माध्यान्ह...!!!!
माध्यान्ह...!!!!
तसं पाहायला गेलं तर माध्यान्ह ही कुणाच्या आवडीची गोष्ट असेल असे वाटत नाही. माध्यान्ह या शब्दाचा अगदी सरळ अर्थ म्हटलं तर टळटळीत दुपार ..पण माध्यान्हीचा चा दोन तासाचा वेळ मला जरा जास्तच भावतो...
सकाळची ताजी तवानी लगबग संपून जरा निवांत व्हायला सवड मिळते ..अजून दुपारच्या जेवणाला अवकाश असतो किंवा झालेली तरी असतात ..त्यामुळे अगदी निवांत आळसावलेली वेळ नाही की कामाचा डोंगर उभा आहे म्हणून वेळ काढायची घाई नाही..जरा निवांत राहून आपल्या मध्येच रमायला, एखाद दुसरं पुस्तक हाताशी धरून ओघवतं नजरे खाली घालायला अशी सुंदर वेळ मिळणार नाही ...सकाळच्या कामात काय राहिलं याचा ताळेबंद आणि नंतरच्या कामाचाही मेळ घालायची संधी ...एखादी आवडीची लकेर गुणगुणावी किंवा शांत गझल ऐकत आठवणी आळवाव्यात...दोन्ही आनंद देणारं..!तसं माध्यान्ह काही अगदी कडक उन्हाचा प्रहर नव्हेच..कडक प्रहराची सुरूवात म्हणूया हवं तर...हिवाळ्यातील माध्यान्ह तर बऱ्याच वेळेला सकाळच्या दहाच्या समयाचीच आठवण करून देते..एखादी व्यक्ती या प्रहरात भेटायला आली तरी अलगद गप्पा होतात ..फारच रंगत आली तर जेवणाच्या बैठकीला एखादा पाहुणा रंग वाढवतो ..पण ओझं होत नाही "आलात तर दोन घास खा" या न्यायाने तो पाहुणाही आहे त्यात तृप्त होतो..मध्यमवर्गीय वळण सुटत नाहीत हेच खरं ..तर अशीही माध्यान्ह ची वेळ ...अशी प्रत्येक दिवशी येते तशी ती प्रत्येकाच्या आयुष्यात ही येते ...बालपण आणि तारुण्याच्या मोघम सारांश वाचला जातो तो याच काळात ..!!जरा स्थिरता आलेली असते आणि पुढच्या आयुष्यात वेगापेक्षा ओढ महत्वाची हे कळण्याची ही माध्यान्ह...साधारण प्रत्येकाच्या आयुष्याची आयुष्याची चाळिशी....संसाराची पंचविशी आणि उरलेल्या निम्म्याविषयीची सुरुवात अशी वेळ म्हणजे माध्यान्ह..!ती चुकवता येत नाही कारण त्याशिवाय सांजवात येतच नाही .सुखावह रम्य सायंकाळ अनुभवायची असेल तर या प्रहराला सामोरे जावेच लागते..पण टळटळीत दुपार होईल म्हणून राग नाही किंवा सकाळपासून आता उसंत मिळाली म्हणून जडावले पण नाही..आयुष्याच्या माध्यान्हीही असेच असते ना .!!बाल्यावस्थेचा आनंद छंद आणि तारुण्याचा कैफ आणि वेग सरून त्याकडे आपण सिंहलोकन करत पाहणे हाच माध्यान्हीचा हेतू ...त्यातून सुटलेले नात्यांचे धागे ,चुकलेल्या वेळेचे हिशेब ,भयंकर वेगाच्या नादात मागे राहिलेल्या आवडीनिवडी आणि छंद ..या साऱ्या गोष्टींचा मेळ घालण्याची ही वेळ ...!यासाठी फार काही करावे लागते असे नाही..बस्स, आपल्याअंतरंगात डोकावून एकदा स्वतःला घुसळलं पाहिजे..!
नवरा बायकोच्या संसाराची माध्यान्ह काही शी तृप्त काहीशी अबोल तर काहीशी कुढणारी सुद्धा असू शकते..मात्र मागील दोषांची चुकांची उजळणी करण्यापेक्षा यातील चांगल्याच गोष्टी मनाला गारवा देणाऱ्या ठरतात. एकदा प्राक्तनातील चांगल्या गोष्टींचा स्वीकार केला की मनाची आणि जीवनाची पायवाट ही नेहमी सुकर करत होते ..तीच गोष्ट मैत्रीची ...!आपण जसे जसे परिपक्व होतो, जसाजसा संसार जसा मुरतो तशी मैत्री ही नेहमी उत्तर उत्तर फुलतच जाते ..मैत्री कोणाशीही असली तरी त्याची फुलत जाणारी जाणीव ही जगण्याची उमेद देते ..पंखांना बळ देते आणि दुःखात दिलासा देते..अशा मैत्रीचाही हिशेब करणं मानसिकताच चुकीची ...तिचा फु तिचा फुलणारा आनंद घेत राहणे हीच मैत्रीची रूपरेषा...त्याला फुलवण्याची जबाबदारी ही नैतिकतेने दोन्ही बाजूने येते अशा जीवश्च मैत्रीचा शेवट नसतोच आणि माध्यान्ह असली तरी ती दाहक नसते..परिपक्वतेकडे जाणारी,,निर्दोष ,अर्थपूर्ण आणि प्रवाही..बस्स..!मैत्रीची ही मध्यान्ह सर्वांनाच हवीहवीशी वाटते..त्यातून जे नवनीत बाहेर येईल ते आपण जगलेल्या आयुष्याचे सार ..!!त्या नवनीतची चव अशी जिभेवर चाखायची आणि त्या चवीच्या अनुभवावर सांजवाटेचा प्रवास सुरू करायचा ..मग तेव्हा त्या चवीची उजळणी होईल ..काही नवीन चवी कळतील तर काही आपल्याला हवंय म्हणून तयार करू शकू...!!असा हा सगळा अनुभवांच्या चवीचा खेळ...!!माध्यान्हीच्या निमित्ताने आयुष्यातला एका अमूल्य वेळेची नोंद या निमित्ताने घेतली गेली एवढेच....!!!!!
