डबल नाही, सिंगल...!
डबल नाही, सिंगल...!


शाळेचा पहीला दिवस, शाळा काय असते याची काहीच कल्पना नाही. वडील मला शाळेत घेऊन गेले. मुख्याध्यापक व शिक्षक यांची भेट घेतली. त्या काळात शाळेत नाव घालायची एक विचित्र पात्रता असे. आलेल्या उमेदवाराला त्याचा एक हात डोक्यावरून कानाला पुरतो की नाही ते बघायचे आणि मगच प्रवेश द्यायचा. मग त्याचे वय ६, ७ वा ८ वर्षे यापैकी कितीही असो. हेच माझ्याबाबत घडले, माझा हात कानाला पुरला. त्यावेळेस माझे वय ७ वर्ष होते. प्रवेश मिळाला. मनात धस्स झाले. आता आपल्याला शाळेत जावेच लागणार या भितीने पोटात गोळा आला.
मुलाला उद्यापासून शाळेत पाठवतो असे आश्वासन देऊन वडील मला घेऊन घरी आले. आमचे घर जुन्या वस्तित, नदीच्या काठी व शाळा नविन वस्तित. अंतर दोन कि.मी. व पायदळ जाण्यासाठी पांदण. वडीलांनी पाठी व लेखन घेऊन दिले.
दिवस उजाडला. जूनचा महीना. पाऊस धो धो चालू होता. पावसामुळे आजचा शाळेत जाण्याचा दिवस टळणार म्हणून मनात खुषी. पण कसले काय. ऐन शाळेत जाण्याच्या वेळेला पाऊस थांबला. पटकन तयारी केली, जेवन केले आणि मधल्या भावासोबत निघण्यास सज्ज झालो.
मधला भाऊ तिसरीत होता. त्याने हात धरून मला दोन्ही बाजूला शेत असलेल्या पांदणीतून पायी चिखल तुडवत चालत नेले. एकदाचे शाळेचे गेट जवळ आले. प्रशस्त इमारत. प्रवेशद्वारावरती भला मोठा काळ्या पांढऱ्या रंगात काहीतरी लिहीलेला बोर्ड. भावाला विचारले की त्यावर काय लिहीले आहे, तर तो म्हणाला, 'उच्च प्राथमिक केन्द्र शाळा, शिरपूर (होरे)'.
पहील्या वर्गाची खोली हा तेथिल सर्वात मोठा हॉल होता. परंतु तेथे जाण्यासाठी कार्यलयाच्या दरवाजातून जावे लागत. साहजिकच तेथे सर्व शिक्षकांचा ताफा बसलेला असायचा. माझा पहीला दिवस असल्याने शिस्त हा शब्द माझ्यासाठी नविनच होता. मी व भाऊ दोघे मित्रांप्रमाणे एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून वर्गात प्रवेश करण्यास निघालो. मधेच एका शिक्षकांचे लक्ष गेले ते रागाने उठले व माझ्या पाठीवर एकच जोराचा धपाटा मारला व म्हणाले, "डबल नाही, सिंगल...!"
क्षणभर मला कळलेच नाही की पाठीवर अचानक आवाज का झाला. नंतर भावाने समजाऊन सांगितले की, 'ते देशकर गुरूजी आहे. शिस्तिचे कडक आहेत व मारायला मागे पुढे बघत नाही. आपण तेथून एका मागून एक लाईनमध्ये चालायला पाहीजे होते पण आपण डबल लाईन करून खांद्यावर हात ठेवून चालत होतो, म्हणून त्यांनी धपाटा मारून समजाऊन सांगितले. पण तू टेन्शन नको घेऊ, तुझा पहीला दिवस आहे, होईल तुला सवय.'
सर्व परस्थिती प्रतीकुल वाटायला लागली. पहीलाच दिवस त्यात हा महाप्रसाद त्यामुळे जरा मी नर्व्हसच झालो होतो. पण भावाने समजूत काढली व माझा हुंदका थांबला. अती पावसामुळे बाकीचे वर्ग गळत असतिल त्यामुळे पहीले ते सातवी इयत्तेचे सर्वच विद्यार्थी एकत्र बसवण्यात आले.
चोहीकडे सर्व मुलांचा चिवचिवाट, गोंधळ, गर्दी व आता पुढे काय शिवाय मला काहीच लिहीता वाचता येत नाही या भितीने थरथरायला लागलो.
लगेच समोरून गर्जना झाली. "पहील्या वर्गातिल प्रत्येकाने आपली पाठी काढून 'अ, आ, इ....' बाराखडी लिहून काढा..!" हे ऐकून चेहरा रडकुंडीस आला. एवढ्यात मला उदास बघून भावकीतला चुलत भाऊ, इयत्ता सातवीत शिकत होता, तो माझ्याकडे आला. मी त्याला लगेच हुंदके देत म्हटले, "मारती भाऊ, कस रे, मला तर काहीच लिहीता येत नाही, काळ्या पांढऱ्या रंगाशिवाय दुसरं काहीच समजत नाही, कसं होईन माझं...?" यावर तो हसून म्हणाला, "अरे, पहील्या दिवशी कोणालाच लिहीता नसते येत, त्या अंकलिपितले पाहून, पाहून लिहून काढ, मग बाकीचे उद्या......!"
दिवस कसा बसा गेला. पण गुरूजीने मारलेला धपाटा आणि उमटलेले वळ 'डबल नाही, सिंगल' ची आठवण करून देत राहीले.
( आठवणी शाळेतल्या, क्रमश: )