Suvarna Pandharinath Walke

Action Inspirational

4.1  

Suvarna Pandharinath Walke

Action Inspirational

मेहनतीचे फळ

मेहनतीचे फळ

3 mins
393


एक छोटेसे गाव होते. त्या गावांमध्ये एक शेतकरी राहत होता. त्याच्या घरी अठराविश्व दारिद्र्य होते. तो शेतकरी खूप मेहनती आणि रात्रंदिवस काबाडकष्ट करीत होता. त्याच्याकडे उदरनिर्वाहाचे साधन म्हणून पोटापुरती थोडी का होईना शेती हाेती. तो ती शेती पारंपरिक पद्धतीने करत असे. त्यामुळे उत्पादन खूपच कमी व्हायचे. तो त्याचा दोन वेळच्या जेवणाचा खर्च कसाबसा भागवीत होता. त्या शेतकऱ्याला एक रघु नावाचा अत्यंत हुशार आणि मेहनती मुलगा होता. रघुची हुशारी बघून त्याच्या वडिलांनी स्वतःच्या पोटाला चिमटा देऊन रघुला उच्चशिक्षणासाठी शहरांमध्ये पाठविले होते. घरची स्थिती दयनीय असल्यामुळे रघु स्वतः मेहनत करून तो त्याचा शिक्षणाचा सगळा खर्च भागवीत होता. त्यामुळे त्याच्या आईवडीलांना त्याची चिंता नव्हती. पण रघूला सतत घरच्यांची चिंता सतावत होती. रघु त्यांचा एकुलता एक मुलगा. रघूचे पदवी शिक्षण पूर्ण झाले होते आता त्याला पदवीत्तर शिक्षण घ्यायचे होते. पुढील शिक्षणासाठी घरच्यांनी त्याला विरोध केला. आणि शेती करण्यासाठी गावाकडे बोलावले. पण रघूला आपल्या घरच्या परिस्थितीची जाणीव असल्या कारणाने तो वडिलांसमोर काहीच बोलला नाही. वडिलांनी त्याला शेती करण्यासाठी सांगितले. रघुने आपल्या स्वप्नांचा विचार न करता वडिलांच्या इच्छेला होकार दिला. रघु हा अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारा मुलगा होता. तो कोणत्याच बाबतीत मागे राहत नसे. कोणतेही काम असो तो अगदी अभ्यास पूर्व आणि प्रामाणिकपणे करत असे. मग रघुनी आपल्या वडिलांच्या संमतीने आधुनिक पद्धतीने शेती करण्याचे ठरविले. वडिलांनी रघुला प्रोत्साहन दिले. रघुने मोठ्या हिमतीने शेती करण्याचे आव्हान पेलले. 

     रघुला आधुनिक पद्धतीने शेती करायची होती त्यासाठी त्याने अनेक अनुभवी शेतकऱ्यांच्या व कृषी तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली माहिती मिळवली. शेती करण्यासाठी हा उच्चशिक्षित तरुण मोठ्या उत्साहाने पेटून उठला. कारण त्याला इतरांपेक्षा काहीतरी वेगळे करून दाखवायचे होते. पारंपारिक शेतीची पद्धत वापरुन तिला आधुनिकतेची साथ जोडली. 'जुनं ते सोनं' हे त्याला माहीत होते. शेतीची योग्य ती मशागत करून त्यांनी द्राक्षाची शेती केली. शेतामध्ये दिवसरात्र कष्ट करून त्या पिकाची लेकरांसारखी काळजी घेतली. उन, वारा, पाऊस, गारपीट अशा अनेक नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागला. या समस्यांना तोंड देत रघूच्या मनाची अगदी घालमेल व्हायची. रघुने केलेल्या मेहनतीचे फळ शेतामध्ये दिसू लागले होते. सर्वत्र रघुची वाह वाह चालली होती. द्राक्षाचे पीक जोमाने आले होते. पण त्यावर्षी द्राक्षाचे उत्पादन खूप जास्त असल्या कारणाने मार्केटमध्ये द्राक्षांना कमी भाव मिळू लागला. यामुळे रघु खूपच हाताश झाला होता. एके दिवशी तो असाच चिंताग्रस्त अवस्थेत बसला असताना त्याला डिजिटल मार्केटिंग ची कल्पना सुचली. त्या माध्यमातून त्यांनी द्राक्षाची जाहिरात करायला सुरुवात केली. त्याचा त्याला उत्तम प्रकारे प्रतिसाद मिळाला. २० रुपये किलोने विकले जाणारे द्राक्ष ७० रुपये किलो या दराने विकायला लागले. असे करत रघु चे सगळे द्राक्ष विकल्या गेले. थोड्या शेतीमध्ये मेहनत आणि कौशल्याच्या जोरावर रघुने लाखो रुपयांचे उत्पादन काढले. आपल्या मुलाची हुशारी बुद्धिचातुर्य आणि मेहनत बघून रघूच्या आई-वडिलांच्या डोळ्यातून आनंदाश्रू आले. झालेल्या नफ्यातून रघुने अनेक शेतीविषयक यंत्राची खरेदी केली व आपले काही वर्षासाठी थांबवलेले शिक्षण चालूच ठेवले. आपले शिक्षण सांभाळत द्राक्षांसारखे आपल्या शेतीमध्ये अनेक नवनवीन पिकांचे प्रयोग यशस्वीरीत्या पूर्ण करून दाखविले. आज-काल शेतीकडे बघण्याचा तरुण पिढीचा दृष्टीकोन बदलला आहे. बदलत्या काळानुसार शेतीकडे दुर्लक्ष होत आहे. शेतीकडे दुर्लक्ष करणाऱ्या तरुण पिढीसमोर एक नवीन आदर्श रघुने उभा केला आहे. शेती पिकली तरच आपण खाऊ शकतो. वावर आहे तर पावर आहे हे विसरून कसे चालेल. 


Rate this content
Log in

More marathi story from Suvarna Pandharinath Walke

Similar marathi story from Action