न फिटणारे ऋण
न फिटणारे ऋण
आज सीमाचे मन काही स्थिर नव्हते. म्हणायला घरात चौघेजण. सासरे रिटायर्ड झालेले. सासू एका शाळेत शिक्षिका व सीमा एका कंपनीत संगणक चालक म्हणून काम करीत असे. तिचा पती प्रदीपचा खाजगी बिझनेस होता पण त्याची मिळकत एवढी नव्हती. तिचा आणि सासूचा पगार ह्यामध्ये ते कसे बसे आपले घर चालवत होते. पण ती सगळ्यांना खुश ठेवायचा प्रयत्न करायची. तिच्या आयुष्यात असे कितीतरी प्रसंग आले पण न डगमगता ती प्रत्येक संघर्षाला हिमतीने तोंड द्यायची.
असाच विचार करत सीमा खिडकीत बसून बाहेर बघत होती. बाहेर पडणाऱ्या रिमझिम पावसाचे थेंब, गारवा घेऊन आलेला वारा गालावरुन मोरपीस फिरवाव तसा स्पर्श करत होता. पावसाळी आभाळाचा तुकडा मनाच्या गाभाऱ्यात साचत होता. मनाच्या विस्तीर्ण आकाशात साठवून ठेवलेला हिशोब जणूकाही हा पाऊस विचारात आहे असं सीमाला वाटतं होतं. सकाळी उठून सगळ्याच करून ती बरोबर ९ वाजता ऑफिसला यायची. वेळेच्या बाबतीत ती खूप परफेक्ट होती. ऑफिसमध्ये तिचा खूप आदर होता. उच्च विचार, ईमानदार आणि साधा स्वभाव. दिसायला तर एकदम नक्षत्रासारखी. पाहताच कोणालाही भुरळ पाडणारी. अजून एक सर्वात महत्वाचा गुण म्हणजे परोपकार. ज्याला त्याला मदत करायला धावत असे. कोणी मदत मागायला आला की त्याला रिकाम्या हातांनी कधीच पाठवत नव्हती. ह्या तिच्या सवयीमुळे तिच्या घरातले खूप त्रासले होते. तिची सासू ही तीची आई म्हणून काळजी घेत होती. दोघींचं खूप पटत होता. हेच महत्वाचं असत घरात एकमेकींना समजून जो घेतो त्या घरात कधी वाद होत नाही.
एक दिवस रात्री अश्विनी, सीमाची मैत्रीण हीचा कॉल आला. खूप घाबरली होती.
अश्विनी - सीमा, मला सद्याचे पाचशे रुपये देते का? खूप अडचण आली ग. मी तुला माझे पैसे आले की वापस करेल.
सीमा - अग, तुझ्याकडे पेटीम आहे का. अकाउंट नंबर दे मी ट्रान्स्फर करते.
प्रदीपनी खूप चिडचिड केली. कशाला देते तिला पैसे आधीचेच तर वापस नाही केले. असे बोलून तो रागरागात निघून गेला. सासूचा पगार व सीमाचा पगार ह्यात ते आपले घर कसबस चालवायचे. आणि सीमानी असे पैसे दिले की महिन्याच्या शेवटी त्यांना खूप अडचण जायची. सीमाची सासू आता थकत चालली होती. दिवसेंदिवस तीची तब्येत ढासळत चालली होती. अचानक एके दिवशी शाळेत त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. सीमा तातडीने शाळेत पोचली. शाळेतल्या लोकांच्या मदतीने तिने मोठ्या दवाखान्यात तिला भरती केले. डॉक्टर बोलले की, तपासून त्यांना काय झालं ते सांगतो. थोड्या वेळात डॉक्टर आले,
डॉक्टर: ह्यांचे तातडीने ऑपरेशन करावे लागेल. त्यासाठी तुम्हाला दहा लाख खर्च येईल. तुम्ही असे करा २ लाख रुपये काउंटर वर जमा करा. बाकीचं फॉर्मलिटी आपण नंतर करू.
सीमाला काय करावं अन् काय नाही काहीच सुचत नव्हते. तिला खूप टेन्शन आले. आपल्या खात्यात जेमतेम ५०००० आहेत. बाकी कसे जमवायचे. तिने डॉक्टरांना खूप विनवणी केली.
डॉक्टर: तुमच्याजवळ पैसे नसतील तर ह्यांना सरकारी दवाखान्यात भरती करा. पण वेळ खूप कमी आहे.
दुसऱ्या दिवशी सीमा सरकारी दवाखान्यात गेली. तिथे चौकशी केली. पण तिथे लंबी वेटींग लिस्ट होती. काय करावं काय नाही. तिच्या मनात विचार आला की, आपण एवढी लोकांना मदत केली ह्यावेळी आपल्यासाठी कोणीच नसेल का. ती तशी स्वाभिमानी होती. कोणासमोर कधीच हात पसरण्यातली ती नव्हती. त्या विचारात
ती दवाखान्यात पोचली पाहते तर काय ऑपरेशनची तयारी चालू होती. सगळ्याची जीकडे तिकडे धावाधाव चालू होती. तिला काय चाललय काहीच कळत नव्हते. थोड्यावेळाने आईला ऑपरेशन थिएटर मध्ये घेऊन जात होते. सीमाने बाबांना विचारले तर त्यांना काहीच माहीत नव्हतं. ती लगेच डॉक्टरकडे गेली
सीमा: डॉक्टर, आम्ही तर पैसे भरले नाही मग ऑपरेशन कसं करता तुम्ही.
डॉक्टर: सीमा, मला आता वेळ नाही आधी ऑपरेशन करून येतो मग सांगतो.
असे म्हणून डॉक्टर ऑपरेशन करण्यासाठी निघून गेले.
ऑपरेशन हे ७ तासाचे होते. तोपर्यंत सीमाचा जीव टांगणीला लागला. ती देवाजवळ धावा करू लागली. देवा, माझ्या बाबतीत तू कधीच वाईट करणार नाही मला माहित आहे. माझ्या आईला पूर्णपणे बर कर. येवढे बोलून ती वापस आली. डॉक्टर बाहेर आले, आईच ऑपरेशन व्यवस्थित पार पडले. काळजी नसावी. त्यांना चोवीस तास लागतील शुद्धीवर यायला. तुम्हाला उद्या त्यांना भेटता येईल. सीमा डॉक्टरच्या मागे गेली, तिचे मन तिला काही स्वस्थ बसू देत नव्हते. तिने डॉक्टरला विचारले
डॉक्टर बोलले हे ऑपरेशन डॉक्टर सुभेदारानी केले. सीमा त्या डॉक्टरजवळ गेली.
डॉक्टर सुभेदार - हे सगळे तुमच्यामुळे शक्य झाले
सीमा आश्चर्यचकित झाली.
सीमा : मी तर काहीच केले नाही
डॉक्टर : सीमा, काही वर्षांपूर्वी तुम्ही ज्या व्यक्तीस मदत केली ती व्यक्ती मी आहे.
सीमा - ते कसं काय
डॉक्टर - त्यावेळेस मला डॉक्टर होण्यासाठी काही पैशाची गरज होती. मी पेपर मध्ये तशी जाहिरात दिली. काही लोकांनी मला मदत केली त्यात तुमचे नाव होते. तुम्ही त्यावेळेस जर मला मदत केली नसती तर मी आज डॉक्टर झालो नसतो.
सीमा - पण डॉक्टर इतक्या वर्षांनी माझं नाव तुमच्या कसे लक्षात राहिला.
डॉक्टर - त्यावेळेस ज्यांनी ज्यांनी मला मदत केली त्या सगळ्यांचे नाव मी माझ्या लिस्ट मध्ये लिहून घेतले होते. आणि जेव्हा ज्या पेशंटचे मी ऑपरेशन करतो त्याचं नाव लिस्टमध्ये चेक करतो. मी तुमचं नाव कन्सेंट फॉर्मवर वाचलं. सीमा प्रधान हे नाव वाचल आणि लिस्टमध्ये पाहिलं. म्हणून मी हे ऑपरेशन तुमच्या आईच मोफत केलं. तुम्ही पैशाची काळजी करू नका. आईची काळजी घ्या. इथे आठ दिवस ठेवून त्यांना डिस्चार्ज देईल.
सीमाने बाहेर येताच हे गोष्ट बाबांना सांगितली. ते बोलले की तू केलेल्या मदतीचे ऋण ह्या डॉक्टरनी असे फेडले. खरच बेटा, तू जे परोपकार करते ना देव कुठल्या ना कुठल्या रूपात येऊन असं फळ देतं. आज ते डॉक्टर एका देवाच्या रूपात आले आणि त्यांनी हे ऋण असे फेडले. सीमाच्या डोळ्यात अश्रूंनी गर्दी केली. ती रडायला लागली. बाबा बोलले, रडू नकोस बेटा. आम्ही तुला नेहमी नाव ठेवत होतो, चिडचिड करत होतो. पण आज कळलं की परोपकाराचं फळ हे कधी ना कधी मिळतं. आज त्या डॉक्टरनी तुझ्या केलेल्या उपकराचे ऋण आईचे प्रेम वाचवून फेडले. पोरी, देव तुला सदा सुखात ठेवो हीच माझी देवाजवळ प्रार्थना.
आपल्याला आयुष्यात शेकडो व्यक्ती भेटतात, काहीजण अजिबात लक्षातही रहात नाहीत, तर काही लोक थोड्या दिवसासाठी जवळचे वाटतात, काही जणांच्या सवयी कायम लक्षात राहतात, काही जणांचे काही गुण, कला मनाला भावतात पण प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात एकतरी व्यक्ती अशी असते की जिची आठवण मनात घर करुन राहते.
आज त्या व्यक्तीने न फिटलेले ऋण असे फेडले. सीमा तिथल्या बाप्पा जवळ एकटक शून्यात बघत राहिली.