आठवणीतील गाव शिरगाव
आठवणीतील गाव शिरगाव
शिरगाव येथिल एस टी स्टँड हे १९७२ साली बांधले असावे असा माझा अंदाज आहे. हे एस. टी. स्टँड म्हणजे मोठे भेंडीचे झाड व त्यावर असनारा छोटासा ओबडधोबड पार. हेच तेव्हाचे एस टी स्टँड होते. परंतु ते कसेही असले तरी शिरगाव , मंदोशी, मोरोशी,टोकावडे व भोरगीरी या गावांचे आवडते ठिकाण होते.
मला तर हे ठिकाण खुपच आवडायचे. शिरगाव एस.टी स्टँड हे पहाटे पासुनच गजबजलेले असायचे. तेव्हा डेहणे आदिवासी संस्थेची २२०६ या क्रमांकाची दुधगाडी होती.ही गाडी भल्या पहाटेपासुनच शिरगावच्या स्टँडवर दुधाची रिकामी कँन्स व बर्फाची लादी टाकुन पुढे जायची आणि थोड्याच वेळात मंदोशी व मोरोशी वरून दुधवाल्यांची दुध घालाण्यासाठी एकच गर्दी व्हायची.डेहणे गावचे कै.नावजी वनघरे हे तेव्हा दुध घ्यायला असायचे. दुध घातल्यावर पाराच्या अवतीभवती उभे राहून दुधवाले अनेक सुखदुखे एकमेकांना सांगायाचे.ते याच स्टँडवर.
सकाळी सात वाजता भोरगीरी वरून खेडला जाण्यासाठी एस टी यायची. ज्या कोणाला वाडा,डेहणे व खेड येथे जायचे असेल तर प्रवासी या स्टँडवर अर्धा तास अधीच हजर असत. शनिवारी तर या स्टँडला यात्रेचे स्वरूप यायाचे.
शनिवारी सकाळी शाळा असायाची.व शनीवारी वाडयाचा बाजार असायचा. त्यामुळे शालेय विद्यार्थी बाजारकरी व दुधवाले यांनी एस टी स्टँड फुलून जायचे. सकाळी ७ वाजता खेडला जाणारी एस टी असायची. त्यानंतर १० वाजता यायची परेल भोरगीरी. ती गेल्यावर १२ वाजता असायची तळेगाव टोकावडे. त्यानंतर राजगुरूनगर भोरगीरी ही ३ वाजता असायची.त्यानतर ८ वाजता राजगुरूनगर- भोरगीरी ही मुक्काम एसा टी असायची. शिवाय दुधगाडीने प्रवास करनारेही असायचे. त्यामुळे या स्टँडवर दिवसभर प्रवासी बसुन असायचे.
या स्टँडवर असनारे भेंडीचे झाड व त्यावर असनारा ओबडधोबड पार व पारालाच रस्त्यांची खडी दाबनारा दगडी रूळ ही या पाराचाच अविभाज्य घटक होता. या पाराखाली कित्येक तास एस टी ची वाट पहात प्रवासी बसायचे.कधी एस टी वेळेवर यायची तर कधी उशिरा तर कधी यायची पण नाही. मी सुध्दा या स्टँडवर कित्येक वेळा व कित्येक तास एस टी ची वाट पाहण्यात घालवले आहेत. एस टी स्टँडवरून लांबुन येताना पाहिली किंवा आवाज ऐकला तरी खुप आनंद व्हायचा .
पुर्वी डांबरी रस्ते नव्हते. खडी व मातीचे रस्ते असायाचे.लांबुन प्रचंड धुळीचे ढग सोबत घेऊन एस टी यायची व या स्टँडवर थांबायची.आणि आम्हा प्रवाश्यांना घेऊन पुढे जायची. या स्टँडवर कधीच कंटाळा यायचा नाही. सतत येथे वर्दळ असायची.
