दिवाळी
दिवाळी
लहानपणाची दिवाळी आठवते सगळ्यांना? माझ्या या एका प्रश्नार्थक वाक्यानेच तुम्हाला तुमचे दिवाळी साजरी केलेले लहानपण आठवले असेल. हो कि नाही. दिवाळीच्या काळात तुम्ही खूप दिवाळी अंक आणि लेख वाचले असतील पुस्तकात नाहीतर कोणत्यातरी वेबसाईटवर. मी तुम्हाला माझ्या लहानपणाची दिवाळी सांगणार आहे. बघा बर तुमच्या लहानपणाशी मिळती जुळती आहे का ते.
तर सुरुवात करू या चला तर मग आपल्याला १२ वर्ष मागे जावे लागेल. अर्थात जे मी काही सांगणार आहे ते सगळे शालेय कालखंडातले आहे बर का ! शाळेत परीक्षेचे वेळापत्रक लागले की आधी संपते कधी या गोष्टीवर जास्त भर असायचा. कारण दिवाळीच्या सुट्टीची सगळेच आतुरतेने वाट पाहत असायचो . कधी एकदाचे पेपर संपतील असे होयचे. आणि एकदा कि पेपर संपले कि बास नुसता धुडघूस असायचा आमचा चाळीत. हो चाळीतच अर्थात दिवाळीची खरी मज्जा ही चाळीतच येते हे वेगळे सांगायला नको नाही का
सर्वात आधी गेल्या दिवाळीची पिस्तुल आहे का ते शोधायचे काम आम्ही करायचो. ती चांगल्या अवस्तेत असेल तर ठीक नाहीतर बाबांच्या मागे लागून नवीन घ्यायचीच. मला आठवतंय एकदा बाबांनी मला एक लोखंडी पिस्तुल आणली होती ती एकदम खरी पिस्तुलासारखी दिसायला होती आणि ते गोळ्या भरायचे हे तसेच होते फिरायचे ते गरगर.
दिवाळीच्या आधीच त्या पिस्तुलांनी आम्ही चोर - पोलीस खेळायचो. टिकल्या बंदुकीत भरून कंटाळा आला की एक कागदावर सगळ्या जमा करून
तो कागद पेटवायचा त्यात काही औरच मज्जा असायची. टिकल्यांची रीळ असली की निरनिराळ्या पद्धतीने त्या फोडण्याचा आमचा प्रयत्न असायचा.
जसे की नट आवळायची पक्कड घेयाची त्यात टिकली धरून फोडायची.
नाहीतर रीळ घेवून थोड्या रफ जागेवर बोटाने जोरात घासायची आणि टिकली फोडायची. असे आणि असेल प्रकार आम्ही करायचो हे सगळे दिवाळीच्या आधी बर का. बाबा दिवाळीच्या आदल्या रात्री कधी फटाके आणायचे हे कधी कळले नाही आम्हाला. पण सकाळी लवकर उठून सर्वात आधी आम्हाला फटाके दाखवून. लवकर उटणं लावून अभ्यंगस्नान करायला लावायचे. तेव्हा अभ्यंग स्नानाचा खूप कंटाळा येयचा ते खरखरीत उटन आईला अंगाला लावायची अगदी नको वाटायचे ते.
पण महत्वाचे हे होते की चाळीत सर्वांत आधी उठून पहिला फटका कोण फोडणार. जणू शर्यंत लागली असायची तेव्हा. थोडा अंधार असे पर्यंत फटाके फोडायचे. फटाके पूर्ण माळ आम्ही फोडलेली आठवत नाही उलट माळ सगळ्या सोडवून एक एक फटका फोडायला खूप आवडायचे. तो फटका पण कसा फोडायचा माहितेय. कुठ भिंतीत फट असेल तर तिथे खोचून फोडायचा. नाहीतर फटाक्यांचे रिकामे खोके घेयचे त्याच्यात ठेवून फोडायचा. अहो आम्ही तर काय करायचो माहितेय. पिठाच्या गिरणीतून खाली पडलेले पिठी पिशवीत आणायचे. आणि मुठभर पीठ खाली जमिनीवर ठेवायचे त्यात एक फटका खोवायचा आणि मग फोडायचा.
ते अक्षरशः चित्रपटातल्या दृष्यागत वाटायचे फुटताना आगीचा एक लोट उठायचं तेव्हा. खूप करामती केल्या त्यावेळेस आता आठवले की फार छान वाटते. चाळीत अजून एका गोष्टीची शर्यत असायची कुणी जास्त फटाके फोडले आणि त्यासाठी आम्ही एक शक्कल लढवायचो. रात्री गुपचूप आजूबाजूचा फटाक्यांचा कचरा स्वतःच्या घरासमोर आणून ठेवायचा म्हणजे दुसऱ्याला वाटेल अरे किती फटाके फोडलेत याने. मुळात दिवाळी या गोष्टीवर थांबत नाही अजून खूप काही असते.
