Participate in 31 Days : 31 Writing Prompts Season 3 contest and win a chance to get your ebook published
Participate in 31 Days : 31 Writing Prompts Season 3 contest and win a chance to get your ebook published

Shobha Wagle

Inspirational


3  

Shobha Wagle

Inspirational


मला काही सांगायचंय

मला काही सांगायचंय

8 mins 197 8 mins 197

बाळांनो मला तुमच्याशी बोलायचे आहे. आता गप्प बसून चालणार नाही. माझं मन मला मोकळं करू द्या. मला आता सहन होत नाही. माझा प्राण कंठाशी आलाय. बोलल्या शिवाय गत्यांतर नाही. माझीच मुले माझी लक्तरे तोडतात. मला आता मूग गिळून बसता येत नाही. सध्याची पिढी माझी खूपच अवेहलना करते, ते खूपच क्लेशदायक आहे. माझी थोरवी आजच्या पिढीला माहीत नसेल पण तुम्हाला आईवडिलांना तर माहीत आहे ना? मग माझी अशी विटंबना का करता?


भारतीय परंपरा जपणारी, भारतीय संस्कृतीचे जाण असलेली माय मवाळ मी मराठी भाषा. जाणता ना माझा इतिहास? मग आजच्या पिढीला ही कळू द्या ना तो थोडासा! मी मराठी एक सुंदर भाषा आहे. मला काना, मात्रा, वेलांटी अशा विविध दागिन्यांनी मढवलेली आहे. मी घरंदाज भाषा आहे. पण बाळांनो, आजच्या तुमच्या मुलांना माझा थोडा इतिहास कथन करून तरी दाखवा.


हजारो वर्षांपूर्वी लिहिला गेलेला श्रवणबेळ्गोळ येथे गोमटेश्वराच्या पुतळ्याखाली माझ्या भाषेतील पहिला शिलालेख आढळतो. तर आद्यग्रंथ म्हणून माझ्या `ज्ञानेश्वरीचा' उल्लेख करतात. माझे मातृभाषेचे महत्त्व ओळखून ज्ञानेश्वरांनी संस्कृत भाषेतील भगवदगीता प्राकृत भाषेत अनुवादित केली. मातृभाषेबद्दल असणारा आदरभाव व्यक्त करताना ज्ञानेश्वर म्हणतात,

"माझा मऱ्हाटीचि

बोलु कवतुके परी अमृताते

ही पैजेसी जिंके॥'


भारतातील प्रमुख २२ भाषांपैकी मी एक आहे. महाराष्ट्र आणि गोवा ह्या राज्यांची मी अधिकृत राज्यभाषा आहे. मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकसंख्येनुसार मी ही जगातील पंधरावी व भारतातील चौथी भाषा आहे. मराठी बोलणाऱ्यांची एकूण लोकसंख्या ९,००,००,००० आहे. मी ९व्या शतकापासून प्रचलित आहे. माझी निर्मिती संस्कृतमधून निर्माण झालेल्या महाराष्ट्री प्राकृत व अपभ्रंश या भाषांपासून झाली आहे.


माझ्या खूप पोटभाषा आहेत. त्या म्हणजे, वऱ्हाडी, मालवणी, कोळी, कोकणी इत्यादी. माझे अस्तित्व २००० वर्षापासून आहे. महाराष्ट्रात पंथ, जाती, धर्म, संप्रदाय यांची विविधता आहे. यामुळे माझी प्रादेशिक रूपे साहजिकच अनेक आहेत. अभिजन, बहुजन, भटके, विमुक्त, आदिवासी, दलित अशा विविध समाजांच्या विविध भाषिक रूपांनी महाराष्ट्र ध्वनीत होत असतो आणि मी प्रत्येक बारा मैलांच्या अंतरावर माझ्यात थोडा बदल दाखवत असते.


२७ फेब्रुवारी हा माझा दिन म्हणून साजरा केला जातो. त्याचे कारण म्हणजे तुम्हा सर्वांचे लाडके साहित्यकार कुसुमाग्रजांचा जन्म दिवस "मराठी दिन" म्हणून धुमधडाक्यात साजरा करतात. ही गोष्ट मला आनंदाची आहे. एखादा दिवस साजरा करणे खूप सोपं होत चाललंय पण आपण खरोखर आपली मातृभाषा टिकावी म्हणून काही प्रयत्न करतोय का? आणि करायला हवेत तर कोणते?


मराठी दिन म्हणून मोठ मोेठे कार्यक्रम आखतात. साहित्यिकांचा सन्मान करतात. खूप आवडतं मला. पण मी टिकावं, माझा उत्कर्ष व्हावा म्हणून ठोस असं काही कार्य केलेले आढळत नाहीत. तेव्हा आजच्या माझ्या दिनाला तसे ठोस कार्याचे निर्णय घ्या व ते अमलात आणण्याचा पण करा.


आता थोडा माझा इतिहास जाणून घेवू या. ११८७ ई.स. नंतर यादव काळात माझा वापर वाढला. यादव राजे अगोदर कन्नड व संस्कृत भाषा वापरत असत. १४ व्या शतकाच्या शेवटी मी वर्णलेखनाची प्रमुख भाषा झाले होते. यादवांनी मला प्राधान्य दिले कारण त्यांना स्वतःला प्रजेशी जोडायचे होते. कारण सामान्य जनतेच्या तोंडी मीच होते. यादवातल्या शेवटच्या तीन राजांच्या काळात ज्योतिष, आयुर्वेद, पुराण, वेदां वर माझे साहित्य गद्य आणि पद्य रुपात करण्यात आले. मला महाराष्ट्रात जो मोठा दर्जा मिळाला तो फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. त्या काळी शासकीय कामकाज आणि बोली भाषा म्हणून माझा विस्तार झाला. त्याकाळी पर्शियन भाषा होती. तिचा प्रभाव कमी होऊन माझा विस्तार वाढला तो फक्त शिवबा राजेंमुळे. त्यावेळी मला "मोडी " लिपीत लिहीत होते. तसेच त्या काळी विद्वान पंडित लोक संस्कृत भाषेचा वापर जास्त करत व सामान्य जनतेला माझ्या शिवाय दुसरी भाषा अवगत नव्हती.


संत वाङ्मय जाणून घ्यायचे का थोडं माझे! गौळणी आणि विरहिणी हे माझे संत साहित्य. तसेच वारकरी संप्रदायातील साहित्य, ओवी आणि अभंग छंदातून प्रामुख्याने लिहिण्यात आले आहे. वारकरी सांप्रदायातील बरेचसे वाङ्मय स्फुट स्वरुपात आहे. त्यात बालक्रिडा, गाऱ्हाणी, काला अभंग, गौळण, जोहर, भारूड, आरत्या असे विविद्य प्रकार येतात. परमेश्वराच्या प्राप्ती करता भक्ती रसातून व करूण रसातून जिव्हाळा, प्रेमाचे भाव भावना व्यक्त करण्यासाठी संतानी गौळणी विरहिणी यांचा आधार घेतला.


मातृभाषेचे महत्त्व ओळखून ज्ञानेश्वरांनी संस्कृत भाषेतील भगवदगीता प्राकृत भाषेत अनुवादित केली. संत ज्ञानेश्वरांनी मला ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव पासष्टी, हरिपाठ या साहित्यात लिहिलेय. सामान्य जनतेला सुलभ व्हावे म्हणून संस्कृतातून "भार्वात दिपिका" म्हणजेच ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला. आज वारकऱ्यांच्या मुखा मुखात ती आढळते.


ज्ञानेश्वराचे पसायदान, संत रामदासांचे मनाचे श्लोक ह्याचे घरा घरातून पठण व्हायचे. आज कुठे आहे ते? तुकोबांच्या अभंगात मी वारकरी व भजन मंडळीत नेहमी देव देवतांची स्तुती करत आहे. तूकोबांचे ३००० अभंग, एकनाथ, चोखोबा, जनाबाई, बहिणाबाई ह्यांच्या रचनेत माझे उच्च स्थान आहे. ते तुमच्या मुलांना सांगा.


माझी शैली साहित्यकारांनी खूप उंचावली आहे. कोणत्याही भाषेत एवढे साहित्य समावले नसेल तेवढे माझ्यात आहे. त्या सर्व थोर साहित्यिकांची मी आभारी आहे. नाटककार, कथाकार, कादंबरीकार, काव्य खंड रचनाकार, किती किती अफाट साहित्य समावले आहे. त्या महान साहित्यकारांच्या लेखणीची ओळख तुमच्या मुलांना होऊ द्या. तुम्हाला तरी आठवतात का? वि.स. खांडेकर, ना. सी फडके, अत्रे, केशवसूत, बालकवी, मोरोपंत कवि ग्रेस, विंदा करंदीकर, कुसुमाग्रज, जयवंत दळवी, पु.ल.देशपांडे असे अनंत नामवंत साहित्यिकांनी माझी शान उंचावलीय. त्याची थोडी ओळख आजच्या पिढीला करून द्या.


पूर्वी सर्व मुले माझ्या भाषेतुन शिकत होती व त्यानेच ती मोठी नामवंत झाली. ब्रिटिश काळात इंग्रजी भाषा आली. त्या ब्रिटिशांनी स्वतःच्या फायद्याकरता तिला भारतात स्थान दिले. पण भारतीय हळुहळू एवढे भाळले की त्यांना तिची गोडी लागली. पूर्वी मोजक्याच इंग्रजी शाळा होत्या पण सध्या माझ्या शाळांची स्थिती एवढी खालावलीय की सरसकट सगळेच इंग्रजीच्या आहारी गेलेत. माझा रोष इंग्रजी भाषेवर नाही. भाषा वेगवेगळ्या जाणून शिकून घ्याव्याच पण माझ्याकडे एवढे दुर्लक्ष नको ना!


अरे मुलांना जरी इंग्रजी माध्यमात घातलं तरी मातृभाषा का दुरावता. घरी तरी ती बोली भाषा जागृत ठेवा ना! आज भाषेची सर्वांनी मिसळ केली आहे. मराठी बोलतांना बहुतांश शब्द तुम्ही हिन्दी इंग्रजी वापरतात. कुणी भेटलं तर नमस्ते बोलायचे सोडून तुम्ही हाय आणि बाय बोलता. प्रत्येक ठिकाणी तुम्ही इंग्रजी भाषा घुसवता. तुम्हाला इंग्रजी येत नाही तरी तुमच्या मुलांना इंग्रजीचाच हट्ट का? त्या पोरांच्या डोक्यात ती भाषा शिरत नाही. आणि त्या करता तुम्ही पोट मारून पैसै साठवता व मुलांना भारंभार फिच्या शिकवणीला टाकता! कुणी सांगीतला एवढा उपद्व्याप? का एवढा अट्टहास? का माझा असा दुसवास? प्रत्येक पावलो पावली माझा अपमान करतात. अरे तुम्ही माझीच लेकरं माझा मान ठेवत नसाल तर बाकीचे परके माझी इज्जत कशी काय ठेवतील !


पिकते तिथे विकत नाही' असे म्हणतात. तसेच महाराष्ट्रात राहून माझे महत्त्व तितके जाणवत नाही! आई समोर  असताना आईचे महत्त्व जाणवते का? आपण जेव्हा परप्रांतात काही काळासाठी जातो व सतत जेव्हा ती परप्रांतीय अनोळखी भाषा कानावर पडू लागते. तेव्हा आपण आपली मातृभाषा ऐकण्यासाठी कासावीस होतो. आणि अशावेळी चुकून अपली भाषा बोलणारी, अनोळखी मंडळी दिसली तर ती माणसे अनोळखी असूनही खूप आपलीशी वाटतात ना? हे भाषेचे अदृश्य धागे! ही माझी माया. माझ्यामुळे परदेशात तुम्ही परके, एकमेकांना ओळखत नसलेले माझ्या प्रेमळ धाग्याने एकत्र येतात व मी ही मायेने सर्वांना एका भाषेच्या बंधनात जखडून ठेवते.


आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त होऊन सत्तरी ओलांडली तरी ही इंग्रजी भाषेने आपल्या देशात भक्कम पाय रोवले आहेत. आज अनेक पालक मुलांना इंग्रजी शाळेत घालतात. उच्च शिक्षण मराठी भाषेतून उपलब्ध नाही हे खरं आहे. तरी पूर्वी प्राथमिक शाळा मातृभाषेतून शिक्षणास प्राध्यान द्यायचे. त्यामुळे शिक्षणाचा पाया मजबूत व्हायचा. पहिली ते चौथी पर्यंत मातृभाषेत शिक्षण घेतल्याने मुलांना आपले विचार व्यक्त करणे सोपे जात होते. मातृभाषा ही ज्ञानभाषा झाली तर शिक्षण सुलभ व्हायचे. विषयांचे आकलन मुलांना सोपे व्हायचे. आणि त्यामुळे ती आदान प्रादान मोकळ्या मनाने करायची. आपल्या मातृभाषेतुन त्यांना व्यक्त होता येत होतं. त्याकाळी प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून घेऊन मुले उच्च स्थराला पोचली. आपले भारतीय मोठमोठे शास्त्रज्ञ, डॉक्टर, मातृभाषेतूनच सुरवातीचं शिक्षण घेऊन नामवंत झाले. याचा अर्थ असा नाही की परकीय भाषा शिकू नये, परकीय भाषा जरुर शिकाव्यात, त्याही भाषांचा आदर करावा, पण आपण आपल्या भाषेला कमी मानू नये. आजचे युग हे माहिती-तंत्रज्ञानाचे युग मानले जाते. संपर्क-क्रांतीचे युग मानले जाते. अशा वेळी आपण आपल्या दैनंदिन जीवनात अशाच छोट्या छोट्या कृतींनी आपली भाषा प्रभावी कशी करावी ह्यावर विचार करावा. आपल्या भाषेचा मनात अभिमान बाळगून कृती करून तिची शान कशी शाबूत ठेऊ ह्यावर विचार करायला हवा. तरच माझी उन्नती होईल.


भाषेसाठी सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या सक्रिय कार्यकर्त्यांना आपल्या परीने त्यांना सहकार्य देऊन मातृभाषा सर्वोसर्व कशी प्रज्वलीत होईल हे पहायला हवे. आपली मातृभाषा सर्वोतोमुखी असावी ह्या करता पुढाकार घेऊन 'भाषा संवर्धन आणि प्रसार कार्यक्रम' आयोजित करावे. माझ्या करता तुम्ही तुमचे योगदान देतात ह्याचा मला खूप अभिमान वाटेल. प्रत्येक महाराष्ट्रीय मुलाने माझ्या संवर्धनासाठी थोडा हातभार लावावा.


तुम्ही बऱ्याच ठिकाणी मला डावलून इंग्रजीच्या आहारी जाता. येथे थोडा बदल करा आणि बघा. तुम्ही दैनंदिन जीवनात रोज किमान १०, १५ वेळां तरी फोन घेतात अन् दुसऱ्यांस लावतात. समोरचा माणूस एक वेळ इंग्रजी बोलत असेल तर हरकत नाही पण जेव्हा समोरचा शुध्द मराठी बोलतो तेव्हा तुम्ही ही मराठीच बोला. "नमस्ते", "माफ करा " "हरकत नाही" परत सांगाल कां जरा" किती आर्तता आहे बघा ह्या शब्दांत. बाय पेक्षा "येतो हं " किती गोडवा आहे ह्या शब्दांत बघा. तसेच मोबाईल संदेश ही आपण माझ्याच भाषेतून करा. ते सर्वांना नीट ही कळेल.


तुम्ही आज सर्वच ठिकाणी इंग्रजी वापरत आहात . सर्वांनाच इंग्रजी ठीक येतं असंही नाही. तरी पण जन सामान्यात असा ग्रह झालाय की इंग्रजी दोन शब्द फेकले की त्यात तिचं समाजात स्थान उच्च गणलं जातं. पण हे साफ चूक आहे. माणसाची विद्ववत्ता त्याच्या दोन शब्द बोलण्यावरून ओळखता येते. उच्च अथवा श्रीमंतीचा डौल हा मेकप अथवा कपड्यावरून नाही तर भाषा प्रभूत्वावर असतं. तुम्हाला माहितच आहे आपले स्वामी विवेकानंद. भाषा कुठलीही असली तर ती शुध्दच बोलायला हवी.


तुमची मराठी श्रीमंत भाषा आहे. प्रत्येक प्रांत आपापल्या भाषेला जपतात, मान सन्मान देतात. तसा मला तो मिळावा असे मला वाटले तर त्यात गैर काय बरं! तुम्ही तुमच्या मुलांना कुठल्याही माध्यमात घाला पण एकच कळकळीची विनवणी. घरी तुम्ही मुलांशी मातृभाषेतूनच बोला. मुलांवर संस्कार बिंबवायचे तर रामायण, महाभारत, मनाचे श्लोक, गीतेचे श्लोक हे मुलांना शिकवा. लक्षात ठेवा, शिवबा छत्रपती झाला तो फक्त त्यांच्या मातोश्रींमुळे. बालपणी जे बाळकडू माँसाहेबांनी पाजले, त्यामुळे. मुलांना सगळ्या भाषा शिकवा आणि तुम्ही ही शिका. पण तुमच्या ह्या मवाळ मातृभाषा मराठीला कधीच विसरू नका. ती जतन करा. मुलांना आपला इतिहास पहिल्यांदा कळू द्या. मुलांना ग्रंथालयात न्या. त्यांना वाचनाची गोडी लागू द्या. त्याकरता पहिल्यांदा घरातल्या मोठ्यानों तुम्ही सवयी लावा. मग मुलांना आपसूकच वाचनाची गोडी लागेल.


घरात एक, बाहेर दुसरे असे करू नका. मराठी माणसांकडे मराठीच बोला. भाषेचा गोडवा टिकू द्या. मुलांच्या वाढदिवसाला केक कापाच पण माझी संस्कृती औक्षणाची विसरू नका. सूटबूट घालाच पण सण वारी नऊवारी, धोतर, टोपी घालण्याची परंपरा ही पाळत चला. आपली संस्कृती जपायची तर चांगल्या असलेल्या परंपरा ही जपा.


सरकारने ही शासकीय कामकाज माझ्या भाषेतूनच करावे. म्हणजे परप्रांतीय येथे राहत असेल तर त्यास मराठी भाषा बोलायला व लिहायला यायलाच पाहिजे. जेव्हा सगळे एकजुटीने माझा विचार करतील तेव्हाच मला शांतता लाभेल. माझ्या शाळा खालावल्या त्या उभारतील. सगळी मराठमोळी माणसें एकत्र येतील व माझ्या मुलांचा उत्कर्ष पाहून तुमची ही माय मराठी धन्य धन्य होईल. 


आज माझ्या जन्मदिनापासून नवा संकल्प करा आणि जनता आणि सरकार मिळून एकत्र कामाला लागा आणि माझे सौभाग्य टिकवा.


Rate this content
Log in

More marathi story from Shobha Wagle

Similar marathi story from Inspirational