माझा स्पेशल मधील प्रवास
माझा स्पेशल मधील प्रवास


स्पेस शटल मधून प्रवास करत होते, घड्याळाची उलटी गणती सुरू झाली दहा नऊ आठ-----एक आणि इतक्या प्रचंड वेगाने आम्ही अवकाशात कडे झेपावलं की आत मध्ये आम्हाला जराही वेग जाणवला नाही. वातावरण भेदून पलीकडे गेलो संपूर्ण पोकळीमध्ये अंधाराचे साम्राज्य, रात्री खालून बघतो त्या साऱ्या ग्रहताऱ्यांच्या जवळून भेटत होतो आणि मला वि वा शिरवाडकर यांचे पृथ्वीचे प्रेमगीत आठवले
"पिसारा प्रभेचा उभारून दारी पहाटे उभा शुक्र हा प्रेमळ
करी प्रीतीची याचना लाजुनी लाल होऊनिया लाजरा मंगळ
निराशेत संन्यस्त होऊन बैसे ऋषींच्या कुळी उत्तरेला ध्रुव
पिसाटापरी केस पिंजारुनी करी धूमकेतू कधी आर्जव"
मी कवयित्री त्यामुळे माझ्या मनात अशी कल्पना आली की आपण पृथ्वीचा होकार घेऊन यांना भेटायला आलो आहे आणि पृथ्वीचे स्वयंवर मांडून एकाला माळ घालायची आहे .मग आम्ही वऱ्हाडणी प्रथम धूमकेतूला भेटलो पण तो तर बोटीवर नोकरीला असल्याप्रमाणे वर्षातून कधीतरी दिसणार" नको ग बाई नको! असला नवरा नको!
मंगळ मला जास्तीचा लाजाळू वाटला .लाल डोंगर, लाल माती, लाल प्रकाश, मग संसार कसा होणार हाही नको ,
मग ध्रुव ताऱ्याला भेटलो पण तो मला आखडू वाटला ,तो काही आपली जागा सोडून पुढे येईना मग कसं काय जमायचं नको रे बाबा हा पण नको!
मग जाता जाता शनीच्या कड्याला हात लावला तो त्याचा प्लस पॉइंट,होता ना! आणि कडा सोन्याचा की प्लॅटिनमच ते पण बघितलं तसा बरा वाटला पण एकंदरीत त्याचा कडक स्वभाव बघून म्हटला आमच्या पृथ्वीला हा काही परवडणार नाही हा पण नको
बुध सर्वात लहान आणि गुरु सर्वात मोठा म्हणून दोघांनाही रिजेक्ट केले.
मग आम्हाला देखणा शुक्र आवडला एक तर तो सुंदर होताच, वरून पृथ्वी साठी त्याने जास्त वेळ दिला असता.
सप्त ऋषींनी त्याला मान्यता दिली. चंद्र तर तिचा भाऊच असल्यामुळे , त्याची पण मान्यता होती शेवटी आम्ही शुक्राला नवरदेव म्हणून फिक्स केले आणि तसा संदेश खाली पाठवला पण पृथ्वीने मी सूर्याशिवाय कोणाशी लग्न करणार नसल्याचा पवित्रा घेतला आणि तिचे नाही ऐकले तर पृथ्वीवर भूकंप करणार असल्या ची धमकी दिली. त्यामुळे आमचा नाईलाज झाला आणि आम्ही परतीची तयारी केली परंतु वातावरणात शिरताना काहीतरी गडबड झाली आमचे स्पेस शटल दाणकन्
पृथ्वीवर आदळले त्यातून समुद्रात पडले माझ्या नाकातोंडात पाणी जाऊ लागले म्हणून मी ओरडत जागी झाले पाहते तर आई माझ्या तोंडावर पाणी मारुन मला उठवत होती अशा रीतीने माझे स्पेस शटल चे स्वप्न तिथेच भंगले.