कान्हेरी लेणी… एक विस्मयकारक कार्यशाळा
कान्हेरी लेणी… एक विस्मयकारक कार्यशाळा


कान्हेरी लेणी… एक विस्मयकारक कार्यशाळा
मुंबईतील बोरीवली राष्ट्रीय उद्यानातील कान्हेरी लेणी बघण्यासाठी सिध्दार्थ महाविद्यालय, पाली विभागातर्फे एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्याकरिता मला 9 वाजेपर्यंत बोरीवली येथील राष्ट्रीय उद्यानात पोहचणे गरजेच होत. मी, सकाळी 5 वाजता उठून सकाळची नित्यकर्म केल्यानंतर पंचशील आणि बुध्द वंदनाकरुन ब्लॉक कॉफी बनवुन घेतली. पत्नी आणि दोन सुंदर फुलं अजून साखर झोपेतच होती. दुपारच्या जेवनासाठी मी चीज सँडविच डब्यात बनवुन घेतले. सोबत शिजवलेल्या कॉर्नमध्ये मिठ, लाल तिखट टाकले आणि मिक्स करुन दुस-या डब्यात घेतले. बॅग भरली. पार्किंगमधुन स्कुटी काढली आणि कॉम्पल्यक्स मधुन बाहेर पडलो. मंद काळोख पसरला होता. सुर्य उगवण्याच्या बेतात सुरवातीचा प्रकाश होत होता. हवेत कोमट गारवा जाणवत होता. मी स्कुटी स्टेशनच्या पार्किंग मध्ये लावली आणि पनवेल स्टेशनला पोहचलो. 7:09 ची वडाळा ट्रेन मध्ये चढलो. ट्रेनच्या कोच मध्ये नजर फिरवली आणि विंडो सिट रिकामी पाहुन जाऊन बसलो. पुढच्या प्रवासाची रुपरेषा मनात आखली. बुल्युथुथ हेडफोन बॅगेतुन काढुन सकाळच्या गारव्यात ‘पाली’ भाषेतील पावा सिंगरचे (PAWA Singer) ‘बुध्द सुत्त’ स्मार्ट फोनवर सुरुकरुन अर्धवट राहिलेली झोप पुर्ण करण्याकरिता डोळे मिटले....
‘पाली’ भाषेतील पावा सिंगरचे (PAWA Singer) ‘बुध्द सुत्त’ ऐकणे हे माझ्या दररोजच्या ऑफिसला जाण्याच्या प्रवासातील विरंगुळा आहे. सुत्तचे स्वर, शब्द दररोजच्या धकाधकीच्या , गर्दीच्या प्रवासामुळे येणारा शिणपणा नाहिसा होऊन मी ताजातवाना होतो. लँगरुटचा प्रवास कधी संपतो हे कळतं देखिल नाही..... असो गाणी ऐकता- ऐकता माझी झोप पुर्ण होऊन मला जाग आली. खिडकी बाहेर पाहिलं टिळक नगर स्टेशन आलं होतं. प्रवासाची रुपरेषा ठरवल्याप्रमाणे मी, कुर्ल्याला उतरुन पुढच्या प्रवासासाठी घाटकोपरला जाण्यासाकरिता ट्रेन पकडली. घाटकोपरला येऊन मी, मेट्रोच परतीच तिकीट काढलं.. स्वंयचलीत जिने चढून मी मेट्रोच्या प्लॅटफॉर्मवर आलो.. इंडिकेटरवर घाटकोपर ते वर्सोवाला जाणारी मेट्रो ट्रेन २ मिनिटात येण्याची शक्याता दर्शवत होतं. मी प्रवाशांच्या रांगेत उभा राहिलो...... इतक्यात मेट्रो ट्रेन प्लॅटफॉर्मला आली... सकाळ आणि आज दुसरा शनिवार असल्यामुळे गर्दी कमी होती.. मेट्रोमध्ये बसायला जागा मिळाली.. मेट्रोमधील थंड आणि शांत वातावरण… मी, आजुबाजुच्या सहप्रवाशांकडे पाहिलं सर्वजण आप-आपल्या स्मार्टफोन मध्ये व्यस्त होते. त्यांच्याकडे पाहून मेट्रोच्या वेगाने मनात स्मार्ट फोनच्या शोधापासुन ते आतापर्यंतचा प्रवास डोळ्यासमोर धावु लागला..... मी , मोबाईल किंवा स्मार्टफोन वापरायच्या अगोदर कितीतरी वेळा प्रवास केला आहे... स्मार्टफोनच्या अगोदर प्रवासात असताना सहप्रवासी प्रवासात मागे पडणा-या प्रदेशाला बघुन कंटाळले की, आपल्या आजुबाजुच्या सहप्रवाशांसोबत संवाद साधण्यासाठी बोलायची आणि मग मस्त एकमेकांच्या गप्पांमध्ये रंगुन जात. स्मार्टफोन मानवी जिवनाचा एक अविभाज्य अंग झाल्यापासून आजच्या परिस्थितीत खुप मोठा फरक पडला आहे. स्मार्टफोन मधील विविध अॅप आपलं लक्ष स्वयंकेंद्रित करुन घेतात आणि मग आपल्याला आजुबाजुच्या जगाचाच विसर पडू लागतो. आपण ऑनलाईनच्या दुनियेत खुप जवळ आलो, परंतु आपल्या सोबतच्या व्यक्ती, जवळच्या सहप्रवाशांपासुन खुप दुर झालो आहे. ह्याची खंत वाटत होती... त्यात मी पण ह्या जगाचा नकळतं एक भाग बनंत होतो... इतक्यात पुढच्या स्टेशनची अनाऊस्मेंट ऐकु आली... वेस्टर्न एक्प्रेस हायवे... येथे उतरुन मला बोरीवली येथील राष्ट्रीय उद्यानात पोहचण्यासाठी दुसरी मेट्रो ट्रेन पकडायची होती.... मेट्रो थांबली. मी मेट्रोमधील थंड आणि शांत वातावरणातुन बाहेर पडलो.. मागे प्रवाशांकडे पाहिलं.. एक स्मित करुन स्मार्टफोनचा प्रश्न, ती परिस्थिती तिथेच सोडून..... पुढच्या प्रवासाला निघालो...
वेस्टर्न एक्प्रेस हायवे मेट्रो स्टेशनला उतरून दुसरी मेट्रो ट्रेन पकडण्याकरिता मी दोन्ही मेट्रो स्टेशनला जोडणा-या ब्रिजवरुन चालत गुंदवली मेट्रो स्टेशनला पोहचलो तिथे सुध्दा परतीच्या प्रवासाच तिकीट काढलं. स्वंयचलीत जिने चढून मी मेट्रोच्या प्लॅटफॉर्मवर आलो.. पण ह्या मेट्रो ट्रेनचे प्लॅटफॉर्म जरा वेगळे होते. प्लॅटफॉर्म पुर्ण काचेच्या भिंतींनी बंद होते. प्लॅटफॉर्मवर मेट्रोच्या कोचच्या अंतराप्रमाणे प्लॅटफॉर्मवर दरवाजे होते. जे मेट्रोट्रेन प्लॅटफॉर्मवर थांबल्यावरच उघडतात... अशा नव्यापध्दतीने बांधकाम केले होते. मेट्रो ट्रेन आली.. मेट्रोट्रेन प्लॅटफॉर्मवर थांबल्यावर स्वंयचलीत दरवाजे उघडले आणि मी मेट्रो ट्रेन मध्ये प्रवेश केला. बीप...बीप... आवाज करत मेट्रोट्रेनचे आणि प्लॅटफॉर्मचे दरवाजे बंद झाले. मेट्रोट्रेनमध्ये अगोदर सांगितल्याप्रमाणे येथेही गर्दी कमीच होती.. तसं म्हणावं तर गर्दीच नव्हती. पुर्ण ट्रेनमध्ये मी मिळून 15 ते 16 प्रवासी होतो. मेट्रोमध्ये समोर बसायला जागा मिळाली.. मेट्रोमधील थंडगार आणि शांत वातावरणात पुढचा प्रवास सुरु झाला...... मेट्रोच स्टेशन आल्यावर स्वंयचलीत दरवाजे उघडले की, मेट्रोच्या शांत वातावरणात शहरातील रहदारीचा गोंधळ , वेस्टर्न एक्प्रेस हायवे वरील गाड्यांच्या ट्राफिकचा गोंगाट आत यायचा आणि स्वंयचलीत दरवाजे बंद झाले की गोंधळ, गोंगाट यांचा आवाज मेट्रो पाठीमागे सोडुन पुन्हा शांत होत होती... असा लपंडाव चालुच होता... मेट्रोच्या खिडकीतुन बाहेर पाहिलं. सुर्याच्या पिवळ्या किरणांच्या प्रकाशात शहर उजाळतं होतं. एका बाजुला आधुनिकरणाने निर्माण केलेल्या उंच ,सुरेख, सुंदर काचेच्या बिल्डींग होत्या तर दुस-या बाजुला त्यांना कलाटणी देणारी घरे यांच परस्पर विरोधी एककत्रीकरण असून ही शहराला जागतिक दर्जा मिळाला आहे. हे मार्मिक सत्य लक्षात येत.... इतक्यात मला ज्या गंतव्य स्थानी पोहचायच होत. त्या ठिकाणाची अनाऊस्मेंट झाली.. मी बाहेर येऊन कॉलेजच्या गृपसोबत राष्ट्रीय उद्यानातील प्रवेश घेण्यासाठी प्रवेश शुल्क भरले ... आणि जे अजुन प्रवासात होते त्या सहकारी, मित्रांची वाट पाहु लागलो.....
माझ्या गृपमध्ये बहुतेक माझ्यापेक्षा वयाने वरिष्ठच होते. माझ्या वयाचे फक्त आम्ही तिघेच होतो. सर्व मित्र परिवार आल्यानंतर आम्ही कान्हेरी लेणीकडे नेणा-या बसची वाट पाहत फोटो शुट केले. बस आली.. सर्वजण बस मध्ये चढलो.. 10:30 वाजले होते. सुर्य प्रकाश लख झाला होता. राष्ट्रीय उद्याना पासून कान्हेरी लेणीच अंतर 7 किलो मिटर आहे. बसने वेग घेतला. उद्यानातील परिसरपाठी मागे सोडत बसने सर्वांना कान्हेरी लेणीच्या पायथ्याशी असलेल्या बस स्टॉपवर सोडुन पुन्हा नवीन पर्यटकांना आणण्यासाठी युटर्न घेऊन धाव घेतली. आम्ही उतरल्यावर सरां सोबत गृप फोटो काढला.. आणि कान्हेरी लेणी प्रवेश फी भरुन कान्हेरी लेणीच्या पहिल्या नंबरच्या लेण्यामध्ये आम्ही बसलो. विनोद भेले सरांनी कान्हेरी लेणीचा इतिहास, तसेच लेण्यामध्ये कलाकृती घडवण्याकरिता लागणारा कालावधी, लेण्यांना दान देऊन कोरण्यात आलेल्या मजकुर, दगड कसा ओळखायचा पध्दती, ह्या लेण्या दुस-या शतकापासून घडत होत्या ज्या काळात अधुनिकरणाच नाव सुध्दा नव्हतं. बुध्दंची शिकवण व त्यात नंतरच्या काळात निर्माण झालेले संप्रदाय, बुध्दांची शिकवण येणा-या पिढीला मिळावी म्हणून लगोपाठ 9 ते 10 पिढ्या हे काम अखंड सुरुच होत. अशा ब-याच इतिहासाची पाने सर आम्हाला समोर उलगडून सांगत होते... सुरुवातीला सरांच लेक्चर छान वाटलं. मध्येच लेण्या पाहायला येणारे पर्यटक आम्ही बसलेल्या ठिकाणी येवुन डोकावत होते. सरांच लेक्चर ऐकत पुढे जात होते. त्याच्यामुळे लेक्चर मध्ये अडचण येत होती. पण त्याच्याकडे दुर्लक्ष करत आम्ही ते ऐकत होतो. मध्ये थंड वा-याची झुळुक लेण्याना स्पर्शकरुन आम्हाला सुखावत होती. थोड्या वेळेनंतर आमच्यातील विद्यार्थी वृत्तीला पण कंटाळवाण वाटु लागलं.. 2 तासांनी सरांनी लेक्चर संपवलं आणि आम्ही सुटकेचा निश्वास सोडला...
सुर्य माथावर आला होता. उन्ह टोचत होती. आम्ही लेणी पाहण्यास सुरुवत केली. पण दुपारचा 1 वाजले होते. सर्वांची पोटे आत जेवन करण्यासाठी आम्हाला खुणावत होती. सर सर्व विद्यार्थांना म्हणाले की, “ लेणी क्र. ३ मध्ये बुध्द स्तुपाच्या आवारात पंचशील आणि बुध्द वंदना घेऊन, नतंर जेवु आणि पुढच्या लेण्या बघुया.” आम्ही सर्वांनी होकार दिला.
आम्ही सर्व विद्यार्थी लेणी क्र. ३ च्या आवारात प्रवेश केला. लेण्याच्या प्रवेश व्दारापासुन ते लेण्यामध्ये आत जाईपर्यंत प्रशस्थत खुली जागा आणि कोरीव शिल्पांच्या कलाकृती, स्तंभ, दोन्ही बाजुला बुध्दांच्या उभ्या मोठ्या शांत मुर्त्या दगडत कोरल्या होत्या. त्या निरखुन पाहण्यासाठी मी वर पाहिलं मुखावरील स्मित हस्य आणि शांत मुद्रा पाहुन जणु ती दगडातील कलाकृती अजून ही जिवंत असून संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहे अस वाटत होतं. आम्ही सर्वांनी लेणीच्या बाहेर शुज आणि पादत्राणे काढुन आत प्रवेश केला. बाहेर जी उन्हं टोचत होती. लेणीत प्रवेश केल्यावर नैसर्गिक एअरकुलर लावला आहे. इतक थंड , शांत आणि प्रसन्न वातावरण वाटत होतं. आम्ही सर्व रांगेत बसलो. स्तुपाला वदंन करुन पंचशील आणि बुध्द वंदना सर्वांनी एकासुरात म्हंटली. पंचशील आणि बुध्द वंदना झाल्यानंतर सर्वांनी 5 मिनिटे डोळे बंद करुन ध्यान मुद्रेत बसुन ध्यान केलं. शेवटची धम्मपालन गाथा बोलुन उठलो. तेव्हा पाहतो तर काय? आमच्या पाठी काही देशी, विदेशी पर्यटक पण बुध्द वंदनेत समिल झाले होते. बुध्द वंदनेचा सुर स्तुपात घुमत होता. तेथिल वातावरण अधिकच शांत, प्रसन्न आणि निरामय झालेल होत. सर्वांच्या चेह-यावर एक वेगळच तेज आणि आनंद झळाळत होता. आम्ही स्तुपाला एक प्रदक्षिणा घातली आणि बाहेर आलो. सर्वांनी फोटो काढले. दुपारच्या जेवनासाठी पुन्हा आम्ही खाली उतरलो. लेणीच्या खाली एक उद्यान (आता बनवण्यात आलं आहे.) आम्ही सर्वजण फ्रेश होउन तिथे जमलो. सर्वांनी सहभोजनासाठी आप-आपले डबे उघडले. वेगवेगळ्या पध्दतीच्या भज्या- भाकरी,चपाती, विविध चटण्याचे प्रकार, सँडविच, खिचडी भात.... असं सर्व पदर्थांचा खंमग सुहास दरवळत होता. सर्वांनी आप-आपल्या डब्यातील पदार्थ एकमेकांना शेअर केलं. लेण्यातील बुध्द चरणांना स्पर्श करुन येणारी उबदार हवा आणि गप्पा गोष्टी, चर्चा करत मस्त खमंग जेवणाचा अस्वाद घेत आम्ही सर्वांनी सहभोजन पुर्ण केलं.
सहभोजन केल्यानंतर ताजेतवाने होऊन आम्ही पुन्हा उस्फुर्तपणे लेणी पाहण्यास तयार झालो. आम्ही पाहिलेल्या अगोदरच्या लेण्या डोंगरच्या सुरवातीलाच होत्या. आता डोंगर चढुन उरलेल्या लेण्या पाहायच्या होत्या. डोंगर चढुन लेण्या पाहु लागलो तसं सरांनी सांगितलेला इतिहास आम्ही पडताळून पाहतं होतं आणि सर त्यात अधिक भर घालत होते. साधारणत: 900 ते 1000 वर्ष ह्या लेण्या घडवण्याचे काम सुरु होते. तिथे 1500 ते 1600 बौध्द भिक्षु, भिक्षुणी राहत, ते उपसकांना ध्यान साधना , विपश्यना शिकवायचे, त्यांच्या राहण्यासाठी , खाण्याची , वर्षभर ऐवढ्या लोकांना पुरेल त्याप्रमाणे पिणाचे आणि विविध कामांसाठी लागण्या-या पाण्याची व्यवस्था नैसर्गिक स्त्रोताचा उत्कृष्ट पध्दतीने वापर करुन पाणी विविध ठिकाणी लेण्यामध्ये अंतर्गत नेण्यासाठी डोंगराच्या कडांना अशा प्रकारे आकार दिला आहे की, काही लेण्याच्या आवारात डोंगरात जलकुंड खोदुन ठेवले आहेत. त्यात पावसळ्यात डोंगरावर पडणारे पाऊसाचे पाणी जिथे जलकुंड आहे. तेथे पाणी नैसर्गिकपणे वाहत त्यात जमा होते. डोंगरात एकांतात ध्यान करण्यासाठी ध्यान कक्ष, अशा 80 ते 90 लेण्या कोरल्या आहेत. त्या कक्षाबाहेर काही ठिकाणी बसण्याकरिता दगडाचे बाक आहेत. आजही त्यातील शिल्प, कलाकृती, बुध्द मुर्त्या खुप सुंदर आणि मनाला मोहुन टाकणा-या आहेत.
मला आवडलेली एक शिल्प कलाकृती म्हणजे पाच फनाचे नाग डोक्यावर असलेले दोन्ही राजे कमळाला धरुन पुर्ण शक्तीनिशी उभे आहेत. कमळात बुध्दांची मध्यम मार्गाची शिकवण देणारी मुद्रा आहे. त्यांच्या बाजुला दोन बोधिसत्वाच्या मुर्त्या आहेत. बोधिसत्व पण कमळात बुध्दांच्या बाजुला उभे आहेत. दोन्ही नाग राज्यांच्या बाजुला प्रत्येकी एक स्त्रि आहे आणि त्यांच्या डाव्या बाजुला एक लहान स्त्रि बुध्दाला नतमस्तक झाली आहे. उजव्या बाजुला एक लहान पुरुष आहे जो बुध्दांची पुज्या करत आहे. (हे सर्व शिल्प पाहुन माझं स्वत:च अकलन आहे. प्रत्येकाला ते वेगळ होऊ शकतं)
काही लेण्यांच्या बाहेर त्या लेण्याचे काम पुर्ण करण्यासाठी कोणी-कोणी दान दिले त्यांचे नावे व प्रसंग धम्म लिपित लिहिली आहेत. लेणी क्र. 41 मध्ये अध्यात्मिक काया रुपातील बोधीसत्व अवलोकितेश्वराची एकादश मुख मुर्ती ही अद्वितीय कलाकृती खुप मनमोहक आणि सुदंर शिल्प आपल्या कल्पनांना एक विशेष खाद्यच आहे. लेणी क्र. 34 च्या छतावर उत्तर वाकाटक कालीन चित्रकलेचे अवशेष सापडता. रमत गमत आम्ही हळुहळु प्रत्येक लेण्याच सौदंर्य मनात आणि स्मार्टफोन मध्ये साठवत पुढे जात होतो. माझ्या सोबतचे सहकारी आणि मी डोंगराच्या माथावर गेलो. तिथुन राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरावर नजर फिरवली संध्याकाळच्या कोवळ्या तांबुस उन्हात परिसरात उन्हाने सुकत चालेल्या झाडांच्या रंगात झालेला बदल जाणवत होता. दुरवर नजर टाकली तर मुंबईला पाणी पुरवठा करणारं तुलसी तलावाच निळसर सौदंर्य दिसत होतं..ते पाहुन थोडा डोंगर माथावर विसावा घेऊन आम्ही सर्व परतीच्या प्रवासासाठी खाली उतरु लागलो… बस स्टॉपवर आलो.. बस स्टॉपवर अगोदरच बससाठी रांग लागली होती. कारण उद्यान बंद होण्याची वेळ होत होती त्यामुळे सर्व पर्यटक परतीच्या बसची वाट पाहत होते. थोड्या वेळातच बस आली. पण ह्यावेळ बस पुर्ण भरुन गेली होती. आम्ही सर्वजण कसेबसे बसमध्ये चढलो आणि थोड्या वेळातच बसने आम्हाला घरी परतण्याच्या वाटेवर सोडून पुन्हा युटर्न घेऊन निघुन गेली. पण मी अजूनही लेण्याचा विचार करत होतो.. इतके अप्रतिम शिल्प कलाकृती पाहुन मला ही खरचं हेवा वाट होता. की, ऐवढा मोठा डोंगर खोदुन त्या दगडांना सुंदर लेण्यामध्ये रुपांतरीत करण्यासाठी आपल्या सर्वांच्या 9 ते 10 पिढ्या खर्च झाल्या का? तर त्या पिढ्यांनी येणा-या हजार पिढ्यांना आणि जगाला बुध्दांची शिकवण चिरंतर मिळावी म्हणुन आपलं आयुष्य पणाला लावुन घडवल्या. ज्या आज ही साक्ष देत आहेत की, आपण कोणाचे वारस आहोत… आजच्या आधुनिकरणाच्या युगात सगळ्या गोष्टी शक्य करता येतात पण ज्यावेळी आधुनिकीकरणाचा जन्म सुध्दा झाला नव्हता. अशा काळात दगडावर योग्य अतंर ठेवुन , योग्य पध्दतीने त्याला घडवणे आणि शिल्प कलेच्या सौदंर्याच लेण चढवणे खुप प्रेरणादायी वाटतं होतं.……इतक्यात सहकारी मित्र मंडळीनी निरोप देण्यासाठी मला आवाज दिला…. लेण्याच्या विचारातुन बाहेत येऊन मी पण सर्वांना निरोप दिला. निघताना काहीतरी विसरल्याची आठवण झाली आणि लख प्रकाश पडावा तसं एकदम आठवलं की, जर सरांनी अगोदर दोन तास लेक्चर दिलं नसतं तर मी पण बाकीच्या पर्यटकांन सारखं फक्त दगड पाहुन घरी गेलो असतो. मी त्यांच्या जवळ जाऊन त्यांना मनापासून धन्यवाद म्हंटल.. आणि पुढच्या वेळेस दगड कसा वाचायचा हे मनात कोरुन मी परतीच्या प्रवासाकरिता मेट्रो स्टेशन मध्ये प्रवेश केला…