krishna shiwarkar

Comedy Drama inspirational tragedy

4.1  

krishna shiwarkar

Comedy Drama inspirational tragedy

जगी ऐसा बंधू नसावा कुणाचा..!

जगी ऐसा बंधू नसावा कुणाचा..!

34 mins
1.6K


प्रस्तुत कथा ही एका साधारण गावात राहणाऱ्या उत्तम नैसर्गिक बुध्दीमत्ता लाभलेल्या तरूणाची असून, आपले कुटुंब सदैव एकत्र राहण्सासाठी व आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या स्वार्थी भावासाठी केलेला संघर्ष आणि त्याग व त्या भावाने केलेली कृतघ्नतापुर्ण परतफेड व त्या तरूणाच्या वाटेला आलेली ही उपेक्षा आणि भावनिक घुसमट यांचे प्रखर वर्णन यातून दिसून येते. ही कथा थोडी दिर्घ स्वरूपाची असली तरी वाचकांच्या पसंतिला नक्कीच उतरेल ही अपेक्षा.


एका सामान्य गावात एक सर्वसाधारण कुटुंब राहात होतं. घरातिल सदस्य संख्या सहा होती. तिघे भाऊ, एक बहीण व आई वडील. बहीणीचे लग्न होऊन ती आपल्या सासरी गेली. मोठा भाऊ अशिक्षित, स्वभावाने अतिशय साधा भोळा, पण कष्टीक व अंगमेहनत करणारा व मोल मजूरी करून पोट भरणारा. लग्न झाले, घरात येणारी नविन सून खुप दुर्गम अशा खेडेगावातून आलेली, शिक्षणाची काहीही ओळख नाही, स्वभावाने अति गावंढळ, संस्कारांचा लवलेषही नसणारी, पण दिसायला बऱ्यापैकी, यामुळे मोठ्या भावाच्या पसंतिला उतरलेली तसेच तिच्या हितचिंतकांनी त्याचे कान भरल्यामुळे, ही सोयरीक कोणाच्याही पसंत नसतांना त्याच्या हट्टापाई झाली व नाईलाजाने लग्न लावून दिले. सुरूवातिचे दोन तिन महीने बरे गेले. मग मात्र तिने आपले रंग दाखवणे चालू केले. बोलायला अतिशय तिखट व गावराणी त्यामुळे तिच्या नादाला सहसा कुणी लागत नव्हते. स्वयंपाक कधितरी रूचकर केला असेल किंवा घर निटनेटके ठेवले असेल अथवा घरी आलेल्या पर पाहुण्यांचा व्यवस्थित मानदान झाला असे कधिच झाले नाही. घर कामात कामचुकारपणा हा ठरलेलाच. यामुळे सासू सुनेत शाब्दिक चकमक व्हायला लागली. याचा परिणाम घरात कल्ला व्हायला लागला. घरातिल सर्वात लहान सदस्य यावेळी इयत्ता सातवित शिकत होता, त्याला कळत होते की चूक कोणाची आहे ते. पाणी भरण्याच्या वादावरून घरात आवाज होऊ नये म्हणून तो स्वत: एकटाच पाणी भरायला हपशीवर जायचा व घरातिल सर्व पाणी भरून टाकायचा. मधल्या भावाला याबद्दल काहीच वाटायचे नाही व लहान भावाला मदत देखिल करत नव्हता. त्याला फक्त एकच माहीत होते, पोटभर जेवणे व गावभर फिरणे. घरातिल तणावाच्या वातावरणात असेच दोन तिन वर्षे लोटलीत. सुनबाईने बरेचदा वेगळे राहण्याचे सोंग केले शेवटी पत्नीच्या हट्टापुढे नतमस्तक होऊन मोठा भाऊ तिला घेऊन वेगळा राहू लागला. एका घराचे दोन घरे होण्यापासून कोणीच वाचवू शकले नाही. घराचे विभाजन करून तिन वर्षे तिथेच राहले. सुनबाईला काही करमले नाही, नवऱ्याला घेऊन तिच्या माहेरी राहायला गेली व कायमचे तिकडेच राहू लागले. 


आता दोन भाऊ व आई वडील मिळून चार लोकांचा संसार कसातरी मजूरी करून चालू होता. या दरम्यान दोघा भावांचे शिक्षण चालू होते. वडीलांचा पारंपारिक मासेमारीचा धंदा असल्यामुळे त्यांना इतर काम करून पैसे मिळवणे जमत नव्हते. पण ते त्यांच्या व्यवसायात पारंगत होते. कुटुंबाचा उदरनिर्वाह बऱ्यापैकी चालू होता व उपाशी राहायची वेळ नाही येऊ दिली. यात दोन लहान मुलांचे शिक्षण चालू असतांना तशात मोठ्या मुला मुलिचे लग्न थाटात केले.

  

 स्पर्धा वाढल्याने व नदीवर जागोजागी धरण उभे केल्याने व्यवसायात मंदी यायला लागली. आई सतत आजारी असायची, तिला बाहेर मजूरी करणे शक्य नव्हते. घरात चार लोकांचा स्वयंपाक करून जेऊ घालणे एवढे केले तरी भरपूर आहे हे त्या कुटुंबातिल इतर तिन सदस्यांनी स्विकारले. दोन मुले आपल्या शिक्षणात व्यस्त असतांना वडीलांना हातभार म्हणून सुट्टीच्या दिवशी, कधी शाळा बुडवून त्यांच्यासोबत नदीवर मासेमारी करायला जायचे. या दोन अविवाहीत भावांपैकी मोठ्याचे नाव विजय व जो सर्वात लहान त्याचे नाव किसना. 

   

या दोघा भावांचे बालपण जरा जगावेगळेच होते. किसना विजयपेक्षा तिन वर्षांनी लहान असूनदेखिल नेहमी त्याच्याशी समजदारीने वागला. वडिलांनी बाजारातून आणलेला खाऊ दोघा भावात समान वाटल्या जाई पण विजयला नेहमीच जास्त पाहीजे असायचे. मग किसना मोठेपणा घेऊन त्याला त्याच्या वाटणीतले देऊन टाकायचा. विजयच्या मनात किसनाबद्दल एक लहान भाऊ म्हणून कधीच प्रेम नाही दिसले. किसनाला घरच्या परस्थितीची जाण असल्याने तो त्याच्या वस्तु जास्तित जास्त टिकवण्याचा व जतन करून ठेवण्याचा प्रयत्न करायचा. याऊलट विजय, त्याला काहीच कोण्या गोष्टीचे देणे घेणे नव्हते. एकदा वडिलांनी दोघांसाठी चपलीचे सारखे दोन जोड आणलेत. विजयने ते लवकरच खराब केले, पण किसनाची चप्पल एवढे दिवस कशी काय टिकली, त्याला चांगली घेऊन दिली असा विचार करून त्याने त्याची चप्पल तोडून टाकली. अशा अनेक वस्तुंबाबत घडायचे. किसनाच्या बालमनावर याचे बरेवाईट परिणाम होत गेले. तो मनातल्या मनात दुखावल्या जायचा पण समजुतदारपणा घेऊन ते कधी जाणवू दिले नाही. विजयला कधी काही वाटणीला कमी आल्यासारखे वाटले की आई वडीलांच्या आडून तो किसनाला झोडपून काढायचा. घरात कधी माहीतही झाले तरी त्याच्या हट्टी व नासमज स्वभावामुळे त्यांचा नाईलाज होई व लहान मुलगा समजदारपणा घेतोय हे पाहून त्यांना अभिमान वाटायचा. किसनाला राग येत नव्हता असे नाही पण घरात तमाशा होऊ नये म्हणून तो नेहमी होणाऱ्या अन्यायावर दुर्लक्ष करायचा. मोठा मुलगा लग्न करून वेगळा झाल्यानंतर सर्व भार आईवर येऊन पडला. अगदी लहानपणासूनच किसनाला वडिलांबद्दल विशेष आदर व आईबद्दल प्रेम वाटायचे. अशातच तिचे आजारपणसुध्दा बळावले. बारा महीने सतत अंथरूणाला खिळून बसल्याने घरातील कामे रेंगाळलेली पाहून किसनाला बरे वाटत नव्हते व विजय ती जबाबदारी स्विकारायला तयार नव्हता. आईचे आजारपण काढण्यात व घरातले काम करण्यात किसनाचे बालपण पुरते हरवून गेले होते. विजयला या गोष्टींची मुळीच चिंता नव्हती, फक्त घरात जेवण करायला यायचा व बाहेर खेळण्यात वेळ घालवायचा. त्याने कधीही लहान भावाची होणारी भावनिक व मानसिक घुसमट गांभिर्याने घेतली नाही.

  

किसना शिक्षणात बुध्दीमान होता. त्या काळात इंग्रजी पाचवीपासून चालू व्हायची. पण किसना तिसरी चौथीपासूनच इंग्रजी फटाफट वाचत व लिहीत होता. यामुळे शाळेतील शिक्षकांना तो एक चमत्कारच वाटायचा व संपुर्ण गावात तो हुशार म्हणून प्रसिध्द झाला. भोयाचा किसना म्हटले की, गावातिल प्रतिष्ठीत लोक व कुणबी पाटील समाज डोळे विस्फारून बघायचा. त्यात वडिल उपसरपंच म्हणून पदावर होते त्यामुळे गावातिल लिडर लोकं त्यांना 'तुमचा मुलगा फारच हुशार आहे हो ! शाळेतले शिक्षक सांगत होते' असे वारंवार आठवण काढून द्यायचे. प्रत्येक वर्गात पहीला क्रमांक कुठेही चुकत नव्हता. वर्गातिल शिक्षकांचा लाडका. गणित, इंग्रजी व विज्ञान हे त्याचे सर्वात आवडते विषय. मोठा विजय हा त्याच्यापेक्षा तिन वर्षाने व दोन वर्गाने मोठा होता. विजय इयत्ता सातवित असतांना किसना त्याचा गणित व इंग्रजीचा गृहपाठ चुटकी सरशी पुर्ण करून द्यायचा.


   विजय अभ्यासात सर्वात मागे असला तरी स्वभावाने शिघ्रकोपी व स्वार्थी होता, परंतू अंगमेहनतिने मजबूत होता व आळशी नव्हता. या ऊलट किसनाचा स्वभाव होता. तो अभ्यासात हुशार, तर्क लावणारा, प्रचंड जिज्ञासा असणारा, थोडा आळशी पण भावनिक व संवेदनशिल होता. आपल्या चुकिमुळे कोणाला त्रास होऊ नये असा त्याचा मानस. किसना इयत्ता सातवित व विजय नववित असतांनाच घरची आर्थिक नाजूक परस्थिती पाहता वडीलांसोबत नदिवर मासेमारी करायला जाणे भाग पडले. या व्यतिरिक्त नदीच्या मिळकतीने भागत नाही हे पाहून ते दोघे भाऊ जमेल तशी शेतमजूरी करायला लागले. सिझनमध्ये विटभट्टीवर जाऊन ढोरमेहनत करू लागले. विजय बारावी जेमतेम पास झाला. व त्याच वर्षी किसना दहावीची परीक्षा केंद्रातून प्रथम येऊन आजूबाजूच्या गावाला आश्चर्याचा धक्का बसला. पण गावात परीक्षेदरम्यान गावात खूप मोठे राजकारण घडले. किसना गावातिलच सम्यक हायस्कुल या शाळेत शिकत होता. तो शाळेमध्ये सर्वात हुशार म्हणून नावलौकीकास आला होता. इयत्ता सातवी पर्यंत त्याच्या स्पर्धेला त्याची एक वर्ग मैत्रिण होती. ति एका पैसे वाल्याच्या घरातली मुलगी म्हणून प्रसिध्द होती. तिचे नाव वैशाली महल्ले. पण किसनाने तिला आपल्या समोर कधिच जाऊ दिले नाही. तिचे दोन्ही मोठे भाऊ गावात राजकारण करू लागले. आपली बहिण पहिला क्रमांक घेऊन येऊ शकत नाही हे पाहून त्यांनी एक शक्कल लढविली. हायस्कुलला इयत्ता आठवीपासून तिचा प्रवेश भिडी या मोठ्या गावात कॉलेज संलग्न असलेल्या मोठ्या शाळेत केला. दहाविच्या बोर्डाच्या परीक्षेला सम्यक हायस्कुलसाठी भिडी हेच सेंटर असायचे. इयत्ता आठवी व नवविचा वैशालीचा निकाल किसनापेक्षा चांगला नव्हता. अशातच तिच्या भावांनी तिला कोणत्याही मार्गाने केंद्रातून प्रथम आणायचे ठरवले होते. यासाठी त्यांनी एक राज मार्ग शोधून काढला. सन १९९८ ची गोष्ट. दहावीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू झाल्या. भिडी, शिरपूर व आजूबाजूच्या सर्व गावांसाठी भिडी हे नियोजित सेंटर होते. महल्ले परिवाराने सम्यक हायस्कुलमधिल सर्व शिक्षक लोकांना पैशाच्या जोरावर पार्टीचे आमिष दाखवून खरेदी केले होते. याचे पडसाद नंतर परीक्षे दरम्यान दिसायला लागले. शिरपूरच्या शाळेतील शिक्षकांचा भिडीच्या शाळेतिल विद्यार्थीनिशी काहीही संबंध नसतांना ते सर्व तिला प्रत्येक पेपरच्या वेळेस कॉपी पुरवायला मदत करत होते व किसना त्याच्याच शाळेतला एक होतकरू विद्यार्थी असूनसुध्दा त्याच्याकडे फिरकूनही पाहात नव्हते. हा सर्व प्रकार किसनाच्या लक्षात आला होता. त्याला काही जाणकारांकडून माहीतही झाले होते. पण तो काहीच करू शकत नव्हता. आपण या राजकिय षडयंत्राचे शिकार झालो आहोत याची त्याला खात्री झाली होती. परीक्षा संपल्या. काही महीन्यानंतर निकाल आला. महल्ले पार्टीच्या डावपेचाला थोडेफार यश आले होते. त्यांची बहीण मुलिंमधून सेंटर प्रथम आली होती तर किसना मुलांमधून सेंटर प्रथम आला होता. खंत एवढीच उरली की, त्याच्यासोबत खेळलेल्या घाणेरड्या राजकारणामुळे महल्लेंची मुलगी त्याच्यापेक्षा केवळ दोन गुणांनी समोर होती. किसनाला याची सल आयुष्यभर सलत राहली. माणूस गरिबीपुढे किती लाचार असतो याची त्याला जाणिव झाली. पण मुलांमधून प्रथम आल्याने त्याचा मान कमी नाही झाला. त्याच्या शाळेने त्याचा सत्कार केला तसेच भिडीच्या एका सामाजिक कार्यक्रमात तत्कालिन आमदार, खासदार मा. रामदास तडस व मा. दत्ता मेघे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


   बस येथूनच किसनाचे उलट चक्र फिरायला सुरूवात झाली. दहावीनंतर कोणते क्षेत्र निवडायचे याचे फारसे ज्ञान नव्हते. तत्पुर्वी पॉलिटेक्निक्स हा चांगला पर्याय होता. शिवाय सायंसला प्रवेश घेवून पुढे अभियांत्रिकी, वैद्यकीय शिक्षण घेता आले असते. व नंबरही अगदी सहजपणे लागला असता. पण घरची जेमतेम परस्थिती पाहता व घरचे लोक पैसा पुरवू शकणार नाही या भितीने चांगले शिक्षण घेण्याची हिंमत झाली नाही. गावातिल काही सल्लागारांनी "तू आय.टी.आय. कर, याला चांगला स्कोप आहे." असे प्रोत्साहन देऊन चुकीचे मार्गदर्शन करण्यात आले. यातही एकाने 'इलेक्ट्रिशियन' सारखा सर्वोत्तम ट्रेडचा पर्याय उपलब्ध असतांना 'मोटर मेकॅनिक' ट्रेड निवडायला सांगितले. किसना पाहीजे तेवढा परिपक्व नव्हता. स्वत:ला ओळखता न आल्याने, व हलाकीची परस्थिती पाहून वरीष्ठांनी केलेल्या चुकिच्या मार्गदर्शनाला योग्य समजून, तसेच भावाने कोणतेही पाठबळ न देता तेच कसे बरोबर आहे हे समजाऊन सांगितले, यामुळे आय.टी.आय, मोटर मेकॅनिक हे ट्रेड निवडले. या दरम्यान इलेक्ट्रिशियनच्या यादीत नाव असूनही त्यावर दुर्लक्ष केले आणि मोटर मेकॅनिकला प्रवेश घेतला व आयुष्याची वाट लागायला सुरूवात झाली.


किसनाला या क्षेत्रात कवडिचाही रस नव्हता. त्याला फक्त वाचन, लिखाण, विज्ञान, मुलांना गणित, इंग्रजीसारखे अवघड विषय शिकवणे, शिवाय इलेक्ट्रिक, इलेक्ट्रॉनिक दुरुस्ती, ड्रॉईंग, पेन्टिंग या मध्ये रस होता. पण या कलेचा व या व्यवसाय निवडीचा तिळमात्रही संबंध नव्हता. एक अपुर्ण स्वप्नाची पुसटशी पुर्तता म्हणून दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांची ट्युशन चालू करून काही होतकरू विद्यार्थ्यांना घडवण्यात यश मिळवले पण ते क्षणिक होते कारण त्याच्या करीअर निवडीचा व शिकवणीचा काहीही ताळमेळ नव्हता. त्यामुळे मनावर प्रचंड तान पडला व घोर निराशा येत गेली.

  

आयुष्यातले दोन वर्षे आय.टी.आय. करून कसेतरी ढकलले. परत एक आशेचा किरण म्हणून झाले गेले विसरून जायचे व नव्याने सुरूवात करायची असा त्याने निर्णय घेतला. अकरावी कला शाखेत देवळी येथे एस.एस.एन.जे. महाविद्यालयात प्रवेश घेतला. पहील्याच दिवशी इंग्रजीच्या प्राध्यपकांवर आपली छाप पाडून त्यांना प्रभावित केले. वर्गात १५० मुले होती. पण हा त्यांपैकी बुध्दीने अलौकीक म्हणून एक वेगळी ओळख निर्माण झाली. सर्व मुला मुलिंचा कट्टा त्याच्या मागे फिरत होता. विशेषत: मुली त्याचे शाहरूख खान सारखे दाट व मुलायम केसं व एका अवघड विषयात पारंगत म्हणून त्याच्या मागे मागे फिरायच्या. तो एक कॉलेजचा हिरो म्हणून ओळखल्या जाऊ लागला.

   विजयसोबत विटभट्टीवर काम करणे, नदीवर मासेमारी करून रोजी - रोटीसाठी हातभार लावून बसच्या पासची सोय करणे अथवा नाही जमल्यास वडीलांना पैसे मागणे व आपल्या कॉलेजला नियमित जाणे असा किसनाचा उपक्रम चालू होता. त्या वेळेस शिरपूर ते देवळी मार्गे पाहीजे तशा बसेस उपलब्ध नव्हत्या. यामुळे कॉलेज सकाळी ११.०० ते दुपारी ४.०० पर्यंत असतांना किसनाला वेळेवर बसच्या अभावी अप डाऊनचा खुप संघर्ष करावा लागला. घरून सकाळी ७.०० ला निघून सायंकाळी ७.०० ला घरी परत यायचा. कॉलेज पाच तास व किसनाचा वेळ बारा तास खर्च व्हायचा, पण रिकाम्या वेळेचाही त्याने सदूपयोग केला, काही वेळ अभ्यास व फावल्या वेळात कविता लिहीण्याचा छंद त्याला जडला होता. एका पाठोपाठ जवळपास १०० कविता त्याने लिहील्या. सर्व लोकप्रिय ठरल्या. यापैकी काही वर्तमान पत्रातही छापून आल्या होत्या. एक कवि म्हणून त्याने एक वेगळी ओळख निर्माण केली होती. एकदाची परीक्षा जवळ आली. किसनापेक्षा दोन मुले जरा मागे होती पण त्यांच्या सुदैवाने त्यांना प्रॉपर कॉलेज परीक्षा केंद्र म्हणून मिळाले व किसनाला बाहेरील जनता कॉलेज. यामुळे झाले असे की किसनाला कुणाच्या मदतीशिवाय व स्व-अभ्यासावर, कोणतीही कॉपी न करता परीक्षा द्यावी लागली, आणि ते दोघे परीक्षा दरम्यान प्रॉपर कॉलेज मिळाल्याणे, शिक्षकांची मदत व इतर सवलती मिळाल्याने किसनापेक्षा अनुक्रमे चार, चार गुणाने समोर गेलीत व किसनाचे कॉलेज प्रथम येण्याचे स्वप्न भंग पावले. पण इंग्रजी विषयात कोणालाही किसनाचा हात नाही पकडता आला हे विशेष, त्यामुळे त्याचे वर्गशिक्षक त्याच्यावर जाम खुश होते. 

  

किसनाला शिकण्यात व शिकवण्यात खूप रस होता. मग डी. एड. ला प्रयत्न केला पण ऐन याच उमेदीच्या तिन वर्षात एक दोन गुणांनी नंबर हुलकावणी देऊन गेला.

बारावी झाल्यानंतर किसनाला काय करावे काही सुचेना झाले. घरी खायचे वांदे. कामाला जाण्याशिवाय पर्याय नव्हता. शिवाय स्नातक होण्याची जिद्द. त्याला माहीत होते आपण आता रेग्युलर कॉलेज नाही करू शकत. म्हणून पुलगावला बी.ए. साठी प्रवेश घेतला पण नियमित जाऊ न शकल्याने विटभट्टीचे मेहनतिचे कामे केलित, थकून भागून आल्यावर अभ्यास केला व प्रथम वर्ष चांगल्या मार्कांनी पास झाला. निकाल लागल्यावर प्राध्यापकांनी त्याला बोलावले व विचारले "तू मला एकही दिवस कॉलेजमध्ये येतांना दिसला नाही, आणि एवढे चांगले मार्क्स ? शिवाय इतरांना अवघड जाणारा इंग्रजी विषय तू रेग्युलर विद्यार्थ्यांपेक्षा चांगलाच गाजवला, हे कसे काय शक्य झाले ?" तेव्हा किसना म्हणाला की, "सर घरची परस्थिती नाजूक असल्याने मला नियमीत येणे शक्य नाही व इंग्रजी माझा आवडता विषय असल्याने हे शक्य झाले !" तेव्हा शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांसमोर त्याची पाठ थोपटून त्याला शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.


द्वितीय वर्षाला प्रवेश घेतला. या दरम्यान विटभट्टीवर काम चालू असतांना भंडारा येथिल अशोक लेलँड कंपनीची तार आली. त्यावेळस मोबाईलचा शोध लागला नव्हता व लोक इंटरनेटपासून फार लांब होते. त्यात कंपनिचे बोलावणे होते. जाण्याची इच्छा होत नव्हती. विटभट्टी मालकाने प्रोत्साहन दिले व म्हणाला, "अरे किसना, तू एवढा हुशार आहे, पण त्याचं काही चिज नाही झालं, भट्टीवर एवढा ढोरासारखे कष्ट उपसतोस, कंपनिने तुला एक संधी दिली आहे, ती तू सोडू नकोस, जा तू, इथं माती चिवडत नको बसू, मी दुसरा मजूर पाहून घेईल !" किसना जरा गोंधळूनच होता, इकडे, तिकडे विचारणा केली व शेवटी कंपनित जाण्याचा निर्णय घेतला. गावापासून लांब राहायचे होते. सोबतीला एक ओळखीचा मित्र होता. ते दोघेही भंडारा जिल्ह्यात गडेगांव येथे अशोक लेलँड कंपनित कामाला लागले. पगार फारसा नव्हता पण एक वेळ जेवणाची व चहा, नास्त्याची सुविधा असल्याने फार अवघड गेले नाही. परंतु सुट्टी नंतर, घरी असतांना, नाईट असतांना किरायाच्या रूमवर स्वयंपाक करून खावे लागत. या दरम्यान त्याला बाहेरील लोकांचा संपर्क येऊन चांगले, वाईट अनुभव यायला लागले. 


महिनाभराचा खाण्याचा व राहण्याचा खर्च वजा करून, जे पैसे उरत ते तो मनीऑर्डरने गावी पाठवायचा. सन २००४ चा कालावधी असेल, त्या काळात टेलिकम्युनिकेशन एवढे विकसित नव्हते. मोठा भाऊ विजय पत्र व्यवहार करून, अथवा किसना गावी गेला असतांना घरची आर्थिक परस्थिती किती नाजूक आहे हे ते पटवून सांगायचा. मग किसनाचा भला मोठा हात त्याच्यासमोर मदत करण्यास सदैव तत्पर असायचा. त्याने स्वत:साठी काहीच केले नाही, पण आपला भाऊ व आई वडिल यांना त्रास होऊ नये म्हणून जमेल तेवढी आर्थिक मदत करायचा. वेळ पडली तर कर्जबाजारी होऊन घरच्या गरजा पुर्ण करण्याचा प्रयत्न करत होता. तो कंपनित राबून रूमवर आल्यांनतर बी.ए. द्वितीय वर्षाचा अभ्यास करून परीक्षेला गावी येऊन चांगल्या गुणांनी परीक्षा पास झाला. कामाला जाणे, अभ्यास करणे, परीक्षा देणे, पैसे पाठवण्याची तडजोड करणे या घासाघिशीत कंपनिचे सहा महीने कधी पुर्ण झाले हे त्याला कळलेच नाही. कंपनिचा बाँड पुर्ण झाला व किसना त्याच्या गावी परत आला.

  

किसनाचे गावातिल काही मित्र पुण्यात कामानिमीत्त राहात होते. त्यांनी टाटा मोटर्स येथे अर्ज करायचा सल्ला दिला. त्याने तसेच केले. या दरम्यान किसनाचा अॅप्रॅंटिसशिपसाठी, वर्धा येथे एस.टी. महामंडळात नंबर लागला व त्याने प्रशिक्षणाकरीता प्रवेश घेतला. शिकावू उमेदवार असतांना केवळ एक हजार रूपये स्टायपन मिळत होते, पण त्याने कशी तरी गुजराण केली व पैसे ऊरलेच तर घरी पण द्यायचा. कार्यशाळेतिल कामे झाल्यावर फावल्या वेळेत रिकाम्या बस मध्ये चोरून अभ्यास केला. बरेचदा साहेबांनी पकडले पण सोडून दिले. अशा रितीने त्याने बी.ए. चे तिसरे वर्षही चांगल्या गुणांनी पास केले. परंतु प्रशिक्षण चालू असतांना सवलत नसल्याने त्याला प्रवासाबाबत बऱ्याच अडचणींना तोंड द्यावे लागले. एवढेच नाही तर एम.एस.सी.आय.टी पुर्ण करण्यासाठी वर्धा येथून गावी परत जातांना भिडीला उतरून तो सराव करायचा व रात्री आठ वाजता घरी पोहचायचा. एम.सी.आय.टी. पास झाला व त्यानंतर प्रशिक्षणाकरीता लागणारा अभ्यासक्रम पुर्ण करून, अॅप्रेंटिसशिपची ची परीक्षा जिल्ह्यात प्रथम येऊन पास झाला. त्याला एस.टी. महामंडळ व मुंबई मध्यवर्ती कार्यालयाचे स्किल कॉम्पिटिशनच्या परीक्षेबाबत दोन पत्र आलीत पण तो नाही जाऊ शकला. प्रशिक्षणा दरम्यान त्याला टाटा मोटर्स लि. पुणे कंपनीचे दोन कॉल लेटर्स आलेत पण प्रशिक्षण चालू असल्याने त्यावेळेस नाही जाऊ शकला.

  

किसना आता गावात बेकार फिरू लागला. पण 'परफेक्ट कम्प्युटर इन्स्टिट्युट' च्या मालकाने त्याची बुध्दीमत्ता ओळखून एक उपशाखा शिरपूर येथे उघडली व त्याला प्रशिक्षक म्हणून निवडले व तो त्या कामात व्यस्त झाला. अगदी सुरूवात असल्या कारणाने मिळकत नव्हती म्हणून नदिवर वडील व भावासोबत मासे पकडायला जायचा. सन २००५ ची गोष्ट असेल. त्या काळात संपर्काची साधने फारच कमी होती. मोबाईलचा फक्त शोध लागला होता. प्रसार झाला नव्हता. एकदा असेच नदिवर मासे पकडत असतांना इन्स्टिट्युटचे मालक म्हणजे गावडे सर काही आवश्यक कामासाठी किसनाला शोधत त्याच्या गावी आले, पण तो नदिवर मासे पकडायला गेला म्हणून घरी सांगण्यात आले. त्यांनी दिशा विचारली व भिडी येथील इन्स्टिट्युटमधील प्रशिक्षक म्हणजे विजयचा वर्गमित्र संजय तऱ्हेकार याला सोबत घेवून थेट नदिवर आले. त्यांना पहिलवाणाच्या अवतारात पाहून थोडे चमकलेच, किसनाही थोडा ओशाळल्यागत झाला. मग गावडे सरांनीच त्याच्या पाठीवर हात ठेवून त्याला प्रोत्साहन दिले व म्हणाले, "क्रिष्णा तुझी खरच कमाल आहे, एवढा हुशार असूनही तुला असे काम करावे लागते, पण यात मुळीच लाज बाळगू नकोस, तुझ्यासारखे होतकरू मुलं फार कमी असतात, मला तुझा खूप अभिमान आहे. खुप मोठा हो व प्रगती कर, माझा तुला आशीर्वाद आहे !" एवढे बोलून त्यांनी पुढील कामाची रूपरेषा समजाऊन सांगितली व ते परत निघून गेले.


असेच काही दिवस निघून गेले. यवतमाळ जिल्ह्यात एक आदिवासी आश्रम शाळा आहे. तिथे शिक्षण सेवक म्हणून एन.टी. (ब) प्रवर्गासाठी एक जागा राखिव होती. त्या शाळेतिल मुख्याध्यापक श्री अंबागडे सर शिरपूर येथिलच असून त्यांना किसना बद्दल खुप काही माहीत होते. ते एक दिवस किसनाच्या घरी गेले व त्याला तिथे काही दिवस विना मानधन ड्युटी करण्याची संधी दिली. ते म्हणाले "किसना तू अभ्यासात खुप हुशार आहेस हे मी आधीपासूनच जाणतो, शिवाय तू सध्या बेरोजगार आहे, या ऑफरसाठी माझ्या मागे खुप लोकं आहेत पण मी कोणाचेही न ऐकता थेट तुझ्याकडे आलो. शिक्षण सेवक म्हणून काही दिवस तू तिथे रूजू होऊन जा, काही दिवस विना पगार काढावे लागतिल व नंतर अर्धा पगार चालू होईल व त्यानंतर पुर्ण पगार मिळेल." किसना गोंधळला, त्याला योग्य निर्णय घेता नाही आला. शिवाय त्याचा भावनिकपणा व त्याग तिथे नडला व सरांना त्याने सांगितले की, "सर ! तुम्ही म्हणताय ते अगदी खरं आहे, पण माझे शिक्षण बरेच झाले आहे, बी.ए., आय.टी.आय., अॅप्रेंटीसशिप व अन्य काही, परंतु माझा मोठा भाऊ जेमतेम बारावी झाला आहे, तो पुढे काहीच करू शकणार नाही, केवळ जात निहाय उमेदवार पाहीजे व टक्केवारीची अट नसेल तर द्या त्याला चिपकवून, शिवाय त्याच्या विना वेतनाच्या काळात मी त्याला आर्थिक मदत करेन व घरीही हातभार लावेन." सरांनी त्याचे बोलणे ऐकले व नाईलाजाने होकार दिला.


  किसनाचा मोठा भाऊ विजय जरा गोंधळलाच व किसनाला म्हणाला, "किसना तुयासारखं मले जमन का शिकवणं ? अन् घरी खाण्याचे वांदे नाय का होणार...?" त्यावर किसना ऊत्तरला, "अरे घाबरू नकोस, मी हाय नं, आदिवासी शाळेतले लेकरं, सर्व जमेल बघ तुला हळूहळू, आणि उरला प्रश्न पोटा पाण्याचा, तर मला तिसरा कॉल टाटा मोटर्स चा येणारच आहे, तेव्हा मी जाईन पुण्याला पिरीयड काढायला तेव्हा सर्व ठिक होईल, जा तू बिनधास्त !


किसनाने दिलेल्या हिमतीने विजयला स्फुरण आले व तो लगेच त्या आश्रम शाळेवर शिक्षक म्हणून रूजू झाला. किसनाला वाटले आता आपला भाऊ शिक्षक होणार व कुटुंबाला तो नि:स्वार्थपणे सांभाळेल व आई वडीलांची सेवा करेल. पण किसनाने एवढा मोठा त्याग करून फार मोठा मुर्खपणा केला असे तो लोकांकडून ऐकू लागला. पण किसना काय करणार. त्याला कोणाचीही व घरच्यांचीही जराही हिम्मत नव्हती. त्याला कोणीच म्हटले नाही की, 'जा तू लढ ! मी तुझ्या पाठीशी आहे !' जे धाडस करण्याचे बळ किसनाने विजयला दिले, तेच त्याला मिळाले असते तर किसनाच्या स्वभावाचा गैरफायदा कदाचित कोणी घेतला नसता. किसना मनातून खचलेला होता. पण त्याने चेहऱ्यावर जराही दिसू नाही दिले. लोकांनी दिलेल्या टोमण्यांकडे दुर्लक्ष करून, आपला भाऊ उद्योगी लागला हा अभिमान बाळगून त्याने दिलेल्या शब्दांची पुर्तता करण्याच्या प्रवासाचे बेत आखू लागला.

   

विजयचे लग्नाचे वय झाले होते. वडील त्याला लग्नासाठी आग्रह धरू लागले. पण विजय ऐकायला तयार नव्हता. सद्या पगार नाही तर मी नविन येणाऱ्या व्यक्तिचे पालन पोषण कसे करणार या भितीने नकार देत होता. हे दुखणे तो किसनाकडे सांगू लागला. योगा योग म्हणजे तेवढ्यातच किसनाला टाटा मोटर्स पुणे येथिल तिसरा कॉल आला. ही गोष्ट ध्यानात घेवून किसना त्याला म्हणाला, "हे बघ दादा, मला आता कॉल आला आहे, तू बिनधास्त लग्न कर, त्या कंपनित पगार जास्त मिळतो, तुझे लग्न मी करून देतो, शिवाय तुझा पगार चालू होत पर्यंत तुमच्या खाण्या-पिण्याची जबाबदारी मी घेतो." विजय हे ऐकताच हर्ष उल्हासित झाला व लग्नासाठी तयार झाला. किसना, त्याचे वडील व इतर मान्यवर व्यक्ती मुलीचा शोध घेऊ लागले. नेहमी चर्चेत असलेल्या एका बदनाम खेडेगावात शेवटी एक स्थळ पसंत आलं. मुलगी दिसायला बरी, शिक्षण ग्रॅज्युएट झालेली, किसनाला वाटले पोरगी सुुशिक्षीत आहे व समजदार दिसत आहे म्हणून त्यानेही पसंतीवर जोर दिला व लग्न ठरवून दिले.


   एकाच वर्षी नोकरी व लग्नाचा योग पाहून विजय जाम खूष झाला होता. पण इकडे किसनाची फार मोठी जबाबदारी वाढली होती. विजयचे लग्न ठरले त्याच्या लगेच दुसऱ्या दिवशी किसनाने पुणे गाठले. पुणे शहर किसनासाठी अगदी नविन होते. पण गावातिल काही मित्र तिथे पुर्वी पासून राहात होते त्यामुळे त्याला थोडा आधार वाटला. गावात राहात असतांना त्याने एम.ए. (समाजशास्त्र) ला प्रवेश घेतला होता व त्याच जिद्दीने प्रथम श्रेणित येण्यासाठी अभ्यासही केला होता. पण या अनोख्या जबाबदारीने त्याला त्या परीक्षेचा त्याग करावा लागला. मंगेश महाजन व गजानन खावडे या त्याच्या वर्ग मित्रांकडे त्याने रूमपार्टनर म्हणून आश्रय घेतला. दिवस उजाडताच किसना कंपनित रूजू होण्याच्या मार्गी लागला. टाटा मोटर्स ही गाड्यांचे भारतातिल अव्वल उत्पादन करणारी कंपनी पिंपरी चिंचवड येथे स्थित होती. रूजू होण्याच्या सर्व औपचारिकता पार पडायला चार दिवस लागलेत. त्यांनतर रूजू अहवाल सादर करून किसना कंपनित कामाला जाऊन नियमित कर्तव्य बजावू लागला. २००६ साली त्यावेळेस टेंपररी पिरीयड काढणाऱ्याला त्या काळात ६००० रू मासिक वेतन खुप होते. टाटा मोटर्स मध्ये लागणे म्हणजे प्रतिष्ठेचे समजल्या जात होते. बऱ्यापैकी पगार, परमनन्ट वर्करला मिळणाऱ्या सुविधा, जेवण, येण्याजाण्यास कंपनिची बस शिवाय ओव्हर टाईम यांचा त्यामध्ये समावेश होता.

   

दोन, तीन महिने लोटले, गावाकडे विजयच्या लग्नाचा मुहुर्त जवळ आला होता. किसनाने भावाच्या लग्नासाठी पन्नास हजार रूपयाचे कर्ज नातेवाईक व मित्रांकडून काढले व स्वत: च्या कमाईतले काही पैसे वाचवले व सर्व रक्कम विजयकडे डी.डी. द्वारे पोहचती केली. विजयने लग्नाची तयारी जोरात केली होती. कंपनीत फारश्या सुट्टया घेता येत नसल्याने व पगार कापण्याच्या भितीमुळे, उद्याचे लग्न असतांना तो आज संध्याकाळी पुण्यावरून गावाकडे रवाना झाला. ऐन घटी मुहुर्ताच्या पर्वावर व नुकतेच लग्न लागणार या क्षणी किसनाने एखाद्या हिरोसारखी एन्ट्री केली. त्याचे चाहते त्याला पाहून खुश झाले. लग्नाचा मुख्य कार्यकर्ताच अगदी वेळेवर पोहचलेला पाहून लोकांमध्ये चर्चा होऊ लागली. किसनाने स्पष्टीकरण देऊन सारवासारव केली व लग्नाचा दिवस थाटात पार पडला.

   

पण किसना खूप उदास होता, कारण सख्ख्या भावाच्या लग्नात त्याला मनासारखा एन्जॉय नाही करता आला शिवाय त्याला दुसऱ्याच दिवशी पुण्याला कंपनीत जाऊन कामावर हजर व्हायचे होते. कर्जाचा डोंगर त्याला स्वस्थ बसू देत नव्हता. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तो पुण्याला जाण्याची तयारी करू लागला. नातेवाईकांनी त्याला अजून एक दिवस राहण्याचा आग्रह केला पण तो कर्तव्यापुढे लाचार होता. त्याचे अश्रु अनावर झाले होते. त्याची आई त्याच्याजवळ येताच तो ढसाढसा रडू लागला व तेथून तो जड पावलाने पुण्याकडे निघाला. एवढ्या लांबून आल्यावर आई-वडील व नातेवाईकांचा असा विरह त्याला प्रथमच अनुभवायला मिळाला.


   दुसऱ्या दिवशी सकाळी किसना पुण्याला पोहचला व न चुकता तो कंपनित कामाला गेला. सोबत गावाकडील आठवणिंचा ठेवा व कर्जाचे आणि जबाबदारीचे ओझे घेऊन तो नियमित कर्तव्यावर जाऊ लागला. किसनाचे एक दोन महिने लाईट कामात असतांना बऱ्यापैकी चालले होते. पण त्याचे नशिबच म्हणा, ज्या ब्लॉकमध्ये तो काम करत होता त्या उत्पादनाची मागणी घटली व किसना आणि इतर टेंपररी कर्मचारी दुसऱ्या हेवी ब्लॉकवर शिफ्ट करण्यात आले. तेथील कामाचा प्रकार पाहून किसना पुरता गोंधळूनच गेला. चालू कन्व्हेअरवर मोठ्या हेवी गाड्यांचे चेसिस येत. त्यावर हँगर व शॅकल लावण्यासाठी रफ होल यायचे. किसनाला ते होल एक भले मोठे रिमर (दोन्ही हाताने उचलावी लागणारी वजनदार ड्रिल मशिन) घेऊन ते होल फाईन करावे लागायचे, तेही खूप वेगाने व ताकदीने. यामध्ये नजरचुक झाली तर हात मोडण्याची शक्यता खूप जास्त. झाले ! किसनाची दमछाक होऊ लागली. असे नाही की यापूर्वी त्याने हेवी काम केले नाहीत पण आंगापेक्षा टारगेट जास्त व त्यात सक्ती होती. सुपरवायझरच्या लक्षात येताच तो किसनावर चवताळून आला, त्याला धमकी देवून नको ते बोलू लागला. किसना रडकुंडी आला, नशिबाला दोष देऊ लागला पण निमुटपणे ऐकून घेण्याखेरीज त्याच्याकडे पर्याय नव्हता कारण त्याने दिलेला शब्द, गावाकडील कर्तव्य त्याला पुर्ण करायचे होते, शिवाय भावाच्या लग्नासाठी घेतलेले कर्ज फेडायचे होते.

   

दिवसागणिक दिवस जाऊ लागले. किसना त्याच्या कामात कौशल्य प्राप्त करून, नविन कामाची जबाबदारी स्विकारली व थोडा रिलॅक्स झाला. संपर्कासाठी त्याने एक मोबाईल घेतला. प्रत्येक महिन्याच्या सात तारखेपुर्वी किसनाला विजयचा फोन येऊ लागला. त्याचे एकच वाक्य असायचे "किसना कसं रे, पैसे संपलेत, खायला नाही, कर्ज पण द्यायचे आहे." यावर किसना म्हणायचा "हो माहीत आहे मला, मी पाठवतो लगेच." मग किसना स्वत: काटकसर करून भरभक्कम पैसे बँकेचा डी.डी. काढून गावाकडे पाठवून द्यायचा. किसनाला वाटायचे की पाठवलेले पैसे तो कुटुंबातिल सर्व सदस्यांवर खर्च करत असेल. कित्येक दिवस तो याच भ्रमात राहीला. एकदा त्याने सहज आई व वडीलांना फोन करून खात्री केली तेव्हा लक्षात आले की तो फक्त त्याची बायको व स्वत: वर खर्च करत होता. कर्जवाल्यांनाही ते पैसे पोहचत नव्हते. याबद्दल त्याने विजयकडे चौकशी केली तेव्हा विजयने रडूनफडून त्याला भावनिक स्वरूप देऊन सत्य झाकून ठेवले. किसना विचार करत होता की, घर म्हटल्यावर हे सर्व चालायचेच, होईल सर्व ठीक म्हणून त्या गोष्टीकडे कानाडोळा केला व कंपनीतला पीरियड संपेपर्यंत त्याला पाहिजे तेवढे पैसे पुरवत राहिला.


   किसनाचा कंपनीतला सहा महिन्याचा पीरियड संपला व तो नियमानुसार टर्मिनेट झाला. या अवधीत तो गावाकडे आला. या दरम्यान विजयचा अर्धा पगार चालू झाला होता बऱ्यापैकी, पण तो काही दाखवत नव्हता. विजयची बायको त्याच्यापेक्षा चार वर्ग जास्त शिकलेली, अभिमानी, हेकेखोर होती. गोगल गाय नि पोटात पाय हा तिचा स्वभावधर्म आहे याची किसनाला केव्हाच खात्री झाली होती. सून म्हणून सासू-सासऱ्यांसोबत ती डायरेक्ट हुज्जत घालत नव्हती. नवऱ्याला रात्री बारीक आवाजात अथवा घरी कोणी नसतांना बारीक चिमटे घेत व त्याचे कान भरायची. याचा दुष्परिणाम मग सर्व राग विजय आपल्या आई-वडिलांवर काढत असे. त्याची बायको जगाच्या नजरेत सुरक्षित राहायची व लोकांना वाटायचे की सुनबाई फारच सोज्वळ आहे आणि म्हाताऱ्यांचा अशिक्षितपणा बाहेर दिसायचा. हा प्रकार किसनाच्या कधीचाच लक्षात आला होता, संतापही आला पण व्यक्त केला नाही. एका घराचे दोन घरं होऊ नये हा त्याचा हेतू होता. त्याने बरेचदा समेट घडवून आणला, विजय आई-वडिलांचाच दोष पुढे करत असे. तरीपण किसनाने त्यावर दुर्लक्ष केले. एखादा आठवडा निघून गेला. अशातच त्याला पुणे येथील "मर्सिडीज बेन्झ" या नामांकित विदेशी कंपनीचा कॉल आला व तो पुण्याला परत निघून गेला.


यावेळेस नवीन कंपनीत त्याला चांगले काम मिळाले व पगारही बऱ्यापैकी मिळू लागला. सन २००७ च्या जमान्यात ओव्हरटाईम पकडून महिन्याकाठी त्याला १५ ते १७ हजार रूपये मिळू लागले. तिकडे विजयचाही पगार बराच वाढलेला पण घरी एक खडकूही देत नव्हता. त्याच्या लग्नाचे राहिलेले सर्व कर्ज किसनाने फेडले व स्वत: मात्र कंगाल झाला. गावाकडे घरी काय रामायण महाभारत चालू होते याची किसनाला काहीच कल्पना नव्हती. घरी सगळं व्यवस्थित आहे असे गृहीत धरून तो महिन्याकाठी पैसे पाठवू लागला. अशातच पीरियडचे सहा महिने संपले व किसना गावाकडे आला. गावी येताच मित्र, शेजारीपाजारी त्याला घरातील वाद कसा विकोपाला गेला ते सांगू लागले. पण किसना हलक्या कानाचा नसल्याने त्याने परत दुर्लक्ष केले.


   एक दिवस किसनाचे वडिल बाजारात मासे विकून घरी आले. नेहमीप्रमाणे घरात चिवडा बनवला. पण विजय आणि त्याच्या पत्नीने तो खाण्यावर सामूहिक बहिष्कार टाकला आणि दोघेही टोमणे मारू लागले. किसनाला हा प्रकार पाहून प्रथम धक्काच बसला व मनातल्या मनात दुखावल्या गेला. एवढे दिवस आपण कुटुंबाला एकत्र ठेवण्याचा प्रयत्न केला पण शेवटी त्याला तडा गेलाच हे पाहून त्याला वाईट वाटले. भावाकडे फक्त टी.व्ही. चे प्रक्षेपण होते, रिमोट मात्र त्याच्या पत्नीकडे होते. कौटुंबिक वादातून केवळ त्याचेच तोंड दिसायचे पण शब्दरचना व वाक्यरचना त्याच्या बायकोची असायची. ती रात्रभर त्याला फुल हवा भरायची व विजय सकाळी ती रिकामी करायचा. त्यांचे लग्न झाले तेव्हा तिच्याकडे पाहून असे वाटत होते की, ही खूप संस्कारीत घरची मुलगी आहे, सर्वांना घेऊन चालणारी आहे, चांगली शिकली सवरली आहे निदान पुस्तकातील तरी चांगले गुण नक्कीच असणार, पण कशात काय नि फाटक्यात पाय. वरकरणी वाटणारी 'आशिकी' चित्रपटातली अनू आपल्या जीवनात आली असे विजयला वाटत होते, परंतु पुढे जाऊन लवकरच 'खलनायिका' मधली अनुराधाचे रूप धारण केले हे त्यालाही समजले नाही आणि त्याला समजूनही घ्यायचे नव्हते. विजयच्या सोयरीकीच्या वेळेस किसनाही असाच भुलला होता तिच्या वडिलांच्या गोडगोड बोलण्याला व तिच्या दिखावू वागण्याला. तो स्वत:लाच ओळखू शकला नाही तर लोकांची काय पारख करणार. जेव्हा किसना पुण्यावरून पैसे पाठवत होता तेव्हा विजयने फोन केल्यावर मात्र ती खूप गोड बोलायची. 'काय म्हणता भाऊजी, कसे आहात तुम्ही... जेवण वगैरे करता की नाही व्यवस्थित... तब्येतीची काळजी घेत जा... जास्त कामं नका करत जाऊ... आम्हाला तुमची काळजी वाटते... वगैरे, वगैरे..!' एकदा तर चक्क राखी पौर्णिमेला, सख्खी बहीण असताना पोस्टाने राखी पाठवली, किसनाला हा प्रकार जरा विचित्रच वाटला व अचानक बहिणीसारखे एवढे प्रेम कसे काय ऊतू आले म्हणून संशयाला जागा मिळाली.

  

विजय बायकोच्या संपूर्ण आहारी गेला होता, आपला मान, सन्मान, स्वाभिमान, खानदानाची अब्रू बाजूला ठेवून तिच्या इशाऱ्यावर नाचू लागला. बायकोसमोर आपण आई-वडिलांना काय शिव्या घालत आहे याचे त्याला मुळीच सोयरसुतक नव्हते. त्यांना जमेल तसे म्हाताऱ्यांना वाईट ठरवणे व वाळीत टाकणे एवढाच त्याचा उद्योग होता. असेच एकदा सर्वजण जेवायला बसले. सूनबाई वाढण करत होती. विदर्भात शेवटला भात घेण्यासाठी आग्रह करण्याची पद्धत आहे, नाही घेतला तर सासरा भिकारी होईल अशी एक विनोदी म्हण आहे. सूनबाईने शेवटला भात विजयला वाढला पण विजय लगेच बोलला, "अगं राहू दे, नको वाढू मला, माझा सासरा खूप श्रीमंत आहे, तुझ्या सासऱ्यासारखा भिकारी नाही." यावर त्याच्या बायकोने दात खिदळले व मनोमन आनंदी झाली. हा सर्व प्रकार पाहून किसनाला खूप संताप आला पण जेवताना भांडण नको म्हणून स्वत:ला सावरले. आता विजयला पूर्ण आणि गलेलठ्ठ पगार मिळू लागला होता. त्या दोघाही नवरा बायकोचे विविध नाट्यप्रदर्शन चालूच होते. या ना त्या कारणावरून घरात आदळआपट करणे, कामाला हात न लावणे, टोमणे मारून सासू-सासऱ्याला राग व चीड आणून त्यांना बोलण्यास प्रवृत्त करणे. स्वयंपाक वेगळा करणे. दोघेच वेगळे जेवण करणे. असले नाटक पाहून किसनाच्या लक्षात आले की यांची सर्व नाटकं वेगळी राहण्यासाठी आहेत. विजयने सर्व अपेक्षांवर पाणी फेरले होते या विचाराने किसना पुरता निराश झाला होता.

   

एक दिवस सकाळी कुठल्यातरी गोष्टींवरून सासू सूनेत छोटासा वाद झाला. विजयने नेमकी संधी साधली. तो अचानक एका पिशवीकडे धावत गेला व त्यातून एक मच्छी कापण्याचा सत्तूर बाहेर काढला आणि स्वत:च्या पोटावर धरला. किसना घाबरला व लगेच त्याच्या हातचे शस्त्र हिसकावून बाहेर नेऊन ठेवले. विजय रागाने म्हणाला, "मरू दे मला, या बुडा-बुडीने माझं जगणं कठीण करून टाकलंय, जेव्हा पाहान तेव्हा माझ्या बायकेसोबत भांडत राहते." यावर किसना म्हणाला, "अरे दादा ! मी एवढ्या दिवसापासून पाहात आहे, त्यांचा तर एवढा दोष नाही दिसत यामध्ये, ऊलट तुम्हीच दोघे वेगवेगळे नाटकं करतांना मला दिसताय, बायकोच्या एवढा आधिन जाशिल असे मला कधिच वाटले नव्हते, पण तू तर हदच केली, असे कसे नेहमी आई-बाबांचेच चुकते, कधी तरी तिलाही बोलत जा ना, असे न करता तिला तू डोक्यांवर बसवून प्रोत्साहन देत आहे." विजय म्हणाला, "तुला काय माहीत आहे यातले, त्या दोघांनी किती त्रास दिलाय आम्हाला." यावर किसना बोलला, "अरे ते जन्म दाते आहेत आपले, मला तरी नाही वाटत की काही त्रास दिला असेल म्हणून, मी एवढे आयुष्य काढले शिवाय तुमच्यासोबतही बरेच दिवस राहीलो पण तू सांगतो तसे कधी जाणवले नाही." विजय लगेच उत्तरला, "तू लयच शहाणा झालास काय, मला नको शिकवू शहाणपण, अन ते काही माझे जन्मदाते नाहीत, मी त्यांना माझे माय-बाप नाही मानत, माझे सासू-सासरेच माझे माय-बाप आहेत."

   ़़

किसना हे सर्व ऐकूण सून्नच झाला. त्याने विजय व त्याच्या पत्नीचे सर्व डावपेच ओळखून घेतले होते. त्यांचा उद्देश आता सफल झाला होता व आता त्यांना वेगळे राहायचे होते. शेवटी किसना नाईलाजाणे त्याला बोलला, "बरं ठिक आहे, आले माझ्या लक्षात तुला काय म्हणायचे आहे ते सर्व दोष मी माझ्या नशिबावर घेतो आणि तुम्ही दोघेही आता वेगळे राहा, तू आता आर्थिक दृष्ट्या सक्षमही झालास, नोकरीही पक्की झाली व चांगला पगारही मिळतो, आता तुम्हाला आमची काय गरज आहे. उगाच नेहमी नेहमी भांडण होऊन तमाशा होण्यापेक्षा वेगळेच राहा !"

   

विजय नेमकी हीच संधी शोधत होता. त्याने जराही वेळ न गमावता घराच्या दोन खोल्या ताब्यात घेतल्या, स्वत:चे सर्व सामान लावून वेगळा राहायला लागला. एरव्ही किसना पुण्यात असतांना व त्याच्याकडून पैसे मिळत होते तेव्हा विजयची पत्नी किसनासोबत 'भाऊजी, भाऊजी' म्हणून खूप गोड बोलायची. पण स्वार्थ संपताच तिनेही आपले असली रूप दाखवले. विजयचा दोन वर्षे पगार नव्हता तेव्हा किसना व त्याच्या वडीलांनी जमेल तेवढी आर्थिक मदत करून घर चालवले व त्यांचा संसार पुढे रेटला परंतु त्यांचे असे कडवट फळे मिळतील असे नव्हते वाटले. आता ते दोघेही वेगळे राहून आनंदाने नांदू लागलेत, त्यांना एक दोन वर्षाचा मुलगाही होता. नातवाला खेळवण्यासाठी आजी आजोबा अधून मधून त्याला जवळ घेत परंतू त्याची आई त्याला हिसकावून घेऊन जात. "माझ्या मुलाला हात नाही लावायचा !" अशी वरून तंबी द्यायची. एवढा तिरस्कार व एवढी ईर्ष्या माणसाच्या मनात येतेच कशी हे एक न सुटणारं कोडंच आहे.

   

आपलं विस्कटलेलं घर पाहून किसना पुरता हताश झाला होता. त्याला वाटायचे की आपला भाऊ मास्तर झाल्यावर सर्व गरीबी दूर होईल. तो आपल्या म्हाताऱ्या आई वडीलांचा आधारस्तंभ होईल. लहानपणी भोगलेले काबाडकष्ट, दारिद्र्य आणि विवंचणा याला कलाटणी मिळेल. दोघे भाऊ संपुर्ण कुटुंबासह एकत्र राहून समाजाला एक वेगळा आदर्श घालवून देऊ. पण आता पुर्वीसारखी परस्थिती राहीली नव्हती, सर्वकाही उलटे झाले होते. किसनाचा भ्रमनिरास झाला होता. आता तो आई वडीलांना घेऊन एकटा पडला होता. स्वत:चे सर्वस्व स्वार्थी भावाला अर्पण करून रिकामा झाला होता. जगात असे घडत असते, हेही दिवस निघून जातिल असा विचार करून किसनाने स्वत:ला सावरले, पण भावाचा तिरस्कार मात्र केला नाही. हा त्याचा स्वभावच तसा असेल त्याला काय उपाय आहे म्हणून स्वत:ची समजूत काढली. येईल त्याला एक दिवस समज म्हणून किसना गप्प बसला. पण इकडे विजयची व त्याच्या बायकोची कुरघोडी दिवसेंदिवस वाढतच चालली. घराला घर लागून असल्याने खटके उडतातच पण ईथे मात्र परस्थिती वेगळी होती. ते दोघे मुद्दामहून काही ना काही भांडण उकरून काढत. त्यांचा उद्देश एकच की, म्हाताऱ्यांना चिड आली पाहीजे व ते काही बरे वाईट बोलले पाहीजे जेणेकरून जगाच्या नजरेत ते वाईट ठरेल. असे नेहमी नेहमी घडायचे त्यामुळे वडीलांचा एकदा नियंत्रणाचा बांध फुटला व हे घर सोडून दुसरीकडे जाऊन राहायला सांगितले. झाले त्यांच्या मनासारखे. बहुतेक याच गोष्टाची वाट पाहात होते ते दोघे. लगेच सामानाची आवरा आवर केली व यवतमाळ जिल्ह्यात कळंब येथे तालूक्याच्या गावी राहायला गेले. तेथून त्याला त्याची शाळाही जवळ पडत होती. काही दिवस किरायाने राहीलेत नंतर स्वत:चे घर बांधले. त्यांना जे पाहीजे होतं तसं घडलं.

  

विजय पार बदलून गेला पण किसना मात्र तसाच राहीला. किसनाला पुणे येथून कंपनिचे दुसरे बोलावणे आले. त्याने आई बाबांना झालेल्या प्रकाराचा जास्त विचार नका करत बसू, आपण नव्याने चांगली सुरूवात करू म्हणून त्यांची समजूत घातली व त्यांचा निरोप घेवून वेळ न घालवता लगेच निघून गेला. किसनाला आता टाटा मोटर्स मध्ये 'के ब्लॉक' कार प्लँट ला जॉब मिळाला होता. पगारातही वाढ झाली होती. पण किसनाला जरा अवघड काम मिळाले. चार दिवस काम करून पाहीले. जरा जास्तच त्रास व्हायला लागला. त्याने सुपरवायजरच्या कानावर टाकले, शक्य नसल्यास कंपनी सोडायची तयारीही दर्शविली. पण किसनाचे योगमान चांगले, त्याला शरीराला त्रास न होणारे पण अतिशय जबाबदारीचे काम त्याला मिळाले. पण किसनाने कौशल्य प्राप्त करून त्यावर मात केली आणि रममान झाला शिवाय ओव्हरटाईमचाही फायदा मिळाला. रूमचा व एक वेळच्या जेवणाचा खर्च वगळता काही पैसे गावी पाठवायचा व उरलेले पैसे शिल्लक ठेवायला लागला. किसनाचे आता लग्नाचे वय झाले होते. त्याला आता स्वत:च हा सर्व खर्च करावा लागणार होता त्यामुळे वायफळ खर्च टाळून एक एक पैसा जोडून शिल्लक पाडला.

इकडे गावाकडे मास्तरचे मस्त चालले होते. विजय अधून मधून त्याच्या आई वडीलांकडे येऊ लागला पण तो त्याचा स्वार्थ पुर्ण करण्यासाठी. कधी घर टॅक्स पावती, कधी राशन कार्ड मधून नाव वेगळे करण्यासाठी, कधी आईवडीलांचे आधार कार्डचा उपयोग त्याच्या वैयक्तिक काम करून घेण्यासाठी. पण कधी ऐकले नाही की त्याने कधी त्या म्हाताऱ्या आईबाबांना कसे आहेत म्हणून विचारले वा कधी पैसे दिलेत म्हणून. त्याला जे कागदपत्र पाहीजेत ते तो येऊन गोड बोलून घेवून जायचा. अशातच त्याने वडीलांचे जात प्रमाणपत्र व जन्माची नोंदही घेऊन गेला. किसनाचे सहा महिने त्या कंपनितले संपले व तो त्या अवधित तो गावाकडे निघून आला. तेव्हा विजयचा सर्व प्रकार त्याच्या लक्षात आला. पण भोळ्या किसनाने त्याला लागेल तेव्हा विजय परत करील असा विश्वास व्यक्त करून त्यावर दुर्लक्ष केले.

  

किसना आता गावात बेकार फिरत होता. गावातिल मित्रांच्या सहाय्याने काही महीने शेतावर काम करू लागला. वडीलांना नदीवर मासे पकडायला मदत करू लागला. काही महीने असेच निघून गेलेत. किसनाने आता लग्न करून टाकावे असे सर्वांनी सुचवले व तोही तयार झाला. सन २००८ नोव्हेंबर महिन्यापासून किसना लग्नासाठी मुली शोधू लागला. शेवटी एक स्थळ पसंत आले व लग्न ठरले. एक महीन्यानंतर किसनाला परत टाटा मोटर्सचा तिसरा कॉल आला. लग्नासाठी आणखी पैसा जमा करण्याची त्याला संधी प्राप्त झाली. तो पुण्याला निघून गेला. आता त्याला उच्च शैक्षणिक पात्रतेचा व मागिल अनुभवांचा चांगला फायदा झाला होता. त्याला चांगले काम मिळाले होते. त्याने तेथूनच फोनवर लग्नाची सर्व जुळवा जुळव केली होती. गावाकडे सगळी तयारी आटोपली होती. मोठा भाऊ जरी कर्तव्याला विसरला तरी त्याला तसे करायचे नव्हते. त्याने त्याच्या नातेवाईकांकडून लग्नाची पत्रिका विजयला पोहचवली पण विजय त्यांना उध्दटपणे बोलला हे किसनाला कळले. 

  

किसनाने शेवटले कर्तव्य म्हणून विजयला लग्नाच्या निमंत्रणासाठी फोन केला. "हेलो, दादा मी किसना बोलत आहे, जे झाले ते झाले, सर्व विसरून जा, किमान चार अक्षता टाकण्यासाठी तरी माझ्या लग्नात येशिल अशी अपेक्षा करतो." पण विजयने त्याची विनंती ऐकूण फार विचित्र उत्तर दिले. "तू एक मानव प्राणी आहेस ना, अन्न खातोस ना, गू नाही खात ना, मग तुला समजत नाही का, तू कोण रे माझा, काय आपले नाते, कोण्या नाकाने मला फोन करतोय, लाज नाही वाटत का तूला मला फोन करतांना...?" 

विजय जन्मो जन्मीची भर्रास काढून मोकळा झाला. पण किसनाला या बोलण्याचे फार वाईट वाटले. आपण काय चूक केली हे तो विचार करू लागला. मोठ्या भावासाठी आयुष्याचे काही वर्षे वाया घालवली. त्याला स्वत: ची नोकरी दिली, लग्न करून दिले, काही दिवस त्याचा संसार जगवला, काहीही कमी पडू दिले नाही आणि आता याच गोष्टींचा अवडंबर करून तो लहान भावासोबत असा वाईट वागत आहे असे पाहून किसना मनातून दुखावला. 'देवा चांगले पांग फेडलेस रे बाबा, माझ्या कर्तव्य, त्याग आणि जबाबदारीचे, अशी वेळ कुणावरही नको येऊ देऊस म्हणजे झालं !' असे म्हणून तो स्वत:ला च दोष देत राहीला व सावरला.

  

किसनाचे लग्न जवळपास येऊन ठेपले, कंपनित सात आठ दिवसांच्या सुट्या टाकून तो लग्नासाठी गावी आला. लग्न धुम धडाक्यात पार पडले. होते नव्हते सर्व लग्नात हजर होते पण विजय मात्र नव्हता याची सल त्याला आयुष्यभर सलत राहली. पत्नीला घेऊन किसना पुण्याला गेला. तिथे त्याचा संसार नव्याने सुरू झाला. कंपनिचे दोन महीने बाकी असतांना तिथे २००९ साली 'स्वाईन फ्लू' नावाच्या भयंकर आजाराने पुण्यात दहशत निर्माण झाली होती. अशातच किसनाची पत्नी गरोदर होती. तो आधिच खुप संवेदनशिल होता, त्यामुळे भिती आणखिनच वाढली व कोणताही धोका पत्करायचा नाही व खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी पुणे शहर व कंपनिचा राहीलेला अर्धवट जॉब सोडून गावाकडे परत आले. गावाकडे परत आल्यानंतर किसनाला बेकारीचा सामना करावा लागला. वडीलांची मदत होत होती आणि किसनाही त्यांच्यासोबत मदतिला जाऊ लागला. 

   

असेच काही महीने लोटले. किसना व त्याची पत्नी वर्धा येथे आले. पत्नीचा प्रसवकाल जवळ आल्याने ते तेथेच राहीले. एक मुलगा झाला. पत्नी चांगली शिकलेली, लग्नापुर्वी एम.एस.ई.बी. विभागाच्या खूप जागा निघाल्या होत्या, त्यामुळे तिने आधिच खूप अर्ज करून ठेवले होते. ती गरोदर असतांनाच तिला त्या विभागाचे विविध जील्ह्यातून नोकरीचे कॉल्स येऊ लागलेत, पण अशा अवस्थेत रूजू होणे शक्य नसल्याने ते पुढे ढकलण्यात आले. येथून काही महीन्यानंतरच औरंगाबाद जिल्ह्यात ति नोकरीवर रूजू झाली. किसना बायको, मुलासह तिथे राहण्यास गेले.

  

किसनाची आता आर्थिक विवंचणा दूर झाली होती परंतू आई वडीलांपासून दुरावला होता. घरात स्वाभिमानाच्या विषयावरून वाद होऊ लागले. त्यालाही वाटू लागले की आपणही कमावले पाहीजे त्यामुळे वैजापूर येथे बारावी, बी.ए., एम.ए., बी.एस.सी. च्या विद्यार्थ्यांचे ट्युशन क्लासेस चालू केलेत. क्लासेसला चांगले दिवस येऊ लागलेत. किसनाला लोकप्रियता मिळायला लागली. अशातच किसनाचा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास जोरात चालू होता व त्याला यनतमाळ येथे एस.टी. महामंडळात कमी पगाराची पण स्थायी नोकरी लागली. विद्यार्थ्यांनी त्याला 'सर जाऊ नका' म्हणून विनवणी केली. पण भविष्याचा विचार करून तो नाईलाजाने क्लासेस सोडून गावाकडे गेला व नोकरीवर रूजू झाला. लिस्टमध्ये जिल्ह्यातून प्रथम आल्याने त्याची निवड खुल्या प्रवर्गात झाली त्यामुळे जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्याची वेळ आली नाही कारण वडीलांचे जात प्रमाणपत्र व जन्माची नोंद मास्तर विजयकडे होती.

   

एक वर्षानंतर किसनाच्या पत्नीने वर्धेला बदली करून घेतली व पत्नी मुलासह तो तिच्या नोकरी निमित्ताने वर्धेलाच राहू लागले. किसनाला इतर क्षेत्रातही प्रयत्न करायचा होता शिवाय त्याला आहे त्या नोकरीत जातीचे आरक्षण घ्यायचे होते. विजय आणि किसना यांच्यात बोलचाल नव्हती त्यामुळे काही मध्यस्थांच्या मदतिने त्याला ते कागद पत्र मागण्याचा प्रयत्न केला. किसनाला वाटले आपला भाऊच आहे तो, सहज देईल. पण विजयने ते देण्यास साफ नकार दिला. गावातिल प्रतिष्ठीत नागरीक विजयकडे गेलेत, विनवणी करून पाहीली पण यश आले नाही. 


   विजयच्या शिक्षक मित्रांनी त्याला म्हटले, "अरे ज्याच्या भरवशावर तू या स्थानाला आहे, त्याचाच तू आज अटकाव करत आहेस, देऊन टाक त्याला पाहीजे ते, परत करण्याची हमी आम्ही घेतो, निदान एवढी तरी उपकाराची परतफेढ कर त्याची, तेवढेच तुला पुण्य लागेल." यावर विजय बोलला, "हे बघा, मला काही उपकार, पुण्य वगैरे सांगू नका आणि मला त्या कागद पत्रांचे काहीही काम नाही, तरी पण मला ते नाही द्यायचेत, त्याला काय करायचे ते कर म्हणावं, मी नाही देणार ते, सांगून द्या त्याला." किसना या त्याच्या उत्तराने अचंबित झाला. विजय एवढे वैर का करतोस हे त्याला कळलेच नाही.

   

नातेवाईकांनी सांगून पाहीले, विजयच्या हेड मास्तरांनीही त्याला विनवणी केली पण त्याने उध्दटपणे बोलून फेटाळून लावले. तहसिलमधूनही ते रेकॉर्ड हरवले होते हे विजयलाही माहीत होते त्यामुळे किसना आता खूप निराश झाला होता. तब्बल तिन चार वर्षे असेच विनवणी करण्यात निघून गेले पण विजयला काही पाझर फुटला नाही व किसनानेही त्यावर दुर्लक्ष केले.

   

एक दिवस विजयचा त्याच्याच शाळेवर शिकवणारा व त्याच्यासोबतच नोकरीवर लागलेला शिक्षक सहकारी किसनाला भेटला. इकडली तिकडली चर्चा झाली. किसनाने शाळेच्या घडामोडीबद्दल सहज विषय छेडला व झाले का सर्वांचे डी.एड. म्हणून प्रश्न केला. यावर तो शिक्षक मित्र बोलला, "माझे तर लवकर झाले चार वर्षात कारण माझे दोनच विषय बाकी राहीले होते ते मी काढले आता सेटींग लाऊन. पण तुझा भाऊ लयच मतीमंद आहे राव, सर्वच्या सर्वच विषय घेऊन बसला, एकही विषय त्याला बाँण्ड्रीवर पास नाही करता आला." "मग पुढे काय झाले....?" किसनाने विचारले. त्यावर त्यावर तो मित्र म्हणाला, "काय होणार, सेटींग लावली, त्याला घेऊन बोर्डात गेलो, त्याच्या सासऱ्याडून पैसे घेतलेच होते उसणे, रिचेकींगचा अर्ज सादर केला, अधिकाऱ्यांना पैसे खाऊ घातले, पेपर बाहेर काढले जिथे २५ गुण होते त्याचे ५२ गुण केलेत व अशा पध्दतिने सर्व गुणपत्रिकाच पलटी मारली, जमलं त्याचं काम फत्ते ! पण तुझा भाऊ लयच मतलबी हाय बुवा, सासऱ्याने दिलेले पैसे परतही केले तरी तो सासऱ्याचेच गुणगाण गातो आणि मी एवढी सेटींग लावून दिली तरी त्याला त्याचे काहीच वाटत नाही...! बोलण्याच्या ओघात तो सर्व काही सांगून गेला. किसनाने त्याची लपून व्हीडीओ रेकॉर्डींग केली हे त्याच्या लक्षातही नाही आले. शेवटी तो मित्र म्हणाला, " पाय किसना, तु होय म्हणून मी तुले सांगत आहे, ही गोष्ट कोणालाच सांगू नको, नाही तर मी आणि तुझा भाऊ जाईल बाराच्या भावात...!" यावर किसना बोलला, "नाही रे बुआ, असे कसे करीन मी, चिंता करू नकोस...!"

   

नासुकल्या डी.एड. चे विषय पास करण्यासाठी एवढी वर्षे लागलीत व एवढी मोठी सेटींग लावावी लागली तर त्या आश्रम शाळेतले विद्यार्थी कसे घडवल्या जात असतील तो विचार न केलेलाच बरा. विजयने हे सारे जुगाड करून स्वत:ची व शासनाची फसवणूक करून खूप तिर मारल्याचा आव आणत होता. किसनाने मनात आणले असते तर जसे शिक्षक बनवता आले तसेच पायउतारही करता आले असते. पण कोणाला खायला दिलेले अन्न काढायचे नसते हे त्याला ठाऊक होते व शेवटी विजय व त्याच्यात काय फरक उरला असता. असा विचार करुन त्याने ती पुरावा असणारी रेकॉर्डींग डिलिट केली.

   

एक दिवस किसना त्याच्या मायगावी असतांना त्याच्या म्हाताऱ्या आईचा नालीवर पडून हात मोडला, त्याने वर्धेला आणले व सावंगी दवाखान्यात भरती केले. सर्जरी करण्यात आली. विजयला कोणाकडून तरी समजले असेल, तो दवाखान्यात भेटायला आला. सर्वांना आश्चर्य वाटले. किसना व विजयची बोलचाल सुरू झाली. यानंतर त्याचे किसनाच्या घरी येणे जाणे वाढले. त्याला कळंब सोडून वर्धेला येऊन राहायचे होते म्हणून तो किसना व त्याच्या पत्नीच्या सहाय्याने बरेचसे प्लॉट्स बघितले. त्याच्यात असे परिवर्तन व त्याची अशी जवळीक पाहून सर्वांना नवलच वाटले. एक दिवस सपत्निक तो दवाखान्यात आला भेटायला.पत्नीच्या आडून आईच्या मदतीसाठी फुल ना फुलाची पाकळी म्हणून काही पैसे आग्रहाने किसनाच्या हातात ठेवले. हे बहुतेक तिला माहीत पडले असावे. तिला वाटले असेल की आता या दोघा भावांची मैत्री वाढत आहे, दोन तिन तास ती अबोलच राहली. बऱ्याच लोकांनी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण ती काही बोलत नव्हती. एक बुजगावणे भावाने सोबत आणले असेच वाटू लागले. तिच्या मनातले डावपेच तिलाच माहीत. तिने अचानक चक्कर आल्याचे सांगितले व विजय तिला घेवून लगेच गावाकडे गेला. गावी पोहचल्यावर त्याने फोन करुन शहाणिशा केली. विजयने आता सर्व ठिक असल्याचे सांगितले.

  

यानंतर बरेचदा किसनाने त्याला फोन केले. पण विजय फोन काही उचलेना. किसना त्याला अजून पाहणितले दोन, चार प्लॉट्स दाखवणार होता. तब्बल १५ दिवस विजय किसनासोबत काहीच बोलला नाही. शेवटी एका मध्यस्थी मित्राचा फोन आला. त्याने किसनाला सांगितले, "किसनाभाऊ तू काही विजयभाऊ सोबत संपर्क ठेवण्याचा प्रयत्न करू नकोस, मला त्याचाच फोन आला होता, त्याच्या बोलण्यावरून मला सर्व लक्षात आले आहे." किसनाने विचारले, "पण नेमके झाले काय, माझे काही चुकले काय ?" त्यावर तो मित्र म्हणाला, "नाही रे भाऊ, तसे काही नाही, त्या दिवशी दवाखान्यात भेटायला आल्यावर वहीणीला जो चक्कर वगैरे आला होता, त्यावर विश्वास करू नकोस, काढता पाय घेण्यासाठी हे सर्व चालले होते आणि दोघे भाऊ जवळ येत आहे हे तिला खपले नाही."

   

किसनाने परत विचारले, "मग प्लॉट पाहात होता ना तो, त्याचे काय झाले मग ?" यावर मित्राने उत्तर दिले ते जरा विस्मयकारकच होते. "अरे सोड तो प्लॉट वगैरे, त्या दिवशी दवाखान्यातून परत आल्यावर वहीणी विजयभाऊला अमरावती जिल्ह्यात एका खेड्यावर एका महाराजाकडे घेऊन गेली. तेव्हा त्या महाराजांनी सांगितले की, 'राहण्यासाठी वर्धा जिल्ह्याची शिवही ओलांडू नकोस, त्या जिल्ह्यात तुम्हाला धोका आहे.' तेव्हा किसनाभाऊ तू समजून घे डावपेच महाराजांचे आहे की, वहीणीचे ? तू आता त्याला कधीही फोन करू नकोस...!" एवढे बोलून मित्राने फोन ठेवला.


आता किसना घोर विचारात पडला. त्याने नकारात्मकपणे विचार करून पाहीला की, 'हे नक्कीच वहीणीचे कारस्थान असणार' पण त्याच क्षणी सकारात्मकही विचार केला की, 'होऊ शकते, सांगितले असेल महाराजांनी, आता तो यवतमाळ जिल्हा सोडून नाही येणार वर्धा जिल्ह्यात राहायला...!'

दोन महिन्यात खबर आली की, विजयने वर्धा जिल्ह्यात देवळीला तालूक्याच्या गावी प्लॉट घेतला, जेथून त्याच्या पत्नीचे माहेर अगदी जवळ पडते. यानंतर एक वर्षाने बातमी आली की, विजयने तिथे घर बांधले, राहायला आलेत व वास्तुपुजनही झाले, पण किसनाला जाणिवपुर्वक निमंत्रण नव्हते.

किसना विचारच करत राहीला. महाराजांनी स्टेटमेन्ट बदलले की काय म्हणून स्वत:च्या मनाशीच हसला.

   

एवढा मोठा विरोधाभास पाहून कोणालाही हसू आल्याशिवाय राहणार नाही. ज्या माणसाने कुटुंबासाठी एवढं मोठं समर्पण केलं त्याच्या वाट्याला आज काय आले ? अलौकीक बुध्दीमत्ता असूनही ज्याच्या हाती आज किमान खडू आणि पेन तरी असायला हवा होता आज त्याच्या हातात एक मेकॅनिक म्हणून त्याच्या पदरी स्पॅनर्स व टुल किट आली. जो 'शिक्षक' या पदाची किंचितही बरोबरी करू शकत नाही, त्याच्याकडे आज देशातले विद्यार्थी व भावी नागरिक घडवण्याची संधी चालून आली ती कुणामुळे तर त्याच्याच लहान भावामुळे आणि आज त्याचीच हेळसांड होत आहे. कृतघ्नता हा शब्द ऐकला होता, पण एवढी त्याची व्यापकता असेल असे ऐकणारा विरळच. याच्यात दोष कुणाचा ? ज्याने आपले रक्ताचे नाते नेकीने जपले, कुटुंब एकत्र राहावे म्हणून वाटेल त्या त्यागाला आपलेसे केले, स्वत:च्या भविष्याची, करिअरची वाट लावून टाकली, आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक आनंदी क्षणाचा नि:स्वार्थपणे त्याग केला, मोठ्या भावाववर डोळेझाक विश्वास केला त्याची की जो निर्दयपणे लहान भावाच्या हळव्या स्वभावाचा गैरफायदा घेवून केवळ आपलेच स्वार्थ साधण्यात धन्यता मानली त्याची ? शेवटी एकच म्हणावे लागेल.....

     

   सोडूनिया हात सग्या, सोयऱ्यांचा

   करूनिया घात, भ्रात उपकारांचा,

   होईशी गुलाम नवरीच्या मनाचा

   जगी ऐसा बंधू नसावा कुणाचा !   


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy