। नातं ।
। नातं ।


एकांतात असताना सहज स्वतःच्या आयुष्यात डोकावून पाहिलं.. बिना नात्यांनी भरलेलं आयुष्य कुठे काही दिसलं नाही, तसं नसायलाही हवं! नाती कीती घट्ट चिकटलेली असतात आणि त्यांचा ओलावा मनाला कीती सुख-दुःख देऊन जातो याची थोडीशी अनुभूति आपसुक येऊ लागली. कौटुंबिक नात्यांबरोबर इतर काही नाती पण कीती जिव्हाळ्याची असतात हे सांगायची गरज खरं तर कोणालाच नाही.पण कोणतं नातं किती जवळ आणि आपल्या आयुष्याला कितपत महत्वाचं आहे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक अनुभव आणि दृष्टिकोण! मैत्री आणि प्रेमाचं नातं पहायला गेलं तर सर्वांचा आवडता आणि रुचकर विषय ! काही मैत्रीची नाती आयुष्याला खरी चव देऊन जातात जणू त्याशिवाय नित्य जिवन जगणं अवघड्ल्यागत वाटायला लागतं . प्रेमाचंही काहीसं तसंच! प्रेमात नहायला कोणाला नकोसं असतं? परंतू या नात्यांची भीती म्हणा किंवा जबाबदारी पेलवायला सर्वच आतूर असतात असंही काही नाही. काही मुद्दाम त्या वळणावर पाऊल ठेवत नाहीत तर काहींची मुद्दाम चाललेली धडपड नेहमीच पहायला मिळते !
या पलीकडे विचार करायला गेलं तर असंही मनात येतं...काहिंचं आयूष्य बिना नात्यानी रितंही असू शकेल? नियतीने काही जणांना नातं काय असू शकतं हे समजूही दिलं नसेलच की.. मग त्यांचं खरच काय ? बिना नात्यांनी भरलेल्या पेल्याचा आस्वाद तो काय असेल कदाचित याची कल्पना करणं अवघडच ! ज्यांचं आयुष्य नात्याविना पुढे जाऊ शकत नाही त्यांच्यासाठी हां विचार तर क्षितिजाची गवसनी घालण्यापलीकडचा ! कायमचं बंद कैदेत अडकलेल्या बंदिस्त मनांना नात्यांची रूची आणि महत्वकान्क्षा असते की नाही कदाचित याचं उत्तर त्यांनाच माहीत असावं.
परंतू एक मात्र नक्की,ज्यांनी कोणी नाती जपली आणि त्या त्या नात्यांची आपल्या आयुष्याशी सांगड घालून गाडी पुढे सरकवली ते खरोखर स्वतःच्या मनाला एक अमूलाग्र अनुभव देऊन गेले किंवा देत असावे! नात्यांना न्याय देणारी माणसे आयुष्याला न्याय दिल्याशिवाय कसे राहतील;कदाचित ते आयुष्य रममान करूनच आयुष्याशी वेगळ नातं जुळवत असतील ! नातं जोडणं,जूळवणं,टिकवणं आणि त्याला योग्य प्रवाहात घेऊन शेवटच्या टोकापर्यंत पोहोचवणं ज्याला जमतं त्याला आयूष्यवान म्हणायला काहीच हरकत नाही !