वडील शिक्षक असल्याने ती वडिलांना मास्तर म्हणायची.विठ्ठल फोन मधून तु लिव्हलेलं वाचून दावतो.

जेवणाच्या खोलीकडं बघत‚ म्हातारी सुनांना उद्देशून म्हणाली‚ अगं सवाशीन आली.कुनीतरी कुकू लावा की गं तिच्या कपाळाला.
म्हातारीचं बोलणं ऐकताना माझं काळीज चिरल्यासारखं झालं.

गावठ्यावरच्या म्हातारीच्या घराबाहेर पडताच मी बायकोला म्हणालो‚ बघितलंस‚अशी माणसं भेटायची नाहीत इथून पुढं.

थोड्याच दिवसांत माझ्या मोबाईलवर मेसेज आला प्रिय रामदास, तुझी गावठ्यावरची म्हातारी गेली.तुझं नाव काढलं तिनं जाताना. तुझा विठ्ठल....

आजही मी गावी जातो.गावी गेल्यावर गावठ्यावरच्या म्हातारीची तीव्रतेने आठवण येते.आणि नकळत मी गावठ्यावरची वाट चालू लागतो.दुरूनच म्हातारीचे घर दिसते.म्हातारी आपल्यात नाही हे मनाला पटतच नाही.म्हातारी आपल्यात आहे असा भास होतो का? काय माहित? परंतु म्हातारीच्या घराकडे जायला पावले जड होतात. मग मी तिथूनच म्हातारीच्या घराच्या दिशेने म्हातारीला नमस्कार करतो आणि मागे फिरतो.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract