झुलवा
झुलवा
राधा अक्का ही गाव जोगतीन होती. तिला दोन मुल आणि एक मुलगी होती. राधा अक्का ही जोगतीन असल्यामुळे तिच्या मुलांना कधीच बाप दिसला नाही. राधा अक्काचा झुलवा लागला होता गावच्या पाटलासोबत ती त्याच्याबरोबरच रहायची आणि त्याच्याकडूनच ही तीन मुले झाली होती. राधा अक्का ही जोगतीन असल्यामुळे पाटलाने कधी मुलांना स्वतःचे नाव दिले नाही मग संपत्तीतर दूरचीच गोष्ट होती.राधा अक्काने आपल्या मुलांना जोगवा मागवून वाढवले दोन मुले होती त्यांना पाटलाने त्याच्या शेतात चाकरीला घेऊन गेला. आता राधा अक्का,लहान सुलभा व राधाअक्काचा गुरु परशुराम बा हे तिघे रहात होते. सुलभा रोज शाळेत जायची. शाळेत गुरुजींनी सांगितलेला अभ्यास ती नित्य करायची. न चुकता शाळेत जाणे अभ्यास करणे हे तिचे नित्य काम होते. राधाअक्का व परशुराम दोघ गावभर गाणी गावून, यल्लमा देवीच्या नावाने जोगवा गोळा करून आणायचे. सुलभा नऊ वर्षाची होती म्हणून तिला जोगवा मागणे व गाणी म्हणायला राधा अक्का घेवून जात नसायची पण परशुराम तिला रोज भुणभुण करत होता. जोगत्याची पोरं हाय तिलापण जोगवा मागायला शिकव राधे नायतर अवघड होऊन बसायचं समध असे परशुराम बोलताच. "अरे परशुबा लहान हाय ती शिकवते तिला मोठी झाल्यावर तोवर जगू दे कि जग तिला"असे राधा बोलून परशुरामला टाळायची.
सुलभा नुकतीच शाळेतून घरी आली होती आणि पाटील त्यांच्या घरात आलेला होता. सुलभाला बघून तो राधाला म्हणाला,"राधाबाई पोरं मोठी झालीय करा तिचे कारण उशीर करू नका नाहीतर पळून जायची रेखासारखी "
"नाय मालक अजून पोरं लहान हाय तिला अजून शिकायचं हाय"राधा अशी बोलताच पाटील आपला राक्षसी हसायला लागला आणि म्हणाला,"राधे कोणत्या जगात जगतीय तू जोगतीनीची पोरं आहे ती माझी जरी असली तरी काय झालं शेवटी पाटलाची ठेवलेली बाईच होणार ह्या गावात असो कि दुसऱ्या कुण्या गावात मंग शिकून काय उपेग? करा करा तुला जे काय करायच ते करा ज्या दिवशी मुलीला पदर येईल त्यादिवसापासून तेरा दिवसाच्या आत कारन करून टाकायचं नाय केलं तर याद राखा आमच्या इज्जतीचा सवाल हाय"
राधा ह्या गोष्टीला नकार देत होती तेवढ्यात परशुराम बोलतो, "तू गप गं राधे माझ्या घरात राहतेय तू जोगत्याच्या मालक जस सांगतील तसंच होणार, हो मालक करू आम्ही थोडं पैक दिल तर बरं होईल पोटापाण्याचं बघता येईल "
पाटील काही रुपये परशुरामच्या हातात देतो आणि तिथून निघून जातो.
ह्याचे सर्वांचे संभाषण सुलभा गप्प एका कोपऱ्याला बसून ऐकत होती. पाटील जाताच ती राधाला येऊन बोलते, "आय मला जोगतीन व्हायचं नाय मी शिकणार मला डॉक्टर व्हायचं आहे डॉक्टर दीदी सारखं"
सुलभाचे हे बोलणे ऐकून, राधाच्या डोळ्यात पाणी येते. ती म्हणाली, "सुलभे तुला डाक्टर व्हायचं न मंग चल जोगवा मागायला उद्या पासून जे पैक मिळतील ते तू ठेवून घे तुला शिकायला कामी येतील."
परशुराम माय लेकीचं हे बोलण ऐकून खूप खुश झाला आणि म्हणाला, " हे कसं बरोबर पत्ताच बोलली राधे तू मुलीला जोगवा मागायला शिकव आता तेव्हाच थांबेल ओघ आणि लोभ "
ह्यावर राधा काहीच बोलत नाही.
दुसऱ्या दिवशी राधा सुलभाला साडी घालून जोगव्यासाठी तयार करते. साडीमध्ये सुलभा नव्या नवरीसारखी दृष्ट लागावी अशी दिसत होती. राधा डोक्यावर यल्लमा देवीचा जग घेते आणि परशुराम सुती चवंडक घेवून निघाले जोगवा मागायला. गावाच्या वेशीवर आल्यावर राधा गाणं म्हणू लागली परशुराम सुती चवंडकवाजवू लागला आणि सुलभाला नाचण्यास सांगितले सुलभाने ताल धरला तिथे काही तरुण उनाड मूल बसली होती. ती सुलभाला नाचताना पाहून मनाला येईल ते बोलून सुलभाची छेड कडू लागले सुलभावर पैसे उधळून लागले. सुलभावर होणारी पैश्याची उधळण बघून परशुराम आणि राधा अक्का गप्प आपले वाजवणे व गाणं म्हनने सुरु ठेवले त्यांना कसेच रोखले नाही पण ह्यात सुलभाचे जीव गुदमरत होते.
घरी येताच सुलभा चिडली म्हणाली, " मी नाही येणार जोगवा मागायला"
"अगं लोक असाच करत्यात तू सुंदर हाय नव्ह म्हणून त्याच्या लक्ष नग देवू पैक बघ पैक किती गोळा झालंय आम्ही दोघ रोज जेवढं आणत होतं त्याच्या दहापट पैक आलेत महिनाभराची कमाई आली आहे."राधा सुलभाला समजावू लागली.
"आय आपण मजुरी करूयात नको गं हे जोगवा वगैरे मागणं "सुलभा म्हणाली.
यावर परशुराम चिडला आणि म्हणाला,"ये रांड, जोगत्याच्या घरात राहून मजुरी करती व्हय गं सटवे बट्टा लाव आमच्या जातीला, झुलवा कसं लागलं गं तुझ"
"परशुबा शांत हो तिला नाही कळत रे अजून लहान हाय ती"राधा म्हणाली.
"लग्न करून दिल तर दोन मुलं होतील घोडीला तू लहान म्हणती व्हय गं" चिडून परशुराम राधाला बोलला.राधा काहीच न बोलता शांत बसली.
त्यांचे नित्यक्रम सुरु झाले रोज सुलभा शाळेतून येताच तिला घेवून जोगवा मागायला जायचे.
अशीच दोन ते तीन महिने गेले सुलभा आता दहावीत आली होती.ती रोज शाळेतून येताच अभ्यासाला बसायची ह्यामुळे जोगव्याला जायचा खोळंबा व्हायचा. परशुराम रागाला येऊन एकदा सुलभाला मारायला लागला राधा आडवायचा प्रयत्न करते तरी तो काही ऐकत नाही. सुलभाला घाबरून पदर येतो.
राधा परशुरामला थांबवते म्हणते, "थांब बा बघ मुलालीची हालत काय झालीय? गप बस मुलीला कुठं घेवून नाही जावू शकत आता"
परशुराम थांबतो म्हणतो, "ये राधे बाया बघ लवकरच आता कारन करावं लागेल मालकाने सांगितल्यासारखं "
" परशुबा मी आजवर सहन केले रे कसे तरी हे जोगतपणा माझ्या मुलीला नको रे नको सांगू मालकाला. तू हवं ते घे पण माझ्या मुलीला नको रे ह्यात ओढू मी तुझ्या पाया पडते. माझ्या मुलीला शिकायचे हाय रे " राधा गयावया करू लागली.
"ये बये असे काय बी बोलू नग, मला माझं गावातल हुक्का पाणी बंद करून घ्यायचा नाय. चल तिकडं आली मोठी शाळा शाळा करणारी"असे म्हणून परशुरामाने तिला ढकलून तिथून निघून गेला.
राधा सुलभाला उचलते तिला अंघोळ घालून कोपऱ्यात बसायला सांगते. राधाच्या मनात धडकी भरलेली होती कि काय होईल? परशुराम जाऊन पाटलाला सांगेल का? ह्या सर्वं प्रश्नाच्या गराड्यात तिला रात्रभर डोळ्याला डोळा लागत नाही.
सकाळ होतच परशुराम बाहेर झोपलेला असतो त्याला बघून मनात खूप प्रश्न निर्माण होतात. राधा परशुरामला उठवते. तो उठताच राधाला म्हणतो,"राधे सुलभा मोठी झालेली गोष्ट मी पाठलाला सांगत नाय तर मला तू जमा करून ठेवलेले सारे पैसे देणार का? मगच मी शांत बसतो "
"घे गं घे सारे पैसे घे पण ही गोष्ट कोणाला सांगू नको तुझ्या पाया पडते"राधा परशुरामला सारे पैसे देताना असे बोलते.
असेच दहा पंधरा दिवस जातात. सुलभाच्या मनात जोगवा न मागण्याची आणि जोगतीन न होण्याचा विद्रोह तसाच जिवंत होता. शाळेतून घरी येताना सुलभा देशमुखच्या मळ्याकडे मजुरीचे विचारण्यासाठी जाते. तिला तिथून येताना पाटील पाहतो आणि त्याच्या मनात वेगवेगळे व वाईट विचार येतात.
सुलभा घरी पोहचायच्या आधी पाटील येऊन तिथे बसलेला असतो. राधा-परशुराम व पाटील यांच्यात वाद चालेल होता. पाटील राधा आणि परशुरामला घाण शिव्या देत ऐकवत होता.
सुलभा घरी येताच परशुराम तिला तिची वेणी पकडून वाकवून विचारु लागतो,"काय गं कुठं गेली होतीस? शाळा सुटून किती येळ झालं? मालक जे सांगतेत ते खरं हाय का? देशमुखाच्या मळ्यात का गेली होती? त्यानं तुला तिथं का बोलावलं होतं?" असे अनेक प्रश्न तिला विचारू लागतो.
"ये बस झालं नाटक, तुमचं काही सांगायचं नाय दोन दिवसात मुलीच कारण करायच. ये परश्या कारन करायला किती लागत्यात ते घेवून जा वाड्याकडे येऊन " असे रागात बोलून पाटील निघून जातो.हाताश झालेली राधाबाई काहीच न बोलता सुलभाला बिलघून रडू लागते.
परशु पाटलाच्या वाड्याला जावून पैसे आणतो आणि सुलभाचे कारन करण्यासाठी सौन्दतीला घेवून जातो. ह्याच्यासोबत रेणुकाही जाते.
सुलभाला रडत होती मला माझे कारण करून घेवून जोगतीन व्हायचे नाही.सौन्दतीला तीला जबरदस्ती घेवून जातात तिथे तिला निम नेसवून वाजत गाजत तिचे कारन केले जाते.
कारन म्हणजे तिला जोगतीनीसारखा साज घालतात तिचे देवासोबत लग्न लावले जाते आणि ती तेव्हापासून गावाला जोगतीन म्हणून सोडली जाते.
कारन करून सगळे गावाकडे परत येतात. गावाला संभोगासाठी नवीन जोगती मिळाली होती. रस्त्याने येत असताना काही मुलं उभारलेली म्हणतात, "आता आपली नवी सोय झाली" असे बोलून हसायला लागतात. राधा व बाकी सगळे काही न बोलता घरी येतात.
दुसऱ्या दिवशी सकाळी पाटील घरी येतो.
"कसा झाला कार्यक्रम? राधाबाई" बाहेर बसलेल्या राधाला बोलतो.
"तुमची कृपा मालक सगळं झाक झालं "अश्रूचा आवंडा गिळत राधा बोलते.
"कुठेय नवीन जोगतीन दाखवा आम्हाला"पाटील बोलताच राधाला धक्काचं लागतो.
"ओ राधाबाई असं नका बघू आम्ही त्यासाठी नाही तर कशी दिसतेय बघण्यासाठी म्हणतोय."पाटील असे बोलताच राधाचा जीव भांड्यात पडतो.
"परश्या झुलव्यासाठी कोणी बघितलं का नाही? कि गरोदर ज्याच्याकडून होईल त्याच्या सोबत लावणार झुलवा"पाटील परश्याला बोलला.
"नाय मालक अजून तुमच्या शब्दाच्या पुढे आहे का आम्ही. तुम्ही सांगा त्याच्या सोबत लावू झुलवा" परश्या पाटलाला म्हणाला.
"ठीक, पनवेलच्या सावकारचा मुलगा निलेश हाय माझ्या मुलाचा मित्र त्याला एक बाई हवी बक्कळ पैसा देईल सोन, चांदी देईल लावून द्या झुलवा त्याच्या सोबत पुढच्या मंगळवारी देवीला विचारून, काय म्हणतो पटतंय ना राधा बाई?"
पाटील म्हणाला.
राधा काहीच न बोलता गपगुमान होकारार्थी मान हालवते.
पाटील हे सांगून तिथून निघून जातो.राधा सुलभाला आपल्या मिठीत घेवून रडायला लागते.ती हतबल होती सुलभाला काही करून ह्यातून वाचवू शकत नव्हती.रात्रभर मुलीला जवळ घेवून राधबाई बिलघत झोपली.
सकाळ होताच ठरल्याप्रमाणे निलेश पाटलासोबत राधाबाईच्या घरी येतो.राधाबाईला
पाटील म्हणतो, "राधाबाई हा बघा जावई तुमचा", असे म्हणून मिश्किल हसतो.
परशुराम म्हणतो,"बसा कि पाहुण बसा ये राधा बघत काय उभी आहे जा पाणी आण जा"
निलेश आणि पाटील ठेवलेल्या बाजेवर बसतात. राधा चहा व पाणी घेवून येतात.
परशुराम म्हणतो, "घ्या पाहुण घ्या चहा".
निलेश चहाचा कप हातात घेतो आणि इकडे तिकडे बघायला लागतो. पाटील म्हणतो,"येतीय का सुलभा बाहेर आज पाहुण्याची नजर शोधत हाय तिला"
परशुराम हसत हसत तिला घेवून येतो. तेवढ्यात पाटील म्हणतो, "निलेश पसंत हाय ना जोगतीन लावायचा का मग झुलवा?"
निलेश होकारार्थी स्मितहास्य करतो.
परशुराम म्हणतो, "किती द्यायचं ठरलं मग पाहुण?"
"परश्या आम्ही काय मेलो काय? आम्ही आहोत ना विचारतो ना सांगतो ना "पाटील म्हणाला.
"चुकी झाली मालक ", परशुराम म्हणाला.
तेवढ्यात पाटलाचा मुलगा निखिलही तिथे आला.
"ओय निखल्या काय करतोय इथं?" पाटील मुलाला बोलला.
"आबा निलेश इथे आलाय का बघायला आलो होतो. आपल्या गावाच्या जोगतीनीचा जावई होणार मग आम्ही कसं नाही येणार?" निखिल पाटीलला बोलतो.
"बरं बरं आल्या सरती बसून घ्या तुम्ही बी",पाटील निखिलला बोलतो.
ह्याचे बोलने चालू असते तेवढ्यात निखिल निलेशला म्हणतो,"निल्या आमच्या गावातला एवढं सुंदर पाखरू आमच्याकडे राहिल्या बगर तुम्ही घेवून जाणार व्हय"असे बोलून मिस्किल हसायला लागतो.
हे हळू चालेल बोलण पाटील ऐकतो व म्हणतो,"काय निखिल राव बापाच्या पुढचे निघालात तुम्ही बापाचेचं बी खायचे म्हणता का? हा इचार आलाच कसं काय?" रागात बोलतो.
निखिल व निलेश तूर्तास घाबरतात. त्यांचे घाबरलेले चेहरे बघून पाटील हसायला लागतो.
"ये पोरावो काय करायच ते करा ही सगळी सोय तुमच्यासाठीच हाय"पाटील निलेश आणि निखिलला बोलतो.
हे ऐकून राधा बोलतो,"मालक काय बोलताय सुलभा तुमची पोरं हाय आणि निखिल सुलभाच नातं काय होईल?"
"ये गप ये तू नको शिकवू आम्हासनी नातं बित, जोगतीन समद्या गावाची बायको असते मला नको सांगू सुलभी नाल्यातली किडा माझं कोणी लागती ते ",पाटील रागात बोलतो.
"ये राधे गप कि बाया त्याची मर्जी ठेवण म्हणजे देवाची सेवा करणं हाय देव माणसं हायत ही आपल्या सुलभेला पदरात घेतायत"परशुराम बोलला.
"राधा बाई ऐक माझं पन्नास हजार रोख, पाच तोळे सोन देवून दहा वर्ष्यासाठी झुलवा लावायचा देवीला कौल लाव परश्या मंगळवारचं, निलेशराव द्या पन्नास हजार राधाबाईला"पाटील बोलतो.
निलेश राधाला पन्नास हजार देतो.
"काका, पन्नास हजार दिले आता पण मंगळवार पर्यत काय थांबवत नाही त्या आधी जर तुमची परवानगी असेल तर घेवून का तुमच्या मळ्यावर? निखिलचं पण मन लागेल तेवढच"
निलेश आपली लाज सोडून बोलायला लागतो.
पाटील हसत हसत होकार देतो.
राधा हा होकार ऐकून पाटलाचे पाया पकडायला लागते रडायला लागते."पाटील दया करा वो तुमच्या मुलगीसारखी हाय वो एकासोबत झुलवा लावायचा म्हणून तिला रांड नका बनवू गावची हो पाटील, पाया पडती हो मी तुमच्या" म्हणून रडायला लागते.
पाटील काही ऐकत नाही. परशुराम सुलभाचा हात निलेशच्या हातात देतो. निलेश सुलभाचा हात पकडून तिला ओढत नेऊन गाडीत बसवतो. निखिल निलेश व त्यांचे मित्र मिळून सुलभाला मळ्यावर घेवून जातात.
तिथे सुलभाला तमासगिरीनसारखे तयार व्हायला लावून त्याचे मनोरंजन करायला सांगतात. हतबल झालेली सुलभा निमूटपणे सगळं काही सहन करत होती. लावणी सादर होता होता दिवस मावळतो आणि त्या अंधारल्या रात्री सुलभाच्या अब्रूचे चिंध्या चिंध्या होतात. एका पाठोपाठ एक करून निलेश, निखिल व त्यांचे मित्र मिळून सुलभाची अब्रू लुटतात.पहाट व्हायला लागते निखिल व निलेश सुलभाला घरी आणून सोडतात. सुलभाची अवस्था बघून राधा ओरडते, "परशु बा....ssss..."
"ये राधे काय झालं बोंबलायला?" परशुराम पळत पळत येतो. तो सुलभाला बघून घाबरतो.
"जोगतीन आणि जोगतीचं जिणं लय वंगाळ हाय गं,पोरं काय केलं गं तुझ? ह्या गिधाडानी" म्हणून रडायला लागतो व सुलभाच्या अंगावर स्वतःच्या साडीचा पदर फाडून झाकतो.
सुलभा अर्धमेली झाली होती. ती काहीच बोलत नव्हती तिच्या डोळ्यातून फक्त अश्रू वाहत होते. राधा पण रडत होती तशीच तिला आत घेवून जाते व अंघोळ घालते.
त्यादिवशी घरी कोणीच जेवण करत नाही. दिवस सरून दिवस उगवतो. तो दिवस मंगळवार होता. परशुरामला सुद्धा सुलभाची आता काळजी वाटतं होती.मंगळवारी सकाळी पाटील येतो.
"ये परश्या, कुठे राधाबाई चला मंडप टाका बोलवा कि दोन गावच्या जोगत्यांना लावा आज झुलवा सुलभाचा निलेश संग" पाटील म्हणतो.
परशुराम पाटलाच्या माणसाला सांगून झुलव्यासाठी लागणारे सर्वं साहित्य मागवतो.आजूबाजूच्या सर्वं जोगती व जोगतीनीला निमंत्रण पाठवलं जात.
घरासमोर तोरण चढतो. देवीच्या जगालाही सजवलं जात. सर्व जोगती जोगतीन जमतात गावातली मंडळीही जमतात.
सुलभाला नवीन साडी, दागिने घालून अगदी एखाद्या नवरीप्रमाणे सजवलं जात. मंडपात चौरंग ठेवली जाते त्याच्यासमोर देवीचा जग ही ठेवला होता. देवाचे घट मांडले जातात. इकडे संभळ व हलगीच ताल धरून जोगती गाणी म्हणून नाचत असतात. झुलाव्याच्या सोहळ्यास येणारे लोक ह्या गोष्टीचा आनंद घेत होते. मंडपाच्या मधोमध मांडलेल्या चौरंगावर सुलभाला बसावले जाते व तिला हळद लावली जाते. सर्वं जोगती व जोगतीन मिळून तिला एक एक करून हळद लावत होते.
हळद लावून झाल्यावर निलेशला ही हळद लावतात दोघांना देवीच्या समोर अंघोळ घातली जाते. जोगती मधला नायक समोर येतो. नायक म्हणजे सर्वं जोगतीचा गुरु म्हणजेच सरदार.
भंडाऱ्यांची पिशवी उघडतो आणि निलेश म्हणतो, "निलेशराव उचला भंडारा आणि म्हणा मी यल्लमा देवीसमोर शपथ घेतो कि आजपासून पुढील दहावर्ष सुलभाचा सांभाळ करेन, तिच्यापासून होणाऱ्या अपत्याचेही सांभाळ करेन, तिला काही लागलं केलं सर्वाची जबाबदारी माझी असेल, दहा वर्षानंतर तिचा व माझा काहीही संबंध रहाणार नाही तिची ईच्छा असेल तर ती सोबत राहू शकते किंवा ती पुन्हा आपल्या माहेरी राधा अक्काकडे येऊन पुन्हा झुलवा घेऊ शकते. झुलव्याची ठरलेली रक्कम राधा अक्काला देतो व तिच्या लेकीचा निट सांभाळ करेन अशी सर्वं पंचासमोर व देवी समोर गाव्ही देतो."
निलेश नायकसोबत भंडारा हातात घेवून बोलतो. ही शपथ पूर्ण झाल्यावर नायक निलेशला हाताला भंडारा सुलभाच्या भांगेत लावायला सांगतो.
एका मुलीची भांग कुंकावाने भरण्यासाठी ऐवजी झुलव्यामुळे भंडाऱ्याने भरली गेली होती. त्या भंडाऱ्यासोबत सुलभाचे डॉक्टर होण्याचे स्वप्न ही गाढले गेले होते. हे सर्वं होताना सुलभाच्या डोळ्यातून अश्रूची धार लागली होती.
"उध गं उध यल्लमा देवीचा उध उध, परशुराम माणिक उध उध" असा जयघोष होतो. सुलभा होणाऱ्या जयघोषामुळे मनात चालू असणारे विचार सोडून भानावर येते.
सुलभाच्या गळ्यात हार घातलं जात. गावातील प्रत्येक जण येऊन तिला हळदी कुंकू लावत होतं.
देवीचं जागरण गोंधळ होतो. रात्रभर पूजा होते. पहाटे पहाटे देवींची पूजा होऊन जागरण गोंधळाची सांगता केली जाते.
सकाळ होताच सुलभाला निलेश सोबत पाठवण्याची तयारी होते. लग्न न होता फक्त देवासमोर घेतल्या गेलेल्या एका शपथीसाठी सुलभा निलेशची धर्म पत्नी न होता पण पत्नीचे पूर्ण धर्म निभावण्याचे तिच्यावर जबाबदारी येते.
राधा सुलभाला एक छोटीशी मूर्ती देते आणि म्हणते, "माफ कर पोरे मला"असे बोलून रडायला लागते.
सुलभा काहीच न बोलता व न रडता तशीच पुढे जाते. परशुराम तिला म्हणतो, "निलेश हाच तुझा नवरा समजून रहायचं त्यांना खुश ठेवायचं काय हवं नको ते बघत रहायचं"
सुलभाला घेवून निलेश पनवेलला येतो. निलेशचे अगोदरच लग्न झालेले होते पण गाव पाटीलकीमध्ये जोगतीन ठेवून रहाणं शान समजली जायची म्हणून सुलभाला झुलवा लावून घेवून येतो.
घरी घेवून न येता तिला गावच्या मळ्यावरच्या घरात नेवून ठेवतो. ही गोष्ट निलेशच्या बायकोला कळते. ती संताप करून घेते पण ती पाटलाची सून असल्यामुळे घरी काहीच तिचे अधिकार नव्हते.
निलेश एकदिवस वाड्यावर असायचा तर एकदिवस मळ्यावर असायचा. ह्यातच निलेशच्या बायकोला दिवस जातात. ती माहेरी जाते.
निलेश आता फक्त आणि फक्त मळ्यावरचं असायचा. कधी कधी आपल्या मित्रांना मळ्यावर पार्टी देवून सुलभाला त्यांचे मनोरंजन करण्यासाठी लावणी करायला लावायचा आणि तिच्यासोबत अत्याचारही व्हायचे.
ह्यात सुलभाही गर्भवती होते. निलेश तरी सुद्धा तिच्यावर अत्याचार करत असल्यामुळे सुलभाचे गर्भपात होते.
सुलभा ह्या सगळ्या यातना सोसून सुद्धा जगत होती. सुलभा खूपच आजारी पडते.
निलेश तिच्या उपचारासाठी एका डॉक्टरला घेवून येतो. डॉक्टर तिचे उपचार करतात. सुलभा बरी होते.
सुलभा पुन्हा गर्भवती होते पण ह्यावेळी ती निलेशला स्पष्ट नकार देते आणि धमकी देते.
"जर तुम्ही माझ्या अंगाला हात लावला त्यामुळे हा बाळ गेला तर साऱ्या गावात जोगत्यांना बोलवून घरात ठाण मांडून बसेन कळालं का? निलेशराव" एकदम चिडून व रागात ती बोलत होती.
तिचे हे रूप पाहुन निलेश मागे हटतो.
तिकडे निलेशच्या बायकोला मुलगी होते. तिचे बारसे वगैरे होईपर्यत इकडे सुलभालाही मुलगी होते.
निकेश बायको रेखा माहेरहून आल्यावर ती सासूला घेवून वेळा अमावसेला तीन वर्ष्याचा आपल्या मुलीसह शेताकडे येते. त्यानिमित्ताने तिला सुलभाला भेटायचे होते.सुलभा येऊन गावात पाच वर्ष झाली होती पण आजवर निलेशची बायको दिशा तिला भेटली नव्हती. ती भेट आज होणार होती.
दिशाच्या मनात प्रचंड सुलभाबद्दल राग होता. दिशाचा राग स्वाभाविक होता कोणत्या बायकोला आवडेल आपला नवरा दुसऱ्या बाईसोबत वाटने. दिशाला सुलभाच चुकीची वाटायची. समाजाची जोगतीनीकडे पाहण्याच्या नजरेतून दिशा सुलभाला पाहत होती नको असलेली तर्क वितर्क लावत होती. तिच्या सासूने सुद्धा सुलभाला पहिलं नव्हतं. तिलाही सुलभाबद्दल राग होता.
दोघी बाळा घेवून वाड्यात काम करणाऱ्या शांताबाई सोबत मळ्यावर येतात. वेळा अमावसेची पूजा मागील पाच वर्ष्यानंतर सुतक सुटल्यावर आता करण्याचा योग आलेला असतो. त्यामुळे त्या दोघी आधी सुलभाकडे न जाता परिवारा सोबत पूजा वगैरे जेवण करून घेतात. तेवढ्यात एक आवाज कानी पडतो ज्ञानेश्वरी कोणी तरी म्हणत होतं तेही स्पष्ट आवजात आणि त्यानंतर बोबड्या आवाजात लहान बाळ म्हणताना सर्वांना आवाज येतो.
"आई, आपल्या मळ्यात ज्ञानेश्वरी कोणी म्हणतय जिथे घुंगराचे आवाज यायला हवे तिथे ज्ञानेश्वरी"दिशा सासूला बोलत होती.
तिचे हे वाक्य कापत शांताऊ म्हणाली,"सुलभा ताई व त्याची लेक म्हणती हाय सुलभा ताई जास्त शिकलेली नाही पण ज्ञानेश्वरी, अभंग, ओवी, श्लोक सर्वं कशी तोंडपाठ हायत त्यास्नी, जेव्हा मन लागत नाही शेतात खुरपायला आलेल्या बाया त्याच्याकडे येऊन हे सर्वं म्हणून घेतात ऐकून आनंद घेतात."
हे ऐकून दिशा पटकन उठते व आवाजाच्या दिशेने चालायला लागते. तिच्या मागे मागे तिची सासू सुद्धा जाते.
ह्यांना येताना पाहुन सुलभा ज्ञानेश्वरी म्हणणे थांबवते व मुलीला आत घेवून दार बंद करून घेते.
"सुलभा दार उघड मला तुझ्याशी बोलायचं आहे"दिशा सुलभाला दरवाजा वाजवत हाक देत राहते.
"ताईसाहेब तुम्ही इथून जा मालक बघितले कि तुम्हाला व मला रागावतील आल्या पावलाने निघून जा ताईसाहेब ",सुलभा आतूनच बोलायला लागते.
तेवढ्यात दिशाची सासूपण तिथे येते." सुलभा दार उघड तुला देवींची शपथ हाय " दिशाची सासू म्हणते.
सुलभा नाईजाने दार उघडते. दिशाला तिच्याकडे पाहुन मनात असलेला संपूर्ण राग निघून जातो. दिशा तिला तिची कहाणी विचारू लागते. सुलभा रडत रडत सगळी कहाणी सांगते.
दिशा व तिच्या सासूला तिच्यावर दया येते तिची कहाणी ऐकून.
दिशा म्हणते, "माझ्या नवऱ्याकडून जे काही गुन्हा झाला असेल मी तुझी माफी मागत, माफ कर ताई तुझे ह्या जगात कोणी नाही असे समजू नको मी आहे तुझी मोठी बहीण कधीही तुला काहीही हवं असेल तर फक्त एक निरोप पाठव मी तुला मदत करेन "असे म्हणता म्हणता सुलभाच्या डोळयांतील अश्रू पुसायला लागते.
संध्याकाळ व्हायला येते दिशा व तिची सासू घराकडे निघतात.
सुलभाला त्यादिवशी आपलं म्हणणार तरी कोणी आहे ह्याच आनंद होतो आणि त्यादिवशी ती निश्चित झोपते.
सुलभाने दिशाच्या मदतीने दहावी व नंतरचे दोन वर्ष असे बारावी पर्यतचे शिक्षण पूर्ण करते.
दिशा सुलभा हवी तशी मदत करत होती. असे करतात करतात. सुलभाचे दहा वर्ष कसे पूर्ण होतात कळत नाही. आता सुलभा सत्तावीस वर्षाची होती व तिची मुलगी दहा वर्षाची होती.
सुलभा माहेरी परत जाण्याचा निर्णय घेते पण निलेशच्या मनात कपट येतो तो सुलभाला माहेरी परत जावू देणार नव्हता. हे तिला कळत आणि सुलभा दिशाच्या मदतीने माहेरी परशुबाला निरोप पाठते.
दहा वर्षाचा झुलवा संपला आहे मला दुसरा झुलवा करायचा आहे मला येऊन घेवून जा.
हा निरोप मिळताच परशुच्या मनात लोभ निर्माण होतो. तो सर्वं जोगतीना गोळा करून सुलभा व तिच्या मुलीला घेवून जाण्यासाठी येतो.
निलेश ऐकत नव्हता परशुराम त्याला जोगत्याच्या जोरावर सुलभाला व तिच्यामुलीला माहेरी घेवून जातो.
तिथे पोहचल्यावर सुलभा राधा अक्काला शोधत असते.
हाक मारते,"अक्का मी तुझी सुब्बू आले कुठेय तू"
परशुराम भिंतीवर तंगलेल्या फोटोकडे हात करतो आणि म्हणतो, " राधाक्का आपला सोडून गेली तीन वर्ष झाले"म्हणून रडायला लागतो.
राधाच्या दोन्ही मुलांचे लग्न झाले होते. पाटलाचा मुलगा व पाटील ह्या दोघांचे सुद्धा गाडीच्या अपघातात मृत्यू होते.
कायद्याने पाटलांचे जमीन जुमला घरदार सुलभाच्या भावाच्या नावावर झाले होते.
सुलभाचे भाऊ पाटलाच्या घरात राहत होते दोघांचे लग्न झालेले होते.
परशुराम सुलभाला भावांची ओळख करून देतो. सगळे एकमेकांना गळ्याला गळे लावून रडायला लागतात.
मोठा भाऊ सुरेश सुलभाला म्हणतो, "सुब्बू, आम्हाला माहिती नव्हते तू कुठे आहे ते आम्ही शोध घेतला तुझा आईच्या सांगण्यावरून पण तू मिळाली नाही. आता आली आहे तर इथे रहा आमच्यासोबत"
सुरेशचे हे बोलणे ऐकून सुरेशची बायको म्हणते, "आता घर दार आला तर आल्या गोळा झाल्या माश्या जेव्हा भावाला दारिद्र होतं तेव्हा झोपली होती खुशीत पाटलाच्या त्याला लुबाडून आता आली आम्हाला लुबाडायला. काही गरज नाही इथे राहण्याची कायमची पाहुण्यासारखी आली आहे पाहुण्यासारखी राहा आणि निमूटपणे निघून जा"
सुरेश हे ऐकून बायकोला गप्प राहण्यासाठी सांगतो.
त्याची बायको तशीच तन तन करत तिथून निघून जाते.
"सुब्बू बस इथे नको लक्ष देवू तिकडे बायकाच असचं असत" सुरेश सुलभाला समजावत बसण्यासाठी सांगू लागला.
"नको दादा मी जाते आईच्या घरी ह्याच गावात थांबते. पुन्हा भेटायला येते. आहे इथेच" सुलभा बोलून तिथून निघून घरी येते.
रात्रीचे जेवण होते सगळे झोपतात. सुलभाला झोप येत नव्हती म्हणून ती बाहेर येऊन बसते. तिच्या मागोमाग परशुरामही तिथे येवून बसतो आणि विचारतो , "तुझा दुसरा झुलवा कधी लावायचा?"
"थांब रे परशुबा सांगते तुला मला काही दिवस एकटीला जगू दे"सुलभा म्हणते बरं.
"पोरीचं नाव काय ठेवलंय?" परशुराम म्हणतो.
सुलभा चिडते जोरात म्हणते, "परसुबा पोरीचं नाव पण घ्यायचं नाही"
"अगं चिडतेस का? मी फक्त नाव विचारलं. आता तुझा पून्हा झुलवा लागला कि पोरं माझ्याकडेच रहाणार माग मला नाव माहिती असलायला नग" परशुराम म्हणतो.
"वेदना आहे तिचं नाव"सुलभा म्हणते.
"काय वेदना?" परशुराम बोलतो.
"हो वेदना माझ्यावर अत्याचार, जखमा होऊनच ती जन्मली आहे म्हणूनचं ती माझी एक वेदना आहे. जोपर्यत तिचे जगणे सामान्य असेल तोवर ती माझी वेदनाच असेल ",सुलभा म्हणते.
"चल उठ लय झालं बस झालं तुझ पुराण आणि उच्च विचार बाजूच्या गावच्या पाटलाकडे जायचं आहे उद्या तुझ्या झुलव्या बद्दल बोलायला सकाळी लवकरच उठून जायचं हाय चल झोप चल"म्हणत परशुराम उठतो आणि झोपायला जातो.
"तू चल मी आलेच"म्हणून सुलभा तिथेच बसते.
सकाळ होते दिवस उजाडतो. परशुराम सांगितल्याप्रमाणे झुलव्याचं बोलायला पाटलाकडे जातो सुलभा ऐवजी तिच्या पोरीबद्दल बोलणी करून येतो आणि तीन लाखाची रक्कम घेवून येतो.
दारू पिऊन घरी आल्यावर सुलभाला म्हणतो,"मी तुझ्याबद्दल गेलो होतो बोलायला पण पाटलाच्या पोराला तुझा झुलवा झाल्यामुळे व तुला पोरं असल्यामुळे नकार दिला. म्हणून मला तुझ्या मुलीच्या झुलव्या बद्दल बोलाव लागलं. पाटलांने आता तीन लाख रोख दिलेत आणि झुलव्याच्या दिवशी अजून तीन लाख देणार सोबत तुला व मला ठेवून घेणार आणि दहा तोळे सोन मुलीला घालणारबोलला आहे वीस वर्षासाठी"
सुलभा खूप चिडते चुली जवळ पडलेला विळा घेवून परशुरामाच्या अंगावर धावून जाते,"चल निघ रे भडव्या माझ्या घरातून नाहीतर तुला कापून टाकीन चरा चरा, माझ्या आय न हे आधीच केलं असत तर मला आज हा दिवस बघाला भेटला नसता. मी आज डॉक्टर असले असते."
सुलभाचे हे चिडलेले रुद्र अवतार बघून परशुराम तिथून पळ काढतो. सुलभा हातातला विळा खाली टाकून मुलीला गळ्याला लावून रडायला लागते.
हा झालेला अपमान परशुराम लक्षात ठेवतो. ह्या अपमानाचा बदला घेण्यासाठी तो पाटलाकडे जातो. घडलेला प्रकार सांगतो. पाटलाला विश्वासात घेवून एक योजना आखतो.
रात्रीच्या वेळी सुलभाच्या घराला आग लावतो पाटलाच्या लोकांना घेवून. सुदैवाने त्यादिवशी सुरेश गोडाचे जेवण करून सुलभाला बोलवून घेतलेला होता निघण्यासाठी रात्र झाल्यामुळे तिथेच थांबण्याचा आग्रह करतो. सुलभा व तिची मुलगी वेदना तिथेच थांबतात. तिथे घराला पूर्ण आग लागले असते. लोभा पायी परशुराम आग लागलेल्या घरात सुलभाचे दागिने घायला जातो. तेवढ्यात डोक्यावर जळत असलेला लाकूड पडतो आणि त्या आगीत स्वतःच जळून मरतो.
सकाळी सुलभाला कळते कि तिचे घर जळून राख झाले आहे. तरीही ती डोळ्यातून एक अश्रू न काढता. म्हणते, " ह्या घरासोबतच माझे अस्तित्व ही जळून राख झाले ते एकदाचे बरे झाले नाहीतर. ते मला वेदना देत राहिले असते. "
सुलभानं आपल्या माहेरच्या घराशेजारीच एक कच्च्या विटांची झोपडी बांधली. तिनं तिच्या दोन्ही दादांना ठामपणे सांगितलं अन् शिलाई मशिन घेऊन आपल्या नऊ दहा वर्षाच्या लेकीसह शेजारी राहू लागली. तिच्या दादांनीही दोघींना आवश्यक त्या वस्तु दिल्या.
सुलभा आपले आयुष्य मोल मजुरी करून. गावातील लोकांचे नवे जुने शिवून घालावत होती.
सुलभा आपल्या मुलीला खूप शिकवते. सुलभाची मुलगी आज डॉक्टर आहे. वेदना सुलभाचे स्वप्न पूर्ण करते. वेदनाचे लग्न सुरेशच्या वैज्ञानिक मुलासोबत होते.
आज सुलभा आपल्या नातवंडाना आपली कहाणी सांगत होती.
तेवढ्यात घरची बेल वाजते. सुलभा उठते दरवाजा उघडते. "आई केव्हापासून बाहेर उभी आहे मी एक तास झालं. काय करत होतात सगळे जे कोणीच उठल नाही दरवाजा उघडलाय "
"माफ करा डॉक्टर चला जेवण करून घ्या" सुलभा म्हणते.
