Nagesh S Shewalkar

Tragedy

1.0  

Nagesh S Shewalkar

Tragedy

न संपणारा शेवट

न संपणारा शेवट

8 mins
1.6K


   

     'ट्याहां......ट्याहां....' कुणाच्या तरी रडण्याने रात्रीच्या भजनानंतर उशिरा झोपलेला मठातला सारा शिष्यवर्ग जागा झाला. सर्वांनी मठाच्या मुख्य दाराकडे धाव घेतली. रात्रीच्या त्या गुढ शांततेत कुठून तरी कुत्र्याच्या ओरडण्याचा भकास आवाज कानावर येत होता. त्यामुळे शांततेचा भंग होत होता. मठातील सारी माणसं दाराजवळ आली. सर्वांचे लक्ष रडणाऱ्या बालकाकडे गेले. मठाच्या पायरीवर कपड्यात गुंडाळून ठेवलेल्या त्या नवजात बालकाला पाहताच सर्वांच्या मनात विचारांचे काहूर माजले.

'कोण असेल ? मुलगा की मुलगी?'

'कुणी टाकले असेल याला ? का टाकले असेल?'

'पडली अजून एकाची भर.'

'यालाही दारोदार फिरावे लागेल.'

'का वागत असतील लोक असे ? स्वतःचे पाप लपावे म्हणून ?' निष्पाप जीवाला का देत असतील सजा ?'

'अरेरे! काय नशीब बिचाऱ्याचे. जन्माला आल्याबरोबर दिले टाकून.'

'कुण्या घरचे आहे? कोण्या जातीचे आहे?'

"महाराज आले. महाराज..." कुणीतरी म्हणाले. तसे त्या बाळाभोवतीचे कोंडाळे आपोआप दूर झाले. साठवर्षीय महाराज संथ परंतु आत्मविश्वासपूर्ण पावले टाकत दाराकडे येत होते. त्यांच्याबद्दल सर्वांच्या मनात आदरभाव होता. त्यांच्या चेहऱ्यावर आगळेवेगळे तेज चमकत होते. महाराज बालकाजवळ आले. त्यांनी बालकाला उचलून घेतले. क्षणभर त्याचे निरिक्षण करुन शांत, धीरगंभीर आवाजात म्हणाले,

"नुकताच जन्म झाला आहे गुलामाचा. नाळही कापावी लागेल. प्रभो, अरे, किती रे जन्म घालशील असे? चला. गुरु महाराजांचा प्रसाद समजून वाढवू यालाही. सकाळीच योगानंदाला स्वकर्तृत्व दाखविण्यासाठी सुट्टी झाली. चोवीस तासही झाले नाहीत तोच त्याची जागा भरून निघाली. राधा..."

"आज्ञा महाराज....." म्हणत राधा अदबीने पुढे आली.

"या तुझ्या भावंडांची सारी व्यवस्था तुझ्याकडे."

"कृपाप्रसाद महाराज." बालकाला घेत राधा म्हणाली.......

     'बघता बघता सूर्य डोक्यावर आला. किरणांनीही रुप बदलले. सकाळी मठातून निघालो तेव्हा हीच किरणे कशी गोड, आल्हाददायी वाटत होती. आणि आता नकोशी वाटत आहेत...' असे स्वतःशीच पुटपुटत त्यागानंद महाराज एका घरापुढे उभे राहून कणखर आवाजात म्हणाले,

"माई ये माई, भिक्षा वाढ माई. घराच्या मालकाची भरभराट होणार आहे. माई, तुझ्या गळ्यात सोन्याच्या माळा पडणार आहेत. येत्या दिवाळीत मोठा पोरगा नाव कमावणार आहे. दोन चाकी वाहन घेणार आहे. "

"कशाच्या माळा आन कशाचे काय बाबा? रातच्या तुकड्याची सोय नाही आन म्हणे..."

"त्यागानंदाचे बोल खोटे ठरणार नाहीत. माई, तुझ्या कपाळावर लिहिलेले मला स्पष्ट दिसत आहे. संपली, माई, तुझी दगदग संपली. अजून थोडी कळ सोस..."

"लै सोसलं महाराज, लै दगदग झाली. जीव नकोसा झाला..."

"अरेरे! माई, असे कंटाळून चालायचं नाही. पणतु खेळवणार आहेस, तू मांडीवर. या त्यागानंदाला पुढले सारे दिसते....."

"घे. बाबा, घे..." असे म्हणत त्या बाईने थोडेसे धान्य त्यागानंदाच्या झोळीत टाकले आणि महाराज परतीच्या मार्गाने मठाकडे निघाले. रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतामध्ये बरीच मुले खेळत होती. बारा वर्षीय त्यागानंदाची पावले आपोआप तिकडे वळली. त्यांना वाटले, 'आपल्याच वयाची ही मुले किती छान खेळतात आणि आपण मात्र यांच्या घरी जाऊन ह्यांच भविष्य कथन करतो की, ही मुले मोटारसायकलवर फिरणार आहेत, इमारती बांधणार आहेत, बडे अधिकारी होणार आहेत. आपणच असे काय पाप केले, की दारोदार फिरून भिक्षा मागावी लागते. का सोडले असेल मला माझ्या मायबापाने आश्रमात? सोडताना त्यांना दुःख झाले नसेल? एखाद्या मुलाला शाळेतून घरी यायला उशीर झाला तर त्याच्या आईची होणारी तडफड आपण पाहतो. धान्य टाकताना त्यांचे हात थरथरतात. व्याकूळ नजरेने ती माता मुलाच्या वाटेकडे पाहते. आपल्या भविष्य कथनाला ते मूक ओठ आता माझा मुलगा कुठे असेल असे विचारतात... '         तितक्यात त्यांच्या कानावर आवाज आला, 

"या. महाराज, या. खेळता का क्रिकेट?" त्या आवाजाने त्यागानंद भानावर आले. दुसऱ्या मुलाने विचारले,

"महाराज, झाले का गाव मागून?"

"माझे भविष्य सांगा ना, मी विराट कोहली होणार की बुमराह होणार?"

"अरे, ते काय भविष्य सांगणार? त्यांचे भविष्य ...."

"ये चूप बस. महाराजांना असे बोलू नये....." एक मुलगा त्या मुलाला समजावून सांगत असताना त्यागानंद तिथून निघाल्याचे पाहून पुन्हा एका मुलाने विचारले,

"काय झाले महाराज, का निघालात? खेळायचे नाही का?"

"झोळी सोडून त्यांना कसे खेळता येईल रे?"

मुलांचे बोल ऐकून त्यागानंद तिथून निघाले. छोट्या मुलांपेक्षा मोठ्या माणसांचे बोल त्यांच्या जिव्हारी लागायचे. त्यावेळी त्यांना भरपूर राग येत असे परंतु त्याचवेळी त्यांना मठाधिपती महाराजांचे शब्द आठवत. महाराज नेहमी सांगत,

'अशावेळी राम राम म्हणा. चांगले काम करणारांना असा त्रास होणारच....' हे सारे आठवताना त्यागानंद पुढच्या घरी उभे राहून साद घालत असताना त्यांचा आवाज नकळत भरून येत असे. त्यागानंदाना वाटायचे की, का आपण तोंडदेखले बोलून भिक्षा मिळवितो.खरेच किती लोकांचे भविष्य आपणास समजते? सर्वांनाच का मोटारसायकल मिळणार आहे? सारेच का अधिकारी होणार आहेत? किती जणांच्या मांडीवर नातू, पणतु खेळणार आहेत? स्वतःच्या आयुष्यातील अंधार स्पष्ट दिसत असताना का आपण तोंडदेखले बोलून चार दाणे मिळवितो? आपण अशी तोंडाची वाफ दवडतो म्हणून लोक आपल्याला बघताच नाक उडवतात. त्यागानंदांना एक प्रसंग आठवला.......

     नेहमीप्रमाणे त्यागानंद एका झोपडीसमोर उभे राहून म्हणाले,"माई, भिक्षा वाढ. तुझा मुलगा या इथेच चार मजली बंगला बांधणार आहे. माई, तुझ्या दिमतीला चांगल्या चार गाड्या उभ्या राहणार आहेत. संपणार आई, तुझा वनवास संपणार!" महाराज बोलत असताना एक तरुणी भिक्षा घेऊन आली. भिक्षा वाढत असताना डबडबलेल्या डोळ्यांनी म्हणाली,

"महाराज, विधवेला का मुल होत असते?"

ह्रदय पिळवटून टाकणारा तो प्रश्न ऐकून त्यागानंदाचे मन द्रवले. अस्वस्थ, बेचैन अवस्थेत त्यागानंद लगेचच मठात परतले. त्यांनी घडलेला सारा प्रसंग मठाधिपतींच्या कानावर घातला. ते ऐकून मठाधिपती महाराज म्हणाले,

"त्यागा, अरे, चूक झाली. त्यात काय एवढे? पण लक्षात ठेव, यजमानाचे तोंड आणि घराची कळा पाहून भविष्याची स्वप्नं दाखवावीत. म्हणतात ना, जशी कुडी तशी पुडी...."

     मध्यान्हीचा सूर्य आपल्या रक्षकांकरवी सृष्टीला सळो की पळो करीत असताना त्याच्याशी सामना करत त्यागानंदाची पावले आश्रमाच्या दिशेने निघाली. परंतु त्या चालीत चैतन्य नव्हते, रोजचा वेग नव्हता. एक प्रकारची मरगळ होती. रात्री मठामध्ये आलेले ते बालक त्यांच्या डोळ्यासमोरून हलत नव्हते. 'कोण असतील त्याचे मायबाप? आई कुमारी असेल की विधवा? बालकास समाज मान्यता देणार नसेल म्हणून त्याच्या आईने त्याला मठात सोडले असावे. क्षणिक मोहाला बळी पडून झालेली चूक सावरण्यासाठी, स्वतःची शोभा होऊ नये म्हणून त्या मातेने त्याला मठात सोडून मठाची मात्र शोभा वाढवली. गावोगावी हिंडताना जात, धर्म असे प्रकार आढळतात. मठात मात्र असे प्रकार नाहीत. ईश्वर हा एकमेव धर्म, मानवता हिच जात.....'

"त्यागा, उशीर झाला. काय झाले? बरे नाही का?" मठाधिपतींच्या आवाजाने त्यागानंदांना आपण मठात पोहोचलो असल्याणी जाणीव झाली. झोळी कोठीघरात रिकामी करून, हातपाय धुऊन त्यागानंद जेवायला बसले. त्यांच्या कानावर बाळाच्या रडण्याचा आवाज आला. त्यांच्या वयाचा स्वरुपानंद म्हणाला,

"रात्री आलेले बाळ सारखे रडतेय. कुठून आणावे आईचे दूध?" 

ते ऐकून त्यागानंदांना काही दिवसांपूर्वीचा एक प्रसंग आठवला.......

नेहमीप्रमाणे त्यागानंद भिक्षा मागत होते. भिक्षा घेऊन येणाऱ्या म्हातारीला पाहून ते म्हणाले,

"आजीमाय, या घराचे दैव खुलणार बघ. नातू खेळणार ....." ते ऐकताना अश्रू पाझरणारे डोळे पुसत म्हातारीने दाखविलेल्या दिशेने त्यागानंदांनी पाहिले. एक तरुणी स्वतःच्या छातीतले दूध काढून टाकत होती. म्हातारी म्हणाली,

"चार म्हैन्यापहिले माझे एकुलत एक पोरगं निघून गेले. पंद्रा दिसापूर्वी दोन म्हैन्याचा नातू बी हे जग सोडून गेला. सुनेला दूधबी पिळून काढून टाकावे लागते...."

तो प्रसंग आठवून आणि त्या मुलाचे रडणे ऐकून त्यागानंदांना वाटले,'काय परिस्थिती आहे, चणे आहेत तर दात नाहीत, दात आहेत तर चणे नाहीत. हे असे किती दिवस चालणार?' अस्वस्थ झालेल्या त्यागानंदांनी अर्धवट जेवण सोडून, स्वतःची पत्रावळ गुंडाळली आणि ते उठल्याचे पाहून मठाधिपतींनी विचारले,

"बाळ त्यागी, बरे नाही का? नीट जेवला नाहीस? जा. घटकाभर आराम कर...." महाराजांच्या शब्दांनी त्यागानंदांना भडभडून आले. धावत जाऊन त्यांनी महाराजांच्या गुडघ्यावर मान टेकवताच महाराज म्हणाले, "बाळा, उठ. असे बरे नाही." महाराज म्हणाले.

"महाराज, असे दुष्टचक्र का? असे किती त्यागी आपण पाळणार आहात?" 

"नाही. नंद, नाही. असे बोलायचे नाही. अरे,तो आहे ना,काळजी घेण्यासाठी. बदलेल. हेही बदलेल."

"नाही. महाराज, नाही. मला नाही वाटत हे बदलेल म्हणून..." असे म्हणत त्यागानंद तिथून निघून त्यांच्या खोलीत आले. पाठोपाठ आलेल्या स्वरुपानंदाने विचारले,

"काय झाले त्यागी? "

"काही नाही रे. भविष्याचा विचार करतोय."

"त्यागा, आपल्याला भविष्य आहे? अरे, आपल्याला समाजाची भविष्य मात्र नक्कीच पाठ आहेत."

"समाजाच्या भविष्यावर आपले पोट अवलंबून आहे. सकाळपासून सायंकाळपर्यंत पोपटपंची करायची. यजमानाचे रुप पाहून त्यांचे भविष्य वर्तवून झोळीत चार दाणे घ्यायचे आणि पुन्हा पुढचे दार." त्यागानंद म्हणाले.

"त्यागा, त्यातही वेगळीच मजा असते. अरे, आपण भविष्य ऐकवतो ना, तेव्हा यजमानांच्या चेहऱ्यावर आपले स्वप्न पूर्ण होणार ही आशा दिसते ना तेव्हा आपल्यालाही आनंद होतो. आपण आयुष्यात कधी स्वतःच घर बांधू शकणार नाही हे माहिती असतानाही समाजाला ते सारे ऐकवताना आपल्यालाही वेगळेच समाधान मिळते."

"स्वरुपा, ते सारे फसवे असते रे."

"तेही माहिती असते. तुला काय वाटते, हे सारे यजमानांना माहिती नसते? भ्रमात आहेस. अरे, असे कितीतरी त्यागा, स्वरूपा नेहमी त्यांना तीच तीच पोपटपंची ऐकवतात. भविष्य वगैरे सारे परमेश्वराच्या हातात आहे हे माहिती असूनही ते क्षणभर स्वप्नांच्या दुनियेत जातात. चार दाणे देऊन तीच तीच स्वप्नं रोज विकत घेतात....." स्वरुपानंद सांगत असताना प्रार्थनेची घंटी झाली. ते दोघे प्रार्थनेला येऊन बसले. महाराजांचा तेजःपुंज, आत्मविश्वासाने भरलेला चेहरा पाहून त्यागानंदांना बराच धीर आला. परंतु मनातील घालमेल जात नव्हती. महाराज म्हणाले, "बालकांनो आपला जन्मच मुळी..............."        असे बोल ऐकताना त्यागानंदाच्या मनात विचार आला,

"पापातून झालाय. पापातून जरी झाला नसला तरी आपल्यापैकी अनेक जण विवाहपूर्व, विवाहबाह्य किंवा समाजाला मान्य नसलेल्या नात्यातून जन्मले आहेत. आईवडिलांनी आपल्याला त्यांच्या जवळ ठेवले असते तर त्यांना जगात कुठेही तोंड दाखवता आले नसते म्हणून त्यांनी आपल या मठात सोडले. कदाचित एखादे वेळी आपण स्वतःच्याच आई भविष्य ऐकवले असेल की, तुझा मुलगा खूप मोठा माणूस होणार आहे. परंतु त्यावेळी दोघांनाही एकमेकांची ओळख पटली नसेल.

     एखाद्या जोडप्याला लग्नानंतर अनेक वर्षे मुल झालं नसेल. तेव्हा त्यांनी देवाला नवस केला असणार की,आम्हाला पहिला मुलगा झाला की, देवाला अर्पण करीन. दैवदुर्विलास पहा, त्यांना मुल झाल्याची, त्यांच्या पोटी जन्म घेण्याची सजा आपण भोगतो आहोत. भिक्षा मागताना कुणी तुम्हाला म्हणाले असेल की, कुणाचे पाप आहे कळत नाही. चार वर्षाचे झाले नाही की निघाले भीक मागायला. सोपा धंदा आहे. चार घरं भीक मागून पोट भरा. परंतु असे म्हणणाऱ्या व्यक्तीनेही कदाचित कधी असेच पाप मठासमोर टाकले असेल याची.......'

"त्यागा, अरे, त्यागानंद...." मठाधिपती महाराजांनी आवाज देताच विचारांच्या अश्वावर आरुढ झालेले त्यागानंद वास्तवात येत गडबडीने म्हणाले,

"आज्ञा महाराज...."

"कुठे आहे लक्ष? नीट ऐका. भक्तांनो, काल आपण योगानंदाला दुसऱ्या एका मठाची स्वतंत्र जबाबदारी दिली. आज आपण आपल्या अजून एका भावाला स्वतंत्र करणार आहोत. मला सांगताना अतिशय दुःख होते की,शेजारच्या गावातील मठाधिपती परवा रात्री स्वर्गवासी झाले असून तो मठ स्वतंत्रपणे चालविण्याची जबाबदारी मी आपल्या त्यागानंदावर सोपवित आहे....."

"महाराज... महाराज....." गोंधळलेल्या त्यागानंदांना काय बोलावे ते सूचत नव्हते.

"त्यागा, काय? माझा तुझ्या सामर्थ्यावर पूर्ण विश्वास आहे. वत्सा, दुपारपासून तुझ्या मनाची झालेली अवस्था मला समजतेय. परंतु भक्ता, असे भावनाविवश होऊन चालत नाही. उठ. तयारीला लाग. मी मुहूर्त काढून ठेवला आहे. आज मध्यरात्री तुला येथून प्रस्थान करायचे आहे. सूर्योदयापूर्वी तू त्या मठात पोहोचशील. उद्या दुपारी तुला रीतसर गादीवर बसवले जाईल. योग्य मुहूर्त तोच आहे. उठा कामाला लागा..."

"आज्ञा महाराज..." असे म्हणत त्यागानंदांनी महाराजांचे पदस्पर्श करून आशीर्वाद घेतले.

     बरोबर मध्यरात्री त्यागानंद सर्वांचा निरोप घेऊन, मठाधिपती महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन मठाच्या मुख्य दरवाजाजवळ आले. त्यांनी दरवाजा उघडण्याचा आणि कुण्यातरी बालकाचा रडण्याचा आवाज एकच झाला. त्यागानंदांनी पाहिले, पायरीवर नवीन बालक....नवा त्यागानंद हजर झाला होता. कोणीतरी दूर पळत जात असल्याची चाहूल त्यांना लागली......

    त्यागानंद नवीन मठाच्या दिशेने निघाले. दमदार, निश्चयपूर्वक पावले टाकत ते चालत राहिले. दिशा उजळू लागल्या. पहाटेचा मंद, शीतल वारा त्यांना स्फूर्ती देत होता. योग्य वेळी त्यागानंद मठाजवळ पोहोचले. दूरवरून त्यांनी पाहिले, एक व्यक्ती मठापासून लगबगीने दूर जात आहे. वेगळ्याच शंकेने त्यागानंद पायरीजवळ पोहोचले. त्यांची शंका खरी ठरली. मात्र एका वेगळ्याच निश्चयाने त्यांनी मठापासून दूर गेलेल्या व्यक्तीच्या दिशेने पाहिले आणि दुसऱ्याच क्षणी खाली वाकून त्या व्यक्तीने टाकून देताच भोकाड पसरून त्यागानंदाचे स्वागत करणाऱ्या त्या नवजात बालकाला ह्रदयाशी धरले......

               


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy