काव्य चकोर

Abstract Romance Tragedy

3.1  

काव्य चकोर

Abstract Romance Tragedy

मोहिनी

मोहिनी

27 mins
1.7K


मोहन आणि मोहिनी तसे सुखी दांपत्य. मोहन एका बड्या कंपनी चांगल्या पदावर नोकरी करत होता तर मोहिनी गृहिणी. तसा संसार सुखाचा होता मात्र दोघांना एका गोष्टीची कमी प्रकर्षाने जाणवत होती ती म्हणजे लग्न होऊन ६ वर्ष उलटली तरी अजुन घरात पाळणा हलला नव्हता. एक दोनदा मोहिनी गरोदर राहिली होती मात्र गर्भ उदरात टिकला नव्हता. ह्याची खंत मोहिनीस नेहमीच सतावत होती. बाळासाठी तिचे मातृप्रेम आसुसले होते. तसा तिच्यात दोष काहीच नव्हता दोष होता तो मोहनमधे. विर्याचे पातळपण, शुक्राणूची कमतरता असं निदान डॉक्टरने केलं. त्यासाठी मोहनला काही औषधे, टॉनिक तसेच पथ्य पाळण्यास सांगितले. इतके सारे करूनही म्हणावा तितका फरक अजुन पडला नव्हता. मूल होत नाही म्हणून नातेवाईकांचे तसेच शेजारी पाजाऱ्यांचे सतत टोचणारे शब्द मोहिनीचे काळीज नेहमीच चिरत होते. मूल न होण्यामागील सत्य मात्र त्या दोघांनाच ठावुक होते. पण करणार काय.? पण म्हणतात ना मारणाऱ्याचे हात धरता येतात पण बोलाणाऱ्याचे तोंड धरता येत नाही. तशीच काहीशी अवस्था मोहिनीची झाली. तोंड दाबून, शाब्दिक बुक्क्यांचा मार ती निमुट पणे सहन करत दिवस ढकलत होती.

मोहिनी तशी दिसायला साक्षात मोहिनीच होती. चाफेकळी नाक, खळीदार गाल, गोरा वर्ण, काळेभोर डोळे, भरगच्च बांधा, पाहणाऱ्यावर प्रथम दर्शनीच तिच्या रूपाची मोहिनी पडत असे. शिवाय बोलणेही अतिशय लाघवी. मोहन तिच्या प्रेमात पडला त्यात नवल ते काय.? एव्हना तुम्हाला कळलेच असेल की, मोहन व मोहिनीने प्रेम विवाह केला होता. कदाचित त्याचमुळे घरात आणि नातेवाईकांत सतत टोमण्यांना सामोरे जावे लागत असावे. मात्र एके दिवशी या टोमण्यांचा अगदी कहर झाला.


त्याचे झाले असे की, मोहनच्या घरी कोणा नातेवाईकाने बारशाचे आमंत्रण दिले. सहाजीक मोहिनीच्या सासुने मोहिनीस तिथे पाठवले. मोहिनी सुद्धा छान तयारी करून सायंकाळी त्या नातेवाईकाच्या घरी गेली. बारशाचा कार्यक्रम सुरु झाला तशा सुहासिणी स्त्रीया बाळंतिणीची ओटी भरू लागल्या. रिवाज म्हणून मोहिनीही ओटी भरायला सरसावली मात्र, घोळक्यातून एक आवाज आला. थांब..! मोहिनीने मागे वळून पाहिले. तो आवाज बाळंतीणीच्या सासुचा होता. अचंबित होत मोहिनी तिच्याकडे पहात राहिली. घोळक्यातून पुढें येत ती म्हणाली, तिथेच थांब.! वांझोट्या बाई कडून आम्हास ओटी भरून घ्यायची नाही. तुझ्या ओटीची काही गरज नाही. तिचे ते शब्द मोहिनीच्या वर्मी लागले. त्या शब्दांनी ती पुरती कोलमडून गेली. तिचा टवटवीत प्रफुल्ल चेहरा पुरता मलुल झाला. डोळ्यासमोर अंधार दाटून आला. गंगा यमुना उमडून वाहु लागल्या. खिन्न मनाने ती त्या समारंभातून बाहेर पडली.

आपल्याच विचारांच्या तंद्रीत ती त्या नातेवाईकांच्या बिल्डिंगच्या बाहेर पडताक्षणी ती एका इसमास धडकली अन तिची तंद्री भंग पावली. चमकुन तिने त्या इसमाकडे पाहिले. त्याला पाहताक्षणी तिच्या मनाचा बांध फुटेला. ती त्या इसमास बिलगुन हमसून रडु लागली. तो इसम म्हणजे तिचा पती मोहन होता. त्याने प्रेमाने मोहिनीला थोपटले. तिचे सांत्वन केले व काय घडले ह्याची चौकशी करू लागला. मोहिनीने घडला प्रकार त्याच्या कानावर घातला. विस्तृत घटनाक्रम ऐकताच मोहनची तळपायाची आग मस्तकात गेली. दात ओठ खात तो जाब विचारण्यस इमरतीत शिरणार इतक्यात मोहिनीने त्यास रोखले व म्हणाली, जाऊ दे मोहन. पुन्हा आपल्याला असे समारंभ नको आणि नको ते नातेवाईक. त्या पेक्षा आपण कुठे दुसरीकडे रहायला जाऊ. राजा राणीचा संसार करू. थकले रे आता सततचे टोमणे ऐकून ऐकून. राहायचं का आपण वेगळे.? सांग ना राहायचं का आपण वेगळे..? मोहनला तिचे म्हणणे पटले. त्याने आपला रुकार तिला कळवला तशी मोहिनीची मलूल कळी सुहास्य खुलली.

मोहन,मोहिनी आता आई वडिलांच घर सोडून दुसरीकडे भाड्याने घर घेवून रहायला आले. राजा राणीचा नवा संसार सुरु झाला. आता रोजच्या टोमण्यातुन तिची मुक्तता झाली होती. पण म्हणतात ना नव्याची नवलाई नऊ दिवस तसेच काही मोहिनीचे झाले. काही दिवसातच मोहन त्याच्या कामात व्यस्त झाला. मोहिनीला दोघांच्या जेवणा व्यतीरिक्त काही काम नसल्यामुळे दिवस खायला उठत असे. वेळ जाता जात नव्हता. एकटेपणाच्या जाणिवेतून बाळ नसल्याची खंत तिव्रतेने जाणवू लागली. डोळ्यात प्राण आणून ती मोहनची वाट पाहत बसायची. तो आला की तिल हायसं वाटत असे. बाळाच्या ओढीने ती मोहनला ह्या ना त्या कारणाने रिझवत असे. मोहनही तीला शक्य तितकी साथ देत होता. पण दैव.? ते अजुन रुसलेलं असावं. घरात पाळणा हलण्याची काही चिन्ह दिसेनात. बघता बघता वर्ष सरले.

बाळाच्या ओढीने मोहिनी दिवसेंदिवस चिंताक्रांत दिसू लागली. दिवसभर घरात बसून आपल्याच विचारात मग्न असायची. शेजारी पाजारीही ती सहसा जात नव्हती. न जाणे कुणी बाळाचा विषय छेडला तर..?? ह्याचं भितीपोटी ती जाणे टाळत होती. एके दिवशी दुपारी अशीच विचारात मग्न असता दाराची बेल वाजली व मोहिनीची तंद्री भंग पावली. तिने दार उघडले. समोर १८/१९ वर्षाचा युवक उभा होता. तिने दार उघडताच तो म्हणाला. नमस्कार वाहिनी मी सुहास. आताच शेजारच्या फ्लॅट मधे रहायला आलोय. सामानाची लावालाव अजुन करायची आहे. ज़रा एक बाटली थंड पाणी मिळेल का.? त्याने पाणी मागताच मोहिनीने त्यास नखशिकांत न्याहाळले व म्हणाली थांब हां आता आणते. असं म्हणत तिने दरवाजा चैन मधे अडकवला व पाणी आणायला किचन मधे गेली. किचन मधून बाटली घेऊन आली व पुन्हा दरवाजा उघडला.. पाहते तो त्या मुलांची आई त्याचा मागे उभी होती.. मोहिनीने दरवाजा उघडताच ती पुढे होत म्हणाली, नमस्कार मी सुहासची आई.. म्हटलं एकट्या मुलाला पाहुन कोणी पाणी देईल न देईल म्हणून ह्यांच्या मागोमाग आले. मोहिनी हसली व म्हणाली त्यात काय इतकं मी पाणी देतच होते..आता आलाच आहात तर या आत.. पटकन चहा ठेवते.. तिच्या म्हणण्यास नकार देत सुहासची आई म्हणाली आता नको.. बरचं काम पडलय नंतर येऊ आम्ही. त्या बाईचा नकार पाहुन मोहिनी अधिक आग्रह करत तीला म्हणाली, नंतर याल तेव्हा याल पण आता या. दुरुन आला आहात. चहा घ्या थकवा दूर होईल. अन काम करण्यास सुद्धा उत्साह येईल. मोहिनीचे ते आपुलकीचे लाघवी बोलणे ऐकून सुहासच्या आईला तिचा आग्रह मोडवला नाही. तिने हसून रुकार दिला. दोघे माय लेक आत आले व हॉल मधील सोफ्यावर बसले. मोहिनी आलेच म्हणून किचनमधे गेली अन दोघे मोहिनीचे घर अर्थात हॉल न्याहळू लागले..

मोहिनीने घर अगदी छान सजवले होते. साफ़ आणि टापटिप होते. ते पाहुन दोघांसही प्रसन्न वाटले. काही वेळातच मोहिनी चहाचा ट्रे घेऊन आली.सोबत बिस्कीटांची सरबराई होती. ते पाहुन सुहासची आई म्हणाली, कशाला इतकी तसदी घेतली.? चहा पुरेसा होता. तीचे बोल ऐकून मोहिनी उत्तरली, कशाला काय.? तुम्ही तिकडून आता सामान घेऊन आलात. म्हणजे जेवण झाले नसणार.? आणि सामन लावून जेवण बनवेपर्यंत बराच वेळ जाणार. तो पर्यंत पोटाला आधार म्हणून बिस्कीटे खाऊन घ्या. म्हणजे काम करण्यास हरुप येईल. काय सुहास बरोबर ना.? अचानक झालेल्या प्रश्नाने सुहास भांबावला.. काही न बोलता त्याने माननेच होकार भरला. तिच्या प्रश्नावर मग सुहासची आई उत्तरली. सुहास थोड़ा मितभाषी आहे. मी पाठवाला म्हणून नाइलाजाने आढेवेढे घेत आला. त्यामुळेच मला त्याच्या मागून यावे लागले. म्हटलं पाणी मागतोय की नाही.? त्याला वेळ लागतो ओळख करून घ्यायला. म्हणून त्याचे मित्रही फारसे नाहीत. कॉलेजमधे आहेत का नाही हे ही माहीत नाही. तिच्या उत्तरावर मोहिनी म्हणाली असं आहे होय. पण बरं केलेत तुम्ही स्वतः आलात त्यामुळे ओळख तर झाली. मोहिनीच्या म्हणाण्यास दुजोरा देत सुहासची आई उत्तरली, हो हे मात्र खरे आहे.


चहापाणी आणि जुजबी ओळखपरेड संपवून माय लेक मोहिनीचा निरोप घेऊन निघाले. मोहिनीने दरवाजा लावून घेतला. व आपल्या कामात गुंतली.

दुपारची वमकुक्षी घेऊन मोहिनी संध्याकाळच्या वेळेस सुहासच्या घरी पोहचली.. दरवाजा उघडाच होता. बहुतेक सामानाची आवाराआवर झाली होती. निदान बाहेरून मोहिनीस तसेचं जाणवले होते. तिने बाहेरूनच आवाज दिला. येऊ का आत.? तीला पाहताच सुहासची आई हसत सामोरी गेली व म्हणाली, अगं अशी विचारतेस काय.? बेधड़क ये आपलच घर समज. मोहिनी आत येऊन हॉलमधल्या खुर्चीवर विसावली. व म्हणाली, झाली का सर्व आवाराआवर.? हो आताच झाले. काही छोटी मोठी कामं आहेत ती करता येतील सावकाश. सुहासची आई उत्तरली. गप्पांच्या ओघात मोहिनीने संपूर्ण घर फिरून पाहिले. संपूर्ण सामान अगदी व्यवस्थित जागच्या जागेवर लावले होते. जणू ते आज नाही आधीपासूनच रहात असावेत.. तिने आश्चर्याने त्याबद्दल सुहासच्या आईला विचारले. त्यावर ती हसत उत्तरली..म्हणाली..ही सर्व सुहासची कर्तबगारी..हुशार आहे तो ह्या कामात आणि त्याला आवडही आहे. घरातील बहुतेक कामं तोच करतो. जसे फिटिंग,पेंटिंग, लाईटींग वगैरे.. शिवाय मलाही माझ्या कामात मदत करतो. सुहासच्या आईच्या उद्गारांनी मोहिनी प्रभावित झाली व सुहासकडे एक कटाक्ष टाकून म्हणाली अरे वाह तुमचा सुहास भारीच हुशार दिसतोय. सुहास एका बाजूला वायरचं जंजाळ खोलून काहीतरी टेस्ट करत होता. मोहिनीच्या वाक्यावर त्याने छोटसं स्मित केले व आपल्या कामात गुंग झाला.

थोडा वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा मारून तसेच त्यांच्याबद्दल बहुतेक माहिती घेऊन मोहिनी आपल्या घरी आली. गप्पांच्या ओघात तिला कळले होते की सुहासची आई कामावर जात होती. सुहास सकाळी कॉलेजला जात होता. माय लेक दोघही फार सज्जन वाटली. घरात दोघांव्यतिरिक्त कोणीच नव्हते. सुहासचे वडील त्याच्या लहानपणीच वारले होते. सुहास त्यांचा एकुलता एक मुलगा. सालस, मितभाषी पण हरहुन्नरी. वडिलांच्या पश्चात आईनेच सुहासला लहानाचे मोठे केले होते. चांगले संस्कार दिले होते. वडिलांच्या ठिकाणीच सुहासच्या आईला अनुकंपा तत्वावर नोकरी लागली होती.


मोहिनीला एक चांगली सोबत मिळाली. आता सुहासकडे येणे जाणे नेहमीचे झाले. काही दिवसातचं सुहास सुद्धा तिच्याशी छान गप्पा मारू लागला. मोहिनी होतीच इतकी लाघवी की, एक दिवस जरी ती सुहासच्या घरी गेली नाही तर सुहासची आई तिला भेटायला घरी येत असे. सुहास सुद्धा कधी कधी दुपारच्या वेळी गप्पा मारायला तिच्या घरी जात असे. तिची काही छोटी मोठी काम असतील ती करून देत असे.. मोहिनी सुद्धा घरी काही विशेष बनविले असेल तर सुहासला तसेच त्याच्या आईला आवर्जून देत असे. अलीकडे तिच्या चेहऱ्यावरची चिंतेची रेघ काहीशी धूसर झाली होती. पूर्वीसारखा एकटेपणाही जाणवत नव्हता. असं असलं तरी प्रत्येक वेळी कोणी बोलायला असेल असही नाही ना..? मग कधी कधी एकांतात आसुसलेलं मातृत्व उसळी मारायचं. आणि मन पुन्हा निराशेकडे झुकायचं.

काही महिने असेच गेले. सुहासचं येणे जाणे नित्याचे झाले. आता मोहिनीला ही त्याची सवय झाली होती. तो एखादे दिवस आला नाही तरी मोहिनीला चुकल्या चुकल्यासारखे वाटत असे. असाच एके दिवशी तो आला नाही म्हणून मोहिनी त्याला पहायला त्याच्या घरी गेली. तिने दाराची बेल वाजवली पण बराच वेळ गेला दरवाजा उघडला नाही. तिने बाहेरूनच सुहासला हाक सुद्धा मारली. तरीही आतून काही प्रतिसाद मिळाला नाही. कुठे गेला असेलं हा..? मोहिनी विचार करू लागली.


असं कधीच झालं नव्हतं.. सुहास सहसा दुपारच्या वेळी कुठे जात नव्हता. एक तर मोहिनीच्या घरी येऊन गप्पा मारायचा किंवा स्वतःच्या घरी आराम करायचा. बराच वेळ वाट पाहून, कंटाळून ती निघणार, इतक्यात तिला दरवाजा उघडण्याचा आवाज आला. त्याबरोबर मोहिनीची पावलं पुन्हा मागे वळली व दारातूनच म्हणाली, काय रे किती वेळ लावला दरवाजा उघडायला..? काय करत होता इतका.. बोलता बोलताच ती सुहासची अवस्था पाहून जवळ जवळ किंचाळलीचं.. सुहास सावर.. असं म्हणून तिने पटकन त्याला धरले.. अन्यथा सुहास कोसळलाच असता.. तिने तसंच त्याला सावरत बिछान्यावर झोपवले. त्याला सावरताना तिच्या शरीराला तसेच हातांना झालेल्या त्याच्या स्पर्शात तिला चांगलाच चटका जाणवला. सुहासला भयंकर ताप होता. त्याच्यात उठण्याचे त्राण राहिले नव्हते. तिने ताबडतोब दुध गरम करून त्याच्याबरोबर काही बिस्कीटं त्याला भरवली. त्याचबरोबर घरातून एक क्रोसिनची गोळी आणून त्याला घेण्यास भाग पाडले व आराम करायला सांगून काही वेळ मिठाच्या पाण्याच्या घड्या डोक्यावर घातल्या. थंडी लागत होती म्हणून पांघरून घेऊन झोपायला सांगितले. व त्याच्या शेजारी बसून राहिली.

तासाभरात सुहासला जाग आली. मोहिनीने त्याच्या डोक्याला हात लावून पाहिला. ताप उतरला होता. सुहासने पांघरून काढले. त्याचा शर्ट घामाने पूर्ण ओला झाला होता. मोहिनीने त्याला शर्ट बदलायला सांगितले. पण सुहासमध्ये अजूनही तितकेसे त्राण नव्हते. लाजाळू सुहास नको नको म्हणत असताना सुद्धा मोहिनीने त्याचा शर्ट उतरवला व अंगावरचा घाम पुसून दुसरा शर्ट अंगावर चढवत ती त्याला म्हणाली, सुहास, आता आराम कर तो पर्यंत मी गावठी तांदळाची पेज बनवून आणते. म्हणजे थोडी अंगात ताकद येईल. पडून रहा असाच, मी आलेच काही वेळात. असं म्हणून ती घरी निघून गेली व काही वेळातच गरम पेज घेऊन आली. ताप गेल्यामुळे सुहास बऱ्यापैकी सावरला होता. मोहिनीने आणलेली पेज घेतल्यावर बरीच तरतरी आली. काही वेळातच छान गप्पा मारू लागला. गप्पा मारता मारता मोहिनीचे आभार मानत तो म्हणला, वाहिनी आज तुम्ही वेळेवर आलात म्हणून, नाहीतर आज माझे काही खरे नव्हते. सकाळपासुनच कणकण भासत होती. थंडी सुद्धा वाजत होती. कसाबसा घरी पोहचलो आणि नंतरच तुम्हाला माहितचं आहे काय झालं ते.? त्याच्या आभारावर मोहिनी उत्तरली, अरे आभार कसले मानतो. माझं कर्तव्यच होते ते. तू नाही का मला प्रत्येक कामात मदत करतो, तशीच आज मी तुला केली त्यात काय इतकं? पण हो..एक कर हा.. संध्याकाळी डॉक्टरकडे जा. नाहीतर चल माझ्या बरोबर मीच नेते तुला. मोहिनीच्या बोलण्यावर सुहास चाचरत म्हणाला. नको वहिनी.. आज माझ्यासाठी तुम्ही खूप काही केले. बघा ना माझ्यामुळे तुम्हाला दुपारची झोप सुद्धा मिळाली नाही. तुम्ही काळजी करू नका. आई आल्यावर मी जाईन डॉक्टरकडे. आता तुम्ही सुद्धा आराम करा ताप उतरलाय माझा. काही लागलं तर सांगेन. नक्की सांग हा..चल संध्याकाळी येते..आराम कर तू..असं म्हणून ती निघून गेली व सुहास निवांत बिछान्यावर पहुडला.

मोहिनी संध्याकाळी पुन्हा सुहासला बघायला आली. सुहासची आई घरी आली होती मात्र सुहास अजून तसाच पहुडला होता. घरात येताच मोहिनीने सुहासच्या आईला विचारले, काय म्हणतेय सुहासची तब्बेत..? तिच्या प्रश्नावर सुहासची आई उत्तरली, तसा बरा आहे पण अजून कणकण आहे. आता डॉक्टरकडेच घेऊन जातेय. बरं झालं दुपारी तू देवासारखी धावून आली म्हणून.. नाहीतर पोराचं काय झालं असतं कल्पना करवत नाही. सुहासच्या आईचे बोल ऐकून मोहिनी उत्तरली, देवासारखी वगैरे काही नाही मी फक्त शेजार धर्माला जागले. जसा सुहास आणि तुम्ही जागता अगदी तसच. पण एक बरं झालं त्याला पाहण्याची मला सुबुद्धी झाली. म्हणून निदान वेळेवर गोळी देता आली. नाहीतर एव्हाना तापाने पुरता गर्भगळीत झाला असता. मोहिनीच्या बोलण्यावर सुहासची आई हसली व म्हणाली, म्हणूनच म्हणाले ना अगदी देवासारखी धावून आलीस. मी घरी येताच सुहासने मला सर्व सांगितले. चल त्याला आधी डॉक्टरकडून आणते मग निवांत बोलू. सुहासच्या आईच्या म्हणण्याला दुजोरा देत मोहिनी तिला म्हणाली, एक काम करते मी सुद्धा तुमच्याबरोबर येते. गप्पाच्या गप्पा होतील शिवाय पायही सुद्धा मोकळे होतील.घरात बसून बसून अगदी कंटाळा येतो. मोहिनीच्या आर्जवाला नकार देण्याचा प्रश्नच नव्हता सुहासची हसत म्हणाली, चल तर सोबत मला ही बरं वाटेल.

सुहासला घेऊन दोघी डॉक्टरकडे आल्या डॉक्टरने तपासून एक इंजेक्शन आणि गोळ्या दिल्या. खबरदारी म्हणून उद्या सकाळी रक्त तपासणी करून घ्या आणि रिपोर्ट मला दाखवा असही म्हणाला. डॉक्टरला रुकार देऊन सुहासची आई आणि मोहिनी सुहासला घेऊन घरी निघाल्या. घरी येता येता मोहिनीने बाजारातून किलोभर सफरचंद खरेदी केले व सुहासच्या आईकडे देत म्हणाली, तापामुळे सुहासच्या तोंडाला चव नसेल ना. म्हणून ही सफरचंद त्याला खायला द्या म्हणजे कमजोरी वाटणार नाही. मोहिनीने पुढे केलेली सफरचंद सुहासच्या आईने आढेवेढे घेत स्वीकारली व काही वेळातच तिघांची स्वारी घरी दाखल झाली.

दुसऱ्या दिवशी सकाळी मोहिनीच्या दाराची बेल वाजली. मोहन नुकताच कामावर निघून गेला होता. तोच काहीतरी विसरला म्हणून पुन्हा घरी आला असेल असं समजून ती दरवाजा उघडता उघडता म्हणाली, मोहन आता काय विसरला..तरी तुला.. इतकं बोलून समोर सुहासच्या आईला पाहून बोलता बोलता थबकली. काहीसे चिंतीत भाव तिच्या चेहऱ्यावर उमटले. तेच भाव प्रश्नरुपी तिच्या मुखातून बाहेर पडले.


मोहिनी : अरे.. सुहासची आई..! या आत या.. सकाळीच आलात..? सुहास बरा आहे ना..? ताप उतरला का त्याचा..?


सुहासची आई : अगं हो..हो.. एका वेळेस किती प्रश्न विचारशील..?


मोहिनी : नाही.. सकाळीच आलात ना म्हणून थोडी चिंता वाटली.


सुहासची आई : काही चिंता करू नको.. तसा सुहास बरा आहे.. हा.. ताप चढतो उतरतो आहे.. पण अजून एक दिवस डोस घेतला तर होईल बरा..


मोहिनी : तरी पण रक्त तपासणी करायला हवी ना..?


सुहासची आई : हो तर.. त्यासाठीच तुझ्याकडे आले..


मोहिनी : म्हणजे..?


सुहासची आई : अगं खर तर आज सुट्टी टाकणार होते पण जमत नाही आहे.. जाणं भाग आहे.. म्हणून तुझी मदत घ्यायला आले. तू जाशील का सुहासबरोबर पॅथॉलॉजीमध्ये..? म्हणजे तुला वेळ असेल तर..?


मोहिनी : काय तुम्ही पण..? शिष्टाचार कसले पाळताय..? जाईन ना.. त्यात काय..? मला कुठे कामावर जायचं आहे..?


सुहासची आई : अगं तसं नाही.. तुला सुद्धा घरची कामं असतील ना..?


मोहिनी : इन मीन दोन माणसांची कसली आलीत कामं..? आणि असली तरी नंतर करता येतील..


सुहासची आई : तसा सुहास जाईल एकटा.. तो म्हणतो आहेच तसा पण मेलं आईच काळीज आहे ना..? अशा अवस्थेत कसं पाठवू एकट्याला..?


मोहिनी : बरोबर आहे तुमचं..? तुम्ही काळजी करू नका मी जाईन त्याच्याबरोबर.. वाटल्यास नंतर रिपोर्ट सुद्धा घेऊन येईन. तुम्ही निश्चिंत मनाने कामावर जा..


सुहासची आई : आता तू जोडीला आहेस म्हटल्यावर काळजीच मिटली बघ. मग ठीक आहे मी सुहासला सांगते तसं आणि कामावर जाते.. अधून मधून लक्ष टाक घराकडे..


मोहिनी : हो.. तुम्ही काही काळजी करू नका.. मी पाहते सर्व..


निश्चिंत झाल्या सुहासच्या आईने एक चावी तिच्याकडे दिली व ती कामावर निघून गेली. चावी देण्यामागचा उद्देश हा होता की, यदाकदाचित सुहास झोपून राहिला तर तिला ताटकळत रहायला लागू नये. असो.


मोहिनीने अर्ध्या तासात घरातील सर्व कामं भराभर आवरली. व तयारी करून ती सुहासच्या घरी आली. नशिबाने तिला ताटकळत राहावे लागले नाही. बेल वाजताच सुहासने दरवाजा उघडला. एकंदरीत घरातील स्थिती पाहून ती सुहासला म्हणाली,


मोहिनी : काय रे अजून तयार नाही झाला.? आणि हे काय अजून लोळत पडला आहेस..? बरं व्हायचं नाही वाटते तुला..?


सुहास : (चाचरत) नाही उठलोच होतो.. पण आवरा आवर करण्याच्या आत तुम्ही आलात.


मोहिनी : बरं.. बरं.. तू तयारी कर.. मी आवरते सर्व.


(असं म्हणत ती चादरीची घडी घालू लागली.)


सुहास : (हातातील चादर ओढत) नको वाहिनी.. राहू द्या मी करतो..


सुहास चादर घेतोय हे पाहून तिने ती घट्ट धरून आपली बाजूला ओढली त्या बरोबर तापाने कमजोर झालेला सुहास तिच्याकडे खेचला गेला. नकळत मोहिनीच्या अंगाला त्याच्या शरीराचा स्पर्श झाला. त्याबरोबर कावरा बावरा झाला सुहास चादर सोडून झटकन बाजूला झाला. त्याची भांबावली अवस्था मोहिनीने जाणली व त्याचा ताण हलका करण्यासाठी म्हणाली, काय रे अजून ताप आहे तुला..? औषध वेळेवर घेतोस ना..? आणि किती कमजोरी आलीय.? नुसती चादर खेचली तर इतका धडपडला.? सांगितलं होतं ना मी आवरते म्हणून.? जा आता लवकर तयार हो मी आवरून घेते.


आता मात्र सुहास काही न बोलता तयारी करायला गेला. तो तयारी करून येईपर्यंत मोहिनीने घर आवरून घेतले व सुहास येताच त्याच्या बरोबर पॅथॉलॉजीच्या दिशेने निघाली.

रक्त तपासणीच्या सर्व चाचण्या पार पाडून मोहिनी सुहासला घेऊन घरी आली. प्रवासामुळे त्याला बराच थकवा जाणवत होता, हे एकंदर त्याच्या चेहऱ्याकडे पाहून लक्षात येत होतं. मोहिनीने त्याला बेडवर झोपवले. ताबडतोब दुध आणि बिस्किटे त्याला भरवली. दुध बिस्किटे खाऊन सुहासच्या चेहऱ्यावर बऱ्यापैकी तरतरी आली. ते पाहून मोहिनीला हायसे वाटले व ती म्हणाली, सुहास आता आराम कर, आणि हो आधी त्या गोळ्या घे मग झोप. मोहिनीचे बोलणे ऐकून सुहास गोळ्या घेण्यासाठी झेपावला पण गोळी घेता घेता धडपडला. ते पाहून मोहिनीने चटकन त्याला सावरले. व गोळ्या त्याच्या हातात देत पाण्याचा ग्लास आणून दिला. गोळ्या घेऊन सुहास बिछान्यावर पहुडला. ते पाहून मोहिनी पुन्हा म्हणाली, बर तू झोप आता मी जेवणाच बघते. पाण्याचा ग्लास आणि ती सफरचंद बाजूलाच ठेवते आहे. भूक लागली तर खा. मी येते दुपारी. मोहिनीचे बोल ऐकून सुहासने मूक मान हलवली व त्याने डोळे मिटले.

आज दिवसभर मोहिनीने सुहासच्या सुश्रुषेस वाहून घेतले. त्याच्या खाण्यापिण्यापासून ते त्याच्या औषध देण्यापर्यंत इतकंच काय त्याचा संध्याकाळी मिळणारा रिपोर्ट सुद्धा आणायला तीच गेली. तिथून डॉक्टरला दाखवायला सुद्धा गेली. सुदैवाने रिपोर्ट अगदी नॉर्मल होता. डॉक्टरने मुदतीचा ताप अर्थात व्हायरल फिव्हर असे निदान केले. दोन तीन दिवसात ठीक होईल सांगून काही औषधं लिहून दिली. मोहिनीने ती औषधं मेडिकल स्टोर्समधून खरेदी केली. आणि घरी आली. सुहासची आई तिचीच वाट पाहत होती. मोहिनी येताच तिने काळजीने तिला विचारले,


सुहासची आई : काय सांगितले डॉक्टरने.? रिपोर्ट काय म्हणतोय..? सर्व ठीक आहे ना..?


मोहिनी : (हसत) हो..हो.. सांगते.. जरा श्वास तर घेऊ दे..


सुहास : तू पण काय आई..? जरा निवांत बसू देत्यांना.. सांगतील त्या.. पण त्या आधी जरा पाणी वगैरे काही देशील की नाही.?


सुहासची आई : अरे हो..विसरलेच बघ.. काय करू पोराची काळजी वाटणे स्वाभाविक आहे ना..?


मोहिनी : हो.. मी समजू शकते.. पण काही काळजी करू नका.. साधा मुदतीचा ताप आहे.. दोन चार दिवसात बघा कसा उड्या मारायला लागेल.. हा बघा रिपोर्ट.. असं म्हणून संपूर्ण रिपोर्ट वाचून दाखवला.


सुहासची आई : चला काळजी मिटली. थांब तुला पाणी आणते.. आणि जरा चहा सुद्धा ठेवते.


असं म्हणत मोहिनीच्या प्रतिक्रियेची वाट न पाहताच त्या किचनकडे वळल्या व मोहिनीने आपली नजर रिपोर्टमध्ये खुपसली. व रिपोर्ट पाहता पाहता ती सुहासला म्हणाली.


मोहिनी : अरे सुहास.. तुझा रक्त गट ओ निगेटिव्ह आहे..?


सुहास : हो.. का काय झाल..?


मोहिनी : (विचार करत) नाही काही नाही.. हा गट खूप रेअर असतो ना..?


सुहास : (अजाणतेपणे) असेल.. पण मला माहित नाही..


मोहिनी : अरे मी सुद्धा तुला ऐकीव माहितीच पुरवते आहे.. मी कुठे वैद्यकीय अभ्यास केला आहे.? पण थोडी जुजबी माहिती ठेवावी माणसाने.. कधी तरी कामाला येते.


मोहिनीच्या बोलण्यावर सुहासने स्मित व्यक्त केले इतक्यात आई चहा बिस्किटे घेऊन आली. चहा घेऊन मोहिनी आईचा व सुहासचा निरोप घेऊन तिच्या घरी निघून गेली.

घरी येताच मोहिनी आपल्याच विचारात हरवून बसून राहिली. नेहमी एकटी असली की तिचं असंच होतं असे पण आज कारण जरा वेगळंच होतं. अर्थात मुलाची असूया हेच त्यामागचे एकमेव कारण होतेचं, त्यात सुहासच्या रक्त गटाने तिचे मन विचलित केले. कितीतरी वेळ दोलायमान अवस्थेत ती तशीच बसून राहिली. काही करण्याचे भान तिला राहिलेच नाही. न जाणे अशाच अवस्थेत किती वेळ गेला. दारावरची बेल वाजली आणि ती भानावर आली. तिने लगबगीने डोळे पुसले आणि दार उघडले व मोहन घरात आला. मोहनला आलेला पाहून तिच्या संयमाचा बांध फुटला ती मोहनला बिलगून हमसून रडू लागली. मोहनने तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला व म्हणाला, काय झाल मोहिनी..? कोणी काही बोलले का..? त्याच्या प्रश्नावर मोहिनीने मूक नकारार्थी मान हलवली. त्याबरोबर मोहनने तिचा चेहरा ओंजळीत धरला व म्हणला ओ हो.. राणीला चिंता सतावते आहे तर..? त्याच्या या प्रश्नावर मोहिनीने पुन्हा तशीच होकारार्थी मान हलवली. ते पाहून मोहनने तिला जवळ ओढले व हसत म्हणाला, बस इतकंच.. अगं मग त्यात निराश होण्यासारख काय आहे.? बघ ना.. अजून तरुण किती रात्र आहे. अन हा चंद्र माझ्या मिठीत आहे. फिर डरने की क्या बात है..? पण त्या आधी खूप भूक लागलीय गं.. जेवायला वाढ ना. तो पर्यंत मी फ्रेश होतो.(मिश्किलीने) मग काय रात्र आपलीच आहे.. काय..? मोहनच्या बदलत्या मूडने मोहिनीचा चेहरा खुलला, व ती म्हणाली, हो आता वाढायला घेते.. इतके बोलून तिने जीभ चावली व पुन्हा म्हणाली, सॉरी म्हणजे विचाराच्या तंद्रीत भात लावायला विसरले रे..(मिठी सोडवत) मी आता पटकन लावते.. तू फ्रेश होईपर्यंत वाढायला घेते.. तिची ती उडालेली धांदल पाहून त्याने पुन्हा तिला जवळ ओढले व म्हणला, होईल ग सावकाश.. काय घाई आहे.? आपण एक काम करू दोघांनी मस्त शॉवर घेऊ आणि मग जेवणाला लागू..(डोळा मारत) काय कशी वाटली आयडीया..? त्याचा कावा ओळखून मोहिनी त्याला दूर ढकलत हसत म्हणाली, चल चावट कुठचा.. जा फ्रेश हो लवकर.. तो पर्यंत मी भात लावते.. आणि हो.. ते तू काय म्हणत होता.? हा.. तरुण अजून रात्र आहे.. पण काय आहे ना.? चंद्र जरा कामात आहे.. ते झालं की मग, चंद्रच काय संपूर्ण आकाश कवेत घे, माझी काहीच हरकत नाही. तिच्या शाब्दिक कोटीवर मोहन खळखळून हसला व तिला पुन्हा जवळ ओढत म्हणाला, मग सोडतो की काय.. मोहनाची मिठी सुटत नाही पाहून ती त्याला समजावत म्हणाली, भूक लागलीय ना..? मग तू सोडल्याशिवाय ती कशी मिटणार..? भात लावायला हवा ना..? तिच्या प्रश्नावर मोहन पुन्हा हसला व तिला अधिक घट्ट जखडत म्हणाला म्हणला, तीच मिटविण्याचा प्रयत्न चालू आहे.. त्याच्या मिश्कीलीवर मोहिनी खोटे खोटे रागावून म्हणाली, बस हा.. आता पुरे झाला फाजीलपणा.(बाथरूम मध्ये ढकलत) जा वाश घे लवकर.. मी भात लावते. मोहिनीच्या चिडण्यावर मोहनने तोंड बारीक केले व मुकाट बाथरूममध्ये घुसला. त्याचा तो पडलेला चेहरा पाहून मोहनी हसली व भात लावायला किचनकडे वळली.

पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे मोहिनीचा फुललेला चेहरा रात्र उजळत गेला अन मोहनच्या मनाचा सागर उन्मादाच्या वाऱ्यासंगे बेभान होऊन, चंद्रास गवसणी घालण्या उसळी मारू लागला. विखुरल्या कुंतली जशी रातराणी सजली अन तिच्या गंधाने मोहनच्या मनावर मोहिनी घातली. जणूभावनांनी भारलेली, ती रात्र मंतरलेली..


त्या मोहमयी क्षणानी, चांदण्या अंथरलेली..!!


उन्मादी एक नजर, नजरेस भिडलेली..


जादुई नायनांवर, वेडा जीव जडलेली..!!


स्पंदनांचे दोन वारु. वायु वेगे दौडलेली..


बाहुपाशांच्या शिखरी, आवेगाने भीड़लेली.!!

प्रीतकुंड चेतवून, अग्नि श्वासी विरलेली


खुल्या घन बटांतून, मोरपिस फिरलेली..!!


गोडवा अंगी लेवुन, रातराणी बहरलेली..


एक ओढ़ अनामिक, लागून हुरहुरलेली..!!

भावनांनी भारलेली, ती रात्र मंतरलेली..


उसवल्या चांदण्या कवेत घेऊन मोहन निद्रेच्या आधीन झाला. पण मोहिनीला काही केल्या झोप येईना, तिच्या विचारांची शृंखला तुटता तुटत नव्हती. सुहासचा रिपोर्ट तिच्या डोळ्यासमोर नाचत होता.. कारण त्याचा रक्त गट मोहनच्या रक्त गटाशी जुळत होता आणि त्यामुळेच तिच्या सारासार विचाराला सुरुंग लागत होता. कुठेतरी तिच्या ऐकण्यात, वाचनात आले होते की, आई किंवा वडील या पैकी कोणा एकाचा रक्तगट मुलाला मिळतो. हाच विचार तिच्या मनात फेर धरू लागला व मोहन आणि सुहासचा चेहरा तिच्या डोळ्यासमोर फिरू लागला. तिने किती तरी वेळा आला विचार झटकण्याचा प्रयत्न केला पण बाळाची तीव्र आस तिला पुन्हा तिथेच आणून सोडत होती. नैतिक अनैतिकतेच्या चक्रात भरडल्या मोहिनीला न जाणे कधी झोप लागली ती सकाळी मोहनच्या हाक मारण्याने जाग आली.


मोहनने हाक मारताच ती खडबडून जागी झाली. ती उठून बसताच मोहन तिला म्हणाला,


मोहन : काय राणी साहेब आज कामावर उपाशी पाठवायचा विचार आहे वाटते..?


मोहिनी : (गोंधळून) नाही रे.. आता बनवून देते.. कळत नाही आज कसा डोळा लागला.?


मोहन : (मिश्किलीने) हरकत नाही.. आज डबा नाही मिळाला तरी चालेल.


मोहिनी : का.? देते ना बनवून. का बाहेर खायचा मूड आलाय..?


मोहन : (हसत) तसं नाही गं.. काय आहे.. रात्री पोट आणि मन अगदी तृप्त झालंय. मग आज उपवास घडला तर बिघडलं काय..?


मोहिनी : (लटक्या रागाने) सरळ सांग ना.. बाहेरचं चमचमीत खायचं आहे.. उगाच उपवासाचा बहाना कशाला.?


मोहन : (चेहरा पाडून) घ्या..ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं.. तुझी झोप पूर्ण झाली नाही म्हणून मी म्हणालो. आता तुझी तशीचं इच्छा असेल तर दे बनवून.


मोहिनी : तसं नाही रे.. बाहेरच खाऊन तब्बेत कशाला बिघडवून घ्या. पटकन पोळी भाजी करून देते..


मोहन : बरं.. चालेल. होऊ दे तुझ्या मनासारखं..


मोहनने तिचे म्हणणे ऐकले या समाधानात ती गोड हसली व किचनकडे वळली.

मोहन कामावर निघून जाताच. तिने घराची आवराआवर केली. स्नान वगैरे आटपून ती सुहासच्या घरी आली. दारावची बेल वाजवताच सुहासची आई लगबगीने पर्स सांभाळत बाहेर आली. बहुतेक आज तिलाही उशीर झाला असावा. दारात मोहिनीला पाहताच ती म्हणाली, मोहिनी सॉरी आज उशीर झाला आहे. मी निघते.. संध्याकाळी बोलू. हवं तर बस घरी. सुहास तसा जागाच आहे. सुहासच्या आईला निघालेली पाहून मोहिनीने विचारले, सुहास बरा आहे ना आता..? त्यावर सुहासची आई उत्तरली, हो आता बरा आहे. रात्रीपासून ताप सुद्धा नाही. सुहासच्या आईचे उत्तर ऐकून मोहिनी आईला म्हणाली, बरा आहे ना..? मग मी नंतर येईन. आता जरा बाजारहाट करून येते. तुम्ही निघा.. मी सुद्धा थोड्या वेळात निघते.. असं म्हणून ती पुन्हा माघारी वळली व सुहासची आई कामावर निघून गेली.

घरी येऊन तिने टीव्ही चालू केला. टीव्हीवर कोणती तरी मालिका सुरु होती पण तीचं मन त्यात काही केल्या रमेना. पाच एक मिनिटात टीव्ही पुन्हा बंद केला अन सुरु झाली विचारांची नवी मालिका.


दोन वेळा गर्भ राहूनही अतृप्त राहिलेलं मातृत्व. ते सासरकडच्यांचे टोमणे, शेजारपाजारी कुस्तीत बोलणे, या सर्वांवर वरताण त्या नातेवाईक म्हातारीचे वांझोटे उल्लेखणे व त्यामुळे झालेल्या मानसिक यातना. मागील सारे प्रसंग एखाद्या चित्रपटाप्रमाणे तिच्या नजरेसमोर तरळू लागले व मोहिनीने भीतीने आपले डोळे घट्ट मिटले अन घरात भयाण शांतता पसरली.


घामाघूम झाली मोहिनी काही वेळात भानावर आली. तिने फ्रीज मधून पाण्याची बाटली काढली व घटाघट अर्धी रिती केली. अन परिस्थिती पूर्वपदावर आली.


विचार शृंखलातून बाहेर पडताच मोहिनीने किचनमध्ये जावून अर्धा कप चहा ओतून घेतला. चहाचा घोट घेताच मनाला तरतरी आली. मग चेहऱ्यावर पाणी मारून, हलका मेकअप करून ती बाजारात निघाली.

बाजारातून येऊन जेवण वगैरे आटपून मोहिनी सुहासच्या घरी आली. बेल वाजताच सुहासने दरवाजा उघडला. मोहिनीने आता येत सुहासला विचारले,


मोहिनी : काय सुहास.! तब्बेत काय म्हणतेय..?


सुहास : बरी आहे आता पण अजून जरा अशक्तपणा जाणवतो आहे..


मोहिनी : हम्म.. काही खाल्ले का..?


सुहास : हो सकाळी दुध बिस्कीट नंतर दोन सफरचंद खाल्ली.?


मोहिनी : आणि जेवण..? त्याच काय..? आईने काही केलाय का काही..?


सुहास : असेल पोळी भाजी.. मी अजून काही पाहिले नाही.


मोहिनी : मग सकाळपासून काय केलं..?


सुहास : काही नाही.. फक्त लोळतोय.. पण त्याचा सुद्धा कंटाळा आलाय.. विचार करतोय अंघोळ करावी..


मोहिनी : हम्म.. बरोबर आहे लोळून सुस्ती चढणारच ना..? जा.. मस्त पैकी फ्रेश हो.. त्या शिवाय सुस्ती उडणार नाही..


सुहास : हो जातो आता.


मोहिनी : ऐक.. अंघोळ झाली की जेवायला घरी ये.. गावठी तांदळाचा साधारण नरम भात लावते.


सुहास : (संकोचून) नको वहिनी.. उगाच कशाला त्रास घेता..? तसंही अजून जेवण नीटसं जात नाही.. सफरचंद खाल्ली आहेत..


मोहिनी : म्हणूनच नरम भात बनवते.. जेवण घेतल्याशिवाय ताकद येणार नाही.. जितकं जमेल तितकं खा.. औषधाचा सकारात्मक परिणाम व्हायला हवा की नको..?


सुहास : पण..


मोहिनी : पण नाही बीण नाही.. यायचं म्हणजे यायचं.. नाही तर मी तुमच्याकडे पुन्हा येणार नाही..


सुहास : (नाईलाजाने) बरं येतो..


मोहिनी : छान.. मग ये तर.. मी वाट पाहते...

सुहास अंघोळीला गेला तशी मोहिनी घरी आली. तिने गावठी तांदळाचा भात लावला. काही वेळाने सुहास घरी आला. मोहिनीने दोन ताटं घेतली आणि वाढायला बसली.. हे पाहून सुहासने विचारले, वाहिनी तुम्ही सुद्धा जेवायच्या बाकी आहात..? सुहासच्या प्रश्नावर मोहिनी उत्तरली, हो रे आज एकटीला जेवायचा कंटाळा आला. म्हणून तुला बोलावलं जोडीला. बरं.. असं म्हणून सुहास खाली मान घालून जेवायला बसला.


जेवता जेवता मोहिनी सुहासला न्याहाळू लागली अन तिच्या मस्तकात विचारांची दाटी झाली. मनाचा मनाशी खल चालू झाला व तिचा कल अनैतिकतेकडे झुकू लागला. ती विचार करू लागली. हीच एकमेव संधी आहे जी सुहासच्या रुपात चालून आली आहे. आणि ही संधी जर का वाया गेली तर..? तर कदाचित बाळाचं स्वप्न केवळ स्वप्न बनून राहील व कधीही न पुसला जाणारा वांझोटा शिक्का कायम आपल्या माथ्यावर राहील. हा जीवघेणा शिक्का पुसायचा असेल तर सुहासला वश करायला हवे. कोणाला काहीच कळणार नाही. कारण पुढचा मार्ग निर्धोक असेल नव्हे तर सुहासच्या रक्त गटाने तो आधीच निर्धोक करून ठेवला आहे.


आपल्याच विचारात हरवलेल्या मोहिनीची तंद्री सुहासच्या हाकेने भंग पावली.


सुहास : कुठे हरवलात वाहिनी..? दोनदा हाक दिली तुमच लक्षच नाही..?


मोहिनी : नाही रे सहज विचार करत होते. तुला काही हवं का..?


सुहास : हो थोडा भात आणि वरण द्या. छान झालंय..


मोहिनी : आवडलं तुला..? हे घे..


(असं म्हणत तिने ताटात भात वाढला.)


सुहास : हो आवडलं.. तुम्ही स्वयंपाक छान करता. तुमच्या हाताला वेगळीच चव आहे..


मोहिनी : (हसत) मग रोज ये दुपारचा जेवायला. त्या निमित्ताने मलाही सोबत होईल.


सुहास : ते ठीक आहे पण कॉलेजवरून येता येता खूप उशीर होईल ना..? आता घरी आहे तो पर्यंत ठीक आहे पण कॉलेजला गेल्यावर काही सांगता येणार नाही..


मोहिनी : पण कॉलेज दुपारीच सुटते ना..? जेवायच्या वेळेला घरी येऊ शकतो.


सुहास : ज्या दिवशी लवकर येईन तेव्हा नक्की येईन.


मोहिनी : (मिश्किलपणे) आणि उशिरा येशील तेव्हा काय समजू..? कोणा बरोबर गेला..?


सुहास : (कावरा बावरा होत) तसं नाही.. कधी कोणी मित्र भेटला किंवा ट्राफिक असले तर उशीर होऊ शकतो ना..


मोहिनी : खर सांग हा मित्र की मैत्रीण..?


मोहिनीच्या प्रश्नावर सुहास चक्क लाजला.. व काही न बोलता गप्प बसला..


मोहिनी : अच्छा. म्हणजे मैत्रीण आहे तर..?


सुहास : (लाजत) हो पण आईला काही बोलू नका..


मोहिनी : बरं..हरकत नाही.. कर एन्जॉय.. आता नाही करणार तर कधी करणार..?

जेवण आटपून सुहास आराम करायला घरी निघाला मात्र मोहिनीने रोखले त्याला म्हणाली, बस थोडा वेळ गप्पा मारू.. नाही तरी सकाळपासून झोपाचं काढतो आहेस.. तिचा आग्रह त्याला मोडवला नाही.


गप्पांच्या ओघात ती त्याच्याशी जवळीक साधत त्याला विचलित करू लागली. बाजारात जाताना तिने नेसलेली साडी आज तशीच होती. अधून मधून तिचा पदर ढळत होता आणि सुहास नजर चोरून बसत होता.


आज सुहास मोहिनीचे नवे रूप अनुभवत होता. सहाजिक नेहमीचा परिचय असूनही तो आज जरा गोंधळालाच. कसे आणि काय बोलावे हेच सुचेनासे झाले. सरते शेवटी वहिनी आता थोडा वेळ आराम करतो, तुम्ही ही करा म्हणत तो घरी जाण्यास निघाला. तेव्हा मोहिनीने त्याच्या खांद्यावर हात ठेवला व म्हणाली उद्या जेवायला येशील ना घरी.? तिच्या बोलण्यावर सुहासने मानेने होकार दिला व घरी येऊन पहुडला.


मोहिनीच्या स्पर्शाची भाषा, तिच्या सततच्या ढळणाऱ्या पदराने आपले काम चोख केले. नकळत सुहासचे मन विचलित झाले. त्याच्यातील पुरुषाने त्याची झोप उडवली आणि संपूर्ण दुपार तळमळण्यात गेली.


संध्याकाळी आई घरी येताच सुहास बिछान्यातून उठला व फ्रेश होऊन बसला न बसला तोच मोहिनी घरी आली व सुहासच्या चेहऱ्यावर स्मित लकेर उमटली. घरात प्रवेश करताच ती सुहासकडे पाहून सूचक हसली व म्हणाली, काय सुहास झोप पूर्ण झाली की नाही..? कसं वाटतेय आता..? तिचा आवाज ऐकून सुहासची आई किचनमधून बाहेर आली व म्हणाली, तूच बघ कसा दिसतोय..? कालच्या पेक्षा चेहऱ्यावर तेज दिसतंय नाही..? आईच्या प्रश्नावर मिहिनी उत्तरली, मग दिसणारच ना.. दुपारी पोटभर जेवलाय तो.. त्यामुळेच फ्रेश झालाय. तिच्या उत्तरावर सुहासची आई हसली व म्हणाली, ही तुझीच कृपा आहे बर का. माझ्या पाठीमागे तू त्याची खूप छान काळजी घेतली. खरंच तुझे उपकार कसे मानावे हेच कळत नाही. सुहासच्या आईचे तिच्या प्रती कृतज्ञतेचे उद्गार ऐकून ती म्हणाली, अहो उपकार कसले त्यात, मी परकी आहे का तुम्हाला.? आणि तुम्ही तरी मला परक्या आहात का..? काय रे सुहास मी परकी आहे का कोणी..? मोहिनीच्या प्रश्नावर सुहासने काही न बोलता नकारार्थी मान हलवली व मोहिनी आईशी बोलण्यात गुंतली.

मोहिनी सुहासच्या आई सोबत चांगली तासभर बोलत बसली. इतक्या वेळात सुहास मोहिनीला चोरून न्याहाळत होता. मोहिनीच्या मोहिनीची ही जादू होती. त्याने सुहासची नजर बदलली होती. मोहिनीच्या ते चांगलेच लक्षात आले. कारण ती मधेच त्याच्याकडे लक्ष टाकता सुहासची नजर खाली जात होती पण मोहिनीची त्यावर बारीक नजर होती. तिने पटकन हेरले की मासा गळाच्या आसपास घिरट्या घालतोय, आता अडकण्यास वेळ नाही लागणार. सुहासमधील हा बदल पाहून ती मनोमन सुखावली व निश्चिंत मनाने घरी आली.

दुसऱ्या दिवशी मोहिनीला वाटले होते की, आज सुहास लवकर घरी येईल पण तसे झाले नाही. साहजिक तिचा हिरमोड झाला. दुपारचा १ वाजून गेला तरीही सुहास आला नाही म्हणून ती त्याला पहायला त्याच्या घरी गेली पण सुहास तिथे नव्हता. ती हिमुसली होऊन माघारी वळली व घरी येऊन बसली. आता वाट पाहण्याशिवाय तिच्या हाती काहीच नव्हते. वेळ जावा म्हणून ती मासिक चाळत बसली पण मन त्यातही रमेना. ती विचार करू लागली. एकंदर काल असंच वाटलं होतं की सुहास आकर्षित होतोय मग आज असे काय झाले की तो आला नाही.? शिवाय घरी सुद्धा नाही.. मग गेला तर कुठे गेला..? कदाचित कॉलेजला गेला असेल.? मैत्रिणीला भेटावेसे वाटले असेल..? बघू आल्यावर कळेलच. चला आलिया भोगाशी असावे सादर..


कितीतरी वेळ ती आपल्याच मनाशी संवाद साधत असताना दाराची बेल वाजली. तिने दार उघडले तर दारात सुहास उभा होता. त्याला पाहताच तिची कळी खुलली. तिने त्याच हसत स्वागत केले व म्हणाली,


मोहिनी : काय सुहास..? तब्बेत अगदी ठणठणीत झालेली दिसतेय..?


सुहास : (स्मित हास्य पेरत) हो.. आता एकदम फ्रेश आहे..कॉलेजला गेलो होतो.


मोहिनी : अच्छा.. म्हणून आज यायला इतका उशीर झाला.?


सुहास : हो.. थोडा बॅकलॉग भरून काढायचा होता ना.. म्हणून उशीर झाला.


मोहिनी : (मिश्किलपणे) नक्की कोणता बॅकलॉग..? अभ्यासाचा की आणखी कोणता..?


सुहास : (भांबावल्या मनाने) अ..अ..अभ्यासाचाचं.. खरच..


मोहिनी : (हसत) बरं बरं.. अभ्यासाचाचं.. बाकी तू लाजतो छान हा..(गालाला स्पर्श करत) अगदी गोड दिसतोस.


मोहिनीच्या बिनधास्त बोलण्याने नेमके कसे व्यक्त व्हावे हेच त्याला कळेनासे झाले त्यामुळे भांबावलेला सुहास अधिक भांबावला व नकळत मूक झाला. इतके मात्र खरे की, मोहिनीचा स्पर्श त्यास सुखावून गेला. चाणाक्ष मोहिनीने त्याची ती अवस्था जाणली व त्याला बोलते करण्यास म्हणाली, मग जेवायला बसायचं ना..? तुझ्या आवडीचं जेवण खास तुझ्यासाठी बनवले आहे. मग बसुया..? मोहिनीच्या बोलण्यावर सुहासने रुकार दर्शिविला आणि ते दोघे बसले जेवायला.

एक दोन दिवस असेच गेले. मोहिनी त्याला विचलित करण्याचा हर प्रयत्न करत होती पण त्याचं पाऊल काही पुढे सरकत नव्हते. तो तिच्याकडे आकृष्ट तर झाला होता हे त्याच्या नजरेतून तसेच देहबोलीतून जाणवत होते पण त्याच्या बुजऱ्या स्वभावामुळे मोहिनीला अभिप्रेत असणारा पवित्रा त्याने अजून तरी घेतला नव्हता. त्यामुळे सहाजिक मोहिनीचा हिरमोड झाला.


आपलं इप्सित साध्य करायचं असेल तर एक घाव दोन तुकडे करायलाच हवे त्याशिवाय आपले स्वप्न साकार होणार नाही हे मोहिनीने ताडले. सुहास पुढे येत नाही तर आपणच पुढे होऊ, काही ही झाले तरी लवकरात लवकर सुहासला वश करायलाच हवे असे तिने मनोमन ठरवले आणि तशी संधी तिला दुसऱ्याचं दिवशी उपलब्ध झाली.

मोहन कामावर निघून जाताच मोहिनी किचन आवरून अंघोळीला जाण्याच्या विचारात होती इतक्यात दाराची बेल वाजली. रात्रीची पारदर्शक नाईटी अजूनही तिच्या अंगावर होती. तिने दाराच्या झरोक्यातून बाहेर पाहिले तर सुहास उभा होता. सुहासला पाहताच तिचा चेहरा आनंदाने फुलला. हीच ती योग्य संधी आहे असा विचार करत तिने झटकन दरवाजा खोलला.


झिरझिरीत नाईटीतुन डोकावणाऱ्या त्या चंद्राच्या तेजाने सुहास दिपून गेला. काही क्षण तो भारावून गेला. मात्र पुढच्याच क्षणात भानावर आला अन आत जावे न जावे याचं विचारात दारावर घुटमळळा. त्याच्या पुढच्याच क्षणाला मोहिनीने त्याचा हात धरून त्याला आत ओढला आणि बेसावध तो तिच्या अंगावर धडकला. सावध मोहिनीने चपळाईने दरवाजा बंद केला आणि काही कळण्याच्या आतच मेणाचा पुतळा मोहिनीच्या आचेत विरघळून गेला.

अनपेक्षित अशा या घटनेने सुरवातीस भांबावलेला सुहास सायंकाळी एका वेगळ्याच समाधानाने मोहिनीच्या घरातून बाहेर पडला. जागा झालेल्या अन सुखावलेल्या पुरुषाने सुहासचा चेहरा मोहरा बदलून टाकला. मोहिनीच्या सौंदर्याचे मधु प्याले तो एकावर एक रिचवू लागला. परिणाम व्हायचा तोच झाला. एकीकडे मोहिनीला दिवस गेले आणि दुसरीकडे सुहास कामाक्षीच्या व्यसनात इतका अडकला की, कॉलेजला वरचेवर दांड्या मारू लागला इतकेच काय प्रेयसीतही त्याचे मन रमेनासे झाले. मोहिनीचा सहवास त्याला हवाहवासा वाटू लागला. तिच्या पाशात तो पूर्णतः गुंतून गेला.

मोहिनीचा हेतू साध्य झाल्याने तिला आता थांबायचे होते पण सुहास.? सुहास मात्र थांबण्याच्या मनस्थितीत नव्हता. मोहिनीच्या देहाची आसक्ती त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. तो कधी मनधरणी करून तर कधी प्रसंगी बळजबरीने आपली कामेच्छा पूर्ण करून घेऊ लागला पण मोहिनी त्यास त्यास रोखू शकत नव्हती तिचा नाईलाज होत होता. तिने सुहासला समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण सुहास आता समजण्याच्या पलीकडे गेला होता. अशात दोन महिने होऊन मोहिनीला आता तिसरा महिना लागला.

मोहिनीला दिवस गेल्याचे कळताच तिच्या घरी आता नातेवाईकांचा गोतावळा जमू लागला. मोहिनीचे सासू,सासरे तसेच आई,वडील यांचे वरचेवर येणे जाणे सुरु झाले. कधी कधी मुक्कामी राहू लागले. त्यामुळे सुहासची कुचंबणा होऊ लागली. त्याला संधी मिळेनासी झाली आणि यदाकदाचित मिळाली तरी मोहिनी शिताफीने त्यास परावृत्त करत होती. पण कुठवर करणार..? काही झाले तरी सुहास तिच्या देहाशी खेळणार हे ती ही जाणून होती. यातून सुटका करून घ्यायची असेल तर एक मार्ग होता तो म्हणजे हे राहतं घर सोडून जाणे. त्याशिवाय सुहासचा ससेमिरा सुटणार नाही आणि तसं झाल नाही तर एक ना एक दिवस हे सुहास प्रकरण आपल्या अंगलट येईल याची जाणीव तिला झाली.

एकीकडे मोहिनीने घर सोडण्याचा विचार केला आणि नियतीची तिला साथ मिळाली. नातवासाठी आसुसलेली तिची सासू तिला घरी येण्यासाठी गळ घालू लागली. मोहिनीला तेच हवे होते ती पटकन त्यास तयार झाली व सुहासला काहीच कळू न देता ती निघून सुद्धा गेली. सर्व काही आलबेल झाल्यावर पुढील दोन एक दिवसात मोहनने सर्व सामान टेंपोत भरले व चावी मालकाच्या ताब्यात देऊन आपल्या मुळ मुक्कामी म्हणजेच आपल्या आई वडिलांकडे परतला.

मोहिनी निघून जाताच सुहास वेडापिसा झाला. त्याच वेडात मोहिनीचे शरीर सुख त्याने प्रेयसीकडून मिळविण्याचा प्रयत्न केला आणि त्यात सपशेल आपटला व ती सुद्धा त्यास झिडकारून निघून गेली. हरलेल्या सुहासने मग व्यसनास जवळ केले.


तिकडे मोहिनीच्या आनंदास काही पारावार नव्हता. सगळीकडून कौतुकाचा वर्षाव होत होता. यथावकाश गोंडस मुलगा झाला. तो कलेकलेने वाढू लागला. मोहिनीचा वांझोटा डाग पुसला गेला. पण ज्याच्यामुळे हे शक्य झाले तो सुहास मात्र आयुष्यातून उठला. व्यसनास जवळ केल्याने दिवसेंदिवस खंगत चालला. एकीकडे एका कोवळ्या जीवाचा उदय झाला तर दुसरीकडे ऐन भरात आलेल्या दुसरा जीव अस्ताचळी चालला होता. कोण जबाबदार होतं त्याच्या ऱ्हासाला..? मोहन.? जो वैद्यकीय दृष्ट्या असमर्थ होता. की मोहिनी..? जिचा आई होण्याचा मार्ग चुकला होता. का स्वतः सुहास..? जो कोवळ्या वयात शारीरिक सुखाच्या आहारी गेला. की बुरसटलल्या रूढी,परंपरेत अडकलेला आपला समाज..? ज्यांनी वांझोटेपणाचा शिक्का मोहिनीच्या माथी मारला होता.


कोण.. कोण जबाबदार होतं या संपूर्ण घटनेला..??Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract