Krishna Shiwarkar

Children classics drama

4.0  

Krishna Shiwarkar

Children classics drama

नदीकाठचे रम्य बालपण

नदीकाठचे रम्य बालपण

12 mins
417



    आमचे गाव वर्धा जिल्ह्यातील, देवळी तहसिलमध्ये, वर्धा नदीवर वसलेले जवळपास २००० लोकसंख्या असलेले 'शिरपूर' असे त्या गावाचे नाव.

    सन १९८५ - ८६ चा उत्तरार्ध, आमचे वासुदेव मामा त्या वेळी विटभट्टीच्या कामासाठी रोजगार म्हणून आमचेकडेच राहत असे. त्यांचे मित्र व ते दोघेही विटा बनवण्याचे काम करत असत. माझे वय त्यावेळेस पाच, सहा वर्षे असेल. घरी मी आईला खुप त्रास देत असल्या कारणाने, मामा व त्यांचे मित्र त्यांच्या कामानिमित्य एक दिवस नदीवर घेऊन गेलेत. विटभट्टी नदीच्या पलिकडे असल्यानेे माणसाच्या गुढग्याएवढे पाणी ओलांडून जात असतांना माझ्या आयुष्यातिल पहीला परिचय नदीशी झाला. तो स्वच्छ व प्रचंड प्रवाह असलेला झरा, त्यात दिसणारे पांढरे शिंपले व शंख व भर उन्हाळ्यात चमकणारी काळी रेती व प्रवाहामुळे दिसणाऱ्या रंगित, वळणदार छटा या गोष्टी माझ्यासाठी अद्भुत होत्या. ति प्रतिमा अजूनही जशीच्या तशी मनावर कोरलेली आहे. मी त्यांच्या मागे पाण्यातून चालत होतो, पाण्याची खोली वाढत होती, पाणी कंबर आणि छाती पर्यंत आले, प्रवाहाचा वेग वाढला व स्वत:ला सावरण्याचे नियंत्रण कमी झाले, तसाच भितीने ओरडून हाक मारली. मामा व त्यांचे मित्र माघारी आले व मला अलगद उचलून पलिकडे घेऊन गेलेत.

   घरी रिकाम्या वेळेत आई व काही शेजारच्या बाया नदीकाठच्या जंगलात मोळी आणायला जायच्या, मी हट्ट करून, त्यांच्या मागे लागून जात असे. त्यांच्या चर्चेमध्ये काही नदीकाठच्या ठिकाणांची माहीती झाली. येसोबाचा ढोडा, नार, आगीबेंताई, भोंडेवालं, कानगोकूळाचा घाट, मामे-भाच्यांच्या मोठ्या दगडी प्रतिमा, महार घाट, कुणबी घाट, मुडदुडी, कोटेश्वर, थाटेश्वर, कळंब नदी ( वर्धा नदीची उपनदी ) आणि असे बरेच काही त्या ठिकाणांची नावे.

    साधारण सन १९९२ - ९३ च्या दशकानंतरचा कालखंड. इयत्ता पाचवी पर्यंत शिक्षण घेत असतांना स्वत:ला कधी आर्थिक झळ पोहचली नव्हती. शाळेत जाणे, अभ्यास करणे, पहीला क्रमांक मिळवणे, शिक्षकांच्या लाडात राहणे, मस्त्या करणे, घरी असतांना ऊणाडक्या करत गावभर फिरणे एवढीच दिनचर्या मस्त चालली होती. परंपरेने लादलेला व एकमेव उपजिवेकेचे साधन असलेला व्यवसाय म्हणजे 'मासेमारी करणे' हा होता. घरची आर्थिक बाजू जेमतेम असल्याकारणाने, मी पाचवीत असतांनाच वडीलांना व मधल्या भावाला हातभार म्हणून त्यांच्यासोबत नदीवर मासे पकडण्यासाठी जाणे भाग पडले.

    आमच्या कुटुंबातिल सदस्य संख्या सहा होती. तिन भाऊ, एक मोठी बहिण व मी सर्वात लहान.

    मोठा भाऊ अशिक्षित, त्याला शिक्षणाची अँलर्जीच होती असे म्हणायला हरकत नाही. त्याला मासे पकडण्यात काहीच रस नव्हता, तो ट्रकवर रेती भरायला जाऊन चार पैसे कमवून आणायचा. मधला शाळेतच माझ्यापेक्षा दोन वर्ग पुढे होता पण अभ्यासात एकदम जेमतेम, गणिताचे काही प्रश्न मीच त्याला सोडवून देत असे व ताईने चौथीपासूनच शाळा सोडलेली. शेतात मजुरीला जाऊन ती कुटुंबाच्या उदरनिर्वाहाला हातभार लावत होती. वडीलांचा वडीलोपार्जित मासे पकडण्याचा धंदा असल्यामुळे त्यांनी इतर कौशल्य हस्तगत करण्याचे टाळले.

    रविवार शाळेला सुट्टी असणे म्हणजे हमखास नदीवर मासे पकडायला जाणे ठरलेलेच असायचे. पण पुढे जाऊन अशी वेळ आली की, मन मारून सुट्टी टाकावी लागत व नाईलाजाने नदीवर जावे लागायचे. नाही म्हटले तर खाणे, पिणे व शिक्षणाचा खर्च यांचा प्रश्न उपस्थित व्हायचा.

    बरेचदा मी विरोध करण्याचा प्रयत्न केला पण अयशस्वी झाला. जसजसे वय वाढत गेले व एक एक वर्ग पुढे सरकत गेलो तेव्हा परस्थितीची जाणिव व्हायला लागली. शाळेत हुशार असल्यामुळे वर्गात फेमस व शिक्षकांचा लाडका असल्यामुळे माझे व शाळेचे घट्ट, अतुट नाते जुळले होते. इयत्ता चौथी नंतर कधी वाटलेच नाही की शाळेला सुट्टी मारावी म्हणून. पण पोटा, पाण्याचा प्रश्न स्वस्थ बसू देत नव्हता. 

    शाळेत कधी कधी महत्वाची घटक चाचणी असतांनादेखिल सुट्टी टाकावी लागत. ज्या रस्त्याने मासे पकडण्याचे साहीत्य डोक्यावर घेवून जावे लागत असत ऐन त्याच रस्त्यावरून वर्गातिल मुली शाळेत जाण्यासाठी येतांना दिसत तेव्हा माझा स्वत:चा अवतार पाहून खुप ओशाळल्यागत व्हायचे. लाजून खाली मान घालून सरळ चालण्याच्या प्रयत्नात असतांना त्या मुली खी खी दात काढून हसायच्या व टोमणे मारायच्या "हं...आज सुट्टी आहे वाटतं शाळेला, मासोळ्या पकडण्यासाठी...!" मी निरूत्तर होऊन पुढे चालत जाणे याखेरीज उपाय नव्हता.

   चालत चालत दोन तिन कि.मी. नदीवर पोहचल्यानंतर आम्ही दोघे भाऊ व वडील पहिलवाणासारखे चड्डी धारण करून मासोळ्यांच्या आखाड्यात उतरून मासेमारी चालू व्हायची. वडील आणि भाऊ जाळ्यांचे दोन्ही टोकावर उभे राहून ते ओढत आणायचे. या दरम्यान मी लहान असल्याने माझ्याकडे फारसे अवजड काम नव्हते, परंतु लांबवरून खोल पाण्यातून मासे हाकलत आणण्याची जोखिम मात्र पत्करावी लागे. मी पोहण्यात पटाईत होतो. पण खोल व स्वच्छ पाण्याची काल्पनिक धास्ती मात्र मनात निर्माण होऊन हृदयाचे ठोके वाढायचे. कधी कधी पायाला एखादे झाडाचे खोड, कधी खडक, कधी एखादा मोठा मासा, कधी प्राण्यांच्या हाडांचा सांगाडा शेंदून जायचा तेव्हा मात्र कल्पनेने थंड पाण्यातही घाम फुटल्याशिवाय राहात नव्हता. वडीलांच्या प्रभावामुळे मला पाण्यात असली भिती वाटते असे म्हणायचे कधी धाडसच झाले नाही. गढूळ, पुराच्या पाण्यात भिती वाटत नव्हती कारण त्यात काही दिसण्याचा प्रश्नच नव्हता. 

    कधी कधी जाळे गोल करून, खालचा भाग चिखलात रोवून ते पॅक करावे लागायचे जेणेकरून मासे निघून जाऊ नयेत म्हणून. जाळ्यांच्या आतला चिला ( पाण्यातिल गवतासारखी वनस्पती ) खोल पाण्यात बुडी मारून तोडावा लागत असे व संपुर्ण कचरा साफ करावा लागे. या कामात श्वास रोखून धरण्याची कला अवगत करावी लागली. हे काम चालू असतांना हाताला काय लागेल याचा भरोसा नव्हता. मासे समजून पाण्यातील सापदेखिल हातात यायचा तेव्हा थोडे धडकल्यासारखे व्हायचे. वडीलांना सांगितले की ते म्हणायचे, " काय होते बे याले, 'धोंड्या सरप' (पाण्यातिल सापाची एक जात) हाये न तो ! " मग ते मला बाजूला सरकवून सापाची शेपटी पकडून पाण्याबाहेर फेकून द्यायचे. तेव्हा भिती कमी व्हायची. खोल पाण्यातिल बिळात हात घालून मासे बाहेर काढण्याचा मला छंद जडला होता. मोठ्या माणसांनी सांगितले होते की पाणी भरलेल्या बिळात साप नसतात त्यामुळे आत्मविश्वास वाढला. परंतु त्यांनी हे नाही सांगितले की तिथे मोठे मोठे खेकडे आ वासून बसलेले असतात. एकदा असेच सवयीप्रमाणे बिळात हात घालून पाहीला तर खेकड्याने मला अद्दल घडवण्यासाठी बोटाचा लचकाच तोडला, तेव्हापासून बिळात हात घालणे बंद झाले.

   नदीवर मासे पकडायला जाणे हा माझा छंद नव्हताच मुळी, तर ती एक गरज होती. एकदा चुलत मोठ्या भावासोबत गळाच्या दावणी टाकायला गेलो. एका दावणीला शंभर गळ (आकडे) असायचे, त्याला चारा लावून पाण्यात सोडायचे. चारा म्हणजे गांडूळ, छोटे झिंगे, बारिक मासे जे मिळेल ते लावणे. संध्याकाळी माझ्या चार, पाच दावणीला चारा लावून झाला व त्याने जास्त दावणी लावल्या असतिल, वयाने व अनुभवाने मोठा. खोल डोहात त्या दावणी टाकायच्या होत्या त्यामुळे जड वाहनाच्या टायरमधिल ट्युबमध्ये हवा भरून दोघांनिही दूर अंतरावर त्या दावणी टाकल्या. तो माझ्यापासून खुप लांब होता, अंधार होत असतांना कसे तरी भित भित काम संपवलेे व घरी आलो. दुसऱ्या दिवशी दोघेही त्या दावणी उचलायला नदीवर गेलो. ट्युबवरून उचलत उचलत, लागलेले मासे काढणे व पुढे जाणे असे सहज चालू होते. पण अचानक एक दावणीचा गळ खोल पाण्यात अडकून पडला. जोर लावून ओढला तरी निघता निघेना. तोडून काढावी तर अर्धी दावण पाण्यातच राहील म्हणून त्याला मदतीसाठी हाक मारली. पण तो लांबूनच, उंटावरून शेळ्या हाकलत होता व मला शिव्या घालत होता. "अबे, उतर त्या ट्युबरून, पाण्यात बुडी मार व हाताने काढ तो गळ, अटकला असन एकांद्या खोडाले...!" पाण्याची दिड माणूस खोली पाहून मनात भितीने घर केले. कशाला अडकला असेल गळ म्हणून नाना शंका घर करायला लागल्यात. हिंमत होत नव्हती. पण त्याचा शिव्यांचा जोर पाहून, शेवटी उडी मारलीच एकदाची. हाताला एक भले मोठे, लांबसडक, गोल व चिकने वेटोळे लागले. काळजाची धकधक वाढली. काय असेल ते. एका भयानक, महाकाय सापाची प्रतिमा डोळ्यासमोर उभी झाली. व तसाच पाण्याबाहेर आलो. मी त्या चुलत भावाला घाबरत सांगण्याचा प्रयत्न केला परंतु त्याचा संताप वाढलेला पाहून, जे होईल ते होईल, पाहून घेऊ, म्हणत परत बुडी मारली व ते जड वेटोळेच बाहेर घेऊन आलो. पाहतो तर काय ! भला मोठा तंबू ( सापासारखा दिसणारा एक माशाचा प्रकार ) त्या गळ्यात अडकलेला. बरं झालं, तो जिवंत नव्हता म्हणून, नाहीतर गळ तोडून पळाला असता. भितीचे सावट कमी झाले व किमती मासा आपल्याला गवसला म्हणून आनंद द्विगुणीत झाला.

    झाडांच्या फांद्या एकत्र करून त्या खोल पाण्यात महिनाभर बुडवून ठेवायच्या व तिथे अनेक प्रकारचे मासे मुक्कामाला यायचे. या पध्दतीला 'झाडी टाकणे' असे नाव होते. मुदत संपताच त्या भोवती जाळे गोल करून झाडी काढण्याचा प्रकार चालायचा. हमखास चांगली किंमत येणारे मासे लागायचे व बाजारात नेऊन विकायचे तेव्हा चांगली कमाई झाल्याचे समाधान होत होते.

    साधारण एक एकर नदीच्या सपाट जागेत तात्पुरती गुडघ्याएवढी रेतिची भिंत उभी करणे, दोन्ही टोकाला पाणी आतमध्ये शिरण्यासाठी किंचीत जागा मोकळी सोडायची व संध्याकाळी तिथे सात, आठ बेंदे ( बांबुच्या बारीक कमच्यापासून तयार केलेला गोल व लांबट आकाराचा पिंजरा, ज्यातून छोटे झिंगे, मासे आत घुसत पण परत येऊ शकत नव्हते. त्याला 'कुमणी' असे पण एक पर्यायी नाव होते. ) मांडायचे. सकाळी जाऊन ते उचलणे, मासे विभाजित करून, बाजारात नेणे. या रेतीच्या पाराला 'धार पकडणे' असे व्यावसायीक नाव होते.

    सकाळी ते बेंदे उचलायला जाण्याची एक वेगळीच मजा होती. नदीचा संपुर्ण सपाट रेतिचा पृष्ठभाग, कशाचीही भिती नाही. सोबत समवयस्क मित्र असले की मग अजून मुक्त वावरायला वाव मिळायचा. वडील व काही इतर जेष्ठ मंडळी मासे बाजारात घेऊन जायचे व आम्ही काही मासे शिल्लक ठेवून त्यांचा भाजीसाठी उपयोग करणे व घरून आणलेल्या भाकरी, पोळ्यांसोबत खाणे हा उपक्रम राबवत होतो. या प्रकाराला 'भगुणं' हे नांव होते. हा प्रकार कालांतराने खुप लोकप्रिय झाला. कोणी खेकडे पकडत, कोणी मासे विकत घेऊन, दारू पिऊन कृत्रिमरित्या 'भगुणं' बणवण्याचा आस्वाद घ्यायला लागलेत पण जी चव नैसर्गिक पध्दतिला होती ती कृत्रिमतेला कुठून येणार ?

    भगुणे बनवून ते संपवून झाले की आम्ही वेगळ्या कामाला लागायचो. एकमेकांच्या मागे धावणे, पाण्यातिल शैवाल फेकून मारणे, पकडम पकडाई खेळणे, पाण्यातले डोंगे ( छोटी होडी ) चालवणे, त्यात स्पर्धा करणे व मनसोक्त आनंद लुटणे, दिवस कसा जायचा ते कळतच नव्हते. आजही ते दिवस आठवले की वाटते खरा आनंद तोच होता बालपण आणि नुसते हुंदडत फिरणे, ना कोणती जबाबदारी ना अतिअपेक्षित कर्तव्य.

    १९९० पर्यंत आमचे गाव जूनी वस्ती म्हणून अगदी नदीच्या टोकावर होते. पण पुराच्या संभावित धोक्यामुळे त्याचे नविन वस्तीमध्ये वर्धा यवतमाळ रोडवर स्थलांतर करण्यात आले, त्यामुळे नदीचे व गावाचे अंतर वाढले. अगदी त्याच काळात वडील ग्रामपंचायतचे उपसरपंच म्हणून निवडून आले. आणि विशेष म्हणजे निवडणूक चिन्ह 'मासा' हे होते. त्यावेळेस वडीलांना उपसरपंच पदावर निवडून आल्याबद्दल मुख्यमंत्री, राज्यपाल व प्रधानमंत्री या मोठ्या राजकीय लोकांची अभिनंदनपर पत्रं यायची, मला पाहीजे तसे त्या काळात या गेष्टींचे ज्ञान नव्हते परंतु जेव्हा माध्यमिक शाळेत प्रवेश केला तेव्हा या गोष्टींचे महत्व कळायला लागले आणि मला नवल व वडीलांबद्दल विशेष अभिमान वाटायला लागला, व आठवण म्हणून आजही ती पत्रं तशीच जपून ठेवलित. उपसरपंच पद असल्यामुळे साहजिकच गावातील लिडर लोकांचे घरी येणे जाणे वाढले त्यामुळे पकडलेले काही मासे फुकटातच अर्पण करावे लागत. 

  गावापासून पश्चिमेस ६ कि.मी. अंतरावर कानगोकूळाचा घाट प्रसिध्द होता. तिथे आजोबा, वडील आणि भावंडांसोबत मासे पकडायला गेल्यावर आजोबा त्या ठिकाणाची आख्यायीका सांगायचे. "हा एक पाण्याचा खोल डोह असून काठाच्या खालच्या भागात एक मोठे भुयार आहे. पुर्वी एकदा एका गुराख्याचा गायींचा कळप नदीकाठे चरायला आला होता. त्यापैकी एक गाय पोहता, पोहता खोल पाण्यातून भूयारात शिरली. त्यापाठोपाठ गुराखी तिला आणायला गेला. पाहतो तर काय, एक मोठे साधू महाराज तिथे ध्यानस्थ बसलेले. त्यांच्या बाजूला गाय उभी. गुराख्याने गाय घेवून जाण्याची विनंती केली. साधूने त्याला गाय व सोबत काही वालाच्या शेंगा दिल्या. गुराख्याला वाटले काय त्या शेंगा दिल्यात म्हणून रस्त्यात फेकून दिल्या व गाय घेवून काठावर आला. पण एक शेंग त्याच्या कपड्याला चिकटून राहीली. पाहतो तर काय ती सोन्याची होती. नंतर त्याला शेंगा फेकून देण्याचा पश्चाताप झाला." आजही त्या काठावर महाकाळ हत्ती, घोडे, उंटाचे माग उमटलेले दिसतात. याबद्दल आजोबांनी फारसे काही सांगितले नाही. फक्त पुर्वी इथे खुप मोठी गवयांची वस्ती होती असे त्यांनी सांगितले. पण गम्मत म्हणजे मला मासोळ्या पकडतांना त्या कथेतिल प्रतिमा दिसायच्या व मी घाबरून पाण्याबाहेर येत असे. तेव्हा वडिलधारी मंडळी मला रागवत व मी परत कामाला लागयचो.

    वर्धा नदी ही पश्चिम-पुर्व वाहीनी असल्याने पश्चिम दिशेला वरचा भाग व पुर्व दिशेला खालचा भाग असे संबोधत असे. 

    अर्धा हिवाळा संपताच त्या दिवसात पुर्वी डांगराच्या वाड्या खुप प्रसिध्द होत्या. परंपरेनुसार त्या वाड्या नदीच्या पात्रात रेतिमध्ये लावण्याचे प्राधान्य भोई समाजाला होते. एक जोड व हंगामी व्यवसाय म्हणून याकडे पाहीले जायचे. गावातिल सर्व भोई समाजातिल लोक डांगर पिकवण्यासाठी खुप मेहनत घेत असत. काळ बदलत गेला व स्पर्धा वाढत गेली तसेच व्यवसायात जाती भेदभाव नको या सबबीखाली काही इतर समाजातिल लोक यामध्ये हस्तक्षेप करायला लागलित. मग भांडण-तंटा होऊ नये म्हणून हा विषय ग्रामपंचायतने आपल्याकडे राखून घेतला व जे लोक डांगर पिकवण्यास इच्छुक आहेत अशांची यादी तयार करून, समान जागा वाटप करून त्यामध्ये डांगरांची लागवड करण्याची परवानगी देण्यात आली.

    ग्रामपंचायतचा एक कर्मचारी प्रत्यक्ष हजर राहून सर्वांना समान वाटणी येईल अशी मोजमामाप करायचा. लकी ड्रॉ काढल्याप्रमाणे ज्याच्या वाट्याला जो भाग येईल तिथे निमुटपणे कामाला लागायचे. मग ती रेतीची जमिन निब्बर, नरम, उथळ, खोल, खालचा भाग, वरचा भाग, लांब, जवळ जशी असेल तशी तिथे आपल्या सोयीनुसार मशागत करून लागवडीच्या कामात आणायची.

    एकदा बियांची लागवड चालू झाली की मग जरा हायसे वाटायचे. या हंगामात नेमकी सकाळची शाळा असायची. शाळेतून घरी आल्यावर दप्तर ठेऊन दिले की, जेवणाची शिदोरी घेऊन नदीवर भावासोबत वाडीकडे जायचे. रोपटे वाढल्यानंतर वाडी भोवती काट्यांचे कुंपण असायचे. त्याला एक काटेरी, पालापाचोळा मिळून बनविलेला दरवाजा असायचा. वाडीच्या आत एक उंच असे मचाण असायचे. काही पक्षी व प्रण्यांपासून डांगराच्या वाडीचे संरक्षण व्हावे म्हणून तिथे आम्हाला पाठवण्याचा प्राथमिक उद्देश असत. पण आमच्यासाठी तो एक आनंदाचा क्षण असे. 

    डांगर पिकण्याच्या मार्गावर आले की तिथे रानातील दिवसा विविध पक्षी व रात्रीला प्राणी गस्त घालायचे. काटेरी कुंपण होतेच त्यामुळे प्राणी सहज आत घुसत नव्हते परंतु पक्षी मात्र ताव मारण्यासाठी मागे पुढे पाहात नव्हते यासाठी तिथे पाळत ठेवणे आवश्यक होते. 

    त्यावेळी सकाळाची शाळा असायची. सकाळी ११ ला घरी आलाे की, खुप मज्जाच मज्जा, कारण सर्व आपल्या मनाप्रमाणे हाेते. ताे जानेवारी-फेब्रुवारी चा थंड-गरम माेसम. काम आणि जबाबदारीचे टेन्शन नाही. पण घरच्यांनी आम्हा दाेघा भावंडांना वाडीवर राखण करायला जाण्याची जबाबदारी लावून दिली हाेती जी आम्हाला हवी-हवीशी हाेती.

    शाळेचे दप्तर दाेघांनिही घरी याेग्य जागेवर ठेवले की, शिदाेरी घेवून उड्या मारत निघायचे. चालतांना डुलत, बागडत, हुंदडत शाळेतल्या मुरकुटे बाईंनी शिकवलेली चालबद्ध नविन कविता 

"ऋतू संगे बाेलू, ऋतूंना विचारू या गं, ऋतू संगे बाेलू...!" 

ही कविता माेठ-माेठ्याने म्हणत कधी उघड्या नदीची सपाट रेती पार हाेऊन आमच्या वाडीचे काटेरी गेट यायचे ते कळत नव्हते.

    माेठाली हिरवी पाने व अर्धवट पिकलेल्या डांगरांचा घाेस आमचे दिमाखात स्वागत करायचे. प्रवेश करताच चटकलेले पक्षी भर्र ऊडून जायचे. गेल्या गेल्या पहीले मचाणावर जाऊन बसायचे, जणू एखाद्या इमारतिच्या दुसऱ्या मजल्यावर जाऊन बसल्याचा आनंद हाेत हाेता. भुक लागलेलीच असायची शिदाेरी साेडून उकडलेल्या बटाट्याची भाजी व ज्वारीचा जमाना संपून पाेळ्यांची नव्हाळी असल्याच्या मध्यंतरीचा काळ, त्यामुळे ताव मारून ढेकर द्यायची व नदीला काेमट पाणी असल्या कारणाने जवळच रेतीमध्ये एक खड्डा खाेदून, नविन झरा लागेल एवढे पाणी झाेकायचे व ताे थंडगार, निर्मळ झऱ्याचे पाणी पिऊन आपले नसले उद्याेग चालू व्हायचे. 

     त्या निसर्गरम्य वातावरणाचे शब्दात वर्णन करणे अवघडच. वाडी मध्यभागी असल्या कारणाने, चाेहीकडे हिरव्यागार वाड्यांची रांग, दाेन्ही तिरावर वाहणारा पाण्याचा मंदगती झरा व त्याही पलीकडे नदीच्या काठावरती माेठाली हिरवीगार झाडे आमच्या नसल्या उद्याेगाला प्रतिसाद द्यायची. मग ते उद्याेग तरी काय ? 

    वाड्यांच्याच काठाला उतारावरती इतर भाेई लाेकांच्या छाेट्या लावून ठेवलेल्या असत. त्यांना 'डाेंगा' असे प्रचलित नाव हाेते. दिसला की ढकलला पाण्यात, त्यावर एक लांबसडक बांबू असायचा चालवण्यास. थकवा येईपर्यंत त्या डाेंग्यावर बसून सैर करायची व जिथला तिथं आणून साेडायचा. मालकाला माहीत पडले तरी काेणी आक्षेप घ्यायचे नाही. ते झाले की मग छाेटे मासे पकडण्याचा कार्यक्रम चालू हाेत असे. जेवण केलेल्या डब्याला, वाटीला फडके बांधायचे व अगदी करंगळी घुसेल एवढे त्या फडक्याला छिद्र पाडून, त्यात पाेळीचे तुकडे टाकून वितभर पाण्यात स्टीलचा भाग रेतित राेऊन ठेवायचा व माशांना केवळ फडके दिसेल असे ठेवायचे, दहा एक मिनिटात मासे त्यामध्ये गर्दी करून अडकायचे. दाेन फेरीतच त्यांना एकत्र करून भाजी करायची की वाळवत टाकायचे हे नंतर ठरायचे. असा उद्याेग चालू असतांना एखादा काेल्हा वाडीत घुसायचा. ताेपर्यंत घरचे लाेक तिथे यायचे व काेल्ह्याला पळवत आमच्यावर शिव्यांचा वर्षाव करायचे पण या बाल मनाला या आनंदापुढे त्याचे काहीच वाटत नव्हते.एक महीनाभरातच डांगरांची परीपक्व वाढ हाेऊन ती पिकायला सुरूवात हाेत असे व जिल्ह्याच्या ठिकाणाची व्यापारी मंडळी तिथे येऊन गर्दी करत. त्यांच्या वाहनांनी ते सर्व लाेकांच्या माल घेऊन जायचे. साेबत आमचे सर्व वडीलधारी मंडळी व इतर त्या डांगरांच्या मालाचे मालक साेबत जायचे, हा कार्यक्रम सकाळी सहा ते नऊ वाजे पर्यंत चालायचा व त्यानंतर आमची बालऊद्याेग चालू व्हायचा. पिकलेली फळ शाेधून, चाखून, ती गाेड नसेल तर बाजूला ठेऊन, चवदार डांगर फस्त करणे या ऊपद्व्यापात कित्येक डांगरांची फळे वाया जात असत, ती फळे वाया जाऊ नयेत म्हणून रानटी पक्षांची शिकार करण्यास उपयाेगात आणली जायची.

   दिवसभर ऊनाडपणा करून संपला की सायंकाळी घरी येतांना अंगणात सडा टाकण्यासाठी रानातून परत येणाऱ्या गुरांचे शेण गाेळा करून घरी आणायचे व आपण काही तरी छाेटी जबाबदारी पार पाडल्याचे समाधान चेहऱ्यावर झळकायचे.

   सकाळी बाजारात गेलेला माल विकूण वडील सायंकाळी अथवा रात्रीला घरी परतायचे, नेहमीप्रमाणे पिशवीत काही तरी सरप्राईझ असे, त्यामध्ये खाऊ हा ठरलेलाच., कधी जिलेबी, लाडू, शेव-चिवडा तर कधी द्राक्षे असायची, या व्यतीरिक्त आमच्यासाठी नविन चपलांचा जाेड, कधी महागडे कपडे त्यामुळे प्रत्येक वेळेस उत्सुकता लागून असायची की वडीलांनी आज काही तरी नविन आणले असणार !

   असेच एकदा वडीलांनी त्या काळात एक माेठे भिंतीचे घड्याळ आणले ते पाहून अतिशय आनंद झाला, दिवसातून शंभरवेळा त्या घड्याळात वेळ पाहण्यातच जायचा.

   परंतू आज ती वेळ बदलली आहे. मागे ते सर्व बालपण, त्याच्या गाेड आठवणी कुठे तरी हरवल्यासारखे वाटत आहे. ताे निष्काळजीपणा, ऊनाडपणा, बिनधास्त आचरण व बेजबाबदारपणा कुठे तरी बालपणाच्या इतिहासातील शेवटल्या पानात दडून असल्यासारखे वाटत आहे.

   आजही ती शेवटली पाने उलटून पाहीली की डाेळे पाणावतात. त्याच घड्याळीचा उपयाेग करून टाईम मशिनचा शाेध लावावा व मागिल पंचविस-तिस वर्षे त्या हरवलेल्या बालपणाचा प्रवास करून यावे असे या बावीसाव्या शतकातिल, 4जी, 5जी च्या जमान्यातील 'आपण कधितरी लहान हाेताे' असे वाटणाऱ्या माझ्या हळव्या, बाल मनाला सतत वाटत राहते.

     'आय लव्ह यू अँड मिस यू साे मच माय डियर चाईल्डहूड..!'


Rate this content
Log in

Similar marathi story from Children