स्टॅन्ड पासून जवळच जवळच श्री नामदेव केदारी यांचे रेशनिंग दुकान होते. रेशन घेण्यासाठी लोकांची प्रचंड गर्दी व्हायची. विशेषता दिवाळीच्या वेळी ज्यादा रेशन घेण्यासाठी खूप लोक जमायचे. स्टँडच्या उत्तरेला चढाच्या वर शिरगावचे मारूती मंदिर होते व अजूनही आहे.
मंदिरात डिगुतात्या ब्राम्हण राहायचा. त्याला बहुदा निट दिसायचे नाही. दिगू तात्या एकटाच मंदिरात राहायचा. अजुबाजूच्या गावात श्री सत्यनारायण पुजा करायाचा. त्याला न्यायला व आणून सोडायला लागायाचे. तर ह्या मंदिरात या डिगुतात्या बरोबर गांजा ओढन्यासाठी आजुबाजुच्या गावातील ठराविक लोकांचा मंदिरात दिवसभर राबता असायचा.
शेजारीच कुशाबा ठोसर यांचे हाँटेल कम किराणा मालाचे दुकान होते. बेसन लाडू, रेवडी, लाल शेंगोळी, साखरेच्या गोळ्या व त्या काळातील साठे बिस्किट तेव्हा फेमस होते.
रोज डेअरीला अर्धा लिटर दुध घालणाराची सुद्धा तेथे उधारी असायाची.
१९८८ साली शिरगावला शासनाच्या वतीने रंगीत टिव्ही संच मिळाला.तेव्हा नुकतीच रामायण मालीका सुरू झाली होती. शनिवारी व रविवारी मराठी व हिंदी चित्रपट असायचे. हा टिव्ही मारूतीच्या मंदिरातील समोरच्या भिंतीला भगदाड पाडुन त्यात बसवलेला होता.समोरच्या जमिनीवर बसुन आम्ही टीव्ही मालीका व चित्रपट पहायचो. शनिवारी व रविवारी तसेच रामायण व महाभारत मालीका पहायला मंदोशी गावठाण जावळेवाडी,मोहणवाडी व हुरसाळे वाडीतील संपुर्ण तरूणाई लोटायची. शे-दोनशे लोकांची गर्दी व्हायची. शिरगाव नवचैतन्याने फुलून जायचे.
पुर्वी शिरगावला यात्रा भरत नसे. छोटासा भंडारा भरत असे. परंतु १९८९ साली गावातील उत्साही कार्यकर्ते माझ्या माहिती प्रमाणे कारण मी त्या गावचा नाही श्री.पांडुरंग लांघी श्री धोंडिभाऊ लांघी, कै.हरिभाऊ शिर्के,श्री नारायण कदम, श्री रामचंद्र शिर्के व इतर ग्रामस्थ यांनी गावात प्रथमच ग्रामदैवत जानकादेवीची यात्रा भरवली. रात्री देवतोरणे येथील भारूडाचा कार्यक्रम ठेवला.
त्या काळात देवतोरणीचे भारुड अतिशय प्रसिद्ध होते. ते भारूड पाहण्यासाठी भागातुन त्यावेळी "न भुतो ;न भविष्यती"अशी गर्दी उसळली.अशी प्रचंड गर्दी पुन्हा होणे नाही. त्या भारूडातला कलाकार स्री आणि पुरूष असे दोन्ही आवाज काढुन गाणे म्हणायचा. त्याने म्हणलेले मी जालवंती मी फुलावंती,व थांब थांब पोरी बाप गेला दुरी हे अजूनही अनेकांच्या स्मरणात असेल.
परंतु काळाच्या ओघात राजगुरुनगर भिमाशंकर रस्ता झाल्याने एस टी स्टँडवर असलेल्या पाराचे महत्त्व लयाला गेले. पुर्वी मंदोशीला जाण्यासाठी शीरगावातुन रस्ता होता.नविन रस्ता गावाच्या बाहेरून झाल्याने गावातील संपर्क जवळ जवळ बंदच झाला.अनेकांकडे टिव्ही आले. गावागावात दुकाने झाली. त्यामुळे लोकांची वर्दळ आपोआपच कमी झाली. कै.कुशाबा ठोसर यांच्या मृत्यू नंतर त्यांचे हाँटेल कम किराणा दुकान काळाच्या ओघात लुप्त झाले.
डिगुतात्याच्या मृत्यूनंतर मारूती मंदिरात दररोज गांजा ओढण्यासाठीं येणारे भाविक कधी लुप्त झाले हे गावक-यांना देखील कळले नाही.भिमाशंकर रस्ता झाल्याने एस टी स्टँडवर असणारा पारही आज शेवटच्या घटका मोजताना दिसतोय. आजही कधी तेथे गेल्यावर स्टँडच्या पाराची आवस्था पाहुन जुन्या स्मृती दाटुन येतात व मन विषण्ण होते. व आपणही या पाराचे काही देणे लागतो या जाणिवेतुन काहीतरी करावे असे वाटते परंतू त्यात गावचाही सहभाग असला पाहिजे हा विचार मनात येऊन मुळ विचारच नष्ट होतो.
गावाला आलेल्या एखाद्या मुंबईकराला एस टी पर्यंत पोहोचवण्यासाठी अर्धा गाव या स्टॅन्ड वर गोळा व्हायचा. त्याचप्रमाणे आलेल्या पाहुण्यारावळ्यांना गाडीपर्यंत पोहोचवण्यासाठी या एसटी स्टँड वर लोक जमत असत. छान पैकी गप्पागोष्टी होत. गाडीची वाट पाहिली जाई.
आमच्या गावच्या यात्रेच्या दिवशी मंदोशीचे झाडून सारे लोक पारावर गोळा होत. पारावर शी दोनशे लोकांची गर्दीज होई. मुंबईवरून येणाऱ्या हारतोळ्यांची लोक वाट पाहत असत. थोड्याच वेळात एसटी आल्यावर मुंबईकर देवाची छत्र चामरे, हार तुरे घेऊन उतरत असत. त्याचवेळी फटाक्यांची आतषबाजी होई. कोंडीबा जठार यांची बैलगाडी हारतुरे नेण्यासाठी सज्जा असे. शिरगावच्या सौभाग्यवती महिला हार तुरे यांची पूजा करण्यासाठी मोठ्या संख्येने जमा होत असत. प्रत्येकाला कुंकू लावली जाई. या पारावर एकच जल्लोष पाहायला मिळे. लोक हरिनामाच्या भक्ती तल्लीन होऊन नाचत असत. हर हर महादेव च्या व काळभैरवनाथ महाराज की जय च्या घोषणांनी असमंत दुमदुमत जात असे. पारावरून लोकांची मिरवणूक मधील गावातील रस्त्याने मंदोशीच्या दिशेने रवाना होई. गुलालाच्या उधळणीने लोकांची कपडे लाल भडक होत असत. लोकांची एकच गर्दी पाहायला मिळे. आजही अशी मिरवणूक निघते. परंतु ही मिरवणूक गावाबाहेरून जाते.
एस टी स्टँडवर असलेला पार,मारूती मंदिरात असणारा डिगुतात्या,कुशाबा ठोसर व त्यांचे दुकान, दमरू वाजवणारा दगडू भराडी,नामदेव केदारी यांचे रेशनिंग दुकान,दूधवाल्या गवळ्यांचे आवडते ठिकाण म्हणजेच निजामच्या आब्बाचे दुकान,मंदोशीला शिरगावातून जाणारा रस्ता, मारूती मंदिराच्या भिंतीमध्ये असणारी रंगीत टिव्ही व ते पाहण्यासाठी होणारी गर्दी हे आता काहीच शिल्लक राहिले नाही. एकेकाळी हे त्या गावचे वैभव होते.गावची शान होते.परंतु काळाच्या ओघात हे सर्व नष्ट झाले.प्रत्येकाचा जसा बहराचा काळ असतो तसा उतरणीचाही असतो.आता राहील्या फक्त आठवणी.या आठवणीच आपल्याला साथ देतात जगायची उमेद देतात.
श्री रामदास तळपे (मंदोशी ता.खेड जि.पुणे*
