काव्य चकोर

Others

3  

काव्य चकोर

Others

स्मार्ट फंडे

स्मार्ट फंडे

3 mins
391


आजची पिढी भलतीच स्मार्ट झालीय. याची प्रचिती त्यांच्या बोलण्यातून,वागण्यातून आपणास पावलोपावली येत असते. असंच कुठेतरी एक घोषवाक्य वाचले होते "सोच के आगे" अगदी त्या पद्धतीनेच जणू त्यांची वाटचाल चालू आहे असंच वाटतंय. हा सोशल नेटवर्किंग अथवा चॅनेलचा पगडा आहे की स्पर्धेच्या ह्या युगात त्याने स्वतःस तसे घडवून घेतले आहे न जाणे.


तशी काळाचीही गरज आहे म्हणा एक पाऊल पुढेच राहायला हवे किंबहुना पाऊल जपून टाकायला हवे तरच येणाऱ्या संकटावर मात करण्यात यशस्वी होता होता येते.


तर सांगण्याचं तात्पर्य असं की, आजच्या पिढीत हे गुण प्रामुख्याने दिसून येतात याची प्रचिती मला आमच्या चिरंजीवांनी कपाटवर चिकटलेल्या त्या कागदावरून आली ज्यावर त्याने काही मजकूर लिहून ठेवला होता.


आता तुम्ही म्हणाल मजकूर लिहिण्याचा आणि स्मार्ट होण्याचा काय संबंध.? तर तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय तर झालं असं..


दिवाळीच्या दिवसात चिरंजीव म्हणाले पप्पा आम्ही आज सर्व मित्र अमुक एका हॉटेलमध्ये जाणार आहोत पार्टी करायला.खरं तर शेवटचा पेपर झाल्यानंतर जाणार होतो.पण उशीर होईल म्हणून नाही गेलो. तर आज आम्ही जाणार आहोत.


यावर मी विचारले अरे पण पार्टी म्हणजे नक्की काय.? आणि पार्टी गरजेची आहे का.?


तर तो उत्तरला, पप्पा आमची पार्टी म्हणजे काय? एखाद दुसरा पिझा आणि आईस्क्रीम झाली पार्टी. त्यावर मी पुन्हा विचारले दौरा कुठपर्यंत आहे तर तो उत्तरला जास्त लांब नाही स्टेशनपर्यंत दोन तासात येईन परत. त्यावर मी जास्त न ताणता म्हटले बरं ठीक आहे पण.. 2 तास म्हणजे 2 तास त्यापुढे जर का वेळ लागला तर मात्र माझ्याशी गाठ आहे. त्यावर तो नाराजीने म्हणाला पण पप्पा वेळ मागे पुढे होऊ शकतो ना.? मग 10 पंधरा मिनिटं ग्रेस मिळायला काय हरकत आहे.? त्याच्या उत्तरावर मी त्याला न दर्शविता मनात हसलो व म्हणालो बरं तू म्हणतो तर ठीक आहे दिला तुला अर्धा तास अधिक (थोडा कडक आवाजात) मात्र त्याहून अधिक वेळ झाला तर पाठीला तेल लावून तयार रहा. त्यावर तो हसला म्हणाला तुम्ही बघाच वेळेत येतो की नाही. असं म्हणून तो निघून गेला.


काही वेळातच मी सुद्धा बाहेर निघून गेलो आणि त्यानंतर सौ.मुलीला घेऊन निघून गेली.


साधारण चार,पाच तासांनी घरी आलो. सौ. आणि मुलगीसुद्धा नुकतीच आली होती.मात्र चिरंजीवांचा पत्ता नव्हता. मी सहज सौ. ना चिरंजीवांबद्दल विचारले तर ती म्हणाली,ठाऊक नाही तो आला की नाही कारण मी आले तेव्हा दाराला टाळे होते. त्यावर मी रागातच म्हटले,येऊ दे आता त्याला त्याची पार्टीच बाहेर काढतो. मी असं बोलतो न बोलतो तोच मुलीचं लक्ष कपाटाकडे गेलं व जोरात हसत म्हणाली पप्पा तुमचा चिरंजीव येऊन गेला. हे पहा त्याने कागदावर काय लिहून ठेवलयं. सौ.ने सुद्धा तो मजकूर वाचला आणि हसत म्हणाली, घ्या तुमचा चिरंजीव तुमच्या पेक्षा दोन पाऊलं पुढेच दिसतोय आता बोला. आता घ्या बघू हजेरी त्याची.


मी सावधपणे कपाटाजवळ येऊन तो मजकूर वाचू लागलो त्यावर लिहलं होतं.


"मी घरी येऊन गेलो हाये.


[Please do not shout me]


ok


Rudra


वाचून आलेलं हसू आवरत मी म्हणालो, हू.. स्मार्ट पिढीचे हे स्मार्ट फंडे भलतेच स्मार्ट झालेत. बापाच्या रागाचा बुमरँग चक्क बापावर उलटवला. माझ्या या वाक्यावर मायलेकी खळखळून हसल्या व म्हणाल्या सावध रहा.. ही झाकी आहे अजून पिक्चर बाकी आहे.


Rate this content
Log in