mahesh gelda

Drama

2  

mahesh gelda

Drama

मैफल

मैफल

4 mins
62


रात्र जागुन काढलेली शेवटची मैफल कुठली होती, आठवतय?


मित्र-मैत्रीणींनो,


आज पुन्हा काहितरी लिहायला बसलोय.

तुमच्यासाठीच काहीतरी लिहतोय.

ह्यातला ’तू' तुम्ही तर आहातच...पण मी सुद्धा आहे.

.....आणि हे पत्र वाचणारा प्रत्येकजण ह्यातला ’तू’ असु शकतो.


किती दिवस झाले तू भेटलाच नाहीयेस मला.

मला तू शेवटचा कधी भेटला आहेस,आठवतय तुला ?

तू विचार करशील पण नाही आठवणार.....

तू तुलाच कधी भेटला आहेस शेवटचा, हे आठवतंय ?

तुला आठवु शकेल, पण तू नाही विचार करणार..


हे असं टाळण्याची मला तर सवयच झालीये आता...

मेंदुचं कपाट इतक्या मुखवट्यांनी भरुन गेलंय की ओढुन घेतो एखादा सोइस्कर मुखवटा.

मग..

मग कसलाच त्रास होत नाही....

किंवा त्रास होत नाहीये... हा आणखीन एक मुखवटा....!


पण परवा माझीच एक कविता मला सापडली आणि ........ झालाच त्रास...नक्कीच बेसावध क्षण असणार तो.

नाहीतर मुखवट्यांशिवाय जगण्याची ताकदच नाहीये माझ्यात...

वाटलं.....

का लिहिली मी ही कविता ?


" अडगळीत सापडला फुटका

आरसा जुनासा

आठवेच ना काही केल्या

हा चेहरा कुणाचा

कुणीतरी बिचारा आरशातुन कण्हतो

मी आवाज ओळखत नाही

वाळल्या जखमेतुन... विझल्या रक्ताचे

घाव ओघळत नाही.."


तुला आठवतोय तुझा चेहरा ?

ओळखशील तू तुझाच आवाज ? आहे तुझी जखम अजून ओली ?


Please........ हो म्हणू नकोस.

फसवशील स्वत:लाच. हे सगळं होण्यासाठी तू जिवंत असणं गरजेचं आहे.

आणि.... तू जिवंत नाहीयेस !

जिवंत माणसाला संगीत ऐकू येतं.

त्याला रंग दिसतात.... गंध जाणवतात...

त्याला जवळचे मित्र असतात...

जिवंत माणूस श्वास घेऊ शकतो...

त्याचं धावणंच काय... थांबणंही जिवंत असतं...

जिवंत माणसाला त्याच्या जगण्याच कारण माहीत असतं... किंवा त्याला गरजच नसते त्याची....

जिवंत माणुस खळखळुन हसू शकतो...

त्याचं दु:ख पण जिवंत असतं... कारण तो स्वत:च दु:खातही जिवंत असतो.


मला सांगतोस जरा....

वसंतरावांचं गाणं शेवटचं कधी ऐकलयेस ?

रात्र जागून काढलेली शेवटची मैफल कुठली होती ?

रेडीओवरचं जुनं... ठेवणीतलं गाणं ऐकुन.. शेवटचं कधी गहिवरुन गेला होतास ?

नाही आठवणार......



शेवटचं इन्द्रधनुष्य कधी पाहीलयेस रे ?

संधीप्रकाश बघितलायेस इतक्यात कधी ?

झाडांचे हिरवे-गच्च रंग बघितले आहेस इतक्यात ?

सुर्यास्ताचा तो लालबुंद सुर्य... आठवतोय तुला ?



मोग-याच्या कळ्या शेवटच्या कधी हातात घेतल्या होत्यास ?

शेवटचा श्वास कधी घेतला होतास ?

शेवटचं कधी थांबला होतास ?

थोडं थांब मित्रा...

ऐक माझं.... खुप धावतोयेस तू...

आणि असं उर फुटेपर्यंत धावताना वेगळ्याच जगात आला आहेस...

हे जग तुझं नाही.... हे जग नक्कीच तुझं नाही... !

काहीतरी मिळवण्याच्या स्पर्धेत तुझ्या जगापासुन खुप दुर आलायेस तु...

ज्या जगात आलायेस तिथं फक्त स्पर्धा आहे...

......धावणं आहे

.....हिशोब आहेत

.....आकडे आहेत

जे मिळतय त्यासाठी खुप किंमत देतोयेस ....

इतकं करुन काही मिळाल्याची जाणिवच नाहीये... आनंद कुठुन असणार ?


तुझ्या त्या जगात... काहीही नसताना... इतका आनंदी कसा काय जगायचास रे ?

मी खुप वाचतोय हल्ली...

गेल्या १-१.५ वर्षात वेगवेगळ्या लेखकांची पुस्तकं वाचुन काढलीत मी.

पुस्तकं तुम्हाला वेगळ्याच जगात घेउन जातात...

जरा श्वास घेता येतो... थांबता येतं... बरं वाटतं...!

वाचता वाचता नारायण धारपांच्या गोष्टीतलं भूत होऊन जातो मी... बरं वाटतं...!

द.मां च्या गोष्टीतला बाबु पैलवान होतो.. पण त्या निर्बुद्ध मठ्ठपणातही शांत वाटतं....

बाबाच्या मुक्तांगणातला दारुड्या होतो...

साधनाताईंचं समिधा वाचताना महारोगी पण होतो... तरीही बरंच वाटतं...!

मोकळं वाटतं... हलकं वाटतं...!



कारण हे सगळं जगताना मी Material जगात धावत नसतो...

इथे कसलेही हिशोब नसतात... मुखवटे नसतात...

किती दिवस तू इतरांसाठी त्या जगात धावत रहाणार ?

तुझ्या जगासाठी थोडं थांबायला काय हरकत आहे ?

कामासाठी.. पैशासाठी... तुझं जग, मित्र... हौस.. छंद हे सगळं दूर चाललय...

कधीतरी तुझ्या छंदासाठी,

कामात आणि पैशात पडलो थोडं कमी तर काय जग बुडणार आहे ?

आणि आपण कमी पडूच असंही काही नाही....



महत्वाचं आहे ते...

आपणंच वाढवलेलं Pressure कमी करणं...

तुझ्यासाठी जग.. हवं ते कर...

तू कुणालाही Answerable नाहीयेस.... घे हवे ते निर्णय....


भविष्याच्या काळजीत, आपण वर्तमान किती तुडवणार आहोत ?


थोडं थांब.... ऐक माझं...

परत ये मित्रा...

’काय मिळवयचय’ हे तुला ठरवायचं आहे...

काही मिळवायचय का नाही हे सुद्धा...

कुठं जगायचय.... तु ठरव. कसं जगायचय.... तू ठरव.

आपण कसं मरायचय हे ठरवलं, तरी कसं जगायचय हे आपोआप कळेल.



गेल्या कित्येक दिवसात Software मधल्या खुप तरुण मुलामुलींच्या आत्महत्येच्या बातम्या वाचल्या.

मन विषण्ण झालं.

का निवडलं असेल त्यांनी हे असं मरण ?

का केलं असेल त्यांनी असं ?

असे काय problems असतील की जीवच नकोसा होईल ?

...खरं तर आपल्यालाही कुठं सांगता येतं की आपले so called problems नक्की काय आहेत ?

...आणि आपणही कुठे जिवंत आहोत ?



रस्त्यावरची भिकारी मुलं पाहिली की पुर्वी खुप गलबलुन यायचं...

पण आता नाही होत असं..

काय फरक आहे रे आपल्यात आणि त्यांच्यात ?

सगळंच अनिश्चित आणि अशाश्वत....जगण्याची तिच धडपड... कुतरओढ...

जे मिळतय त्यात समाधान नाही...

मिळालय ते टिकण्याची खात्री नाही...

त्यांना पैसे मिळत नाहीत... आपल्याला पुरत नाहीत...

दोघंही सारखेच दु:खी...

तो गरीब दरिद्री... आपण श्रीमंत दरिद्री !


मला माहिती आहे की...

अगदी मुक्त आणि बेफिकीर नाही जगता येणार आपल्याला..

पण थोडं जिवंत होता आलं तर... ?

वयाच्या ६० व्या वर्षी, आपण काही जगलोच नाही, असं नाही वाटुन घ्यायचं मला....


मला जगायचय.. आत्ताच... अगदी ह्या क्षणापासुन !


ह्या Rat Race मध्ये मी पहिला नाही आलो तरी चालेल....

पण मला धावता धावता रस्त्याचा आनंद घ्यायचाय...

पक्षांशी गप्पा मारायच्यात...

पावसाची गाणी म्हणायचीत...

थोडं थांबुन इन्द्रधनुष्य बघायचय...

मित्रांबरोबर कट्ट्यावर बसायचय...

मला आनंदी जगायचय...

मला समाधानी मरायचय....


मला कसं जगायचय, हे मी ठरवलय...

तू पण ठरव...

पण उशीर होण्याआधी !


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama