मानलेली आई...
मानलेली आई...
शिशिर - सरीता एक प्रेमळ साध जोडपं... आपल्या संसरवेली वरच्या दोन गोजिऱ्या फुलांसोबत आनंदाचा संसार फुलत होता...सिद्धी , शार्दुलच्या रूपाने त्यांच्या जिवनात चैतन्य बहरत होतं.सरीता लवकर सकाळी ऑफिसला जायची आणि शिशिर मुलांना शाळेत सोडून फॅक्टरीत कामाला जायचा.शाळा सुटली की सिद्धी आणि शार्दुल अंजू मावशीच्या पाळणाघरात जायचे...
अंजू एक कमी शिकलेली पण हुशार आणि समजदार मुलगी.. नावलाईच्या दिवसातच अकस्मात झालेल्या पतीच्या निधनानंतर खचून न जाता घरीच छोटेसे पाळणाघर चालवून आपल्या सासू सासऱ्यांचा आधार बनली होती. अचानक काळाने घाव घातला...शिशिरच्या वाढदिवसाचा केक आणायला निघालेल्या मायलेकराला एका भरदाव ट्रकने जोरदार धडक दिली आणि सरीता आणि शार्दुल कायमचे निघून गेले ! कधीही परत न येण्यासाठी...
शिशिर तर या घटनेने अगदी हादरूनच गेला होता...काहीच करण्याची त्याची मनस्थिती नव्हती.सिद्धी खूपच लहान होती.तिला काहीच कळलं नव्हतं.
अंजू मावशीला हे कळतच ती लगेच आली होती आणि सिद्धीला आपल्या घरी घेऊन गेली.
शिशिरला तसे जवळचे नातेवाईक नव्हते फक्त आई होती.ह्या दुःखद घटनेची बातमी मिळताच आई धावत आली...पण सिद्धी , शिशिरकडे बघून तिनेच हाय खाल्ली ...आता शिशिरपुढे पर्याय नव्हता , कामावर तर जाणं भाग होतं..घरी पूर्णवेळ एक मदतनीस ठेवून तो कामावर गेला... सिद्धिने रडून रडून आकांड तांडव केला...तिला आई आणि दादा हवे होते.आज्जीने कसं बसं तिला सावरलं .दुसऱ्या दिवशीपासून अंजू मावशीने तिची पूर्ण जवाबदारी घेतली.दिवसभर सिद्धी अंजू मावशीकडेगेच राहायची.तिला आधीपासून मावशीचा खूपच लळा होता आणि आता तर ती मावशीत आईला शोधत होती.
सिद्धी कडे बघून अंजू च्या जीवाची कालवा कालव व्ह्यायची..खूप प्रेमाने तिने सिद्धिला सांभाळलं ...
वेळप्रसंगी अंजू सिद्धीच्या घरी जाऊन तिथली जबाबदारी पण उचलत होती.आजीला आणि शीशिरला तिच्यामुळे खूप धीर आला होता. सिद्धीची काळजी जवळ जवळ मिटली होती... सिद्धीने आता अंजुला आईचं मानलं होतं...शाळेतही मीटिंगला अंजूला पाहून तिच्या मैत्रिणी ' ही कोण आहे ? तुला तर आई नाही ना ...' असे विचारायच्या तेव्हा ' मी हीची आईचं आहे...फक्त जन्मदात्री नाही तर मानलेली...' असं अंजून सांगितलं आणि तेव्हापासून दोघी एकमेकींच्या मानलेल्या आई - लेकीच्या नात्यात बांधून राहू लागल्या...
सिद्धी हळूहळू मोठी होत गेली...मधल्या काळात आजीसुद्धा देवाघरी गेली होती.तिची मानलेली आईचं आता तीच सर्वस्व होती. शिशिरला एकटेपणा जाणवायचा पण सिद्धीचा विचार करून त्याने कधीच दुसरं लग्न केलं नाही. सिद्धी आता मोठी झाल्यामुळे पाळणाघरात जात नव्हती पण दिवसातून एकदा तरी अंजू मावशीकडे गेल्याशिवाय तिला चैन पडत नसे.अंजू मात्र आता खूप एकटी पडली होती.सिद्धी नसल्यामुळे तिला खूप वाईट वाटायचं.
वयात आलेल्या सिद्धीला आता बाबांचा एकटेपणा जाणवत होता.तिला एक छान कल्पना सुचली ! वाढदिवसाच्या दिवशी "तुला काय हवं" असं बाबांनी आणि अंजू मावशीने तिला विचारलं होतं आणि हवं ते देण्याचं प्रॉमिस सुद्धा तिने त्यांच्याकडून घेतलं होतं.
वाढदिवसाची तयारी अर्थातच अंजू मावशीने केली होती.आता तिची वेळ होती गिफ्ट मागण्याची ..." मला माझे आई बाबा दोन्ही एकत्र हवेत..." असं म्हणून तिने बाबा आणि अंजू मावशीचे हात एकमेकांच्या हातात दिले. दोघेही आनंदले...त्या दोघांना आता एकत्र राहून सिद्धीला सगळी सुख देण्याची संधी मिळाली होती...तिघांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले !
मानलेली आई आज खऱ्या अर्थाने तिची आई झाली होती...!!
