किशोर राजवर्धन

Inspirational Others

4.6  

किशोर राजवर्धन

Inspirational Others

मनी मल्हार # 7

मनी मल्हार # 7

7 mins
381


हिवाळ्यातील थंडीच वातावरण, मल्हारने व्हिडिओ कॉन्फरन्सवर बोर्ड मिटींग नुकतीच संपुष्टात आणली होती. वेळ पुढे सरत असताना सूर्यप्रकाश मल्हारच्या केबिनमध्ये येउन, त्याच्या डेस्कवर परावर्तित होउन त्याच्या डोळ्यावर चकाकत होता. त्याने डेस्कवर पसरलेल्या काचेवर त्याचा हात स्कॅन करुन स्मार्ट कॉम्पुटर कम असिस्टंला सूचना दिल्या. मल्हारने दिलेल्या सुचनेनुसार स्मार्ट कॉम्पुटर कम असिस्टंने केबिनमध्ये येणाऱ्या सूर्यप्रकाशांची तीव्रता सौम्य केली आणि त्याच्या आदेशाप्रमाणे त्याला येणारे कॉल आणि मेसेज स्वतः अटेंड करत त्याच्यासाठी शांत आणि मधुर मेडिटेशनचं म्युझिक सुरु केलं… मल्हार डोळे बंद करत सुंदर मधुर संगीताचा आनंद घेत, येणाऱ्या विचारांच्या गर्तेत विलीन झाला. मनीच्या मिठीची रात्र आणि त्रिशंकू प्रश्न त्याला उत्तर शोधण्यासाठी त्या गर्तेत खेचत होते… (‘मनी मल्हार’ दोघांची भेट होऊन दोन आठवडे उलटले होते. मल्हारला कोल्हापुराची पुन्हा ओढ आणि हुरहुर लागली होती. एकीकडे मृणालीच्या गोजिऱ्या स्पर्शाची, तिच्या गालावर पडणाऱ्या निरागस खळीची, तिच्यावरचा स्नेह आणि काळजीने त्याचा जीव व्याकुळ झाला होता… तिला पाहुन त्याच्या बालपणीच्या आठवणी उजळल्या होत्या. दुसरीकडे संघर्षीसोबतच बालपण, आयुष्याच्या खडतर वाटेवर तिच्या मैत्रीची साथ आणि नंतर एक पत्नी म्हणून तिचा लाभलेला सहवास… तिसरं म्हणजे मनीने घेतलेला निर्णय आणि तिचं प्रेमारुपात तिने जपून वाढवलेली वेल ‘मृणाली’. त्याने मनी, संघर्षी आणि त्याच्या, तिघांच्या बाजुने पुन्हा विचार करण्यास सुरुवात केली. तसं तर तिघेही आयुष्याच्या अशा बिंदूवर उभे होते जिथुन मैत्री आणि प्रेम ह्यामधील कोणतीही एक भावना वरचढ झाली की दुसरी दु:ख देत होती. हे असं दु:ख होतं ज्याच्या प्रभावाने तो वेदनेत बुडून जात होता आणि पुढच्याच क्षणी ‘मनी’ पुन्हा भेटल्याचं सुख आणि आनंदपण होत होता… खूप विचार करुनही त्याला उत्तर सापडत नव्हतं…) शेवटी त्याने संघर्षीसोबत बोलण्याचं ठरवलं कारण ती पत्नी आणि जिवलग मैत्रीणपण होती… त्याने केबिनमधुन बाहेर पडताच स्मार्ट कॉम्पुटर कम असिस्टंने पार्किंगमधून कार बाहेर येण्यासाठी कारच्या ऑटोड्राईव्हरला नोटीफिकेशन सेंट केलं… ऑफिसच्या बाहेर पडताना त्याने वर पाहिलं मनातले मळभ आकाशात जमा होऊन दाटी करत होते. मल्हारने कारमध्ये प्रवेश केला आणि ‘होम डेस्टिनेशन’ला स्पर्श करत पुन्हा विचारात मग्न झाला…

.....................

कोल्हापुरात सर्वत्र धुक्याची मखमली चादर पसरली होती. हवेत गारव भरला होता. सकाळच्या पाखरांची किलबिल ऐकूत मनीने मिणमिणत्या डोळ्यांनी समोरच्या भिंतीवरच्या घड्याळाकडे पाहात आळस झटकला आणि जॉबला जाण्यासाठी ती उठली. मृणालीला दिवाळीच्या सुट्या सुरु झाल्यामुळे ती आजपासून तिच्या सकाळच्या घरच्या कामात थोडं फरक पडून निवांत कामाला जाण्याची तयारी करत होती. तिचं आवरुन तिने आईला मी, निघते म्हणून हाक मारली आणि झोपलेल्या मृणालीच्या माथ्यावर स्पर्श करत आपले ओठ ठेवले.. तिच्या नितळ चेहऱ्यावरुन मायेचा हात फिरवत..ती घराबाहेर पडली…


दिवस सरत होता पण आकाशात ढगांची सावली दाटी करत होती. काही वेळात तिच्या शिफ्टची वेळ संपणार होती आणि रिसेप्शनच्या डेस्कवर सध्या गर्दी नव्हती... ती स्वतःच्या विचार मग्न होऊन गेली. मल्हार आणि मृणालीची भेट करुन देतानाचे क्षण तिच्या मनात तरळू लागले… ( मृणालीला कळू लागल्यापासून ती सारखी तिच्या बाबांबद्ल विचारत असे आणि मनी तिला ते दूर देशात कामाला असतात, त्यांना यायला वेळ नसतो ही कारणे देऊन तिची मनधरणी करत असे त्यामुळे तिचा चेहरा तिच्या बाबांच्या आठवणीत दुर्मुखलेला झाला होता. पण ज्यावेळी मल्हार आणि तिची भेट झाली होती तेव्हापासून तिची ही कुरकूर बंद झाली होती. मल्हार तिला भेटला तेव्हा ती त्याला अशी बिलगली की, जणू तिच्या अंतर्मनाने जाणलं होतं, हेच तिचे बाबा आहेत म्हणून.. आणि मल्हारला स्वतःच्याच स्वभावाची पुनरावृत्ती झाली होती. त्याने तिच्यासाठी आणलेले गिफ्ट अजून तिने तिच्या मम्मालापण दाखवले नव्हते… मल्हार निघताना तिला त्याचा नंबर देऊन गेला होता.. तो तिने कुठे ही न लिहून ठेवता पाठच केला होता.. आत तर ती त्याच्याशी फोनवर गप्पा मारत मम्माची तक्रार करत असे… मनीचं हृदय ह्या आठवणीने उत्फुल्ल झालेलं होतं…) इतक्यात मनीचा फोन वाजला… तिने फोन उचलला आणि आनंदात “हॅलो…आई… मी निघणार आहे थोड्या वेळात..” म्हणून उत्तर दिलं.

आईने रडत म्हटलं “मृणु… मृणु…” आईला रडू आवरत नव्हतं आणि फोनवर वयस्कर आवाज ऐकू आला ते पुढे म्हणाले, “रुपिका… मृणु… मृणु… खेळताना पायऱ्यांवरुन पडली.

मी आण्णा बोलतोय, तिला हॉस्पिटला घेऊन आलोय… ती शुध्दीवर येत नाही.. डोक्यातून खूप रक्त गेलं..!”

“तू कुठे आहेस लवकर निघुन ये...” (बाहेर वाऱ्याने जोरात प्रवाहित होण्यास सुरुवात केली.)

मनीचे हात आणि शरीर कापत होते. तिला ह्या क्षणी काय करावं ते सुचत नव्हतं… रिसेप्शनवरील सहकाऱ्याला सांगून जिवाचे प्राण पायात आणून ती तेथून निघाली… हॉस्पिटला पोहचली. क्षणात मिळणाऱ्या सुख आणि दीर्घकालीन दु:खाची छ्टा तिच्या चेहऱ्यावर दाटली होती..ती आली तेव्हा ऑपरेश्न रुममध्ये डॉक्टर मृणालीच्या डोक्यावर स्टिचेस करत होते… तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले..तिने ओलावलेल्या स्वरात मल्हारला कॉल करण्यासाठी फोन स्क्रिन अनलॉक केली…

........................

बाहेर काळोख दाटत होता… मल्हारच्या कारने मुंबईच्या कुशीतलं जुळया शहरातील निसर्गरम्य परिसरात काचेच्या भिंती असलेल्या बंगल्यात प्रवेश केला… सोसाट्याचा वारा त्याच्या मनातल्या प्रश्नाप्रमाणे थैमान घालत होता… संघर्षी हॉलमध्ये सोफ्यावर डिजिटल स्वरुपातील पुस्तक वाचत बसली होती. त्याने तिच्याकडे पाहिलं… तिचं रुपाच्या खुलण्यानं जणू बंगल्यातील दिव्यांना पूर्ण प्रकाशमान केलं होत. तिच्या असण्याने त्या घराला अस्तित्व असल्याची जाणीव होत होती… काही दिवसांपूर्वी झालेल्या मिसकॅरेजमुळे तिच्या मनाची मातृत्वाची अवस्था तो जाणत असल्यामुळे तिच्याशी बोलण्याकरिता तो मनात साहस एकवटत होता. तो तिच्याजवळ जाऊन तिच्या शेजारी बसला. तिला मिठीत घेत तिचा आजचा दिवस कसा गेला, याबाबत तिची विचारपूस केली. तिने त्याच्याकडे प्रेमपूर्ण नजरेन पाहिलं. त्याच्या मनात सुरू असणाऱ्या वादळाचा अंदाज घेत. त्याच्या चेहऱ्यावर उमटलेल्या प्रश्नांनी त्याच्या चेहरा निस्तेज झालेला होता. तिने त्याचा हात तिच्या तळहातात घेऊन तिच्या ओठांनी त्याच चुबंन घेतलं आणि त्याला स्नेहपूर्ण विचारलं, “मल्हार.. काय झालं.. तुझ्या चेहऱ्यावर आज खूप प्रश्न दिसतात.” मल्हारने तिच्या डोळ्यात पाहिलं आणि विचार आणि दु:खवेगाने त्याने मान खाली घातली. तिने त्याच्या चेहरा तिच्यासमोर आणतं पुन्हा विचारलं. मल्हार सोफ्यावरुन खाली सोफ्याला टेकून तिच्या पायाजवळ जाऊन बसला.

तिने त्याच्या केसात हात फिरवत म्हटलं, “आपण पती-पत्नी अगोदर बालपणीचे मित्र-मैत्रीण आहोत.”

“तू मनीनंतर सर्वांत खास जवळचा मित्र आहेस.”

“ऊठ बरं काय झालं ते सांग…”

त्याने खोल तुटक आवाजात मनीचं नाव उच्चारलं आणि तिला कोल्हापुरला घडलेली हकीकत सांगत सकाळपासून जे प्रश्न त्याच्या मनात थैमान घालत होते ते तिच्या समोर मांडले. दोघांमध्ये एक निर्लिप्त शांतता पसरली. ती भंग करत ढगातून वीज कडाडत खाली यावी तशी संघर्षी ताडकन जागेवर उठून उभी राहिली… ती रागाने कापू लागली.. मेंदूतील न्युरॉन फणफणत होते….


तेवढ्यात मल्हारच्या वॉचमधील स्मार्ट असिस्टंने “मनी कॉलिंग”चं नोटीफिकेशन दिलं. त्याने कॉल उचलला “हॅलो…” त्याचा आवाज ऐकताच मनीने “..मृणु.. मृणु..” रडक्या कळवळ्या स्वरात पुढे म्हटलं, “तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं…” हे ऐकताच त्याच हृदय भय आणि काळजीने कंपित झालं. मृणालीला पाहण्यासाठी मल्हार कोल्हापुरला जाण्यास निघणार इतक्यात संघर्षीने त्याचा हात घट्ट पकडला. तिचा राग अनावर होत होता. मल्हारने मृणाली हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्याच सांगितलं. संघर्षीने हाताची पकड सैल करत त्याचा हात सोडला. तिने स्वतःच्या रागावर संयम आणत स्वतःशीच म्हटलं, “मनातल्या आणि भावनेचा झालेला गुंता हळुवार आणि संयमाने सोडवावा लागेल.”

तिला जाणवलं की, दोघांच्या नात्यात आत पालकत्वाच्या प्रेमाची ओढ निर्माण झाली आहे.


मल्हार बाहेर पडला. मल्हारची कार बगंल्यातून बाहेर पडताना ती फक्त पाहात होती… बाहेर चाललेल्या जोरादार वादळाभोवती तिच्या मनात विचार आणि भावनांचा कल्लोळ सुरु झाला… मल्हारसोबतचं बालपण… तिचं त्याच्यावरचं प्रेम, मल्हारचं मनीवर असलेलं प्रेम. मनी मल्हार दोघांना एकमेकांच्या हातात हात घातलेला पाहून तिला पहिल्यांदा तिच्या जिवलग मैत्रिणीबद्दल वाटलेला तिरस्कार.. दोघं सुखी राहावे म्हणून ती त्यांच्यापासून वेगळी होऊन तिने मानसशास्त्रात (पीएच.डी.) करण्याकरता स्वतःला अभ्यासात गुंतवून तिच्या करिअरची वाटचाल… आणि त्यातून आलेले अनुभव…“ प्रेम पण पाण्यासारखं असतं. मनात साचलं की, डबकं तयार होतं. मग त्यात ना-ना प्रकारच्या नकारात्मक भावनांचे किडे आपलं घर करण्यासाठी झगडतात. ते पाण्यासारखं वाहतं राहिलं की, कुणालाही आपलंसं करतं आणि वेळ आली की नको असणाऱ्या दुषित गोष्टी काठावर सोडून पुन्हा प्रवाहात स्वच्छ होतं. मनी सोडून गेल्यामुळे मल्हारची झालेली अवस्था… त्यातुन त्याला बाहेर काढताना हे तिने अनुभवलं होतं… तिचा आणि मल्हारचा विवाह.. तिचं नुकतंच झालेलं मिसकॅरिएज... तिला ह्या क्षणी मनीवर राग आणि चीड येत होती. पण कॉलेजच्या ग्रुपमधल्या मैत्रिणींचा प्रश्न तिला आठवला “दोघींचं प्रेम जर एकाच मुलावर जडलं तर… जमलं तुमचं…? ” तारुण्याच्या उबंरठ्यावर ज्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी ती मौन धारण करत होती आज तोच प्रश्न पुन्हा तिच्यासमोर उभा होता. ती कॉलेजमधल्या आठवणींच्या पाऊलखुणा आठवत आठवणींच्या मैफलीत रंगली. आठ-दहा मुलींचा ग्रुप. नाटक, सिनेमा, कॅफे, मॅक डी, समुद्रकिनारी फिरणे, पावसाळ्यात स्वच्छंद हिरवाईत बागडणे मनसोक्त आयुष्य जगण्याचा छंद. मल्हारसाठी ती ज्या व्यक्तीचा द्वेष करत होती ती व्यक्ती तिची जिवलग मैत्रीण रुपिका (मनी).. दोघींच्याही आवडी-निवडी सारख्याचं… डोळे एकदम भरुन आले… प्रत्येक गोष्ट शेअर करायच्या… तिने पीएच.डी. करताना अभ्यासलेली ‘पॉलीऍमरी’ नात्यांची नवीन संकल्पना… प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात येणाऱ्या वेगवेगळ्या व्यक्तीबद्दल जाणवणारे प्रेम हे वेगळे असू शकते आणि त्यातील ‘प्रेम मर्यादित नाही तर ते अमर्याद आहे. त्यात अनेक रुप, रंग, गंध असून यांच्या अनेक भावनिक छ्टा असतात आणि त्यामुळे ते आणखीन सुंदर होतं. फक्त ते अनुभवता आलं पाहिजे.’ ….आणि त्यातील भावनिक साक्षरता… तिची मनस्थिती ही मल्हारसारखीच झाली होती. मैत्री आणि प्रेम ह्यामधील कोणतीही एक भावना वरचढ झाली की दुसरी दुखावली जात होती. तिचे डोळे चमकून उठले… ह्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी चाकोरीबाहेरचा विचार करण्याची गरज होती…


तिला मनीचं उत्तर आठवलं, “…जसं ज्ञान शेअर केल्यानं वाढतं. तसं प्रेम पण …” मनातल्या रात्रीच्या अंधारात विचार आणि भावनांचा कल्लोळ बाहेरील वाऱ्याच्या थैमानासोबत शांत झाला आणि रिमझिम पाऊस सुरु होऊन तिच्या डोळ्यातून अश्रू पाझरु लागले.. ती हॉलमध्ये तशी सोफ्यावर बसली… आणि क्षणार्धात तिचा डोळ्यावर झोपेने राज्य घेतलं. (स्मार्ट होम असिस्टंटने सेन्सर स्कॅन करत ती झोपल्याची खात्री करुन बंगल्यातील दिव्यांचा प्रकाश मंद करुन घर ऑटोलॉक केलं.) हॉलमधून..पिवळ्या तांबड्या रंगाचे किरण तिच्या डोळ्यावर पडून तिला उठवण्याचा प्रयत्न करत होते… तिला आज खूप दिवसांनी ताजेतवाने आणि उल्हासित वाटत होतं. तिच्या मनातला विचार आणि भावनांचा दाटलेला काळोख नाहीसा झाला होता… तिला नवीन मार्ग सापडला होता. नात्याच्या आधुनिकतेच्या मार्गावर तिचा निर्णय मल्हारला कळवण्यासाठी, ‘मनी मल्हार’शी बोलण्यासाठी तिने स्मार्ट होम असिस्टंटला तिच्या आवाजात मल्हारला कॉल करण्याची सूचना दिली. त्याने कॉल उचलला आणि स्नेहपूर्ण स्वरात “सॉरी..” म्हटलं. संघर्षीने मृणालीची तब्येत कशी आह त्याबद्दल विचारपूस केली. मल्हारने प्रफुल्लित होत “ती शुध्दीवर आली आहे.. आता तब्येत सुधारत आहे…” असं उत्तर दिलं.

तिने मल्हारला मनीशी बोलण्यासाठी फोन देण्यास सांगितलं… पारंपरिक नात्याने आधुनिकतेची कास धरली...


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational