महालक्ष्मी
महालक्ष्मी


ह्या महामारीच्या दिवसात ना कुठलi सण-समारंभ कुठले, अचानक लहानपणीची गोष्ट आठवली. कसं सांगू आणि काय सांगू? गोष्ट भाव भावनेची आहे, गोष्ट विश्वासाची आहे, आपल्या श्रद्धेची आहे. आमचं सरकारी बंगला, घराच्या पुढे-मागे अंगण, बाजूला गाडीसाठी गॅरेज, थाटामाटात सगळे सण साजरे व्हायचे. माझे वडील क्लास वन ऑफिसर, घरामध्ये काम करायला तीन नोकर होते. माझी आई एका मुलींच्या शाळेमध्ये मुख्याध्यापिका होती.
आमच्याकडे गणपती आणि गौरी सण थाटात साजरे व्हायचे, गावातली सगळे नातेवाईक प्रसादाला घरी यायचे, महालक्ष्मीचा सण तर कळसाध्याय असायचा. दोन अडीच किलो पुरण आणि त्याच्या पोळ्या, सोळा भाज्या, आळूची वडी, खीर, भजी कुरडया, चटण्या, कोशिंबिरी पिवळे धमक वरण, मोगऱ्याच्या कळ्या सारखा भात आणि त्यावर साजूक तुपाची धार, असं दर वर्षी चा बेत असायचा.
माझ्या आईचे मामा गावातच राहायचे, त्यांना तीन मुले होती, मुलगी नाही म्हणून नाराज होती मामी ,नाराज पण आपली हाऊस ती आमच्याकडे येऊन भागवायचे. @@
माझी आत्या आमच्या गावात राहायची, ती विधवा झाल्यावर आमच्याकडे येऊन राहिली होती. दोन भाऊ पण गावातच राहायचं, कुटुंबातले लोक मामा मामी आत्या आणि तिच्या मुली एवढे वीस-पंचवीस जण महालक्ष्मी ला जेवायला घरी यायचे.
मामी नेहमी म्हणायचे,” असा पूर्ण स्वयंपाक करून देवाला नैवेद्य दाखवायचा आहे” आमच्या घरी उभ्या महालक्ष्मी होत्या एक जेष्ठ आणि एक कनिष्ठ. गंमतच वाटायची, ज्येष्ठ गौरी थोडी उंचच, आणि कनिष्ठ थोडी लहान, ज्येष्ठ गौरीला मुलगा तर् कनिष्ठ गौरीला मुलगी. माझ्या वडिलांनी गौरी मांडण्यासाठी एक मोठा चौरंग तयार केला होता, त्याच्यावर लोखंडी सांगाडे ठेवले जायचे. सांगाड्यांना आधी रेशमी साडी नेसवून, त्यावर धड ठेवले जायचे, आणि धडावर गौरीचे सुंदर मोहक मुखवटे. गौरीच्या बाळांना पण तसेच सजवले जायचे.
गौरीच्या चारी बाजूला माझी आई तिच्या भारी रेशमी साड्यांची आरास करायची, दीड फूट उंचीच्या चांदीच्या समया घासूनपुसून तयार ठेवायचे. मोठ्या चौरंगावरती काश्मिरी गालीचा, त्याच्यावर दोन्ही बाजूला धान्याची रास, राशीमध्ये चांदीच्या रुपयांची नाणी, धान्याची रांगोळी, आणि मध्ये दोघी गौरी आणि त्यांची बाळ. आमच्याकडे आई तिचे खरे दागिने गौरीला घालायची, सोळा तोळ्याचे तोडे, बारा पदरी, चपलाहार, बकुळ हार, लक्ष्मीहार, लांब गाठवलेले मंगळसूत्रे, नाकात खऱ्या, नथ, कानात आईच्या हिर्याच्या कुड्या.
त्यामध्ये पूजेच्या वेळेस गौरीला सात पदरी रेशमी वस्त्र घातली जायची, कापसाची वस्त्र, शुभ्र कळ्यांचे नाजूक हार, त्यांच्या केसावर शेवंतीची पिवळीधम्मक वेणी, डोक्यावर पडवळची काप. लोखंडी सांगाडा देवीचे पोट होता, त्यामध्ये साजूक तुपातले बेसनाचे लाडू, ओल्या नारळाच्या करंज्या आणि अनारसे असे ठेवले जायचे. आमच्या घरचा थाट बघायला संध्याकाळी आजूबाजूच्या बायका यायच्या.
एका वर्षीची गोष्ट, मी शाळेत होते, गणपतीचे दिवस होते, घरी यायला संध्याकाळ झाली, आज गौरी येणार म्हणून मी घाईघाईने घरी येत होते. दार उघडले आणि
“आई“,अशी हाक मारली... कोणी उत्तर दिले नाही, गौरी सजून तयार होत्या, पुढच्या अंगणातून मी मागच्या अंगणात गेले, मला वाटले आई तिथे असेल, बाथरूममध्ये बघितलं, घरभर हिंडून बघितलं, घरात कोणीच नाही, गौरी दागिने घालून सजल्या होत्या.
एकदम अंगावर काटा आला, काय झालं असेल, आई कुठे गेली असेल? माझे वडिल कुठे आहेत? फार भीती वाटली, युनिफॉर्म न बदलता मी बाहेरच्या अंगणात येऊन बसले, त्याकाळी फोन पण नव्हते, कुणाला विचारावं? आई कुठे गेली असेल? परत तिचे वडिलांचे भांडण तर नसेल झाले? हजार शंका... एक तास झाला. दिवेलागणीची वेळ झाली, खरं म्हणजे ह्या वेळेस आईची लगबग चालू असते, पुरण शिजवणे, भाज्या निवडून चिरून ठेवणे, फुलांचा हार करणे, फुले देणे, सगळी तयारी ताटात मांडणे आणि गौरीला आल्यासरशी गरम कढी भाताचा नैवेद्य दाखवणे. आणि माझी आई, आई कुठे गेली? खूप रडू यायला लागल, काय झालं असेल. आई घर सोडून जाणे तर शक्यच नाही, चोर आले असतील का? आई बाबा, त्यांना मारले असेल का? पण जर चोर आले तर गौरीवरचे दागिने तसेच आहेत, म्हणजे ही चोरी नाही, मग आई कुठे गेली?
तेवढ्यात दुरून घाईघाईने आई येताना दिसली, तिच्याबरोबर तिची मामी पण होती, दोघी घामाघूम होत वेगात चालत येत होत्या. बापरे! मनात शंका आली कारण आईचे मामा अंथरुणावर होते, फार आजारी होते, डॉक्टरांनी सांगितले होते कि थोड्याच दिवसाचे पाहुणे आहेत. आई आणि मामी घरात आल्या, आल्यासरशी तडक आई एक प्लास्टिकची खुर्ची घेऊन मागच्या अंगणात जाऊन बसली, मला हाक मारून म्हणाली, “जा मामीला सगळी मदत कर, उद्या आणि परवा मामी सगळा स्वयंपाक करणार आहेत.” मी विचारलं,'आई, आई पण तुला काय झालं? तू असं घर उघडं टाकून कुठे गेली होतीस? गौरीला तर दागिनेपण घातले होते, काय झालं? तुझं आणि बाबांचं परत भांडण झालं का? आणि तू का नाही स्वयंपाक करणार? तुला काय झालंय? रागवलीस का?“ माझा जीव रडकुंडीला आला होता.
मंद हसून आई म्हणाली,"वेडाबाई रडू नकोस, सगळी महालक्ष्मीची कृपा, मामीला फार वाटायचं ना, एकदा चारीठाव स्वयंपाक, सगळा नैवेद्य त्यांच्या हातून व्हावा, त्यांची सेवा, त्यांची इच्छा पूर्ण होते आहे. अगं दिवस नसतानादेखील आज मला कावळा शिवला, मी कसा स्वयंपाक करू? म्हणून घाईघाईने मामीला बोलावून आणले. महालक्ष्मीचे स्वागत वैभवाने करायचं असतं, ती माहेरवाशिण असते, काही कमी पडू द्यायचं नसतं, आपल्या लेकराबाळासकट तीन दिवस माहेराला येते, तिचं कोडकौतुक करायचं म्हणजे ती आपल्यालापण काही कमी पडू देत नाही.
अचानक कावळा शिवल्यामुळे मी अगदी गोंधळून गेले ग, काय करावे कळेना, तसेच मामीकडे धावले आणि घर उघडे राहिले. सगळी देवाची कृपा असते बरं." घाबरू नकोस तुझे बाबा आत्याला आणायला गेले आहेत.“
त्या वर्षी मामींनी स्वयंपाक केला आणि दोन महिन्यांनी मामांचा स्वर्गवास झाला.