Krishna Shiwarkar

Comedy Drama Classics

4  

Krishna Shiwarkar

Comedy Drama Classics

भाऊ स्टाफ आहे

भाऊ स्टाफ आहे

3 mins
376


    सायंकाळचे ५ वाजलेत, कामगिरी संपली, नेहमीप्रमाणे वर्कशॉप सोडून बसस्थानक गाठले, परंतू आज वर्धा येथे न जाता, आज गावाकडे जायचे हाेते त्यामुळे लॉंग रूट ची बस न पाहता सरळ जवळपासची सुपर बस पकडली तिचे नाव 'यवतमाळ वर्धा नागपूर', म्हटले नजिकच्या वर्धा विभागाची असल्याने गावी उतरणे सुलभ होईल, या कारणाने सदर बसमध्ये चढलाे, चढतांना दाेन सहकारी साेबत हाेते, त्यापैकी एक देवळी ला व दुसरा वर्धा येथे उतरणार होता. त्यांचा काहीच वांदा नव्हता.

   परंतू चढतांना चालकाने चिडक्या स्वरात "कळमवाले प्रवाशी बसू नका" असे आव्हाहन केले. मनाला थाेडा धिर आला, कारण कळमपासून पुढे माझे गांव शिरपुर 12 किमी अंतरावर असल्याने यवतमाळ नंतर शिरपूरला थांबवणे साेयीचे होते, तसेच आज कळमचा बाजार असल्याने या बस ला भिडी गावाचा थांबा असल्याने ग्रामीण भागातिल 'मदिरा शौकीन' लाेकं खुप गर्दी व गोंधळ करतात, अर्धी बस कळमच्या प्रवाश्यांनिच भरते व तेथून पुढे लाॉंग रुट चे प्रवाशी मिळत नाही, याचा प्रत्यक्ष त्रास चालक, वाहकांना हाेत असताे, हे चालक जाणून असल्या कारणाने "कळमवाले बसू नका़...!" अशी सौम्य ताकीद दिली. पण लाोक मुजाेरी ने बसणार नाही ते कळमचे प्रवाशी कसले ! दाटीवाटीने प्रवाशी बसलेत.

   बस नेहमीच्या मार्गाने म्हणजेच जुन्या बस्थानकासमाेरून जाण्यास निघाली, आम्ही तिघे सर्वात शेवटी बसलेलाे. वाटेत इंग्रजी दारूचे दुकान लागते, ऐन रस्त्यावर काेणीतरी दारू पिणाऱ्या पादचाऱ्याने राडा केला, बराच वेळ वाद चालू हाेता, विकाेपाला जाताे की काय असे वाटत हाेते, आम्ही शेवट बसलाे असल्याने विशेष लक्ष देता नाही आले, पाच ते दहा मिनीटांनी बस पुढे निघाली. 

    शारदा चाैकातून कळमला उतरणारे बरेच प्रवाशी बसलेत त्यामुळे मनात विचार आला की, आधीच रस्त्यातिल वादामुळे चालकाची मनस्थिती खराब झाली असेल त्यात कळमचे प्रवाशी व तेथून भिडी चे गाेंधळ घालणारे प्रवाशी बसणार आणि आपल्याला भिडीपुर्वी पाच किमी अंतराच्या स्टॉप नसणाऱ्या गावी उतरायचे आहे, आता आपले कसे हाेणार म्हणून मनात गाेंधळ चालू झाला.

    बस कळमला आली, 15 प्रवाशी उतरले व 20 प्रवाशी अजून चढले त्यापैकी बरेच लाेक भिडी ला उतरणारे व ते सवयीप्रमाणे म्हणा अथवा पर्याय नसल्याने चालकाच्या केबिनमागे गर्दी करून उभे हाेते, शिरपुर दहा मिनीटात येणार हाेते, एवढ्या गर्दीत चालकाशी संवाद साधून बस थांबवणे जरा आव्हाणच वाटले, चालक चिढताे की काय असे वाटायला लागले. कल्पनेने उरात धडकी भरली, उतरू की नकाे असे झाले, शेवटी गाव जवळ आल्यावर माेठ्या हिंमतीने मनात परमेश्वराचे नाव घेऊन हिंमत केलीच.

    कसातरी गर्दीत रस्ता करून चालकापर्यंत पाेहचलाे, चालक नक्की शिव्या घालणार असे मनात बिंबवून घेतले.

    दुरूनच लाेंबकाळत चालकाच्या कानापर्यंत पाेहाेचलाे, व विनंतीवजा स्वरात बाेललाे, "भाऊ स्टाफ् आहे, जरा उडाणपुलापुर्वी उतरून द्याल काय ?"

   भाऊंनी लगेच रिप्लाय दिला, "अहाे काय हे, मी तुम्हाला बरेच दिवसांपासून ओळखताे, एवढी कशाला विनंती करावी लागते, चला मी आज तुम्हाला अलिकडे, पलिकडे न उतरवता थेट पुलाच्या खालून तुमच्या मेनस्टॉप जवळ पाेहचवताेय, एवढ्या लांबून पायी जाणार काय ..!"

   क्षणभर स्वत:च्या कानावर विश्वास बसला नाही, व मी बाेलण्यापुर्वी चालकांनी बस खालून वळवली, सर्व प्रवाशी हैराण झालेत. मी समयसुचकता साधून, चालकांना म्हटले, "अहाे एवढी घरपाेच सेवा कशाला करताय ?"

   यावर चालकाने उत्तर दिले, "सेवा आपल्या लाेकांना नाही द्यायची तर कुणाला द्यायची, बाकी अन्य सेवा आपल्याला आहेतच कुठे !"

   प्रवाशांची कुजबुज सुरू झाली, त्यापैकी एका ने टाेला दिलाच, "हंममम, डिपार्टमेन्टचा माणूस आहे तर द्या ना घरपर्यंत साेडून...!"

    तसेच वाहकानेही आपली प्रतिक्रिया नाेंदवली, "हाे आम्हीच तुमची सेवा करावी, व बस ब्रेकडाउन झाली की तुम्ही नाटकं करायचे...!"

    पण या सर्वांना उत्तर देण्याची ती अजिबात वेळ नव्हती, कारण ताे संपुर्ण कार्यक्रम अवघ्या दाेन मिनिटात घडला.

    उतरल्यावर जरा हायसे वाटले व परत विचार केला की, "आपण काय नकारात्मक विचार केला हाेता आणि काय सकारात्मक चमत्कार घडलाय..!'

   कधी कधी अपेक्षेपेक्षाही जास्त मिळते हे त्याचेच एक उदाहरण असावे...! 


........धन्यवाद.......


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy