माझं कॉमिक्सविश्व
माझं कॉमिक्सविश्व


90's kids असण्याचे जे भरपूर फायदे मला झाले आहेत त्यापैकी एक म्हणजे वाचनाची विविधता ....
साधारणपणे तिसरी , चौथी नंतर मला बर्यापैकी वाचनाची आवड लागायला सुरवात झाली होती . ठकठक , चंपक , चांदोबा ही पुस्तकं दर महिन्याला नियमीत वाचायला मिळायची . चौथीत असताना काकांनी भा. रा. भागवतांच्या फास्टर फेणे चा 16 पुस्तकांचा अख्ख्या संच भेट म्हणून दिला होता . पुढची 3-4 वर्षे असंख्य वेळा त्यांचं पारायणही झालंय. दर रविवारी रामायण, श्रीकृष्ण, शक्तीमान बघत मोठा झालोय मी .
97-98 साली माझ्या एका आत्तेबहिणीच्या लग्नाला मी आणि आई , आत्त्या आणि काकांबरोबर उज्जैनला चाललो होतो .
आयुष्यात पहिल्यांदाच लक्झरी चा प्रवास करायला मिळणार असल्यामुळे खूप आनंदात होतो. घराशिवाय गाडी मधे ही टी.व्ही असतो हे बघून जाम भारी वाटलं होतं . ठाण्यावरून सुरु झालेल्या लक्झरीत मी मात्र पुढच्या तासाभरातच झोपून गेलो .
मधेच जाग आली तेव्हा सनी देओल कोणाशी तरी हाणामारी करत होता. डोळे परत कधी मिटले ते ही कळलं नाही .
सकाळी इंदौरला पोहचलो .त्यावेळी मोबाईल वगैरे करमणूकीची साधनं नसल्यामुळे आणि इतक्या तासांच्या प्रवासाने जाम वैतागलो होतो. मी गप्प रहावं या साठी अर्धा - एक तासाने मला कोकाकोलाचा कॅन दिला जात होता, मी किरकीर करू नये म्हणून ....
पण शेवटी ते पिऊनही वैतागलो आणि काही तरी वाचायला हवं म्हणून पुन्हा रडारडीला सुरुवात केली. शेवटी आई एका पुस्तक स्टॉलपाशी मला घेउन गेली .
आता मध्यप्रदेशात चंपक, ठकठक मिळण्याचा काहीच संबंध नसल्याने तिथे असणा -या पुस्तकांमधून एखादं पुस्तक घे असं आईने मला सांगितल
पुस्तकं बघताना समोर काही रंगीबेरंगी पुस्तकं मला दिसली. नेमकी कसली पुस्तकं आहेत ते कळत नव्हतं पण शक्तीमान सारखे सुपरहिरो दिसत होते चित्रात . त्यातलीच 2 -3 पुस्तकं आईने मला घेउन दिली आणि इथून सुरू झाला माझा आणि कॉमिक्स चा प्रवास.
सुरवातीला म्हणजे जवळपास 2 -3 वर्षे मला ते हिंदी नीट समजायचं नाही पण हळूहळू घरच्यांना विचारून विचारून थोडंफार हिंदी समजायला लागलं होतं .
सुपर कमांडो ध्रुव ( ध्रुवं नव्हे ), नागराज, डोगा, बांकेलाल, कोबी और भेडिया, तिरंगा, एन्थनी, भोकाल, परमाणू यांनी त्या काळात मनावर अक्षरशः मोहिनी टाकली होती .जन्मजात कुठलीही दैवी शक्ती नसताना केवळ शारीरीक शक्ती आणि अकलेच्या जोरावर मोठमोठ्या व्हिलन ना हरवणारा ध्रुव, नागांचा स्वामी नागराज, एका शास्त्रज्ञाने दिलेल्या वैज्ञानिक कमरपट्ट्याने अकल्पनीय गोष्टी करणारा परमाणू उर्फ इन्स्पेक्टर विनय, रातों का रक्षक डोगा, देशभक्त तिरंगा, हे माझे त्या पैकी सगळ्यात आवडणारे हिरो.
माझ्या लहानपणीच्या डायर्यांमधे ह्यांच्यासारखाच मी पण सुट आणि गॅजेट्स घालून लोकांची रक्षा करेन या विचाराने सूट शस्त्रांची रफ ड्रॉइंग काढलेली आजही पहायला मिळतील .
स्वतःसाठी नाव ही शोधून ठेवलं होतं मी .. " रक्षक " म्हणून ..(आता त्याचं राक्षस झालंय)- ...
त्या वेळी योग्य ती मदत न मिळाल्याने दुर्दैवाने भारत एका महान सुपर हिरोला मुकला.
पुढची कित्येक वर्षे मी आवडीने ही कॉमिक्स वाचत होतो. त्या 6-7 वर्षात 550 -600 कॉमिक्स सहजपणे जमवली होती . कारण कुठलही असो भेट मात्र कॉमिक्सच्या स्वरूपातच घेतली होती .पण 2005 च्या पुरात त्या सगळ्या पुस्तकांनी अखेरचा श्वास घेतला .
हळूहळू हे बालविश्व संपलं आणि आम्ही मोठे झालो .
कॉमिक्स ची जागा आता E books ने घेतली ..
पण भांडताना पुस्तक फाटलं म्हणून बहिणीला बदड बदड बदडण्याची आणि नंतर तिला नवीन कॉमिक्स दिल्याच्या आठवणीची सर कशालाही येणार नाही. कदाचित विश्वास बसणार नाही पण वास्तवाशी लढताना याच काल्पनिक हिरोंनी कळत नकळत कित्येकदा मदत केल्ये मला. आज इच्छा असूनही वेळ नसतो,वेळ असला तर इच्छा नसते.
अशा द्विधा मनस्थितीत हे सगळं आठवून आठवणी ताज्या करायच्या एवढंच हातात आहे ....
मगाशी दादर स्टेशनला एका लहान मुलाला त्याच्या आईकडे कॉमिक्स साठी हट्ट करताना पाहिलं आणि मन पुन्हा एकदा भूतकाळात हरवून गेलं .