मुक्ता - एक आळशी मुलगी
मुक्ता - एक आळशी मुलगी


शाळेची घंटा वाजली. शाळा भरली सर्व मुले प्रार्थनेसाठी जमली. प्रार्थना संपल्यावर सर्व मुले आपापल्या वर्गात जायला निघाले. तेवढ्यात धावत पळत मुक्ता अली.. सरांनी तिला बघितले आणि लगेच आवाज देऊन विचारले मुक्ता शाळेची वेळ काय आहे. मुक्ता म्हणाली 7.30 सर मग आता किती वाजलेत. मुक्ता गप्प बसली. सर जोरात ओरडले किती वाजलेत मुक्ता? 7.50 सर. तू 20 मिनिट उशिरा आलीस मुक्ता. आता तुला शिक्षा. पूर्ण ग्राऊंडला तीन राऊंड मार आणि नंतर वर्गात जा. मुक्ताने ग्राऊंडला तीन चक्कर मारल्या व वर्गात तासाला उशीर झाला. तिथे परत मॅडम तिला ओरडल्या मुक्ता कधीतरी वेळेत शाळेत येत जा. तुला आता शिक्षा पूर्ण तास होईपर्यंत वर्गात उभे राहायचे. हे सर्व मुक्ताला नवे नव्हते. रोज ती शाळेत उशिरा यायची आणि हाच प्रकार व्हायचा.
मुक्ता नऊ-दहा वर्षांची, पाचवीत शिकणारी, अतिशय आळशी आणि बेशिस्त मुलगी होती. घरी आल्यावरही शाळेत दिलेला गृहपाठ कसातरी पूर्ण करायची पण त्यात व्यवस्थितपणा बिलकुल नसायचा. ती अव्यवस्थित होती आईचेही काहीच ऐकायची नाही. आई तिला कधीही कुठल्या गोष्टीची जबरदस्तीही करायची नाही व तिच्या आळशीपणाबद्दल काही समजावूनही सांगायची नाही. कुठलीही गोष्ट तुझी ईच्छा नसेल तर नको करू असे म्हणायची. तीही तिला शिस्त, पद्धतशीरपणा शिकवत नव्हती. बाबा दिवसभर ऑफिसमधून आल्यावर दमायचे त्यामुळे तेही लक्ष घालायचे नाही. मुक्ताला एक छोटा भाऊ होता आणि तो वयाने लहान असून तो मुक्ताच्या अगदी विरुद्ध् होता. तो तिसरीत शिकत होता. तो वेळेची शिस्त पाळायचा अगदी वेळेत शाळेत जायचा. दिलेला अभ्यास अगदी वेळेत व्यवस्थित पूर्ण करायचा. स्वतःच्या वस्तूही जपून ठेवायचा. त्याला अव्यवस्थितपणा बिल्कुल आवडत नव्हता. खरं म्हणजे त्याचे आईवडील त्यालाही काहीच सांगायचे नाही पण तो अंगभूतच व्यवस्थित, शिस्तशीर होता.
मुक्ताचा अव्यवस्थितपणा, बेशिस्तीमुळे तिला फारशा मित्र मैत्रणीही नव्हत्या पण तिला त्याचा विशेष फरक पडत नव्हता. ती दिसायला तशी गोबऱ्या गालाची, मोठ्या डोळ्याची छान होती पण तिच्या आयुष्यातील निरसामुळे तिचे दिसणेही उमटून दिसत नव्हते तिचे आयुष्य रटाळ होत होते. शाळेत काही शिक्षक तिच्याकडे दुर्लक्ष करायचे तर काही लक्ष घालून तिच्यातील दुर्गुण दाखवून तिला शिक्षा करायचे. ती परीक्षेत साधारण मार्क्स घेऊन पास व्हायची.
एक दिवस तिच्या शाळेत गणितासाठी नवीन शिक्षिका आल्या त्यांचे नाव विजया पाटील होते. मुक्ता नेहमीप्रमाणे त्यांच्या वर्गालाही उशिरा आली त्यांनी तिला शिक्षा न देता बसायला सांगितले व वर्ग घ्यायला सुरवात केली. एक गणित विजया मॅडमनी फळ्यावर समजावून सांगितले व मुक्ताला समजले का म्हणून विचारले. मुक्ताने हो म्हटले. मग मॅडम म्हणाल्या, मुक्ता आता तू हेच गणित फळ्यावर सोडवून दाखव पण मुक्ताला ते सोडवता आले नाही. विजया मॅडमनी परत ते गणित समजावून सांगितले व परत मुक्ताला सोडवायला लावले. यावेळी मुक्ताने अचूक सोडविले. मॅडमनी वर्गामध्ये सर्वांना टाळ्या वाजवायला सांगितल्या. मुक्ताला खूप छान वाटले. मग दुसरे गणित मॅडमनी तिला वहीत सोडवायला सांगितले. तिने अचूक सोडवले मात्र एकदम घाणेरड्या अक्षरांमध्ये सोडविले होते. मग मॅडमनी तिला सांगितले मुक्ता हे तू अचूक सोडविले पण अक्षरामुळे हे गणित वाचणे अशक्य आहे. म्हणून तू एकदम खाडाखोड न करता व्यवस्थित सुटसुटीत लिहिण्याचा प्रयत्न कर. मुक्ताने तसा प्रयत्न केला तो बऱ्याच प्रमाणात यशस्वी झाला पण थोडी सुधारणा बाकी होती. मग तिने घरी गेल्यावर लगेच गृहपाठ करायला घेतला व व्यवस्थित लिहिण्याचा प्रयत्न करून गणित सोडविले व ते बघून तिलाच खूप छान वाटले मग हळूहळू तिने दुसरे विषय काढले तेही व्यवस्थित लिहिण्याचा प्रयत्न केला.तिला खूप छान वाटले.
एवढे सर्व केल्यावर तिला रात्री छान झोप लागली व मुक्ता उत्साहाने पहिल्यांदा वेळेत शाळेत गेली व प्रार्थनेला हजर झाली. तिची शिक्षा टळली वर्गात लवकर गेली व गणिताचाच विजया मॅडमचा पहिला तास होता. मुक्ताने स्वतःहून शिक्षिकेला गृहपाठ दाखविला व शिक्षिकेने समजावून सांगितलेले गणित फळ्यावर करून दाखवायला स्वतःच पुढे आली व एकदम अचूक सोडविले. त्यामुळे हळूहळू तिचा एवढा आत्मविश्वास वाढला कि ती वर्गात सर्वात हुशार झाली व्यवस्थित व शिस्तशीर झाली. हे सर्व तिला समजून घेऊन तिच्यातील आत्मविशास निर्माण करणाऱ्या विजया मॅडममुळे झाले. तशी मुक्ता मठ्ठ नव्हती पण आळशी होती व अव्यवस्थित असल्यामुळे मागे राहत होती आणि तिला सर्व गोष्टीचा कंटाळा येत होता. पण तिला व्यवस्थित समजून घेणाऱ्या शिक्षिकेमुळे मुक्ता हुशार मुलगी म्हणून ओळखली जाते. तिचे दिसणेही आत्मविश्वासामुळे खुलले. तिला खूप मित्र-मैत्रिणी झाल्या. तिच्यातील आळस पूर्णपणे नाहीसा झाला.
मुलांना आपण कसे वागावे हे समजावून सांगतो पण प्रत्येक मूल हे वेगळे असते. त्याच्यातील क्षमता, समजण्याची कुवत ही वेगळी असते. काही मुले अंगभूत समजूतदार असतात तर काही जणांना समजावून सांगायला, जाणीव करून द्यायला चांगल्या मार्गदर्शकाची गरज भासते. आणि प्रत्येकाची मानसिकताही वेगळी असते. जर मुलांच्या मानसिकतेवर काम करून समजून घेतले तर प्रत्येकाचे सुप्त गुण समोर येतील व सर्व मुले मुक्ताप्रमाणे वेळीच सावरतील.