ख्वाजाभाई(छोटेभाई) बागवान

Horror Crime

4.3  

ख्वाजाभाई(छोटेभाई) बागवान

Horror Crime

मी येतलंय..!

मी येतलंय..!

5 mins
304


            दिवाणखाण्यात बसलेल्या निलेशने आपली नजर सभोवताली फिरवली.. श्रीमंती नजरेत भरत होती..

" आईशीला किती पळवशील? तुझ्या बापूस आला तर मारुन काढील.. " माडीवरून मघाच्या म्हातारीचा आवाज आला...

" मी इलो दिग्या ... " कुणीतरी मोठ्याने ओरडले..

धाडकन दरवाजा बंद झाल्याचा आवाज झाला.. अन तो आवाज बंद झाला..

" रवळनाथा.. संभाळ रे बाबा.. " परत जीजीचा आवाज आला.

निलेशने प्रश्नार्थक नजरेने बाबुलकडे पाहिलं.. त्याने नजर दुसरीकडे वळवली होती..

बाजूच्या खोलीचा दरवाजा कर्रर्रर्रर्रर्र आवाज करत उघडला गेला.. एक बाई घाबरून बाहेर पडली.. तिच्या हातात कसलेसे कागद होते. बाबूलला पाहून ती क्षणभर थबकली, तिचा चेहरा घाबराघुबरा झालेला होता.. तिने बाबुलकडे पहात हात जोडले.. त्याने डोळे बंद करत होकारार्थी मान हलवली.. तिने पदर डोळ्याला लावत तिथून काढता पाय घेतला...

बुटांचा कर्रर्रर्रर्र कर्रर्रर्र आवाज आल्यामुळे दोघांनी तिकडे पाहिले... उंचापुरा खोत बाहेर पडला.. पन्नाशीच्या उंबरठ्यावर असणारा खोत धट्टाकट्टा.. होता.. पिळदार शरीर.. अक्कडबाज मिशा.. त्याने निलेशकडे पाहिलं.. खांद्यावरील बनियन हातात घेऊन घमेंजलेलं शरीर पुसलं..

"बाबूल... मायझया... न सांगता इलंस?" खोत ओरडला.

" मालकानू.. चुकलं.. " हात जोडत बाबूल म्हणाला.

खोतान ती बनियन अंगात घातली.. अन एक कटाक्ष बसलेल्या निलेशकडे टाकला..तो खोताकडेच पहात होता.

" पाहुणे कोण असा? " नजर रोखून निलेशकडे पहात खोत म्हणाला.

" नवीन इंजिनियर सायेब असा.. प्लांटावर ऱ्हवतो म्हणतं होते.. मिया बोललो इलेलो हपिसर मालकाकडेच ऱ्हवता.. " बाबूल म्हणाला.

" सायबानू.. खय असा.. हित भुताखेताच भय असतं.. तुमी कोकणातले दिसतं नाय? " खोत म्हणाले.

" पुण्याकडंचा आहे.. " निलेश म्हणाला.

" बरोबर असा.. तुम्हां शहरी लोकाक इश्वास नसतो.. करणी.. चेटुक. पण असतात बरे.." खोत म्हणाला.

"मी राहिलो असतो.. वॉचमन पण आहेत की.." निलेश म्हणाला.

" विषाची परीक्षा घ्यायची नसते सायबानू.. तुम्ही या गावचे पाव्हणे आहात.. काही झालं तर? कुटुंब असेल?.. " खोत म्हणाला.

" नाही.. एकटाच आलोय. " निलेश म्हणाला.

" सायबानू.. तुमची बाईल.. पसारा..? नंतर येणार काय.. वाड्यात भरपूर खोल्या आहेत.. बिनघोर रवा. " खोत म्हणाला.

" माझं लग्न नाही झालं अजून. " निलेश म्हणाला.

" असें.. एकला जीव.. मग रवा की .. " खोत म्हणाला.

निलेशने तिथे रहाण्याचा निर्णय घेतला.. बाबुलने सामान मांडीवरील खोलीत नेऊन ठेवले.


                 बाहेरुन जुनाट दिसणारा वाडा आतून आधुनिक होता.. रुमला अटॅच संडास बाथरुम.. संगमरावरी फ्लोअर.. सारं कसं खोताची श्रीमंतीचं दर्शन करणारं. निलेश दार उघडून टेरेसवर आला.. अंधारात बाहेरच काहीच दिसतं नव्हतं.. पण गार वारा आत शिरला सोबत समुद्राच्या लाटांचा आवाज.. निलेश दोन मिनिटं तिथे उभा राहिला..

" दिग्या.. थयच रव.. मी आयलंय.. थांब.. दिग्या..दिग्या.. "

आवाजाने निलेश भानावर आला... तो आत आला..

" सायबानू.. दरवाजा बंदच ठेवा.. वाघूळ फिरतात रात्री.. " आत आलेला नोकर म्हणाला.

" नावं काय रे तुझं? "निलेशने विचारलं.

" रामा.. हा चहा पाठवलाय मालकीणबाई नीं.. "तो म्हणाला.

निलेशने त्याच्याकडे पाहिले.. काळासावळा, थोडासा बुटका.. जाड.. पोट बाहेर सुटलेला.. झुपकेदार मिशा.. गालावर असणारा मस... धोतर अन गंजी.. तो बाहेर जायला वळला..

" रामा.. कोण ओरडत होतं? " निलेशने विचारलं.

" छोटे मालक.. थोडे डिस्टर्ब असा.. त्यांच्या मित्र.. दिगंबर.. दिग्या.. विहिरीतल्या आसरा.. ओढून नेला.. तेव्हा पासून खुळं लागल... पण मी सांगितलं हे सांगू नका हा..!" तो म्हणाला अन रिकामी कपबशी घेऊन निघाला.

" तू केव्हापासून आहेस कामाला? " निलेशने विचारले.

" मी मूळचा पुण्याकडचा.. मालकीणबाई सोबत आलो.. " रामा म्हणाला.

" अरे वा.. मी पण तिकडचाच..! कोथरूड " निलेश म्हणाला.

" मुलुखतलं कुणीतरी भेटलं.. बरं वाटलं साहेब. " रामा म्हणाला..

" बरं हा मालकाचा मुलगा?.. " निलेशने विचारले.

" तुम्ही विचारु नका.. मला सांगायला जमणार नाही.. जरा जपूनच रहा.. " रामा म्हणाला अन निघून गेला..

निलेश आपलं सामान लावत होता.. दुपारपासूनचा घटनाक्रम आठव त्याने आपली डायरी काढली अन लिहायला सुरुबात केली.. बाबूल, जिजी, खोत, ती स्त्री आणि तो नोकर रामा.. आपल्या मनात त्यांच्या विषयी आलेले विचार निलेशने लिहून ठेवले.. तो मोबाईलवर आपल्या आईसोबत बोलला.. आईपासून इतका लांब पहिल्यांदाच आला होता.. विचारात त्याची तंद्री लागली होती..

" सायबानू जेवायला येता न!" जिजी म्हणाली.

" तुम्ही कशाला त्रास घेतलात आजी.. तिथूनच आवाज दिला असतात.. मी आलो असतो.. " निलेश.

"शिरापडली तोंडावर.. तो रामा..आवाज दिल्यावर आला तर शप्पथ.. मी आले.. येवा.. गरम गरम जेवून घे.." जिजी म्हणाली.

निलेश जेवायला गेला.. एक मध्यमवर्गीय स्त्री जेवायला वाढत होती.. गोरीपान.. जराशी निर्विकारपणे वाढत होती..

" सायबानू.. आरामात होऊ दे.. " आजी म्हणाली.

" आजी.. मला साहेब म्हणू नका.. तुमच्या नातवाच्या वयाचा आहे.. निलेश म्हणालात तरी चालेल.. " पाटावर बसत निलेश म्हणाला.

" होय पोरा.. माझा नातूच आहेस.. अगदी माझा विजू.. तसा तू." जिजी म्हणाली.

" आजी.. कुठे असतो विजय? " निलेशने विचारले.

" इथेच.. जरा आजारी असतो.. " जिजी म्हणाली.

बोलता बोलता निलेशचं जेवण झालं.. तो आपल्या रुमकडे निघाला.. पाठोपाठ जिजी ताट घेऊन येत होती.. निलेश आपल्या रुममध्ये आला..

" खिडकी बंद ठेव हा! रातकिडे.. येतात. " जिजी म्हणाली.

निलेश बाहेर बघत " बरं!" असं म्हणाला.. जिजी ताट घेऊन पलीकडच्या खोलीत गेली.. कानोसा घेण्यासाठी तो खोलीजवळ गेला.. दरवाजा बंद होता.. त्याने आतील बोलणं ऐकायचा प्रयत्न केला.

" विजू.. चार घास खाऊन घे हा.. " जिजी म्हणाली.

" जिजीनू.. माका बाहेर जाऊचा.. फिरायला.. थंय माजा दिग्या वाट बगतलो.. " तो म्हणाला.

" बेगीन खाऊन घे.. मग जाऊ हा.. " जिजी म्हणाली.

थोडावेळ शांतता पसरली अन कसलासा आवाज झाला..

" मेल्यानू.. जिजीची मस्करी करतोस काय.. " जिजी वैतागून म्हणाली.. पाठोपाठ त्याच्या हसण्याचा आवाज आला.. निलेश आपल्या खोलीत वापस आला..

दरवाजा बंद करुन तो अंथरुणावर पडला.. कुत्र्याच्या भुंकण्याच्या आवाजाने त्याचं लक्ष वेधले गेले.. दरवाजाचा आवाज आला..

" मायझया.. टाक त्या खोलीत.. बघतो काय करते ती.. जास्तच फडफडतीय.. आज पंखच कापतो.. "

तो नक्कीच खोत असणारं..! निलेशने अंदाज बांधला..

थोडा वेळ गेला.. परत दरवाजाचा कुर्रर्रर्रर्रर्र आवाज झाला.. अन सर्वत्र शांतता पसरली.. कुत्रा मात्र मधून मधून भुंकत राहिला..

 

        सकाळी तयार होऊन निलेश रुमाच्या बाहेर पडला.. समोर एक पंचवीशीतला तरुण खुर्चीत बसला होता.. दोघांची नजरानजर झाली.. निलेशने त्याच्याकडे पाहून मंद हास्य केले.. तो पहातच राहिला.. निलेश त्याच्याजवळ गेला.. त्याने अंग चोरुन घेतले.. निलेशने हस्तान्दोलन करण्यासाठी हात पुढे केला.. त्याच्या डोळ्यात क्रोध जाणवला म्हणून हात परत घेत निलेश परत फिरला..

तो पायऱ्या उतरुन दिवानाखान्यात आला.. खोत झोपळ्यावर पहुडले होते..

" नमस्कार मालक.. " निलेश म्हणाला.

खोताने कसनुसा चेहेरा केला.. बळेच चेहऱ्यावर हास्य आणले..

" बेगीन निघालात.. " खोत म्हणाले..

" रामराम मालकानू.. " आत येत बाबूल म्हणाला.

" मायझया.. तू हय.. इतक्या सकाळी? " खोत म्हणाला.

" सायबच काम.. " बाबूल म्हणाला.

" मायझया.. आमचे गडी काय मेले काय..! तूला येऊन सायबच काम करावं लागलं.. " खोत गरजला.

" बाबूल.. माझं आवरलंय.. चल आपण निघू. " निलेश म्हणाला.. दोघे बाहेर दिवाणखान्यातून बाहेर पडले.. बांधलेला कुत्रा परत गुरगुरत निलेशकडे झेपवला.. दोघे वाड्यातून बाहेर पडले..

(क्रमशः)


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror