Manisha Awekar

Tragedy Thriller

4  

Manisha Awekar

Tragedy Thriller

मी अनुभवलेला पानशेत पूर

मी अनुभवलेला पानशेत पूर

3 mins
523


सकाळपासून आषाढसरी जोरात कोसळत होत्या.पानशेत धरणामधे पाण्याचा साठा पूर्णपणे भरलेला होता. माझी एक धाकटी बहिण एक वर्षाची व चुलतबहिण एक महिन्याची.

   आई परोपरीने सांगत होती "आगं आज सकाळपासून खूप पाऊस आहे.आज वैजू पण मला सोडत नाहीये. आजच्या दिवस शाळेत जाऊ नकोस " पण मला इतका शाळेचा सोस की मी आईच्या खानपटीलाच बसले की "मला शाळेत पोचव. मला शाळेत जायचयं" आम्ही पुण्यात शनिवार पेठेत वीर मारुतीजवळ रहायला. आई शेवटी चिडून म्हणाली "चल तू रेनकोट घाल . मी छत्री घेते. तू रेनकोट घाल. आम्ही वीर मारुतीजवळ आलो ,तर एक आजोबा म्हणाले "अहो ताई कुठे घेऊन चाललात मुलीला? अहो धरण फुटण्याच्या बातम्या येतायत ,अन् तुम्ही शाळेत कसल्या जाताय?"

  आम्ही दोघीही तशाच वळून घरी निघालो. तोपर्यंत वाड्यात धरणाची बातमी येऊन थडकली होतीच. मला व आईला बघून आजीच्या जीवात जीव आला. भर पावसात कुलुपे लावून आम्ही सगळेजण बाहेर पडलो.


   सगळे पुणेकर रस्त्यावर येऊन सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी पळत सुटलेले. पावसाने जोर धरलेला. वाहन नाही. आमच्या आजी आजोबांनी शनिवार वाड्याजवळ फुटक्या बुरजासमोर उंच बिल्डिंगमधे काकूचे नातेवाईक घमांडे रहात होते. ते चौथ्या मजल्यावर रहात असल्याने त्यांच्याकडे जाणे हा एकच पर्याय समोर होता. दोन लहान मुली आई व काकूच्या कडेवर. महत्वाचे सामान आजोबांकडे. आजीकडे सर्वांचे गरजेचे कपडे दोन पिशव्या व माझ्या हातात दोन लहान मुलींच्या कपड्याच्या पिशव्या. मी त्यावेळी सहाच वर्षाची होते.पण दोन्ही पिशव्या घेऊन कशीकाय भराभरा मोठ्या माणसाःच्या चालीने चालले कुणास ठाऊक!!समोरची धावपळ ,आरडाओरडा ह्याचाही परिणाम असावा.त्यांच्याकडे आधीच तीस चाळीस लोक आलेले. तरीही त्यांनी माणुसकीच्या नात्याने आम्हाला प्रेमाने आत यायला सांगितले. खालच्या बाळंतिणीही वर आल्या. मला अजून आठवते त्यांच्या गँलरीत उभे राहूनआम्ही लहान मुले रस्त्यावरच्या पुराच्या पाण्यातून वाहत जाणारे बंब ,भांडी इतर वस्तू बघत होतो. मधेच पाऊस वाढला आणि पुराचा जोराचा लोंढा येऊन शनिवार वाड्याचा बुरुज डोळ्यादेखत कोसळला. मग मात्र भिती वाटू लागली.

   पुराचे पाणी आणि पाऊस दोन्ही वाढू लागले .काही पोहणारी माणसे म्हणाली "आम्ही पाठुंगळी घेऊन सदाशिव पेठेत सोडतो , पण एकतर आमच्या जवळ लहान मुली आणि आजी म्हणाली" नको मधेच काही झाले म्हणजे? आपण सगळे एकाच ठिकाणी ंथांबू.जे काही व्हायचे ते सर्वांचे होईल" नंतर बाळंतिणींचे दवाखान्याचे व प्रत्येकाच्या जवळ असेल ते सर्वांनी वटून खाल्ले . मधेथोडावेळ पाऊस कमी झाला असे वाटले तेवढ्यात जोर धरला. समोरचे धूसर दिसायला लागले. पाण्याचेलोंढेच्या लोंढे वर उसळायला लागले.आपण त्सुनामीत लाटा बघतो तसे. 

  पाणी उंच बिल्डिंगच्या चवथ्या मजल्याला लागले. आम्ही सगळी मिळून शंभर माणसे तिथे होतो. घमांडेआजींनी जलदेवतेची ओटी भरली व भावपूर्ण नमस्कार करुन सांगितले "जलदेवते , माझ्या घरात आज शंभर माणसे आहेत. त्यांचे रक्षण कर. नुकतीच जन्मलेली तान्ही बाळे बाळंतिणी आहेत.आमचे सर्वांचे रक्षण कर. मला यश दे."

मग काही ज्येष्ठ आजी काकू त्यांना म्हणाल्या "ह्यातील एका बाळाचे जरी नशीब जोरावर असेल ,तरीही सगळे वाचतील." सगळेच घाबरलेले पण वेळप्रसंगी एकमेकांना धीर देत होते. त्यावेळी चारच पाय-या पाणी चढायला राहिलेल्या. पण काय आश्चर्य नंतर पाणी आजिबात चढले नाही. 

  त्यांनी उदार अंतःकरणाने मोठे पातेलेभर भात आणि मोठी कढई पिठले करुन सर्वांना भरपूर जेवायला घातले .मग रात्री कोणी जुने अनुभव सांगत होत्या. कुणी जप करीत होत्या.मला झोप आशी लागली नाहीच. मधेच कोणाच्यातरी आवाजाने जाग येई .शेवटी आजीने तिच्या नऊवारीत मला घट्ट लपेटून घेतले ,तेव्हा कुठे भिती ,धडाधड कमी झाली .आमच्या सर्वांचा काळ आला होता ,पण वेळआली नव्हती.

 पुढे कितीक मोठे धुवाधार पाऊस बघितले , पण 12 जुलैचे पावसाचे तांडव आणि जोडीला पुराचे थैमान माझ्या कायम आठवणीत राहील. अगदी अविस्मरणीय पावसाचे तांडव अन् तो दिवस आणि भयग्रस्त अवस्थेतील ती रात्र !!


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy