नात्यातलं प्रेम आणि हक्क
नात्यातलं प्रेम आणि हक्क


रीमा आज तिच्या माहेरी आली होती. पुण्यात तिच्या मैत्रिणीच्या वास्तुशांतीसाठी ती येणार असल्याचे तिने वहिनीला आणि आईला आधीच कळवले होते. त्यानिमित्ताने तिला तिच्या आवडत्या वहिनीसोबत म्हणजे मेघासोबत थोडा वेळ घालवायचा होता. तिचे खाण्याचे डोहाळे स्वत: पुरवायचे होते.
मेघा त्यानंतर पुढच्या आठवड्यात तिच्या माहेरी जाणार होती. नंतर तिला बाळासाठी जास्त वेळ द्यावा लागेल म्हणून रीमा आणि मेघा परत एकदा त्यांचा वेळ एकत्र छान घालवणार होत्या.
रीमाच्या वेळी तिचा भाऊ रोहन आणि मेघा सतत तिच्यासोबत होते. सुरुवातीपासूनच रीमाने जिथे ट्रीटमेंट घेतली आहे, त्याच डॉक्टरकडे आणि त्याच शहरात तिने राहावे अशी रीमाच्या सासरच्यांची इच्छा होती. त्यामुळे रीमाला या काळात जे माहेरपण हवे, काळजी घेतली जावी यासाठी तिची वहिनी मेघा दर वीकेंडला मुंबईला जात होती. दोन दिवस तिच्यासोबत थांबून पुन्हा आल्यावर स्वतःची नोकरी आणि घर व्यवस्थितपणे तिने सांभाळले होते.
रीमाच्या आईचे मन मात्र लेकीसाठी त्यांना काही करता आले नाही म्हणून अधून मधून दुखरे होई.
कोणी यावर बोलले की मग त्यांना मेघाचे आता लाड करताना हा विचार मनात येऊन जाई. काळजी घेत असल्या तरी उगाच कधी त्या अचानक गप्प राहत. रीमा आणि मेघाला या काळात मी काय दिले याचा विचार कुठेतरी वेगळ्या दिशेला भरकटत जाई मग.
"प्रेम देण्यात आणि काळजी करण्यात बरोबरी करण्याच्या नादात, लेकीला, म्हणजे रीमाला समानता देता आली नाही तुम्हाला!" हे शेजारच्या काकू त्यांना बोलून दाखवत होत्या. रीमाच्या कानावर हे पडताच, तिने त्यांची कान उघाडणी केली.
त्यांना समजावले, "अशा विषयांवर कृपा करून माझ्या आईशी किंवा कोणाशीच कधी बोलू नका. प्रत्येक घरात कोण काय त्याग करत आहे? प्रेम लावत आहे, जीव ओवाळून टाकावा इतकं सगळ्यांना जपत नाती टिकवत आहे, हे खूपदा माहित नसते आपल्याला!"
"प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते त्यामुळे त्यांच्यातील प्रेम टिकून कसे राहील यासाठी सुचवणारे, मदत करणारे कौतुकाचे काही सांगता आले तर नक्कीच सांगा पण बाकी काही नको."
काकूंना बहुदा चूक समजली. त्या लगेच त्यांच्या घरी परत गेल्या. परंतु तरी रीमा 'तिच्या आईच्या मनातून ही गोष्ट कशी काढावी?' याचा विचार करत होती.
आज ती तिच्या सासरी गेल्यावर आई आणि मेधा आनंदी असाव्यात नेहमीसारख्या, हिच तिची इच्छा होती.
मेघाला तिच्या माहेरी जायचे होते. या काळात ती जितकं आनंदी राहील तितके चांगलेच.
जाण्यापूर्वी आईशी बोलून रीमा तिच्या सासरी परतली.
मेघाचे आई-वडील येऊन तिला माहेरी घेऊन गेले. त्याच शहरात राहत असल्याने रोहन अधून मधून तिला भेटायला जाऊ शकत होता. मधल्या काळात मेघाची काळजी सगळ्यांनी खूप छान घेतली होती.
रीमा आठवडाभर आधीच तिच्यासाठी परत येऊन तिची हॉस्पिटलमध्ये जाण्याची तयारी करून देणार होती. तिच्यासोबत थांबणार होती त्यासाठी रीमा परत एकदा पुण्याला आली. आल्यावर ती लगेच मेघाची सगळी तयारी करून देण्यासाठी रीमा मेघाच्या माहेरी गेली.
संध्याकाळी घरी ती परतण्यासाठी निघाली. परंतु, मेघा ज्या कॉलनीत राहत होती ते कॉलनीत बरेच आत होते. तिच्या एरियातून रिक्षा क्वचितच मिळत असत.
मेघाच्या घरी टू व्हीलर होती तिच्या बाबांची. ते मेघाला सोडून येतो म्हणाले होते.
परंतु, त्यांना त्रास नको म्हणून आणि रोहनलाही मेघाला भेटता येईल या उद्देशाने रीमाने रोहनला त्याची कार घेऊन तिला न्यायला बोलावले.
थोडावेळ मेघासोबत थांबून रोहन आणि रीमा घरी परतले. बराच उशीर झाल्याने थकून रोहन झोपायला निघाला होता, तितक्यात मेघाच्या माहेरून फोन आला.
तिच्या आईने कळवले की, "ते सगळे मेघाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जात आहेत. तिला थोडा त्रास होतोय म्हणून..."
रोहनला काळजी वाटली आणि "तो लगेच निघतो आहे आणि आपण कार मध्ये जाऊत... शक्य असेल तर थांबा" असा निरोप फोनवर तिच्या घरच्यांना सांगून तो लगेच निघाला आईला सांगून!
रोहन सकाळपासून ऑफिसमध्ये होता. घरी आल्यावर तो रीमाला आणण्यासाठी मेघाच्या घरी गेला होता. आत्ता ते दोघे घरी परतून अर्धा तासही झाला नाही तर लगेच त्याला मेघाच्या घरी जायचे होते, हे कदाचित आईला फारसे आवडले नाही. मुलाची काळजी म्हणून, त्या रोहनला समजावत होत्या. "ते जातील रिक्षाने. तिच्या घरच्यांनाही आहे तिची काळजी. आपण उद्या सकाळीच जाऊ त्यांच्या घरी. मी येईल सोबत. आज आज रीमा जाऊन आली आहे. उद्या मी जाते येते तुझ्यासोबत."
रोहन त्याच्या आईला समजावण्याचा प्रयत्न करत होता की, "आत्ता त्याची तिथे गरज आहे... म्हणून त्याला जावेच लागणार आहे. उद्या सकाळी परत जाता येईल."
त्यांचे बोलणे ऐकून रीमा हॉलमध्ये आली, आईला समजवण्यासाठी. तिने आईची समजूत काढली.
"आई आपल्याकडे गाडी आहे म्हणून कॉलनीत कोणालाही बरं नसलं किंवा काही इमर्जन्सी असेल तर तू स्वतःच रोहनला पाठवते. तो मदतीला जातो यासाठी त्याचे कौतुक करते. माझ्यासाठीदेखील मेघा वहिनी किती वेळा पुण्याहून मुंबईला आली. रोहनलासुद्धा तू गाडी घेऊन पाठवलं होतं केवळ माझ्यासाठी!! आमच्या घरी गाडी असताना देखील.... मग आज मेघासाठी तू का नाही म्हणतेस? तिच्या कॉलनीतून संध्याकाळनंतरच रिक्षा मिळत नाही आणि आता तर रात्र झाली आहे. त्यांची फजिती होऊ शकते. मुळात या अवस्थेत मेघा आपल्या घरच्या गाडीत, आपल्यासोबत हॉस्पिटलमध्ये गेली तर तिला बरे वाटेल.... याचा तर विचार कर. रोहन घरी आल्यावर आराम करू शकतो आणि गरज पडली तर उद्या सुट्टी टाकेल तो! पण आत्ता त्याच्या काळजीपोटी किंवा तुला माझ्या वेळी माझे लाड करता आले नाही, असे वाटून तू मेघावर अन्याय करतेस. ही समानता नाही. तुझ्या प्रेमावर, काळजीवर जसा माझा हक्क आहे तसाच तिचाही आहे. ही समानता तू आम्हाला शिकवली होती तुझ्या वागण्यातून. रोहन आणि मला घडवताना तू कधीही भेदभाव केला नाहीस. मुलगा आणि मुलगी यात नेहमी समानता ठेवली. आज त्याच समान प्रेमाची वागणूक मेघाला हवी आहे. नात्यांमध्ये प्रत्येकाला त्याच्या वाट्याचे प्रेम - सन्मान, काळजी हे मिळायलाच हवे! मग ती व्यक्ती कुठल्याही नात्याने तुमच्याशी जोडली गेली असली तरी!!”
आजवर स्वतःच, मुलांना शिकवलेले आज रीमा आणि रोहनच्या तोंडून ऐकून आईचे डोळे पाणावले. त्यांना त्यांच्याकडून होऊ घातलेली चूक दुरुस्त करायची होती. म्हणूनच रीमा आणि रोहनच्या सोबत त्याही निघाल्या होत्या मेघाच्या माहेरी.... सुनेला परत पुर्वीसारखं, तिच्या हक्काचं प्रेम देवून नात्यात वागणूकीची समानता दृढ
करण्यासाठी...