Sanjay Ronghe

Thriller Others

4.5  

Sanjay Ronghe

Thriller Others

" मुंजा "

" मुंजा "

8 mins
947


    माझे वडील आपले शालेय शिक्षण पूर्ण करण्याचे निमित्ताने तहसीलच्या जागी आणि नंतर कॉलेज च्या निमित्ताने शहरात आलेत. त्यातच त्यांना नोकरी लागली आणि मग आम्ही शहरी झालो. पण आमचे दोन काका आत्या आणि इतर नातेवाईक अजूनही गावातच राहतात. घरी थोडी बहुत शेती असल्यामुळे आमचा गावाशी असलेला संबंध अजूनही कायम आहे. बाबा शेती निमित्ताने वारंवार गावाला जायचे. पण आता बाबांच्या पश्चात ती जवाबदारी माझ्यावर येऊन पडली. बाबांसारखेच आता मीही महिन्या दोन महिन्यांच्या अंतराने गावाला जात येत राहतो. आणि शेतीवर लक्ष ठेवतो. तसं शेतावर जाणं मला जास्त काही आवडत नाही पण जवाबदारी माझ्यावर येऊन पडल्यामुळे ती पार पाडण्याशिवाय माझ्या कडेही काहीच पर्याय नाही.

    आमचे गाव तसे छोटेच आहे. शंभर एक घरांची वस्ती असेल. शहारा पासून बरच लांब आणि मुख्य रस्त्यापासून जवळपास पाच किलोमीटर आत असेल आमचे गाव. पूर्वी मी लहान असताना आम्हाला गावाला जायचे म्हणजे फारच कठीण होते. गाडी , बस कशाचीच व्यवस्था नव्हती. मग गावाला जायला आमच्यासाठी बैल गाडी यायची, त्या बैल गाडीला रेंगी किव्वा दमणी म्हणायचे. या रेंगी ला ऊन पाऊस लागू नये म्हणून चाट केलेले असायचे. आत बसायला गाडी टाकून नरम केले जायचे. जेणे करून जास्त झटके लागू नयेत.आता तशा रेंगी किव्वा दमणी या गाड्या दिसत नाहीत. माल वाहतुकीला वापरात येणारे खाचर किव्वा बैल बंडी मात्र अजूनही दिसते. वाहतुकीच्या त्या अव्यवस्थे मुळे सधन घरचीच मुले बाहेर जाऊन शिकायचे. गरीब मुलं मात्र शिक्षणापासून वंचित राहायचे. मात्र आता प्रत्येक गावात प्राथमिक शिक्षणाची सोय उपलब्ध झालेली आहे. पण तरीही उच्च शिक्षण शहरात जाऊन घेण्या शिवाय पर्याय उपलब्ध नाही. आपल्याकडची गावं अजूनही शहरात मिळणाऱ्या सोईनपासून बरीच दूर आहेत. शिक्षण, आरोग्य, बाजार व इत्यादी गोष्टींकरिता गावातल्या लोकांना शहरकडेच धाव घ्यावी लागते. तसेच इलेक्ट्रिसिटी, पाणी, मोबाईल, पक्की घरं, रस्ते, नाल्या व इतरही सोइ अजूनही गावांपासून बऱ्याच दूर आहेत. तशी गावात इलेक्ट्रिसिटी गावात पोचली आहे पण ती चोवीस तासात फक्त सात आठ तासच असते. केव्हा लाईट जातील याचा काहीच नेम नसतो. त्यामुळे गावांचा पाहिजे तसा विकास झाला असे म्हणता येणार नाही. आणि बरेच लोक निरक्षर आहेत. या निरक्षरतेच्या कारणामुळेच ग्रामीण लोक अजुनही अंधविश्वास पाळतात. जादू टोणा, भूत खेत, मंत्र तंत्र, तोटके यावर त्यांचा खूप विश्वास आहे. अजूनही ते त्यातून बाहेर निघालेले नाहीत. कोणी आजारी पडलं की मंत्रिकाकडून उपचार करून घेणारे बरेच लोक आहेत. पण कधी कधी ते ज्या काही गोष्टी सांगतात त्या अवश्वासनिय असूनही त्याची प्रचिती मात्र आपणासही अनुभवायला मिळते. त्यामुळे खरे आणि खोटे यातला फरक करणे कठीण होऊन जाते.

    आमचेही गाव आजही अशाच परिस्थितीत असलेले गाव आहे. शिक्षणाचाही अजूनही पाहिजे तसा प्रसार झालेला नाही. आत्ता आत्ता आमच्या गावाला शाळेतील मुलांच्या सोईकरिता बस चे दोन टायमिंग दिलेले आहेत. मात्र पूर्वीप्रमाणेच बस च्या वेळा सोडून गावाला जायचे असेल आणि जर स्वतःचे वाहन नसेल तर पाई पाईच पायपीट करत गावाला जावे लागते. रस्त्यात कोणी भेटला आणि त्याने जर लिफ्ट दिली तर ते तुमचे नशीबच म्हणावे लागेल. आता गेल्या पाच सहा वर्षांपासून मी बरेचदा आपल्या बाईकने तर कधी कार ने आणि प्रसंगच पडला तर पाई पाई सुद्धा गावाला गेलेलो आहे. हंगामाच्या वेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूंची शेतं हिरवी हिरवी झालेली असतात. मात्र उन्हाळ्याच्या दिवसात, पाण्याची सोय नसल्याने सगळी शेतं काळी काळी आणि मोकळी दिसतात. दिवसाच्यावेळी शेतात काम करणारे शेतकरी दिसतात पण अंधार होताच रस्ताही अगदी निर्मनुष्य होऊन जातो. रात्रीच्या वेळी पाई पाई गावाकडे जाणारा मीही कधी बघितला नाही. अति महत्वाच्या कामानिमित्त मात्र लोक आपल्या वाहनाने जातात येतात. पण तेही क्वचितच. सगळेच लोक नेहमीच्या सवयीनुसार अंधाराच्या अगोदरच आपल्या घरी पोचतात. त्याबद्दल मीही कधी काही जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही कारण मी अंधारात कधी आलो ते माझ्या गाडीनेच. पाई जाण्याचा प्रसंग कधी आला नाही.

    पण त्या दिवशी माझ्यावर तसा प्रसंग नेमकाच आला. सकाळी सकाळी रामभाऊ चा फोन वाजला , उद्या ला आपल्याला ते बंधी खचली त्याच काम करा लागते. तुम्हाले या लागते. मोज माप थोडी पहा लागन. तुमाले याच लागते. नाही तर काम होणार न्हाई. तुमचं असणं जरुरी हाये असा मेसेज देऊन त्याने आपला फोन बंद केला. मी विचारात पडलो, कसे जायचे आता वेळेवर कारण कार सर्व्हिसिंग ला दिल्यामुळे कारने जाणे शक्य नव्हते. टू व्हिलर ने जायची इच्छा नव्हती आणि आता वेळही बराच झाला होता. पोहोचायला चांगलीच रात्र होणार होती. म्हणून मग मी माझे बाकी काम आटोपून बस ने गावाला जायला निघालो. बसने जायचे म्हणजे पाच किलोमीटर पाई जाणे हे होणारच होते. पण वाटलं बस लवकर मिळाली तर मी सायंकाळ पर्यंत बस स्टॉप वर पोचेल आणि मग कोणी तर गावाला जाणारा भेटला तर त्याच्या सोबत गावाला जाणे होऊन जाईल किव्वा कुणाला तरी गावातून फोन करून घ्यायला बोलऊन घेईल. तशी जास्त चिंता अशी काही वाटलीच नाही. पण नेमकं त्या दिवशी बस लेट लागली आणि मी बऱ्याच उशिरा आमच्या गावाजवळच्या बस स्टॉप वर पोचलो. अंधार झालेला होता. मला वाटले आता इथून गाव काय पाच किलोमीटर तर आहे, भेटेल कोणी तरी म्हणून चौरस्त्यावर थोडा थांबलो. तिथली चहाची टपरीही बंद झालेली होती. तो दिवस माझ्यासाठी काही वेगळाच असावा कारण मला गावाकडे जाणारा एकही व्यक्ती तिथे दिसला नाही. हळू हळू घडयाळीचा काटा पुढेच सरकत होता. रातकिड्यांचा आवाजही वाढलेला होता. कोणी येण्याची शक्यता वाटत नव्हती. कुणाला तरी फोन करून बस स्टॉप वर बोलवून घ्यावे म्हणून मी फोन काढला तर फोन पूर्ण पणे डिस्चार्ज झालेला होता. आता माझ्या लक्षात आले की आज आपल्याला पाच किलोमीटर पाई जाण्याशिवाय काहीच पर्याय नाही. तो विचार लक्षात येताच मला थोडी अस्वस्थता जाणवली पण परत मनातले धैर्य एकवटून मी निश्चय केला की चला आता पायी पायीच निघू या. अर्ध्या पाऊण तासात तर आपण घरी पोहचून जाऊ. मनातली भीती झटकली आणि मी तसाच एकटा पायपीट करत गावाकडे निघालो.

    गार गार वारा सुटला होता. मी आपल्याच मस्तीत कधी कुठल्याश्या विचारात कधी गाण्याचे बोल गुणगुणत गावाचा रस्ता पार करत होतो. अंधार मात्र खूप काळा असल्याचं जाणवत होतं. सहजच विचार आला आज चन्द्र कुठे लपला बा. कुठेच दिसत नाही. नंतर विचार आला कदाचित अमावसेचा काल सुरू असेल. उशिरा निघेल कदाचित. परत मी आपल्या मस्तीत पाय उचलत राहिलो. जवळपास अर्धे अंतर चालून आलो असेल. तिथे शेतातच एक छोटंसं मंदिर असल्याचं मला माहित होतं. ते मंदिर अजून आलं नव्हतं. म्हणजे मी अजून अर्धे अंतर पार व्हायचे होते. तितक्यात दुरून मला ते पांढरे छोटे मंदिर दिसायला लागले. मंदिराचे पुढे दोन व्यक्ती पण असल्याचे दिसत होते. त्यांच्या बोलण्याचा आवाज पण जाणवत होता. तरीही मला सहजच वाटून गेले की हे दोघे इतक्या रात्री इथे कशाला आले असावे आणि तिथे थांबून काय करत आहेत. मी भराभर पाय उचलत मंदिराचे पुढे पोचलो तर तिथे तेव्हा कोणीच नव्हते. मला थोडे आश्चर्य वाटले. अरे आताच तर मी इथे दोन व्यक्ती बघितल्या होत्या, आणि आताच कुठे गेल्या. अंधारात कुठे लपल्या तर नाहीत. मला कदाचित अडवणार तर नाहीत, माझ्या जवळ असलेले पैसे हिसकून तर घेणार नाहीत. की ते आपल्याच गावचे असतील. कोण असतील. आता ते मंदिरात कशाला आले असतील. इतक्या रात्री कशाची पूजा असेल. असे अनेक प्रश्न माझ्या मनात आले. मनात थोडी भतीही वाटायला लागली. मी परत आजू बाजूला समोर मागे त्यांना अंधारात शोधण्याचा प्रयत्न केला. पण कुठेच कोणीही दिसत नव्हते. अंधार आपले काळे कुळकुटे रूप दाखवून मला वेडावत होता. रात किड्यांचा आवाज वाढलेला होता. त्यातच आकाशातून फडफडत काही तरी गेल्याचे जाणवले. कदाचित तो पक्षी असावा. वर आकाशात चांदण्यांनी मला पुरते वेढून घेतले की काय असे वाटत होते. पण ती दोन माणसं मात्र कुठेच दिसत नव्हती. मी आवाज द्यायचा प्रयत्न केला पण तोंडातून आवाजही निघत नव्हता, मी पुरताच घाबरलो होतो, शरीरातून त्या थंड हवेतही घामाच्या धारा लागल्या होत्या.भीतीही वाटायला लागली होती. पण धैर्य न हरपता मी मग तसाच पुढे गावाकडे चालत राहिलो.

पाठीमागे मात्र परत वळून बघायची हिम्मतच होत नव्हती. मग मी तसाच चालत राहिलो. मला घरा शिवाय काहीच दिसत नव्हते. आणि ते अजून किती दूर आहे याचा अंदाज येत नव्हता. सारखे घर केव्हा येईल केव्हा येईल असे वाटत होते. घर येता येत नव्हते. मी मात्र आपल्याच तंद्रीत चालत होतो. शेवटी मला माझे गाव दिसायला लागले. तेव्हा माझ्या जीवात जीव आला. घरी पोचलो तर सम्पूर्ण गाव शांत वाटत होते. मी तसाच मग हातपाय धुवून कॉटवर आडवा झालो. आणि डोळे बंद करून पडून राहिलो. हळूहळू माझे मन शांत झाले आणि मग माझे मलाच हसायला आले. खरच मी ही इतरांसारखाच घाबरट आहे असे वाटले. घर येई पर्यँन्त माझ्या शरीरातील त्राणच गेल्याचे वाटत होते. मंदिरा पासून तर घरापर्यंत मी कसा पोचलो काहीच आठवत नव्हते. त्यावेळी मला फक्त घरच दिसत होते. सगळे भान हरपले होते. मग सगळी भीती झटकून मी उठलो. कपडे चेंज केले आणि सोबत आणलेला टिफिन फस्त केला. थोडं अंगणात जाऊन फिरून घेतलं. वर आकाशात चांदण्या टीमटीम करत मला पाहून हसत आहेत की काय असे वाटत होते. थोडा वेळ तसाच चांदण्या बघत राहिलो. मग मात्र हळळू डोळ्यात झोप आपला रंग दाखवायला सुरू झाली होती. मग मी घरात जाऊन दार आतून घट्ट बंद केले आणि झोपी गेलो. कारण सकाळी लवकर उठून माणसं गोळा करून कामाची सुरुवात करायची होती. बेडवर आडवा होताच झोप केव्हा लागली ते कळलेच नाही.

    सकाळी लवकरच जाग आली. रात्रीचा प्रसंग आठवत मी ब्रश करायला म्हणून बाहेर आलो तर रामभाऊ दारात हजरच होता. तो म्हणाला बापू केव्हा आले राती त मी पाहून गेलो, तुम्ही नोहते. मले वाटलं तुमि आता सकाईच यान पर तुमि त रातीच आले वाटते. गाडी दिसत न्हाई तुमची. पायदलच आले का जी. मले फोन केला असता त म्या सुराशाले धाडलं असत ना बस स्टॉप वर तुमाले घ्याले. इतक्या राती कहाले ऐकलेच पैदल पैदल आले जी. मग मी त्याला रात्रीचा घडलेला प्रसंग सांगितला तर तो म्हणाला बराबर हाये बापू, कालची अमावस नोती काजी, तुमाले त्यानं दर्शन देल्ल जी. नशीबवान हात तुम्ही. बरं झालं तुमचं दर्शन झालं. आजी तुमाले सांगतो आपल्या गावात लय लोकायले दर्शन देल्ल जी त्यानं पर अजून पावतो कोनालेच तरास न्हाई देल्ला.

आजी तेथ मुंजा देव हाये म्हनते. म्हुनच त्या वावर वाल्यानं तिथं मुंजा देवाचं मंदिर बांधलं. लय जुनं मंदिर हाये थे. शंभरक वर्स झाले अस्तिन नाई त जास्त बी झाले अस्तिन आता. पर अजून कोनाले कोनताच धोका झाला न्हाई. गावाची थे राखनच करते म्हना नं. तुम्ही काई कायजी करू नोका. चांगलाच संकेत हाये थो. तुमचं काई चांगलं व्हाचं असन मुन तुमाले दर्शन देल जी. तुमि आंघोळ करा एक उदबत्ती देवाजवळ लावा आन हात जोडा. आन मंग या वावरात. मी आनतो मानस बोलावून. डायरेक वावरातच भेटू आता, मी पोचतो तिथंच असे म्हणून रामराव निघून गेला आणि मी ही आपली तयारी करायला लागलो.


Rate this content
Log in

Similar marathi story from Thriller