किनारे...!!!
किनारे...!!!
समुद्राच्या लाटांची गाज ऐकत समीर नमिता ची वाट बघत होता. दोन वर्षांनंतर तो तिला भेटणार होता .लांबूनच त्याला नमिता सारखी आकृती दिसली .जवळ येताच त्याने ओळखलं..नमिताच ती..केसांचा लांबसडक शेपटा तिला तेव्हा ही नकोसा वाटायचा ..पण केवळ आपल्यासाठी ती ती वागवत होती. नमिता जवळ येताच म्हणाली, "समीर मला उशीर झाला नाही .""फार नाही ,पण वाट पहावी लागली "!आणि तो तिच्याकडे बघतच राहिला..अंगकाठी फारशी बदलली नसली तरी केसांचा बॉबकट, कपाळावर असणारी नकळत लहानशी टिकली आणि सगळ्यात आकृती मिळणारं डोळ्याचा आत्मविश्वास आणि तिचे ते शांत, प्रफुल्ल प्रसन्न हास्य ...जे समीरला कधीच बदलू नये असं वाटत होतं..!!
"बोल ..कशासाठी एवढ्या तातडीने बोलवलं ?"तंद्री भंग करत नमिता म्हणाली. तसा तो चपापला आणि म्हणाला, "मला वाटते ,आपण आपल्या निर्णयाचा पुन्हा एकदा विचार करूया ..आरवची सेटलमेंट झाली असली तरी तो पुन्हा लंडनहून भारतात येईल असं वाटत नाही..आणि पुढची काही वर्षं अशीकाढायची म्हणजे...
तुलाही ते जड जाईल ...!"तशी नमिता उत्तरली, "समीर ,मी कधी असं म्हटले ?मी आज या घडीला तसे जगते आहे ते मला आवडतं ..माझी लाईफ स्टाईल मी माझी मनापासून स्वीकारली आहे ..त्यामुळे त्यात येणाऱ्या अडचणी प्रसंगांना सामोरं कसं जायचं हा प्रश्नच येत नाही..घेतलेला निर्णय हा मी पूर्ण विचार करूनच घेतला होता ..आता राहिली तुझी अडचण ती कशी डील करावी हा सर्वस्वी तुझा प्रश्न आहे." समीर तसा नाराजीने म्हणाला ,'नमिता ,वीस वर्षांपासूनचा सुखासमाधानाचा संसार मोडून वेगळे झालो ..काळाच्या ओघात नवरा-बायकोचं नातं घट्ट होतं ,दूध साखरे सारखे विरघळतं ,आपल्या बाबतीत ते खरं होतं ..पण असा निर्णय..तोही कोणतीही स्वतःची बाजू न मांडता शांतपणे बाजूला झालीस...असं का.. "!!
तशी ती म्हणाली, "सुखासमाधानाचे संसार तुझ्यासाठी होता समीर ..माझ्यासाठी घुसमटच होती..मित्रांच्या मदतीला धावून जाणारा, शेजाऱ्यांची अडचण समजून घेणाऱ्या ,आई-वडिलांचा अतिशय नम्र मुलगा ..यात मी तुझ्या आयुष्यात किती होते सांग..ना..मुलीने माहेरची सगळी वळणं संस्कार सोडून सासरी राहायला सुरुवात करावी असे म्हणतात ,पण या एकट्या मुलीला सांभाळून घ्यायचा आश्वासक हात कुणी हात पुढे करायचा...ज्यांच्यासाठी ती आली त्याने ही कोरडी वागणूक ठेवली तर करायचं काय...तुमच्यासाठी आले पण तुमच्यातली नाही ....वागण्यात कमीजास्त झालं तर तूझ्या आईसारखे टोचून बोलण्यात तूही हिरीरीने भाग घ्यायचास...जगासाठी देव माणूस म्हणून नावाजलेला तू बायको साठी कधी भला माणूस झालास का रे? 'तू वेल क्वालीफाईड आहेस, तुझा निर्णय तू घे' असं म्हणतात पण घेतलेले निर्णय अमान्य करून आपल्याला सोयीचे फिरवून घ्यायचे .....बालविवाह होत नाहीत रे आता.. चोवीस पंचवीस वर्षाची ,स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाची जाण असलेली, समाजात धडपडत आत्मविश्वासाने चालणारी मुलगी ..तुम्ही बायको म्हणून आणता...मग ती घरी आल्यानंतर मात्र मुकाट्याने मांजर व्हावी अशी अपेक्षा करतात तरी कशी...? "
"नमिता ,मी समजू शकतो..एम्.एस्सी.
मध्ये तू विद्यापीठ रॅंकर असतानाही तुझ्या मनासारखी नोकरी तुला करून दिली नाही.. केवळ घरच्या जबाबदाऱ्या म्हणून..माझी चूक नव्हतीच...आईचं करायचं, करायला कोणी नव्हते..तसं ही आईची ,माझी इच्छा नसतानाही तू मुलाला होस्टेलला ठेवलेसच ना..हा तुझा हेका नाही ...काय स्वतःची बाजू ही तू समजून घे ना..!! "
"समीर ,आता या गोष्टी पुन्हा उघडण्यात काहीच अर्थ नाही ..तरीही त्यावेळी मी कोणतेही कारण सांगितलं नाही म्हणून सांगते...आरवचे लहानपण कसे धावपळीत गेले हे मी पाहिले... मेरा बच्चा असं म्हणून दोन मिनिटे जवळ घेणे...आणित्याच्या जबाबदारीत सहभागी होणे वेगळे...आई पण ही माझी जबाबदारी मी ती कधी टाळली ही नाही...पण कुणालाही एखाद्याचा आधार मिळाला तर ते नातं बहरूनयेतं ...नुकतीच लागलेली नोकरी , पाळणाघर आईचं करणे ,या सगळ्या तू कुठे होतास..?तू ही नोकरी केलीच पण तुला वेळेवर मिळत होतं ..ते आवरून तू सगळीकडे हजर असायचास..फक्त बायको सोडून!!एवढे गृहीत धरलं होतं तू मला...!!शेवटी निर्णय घेतला आणि तो आता बदलेल असं मला वाटत नाही..! "
"अग ,पण तुझं स्टेटस ते काय...दोन खोलीत रेंट वर राहतेस ..तोंडापुरते पेन्शन असलेली नोकरी आणि तू कुठे जाणार आहे ...पुढे बरेच काही वाढून ठेवले असेल...त्याला कल्पनाही येणार नाही असे प्रसंग येतील तेव्हा तिने कसे निभावलशील..?आणि एकत्रच नको असेल तर मैत्रीचा तरी पर्याय पडताळून पहायला काय हरकत आहे? "
" समीर ,असा काही पर्याय मी तुला मागितलाच नाही ..पुन्हा त्या गुंत्यात मला जायचंच नाही.. ब्राह्मणांच्या साक्षीने झालेल्या लग्नात मला सोबत देऊ शकला नाहीस मग पोकळ मैत्रीचे मृगजळ ते काय ... काय रे एक सांगशील..मला लग्नाआधी मुलगी उच्चशिक्षित आहे..रॅंकर आहे असं सांगताना अभिमान वाटतो..पण लग्नानंतर समान वागणूक देताना इगो आड येतो की तिची बौद्धिक चमक पेलवत नाही....ती ही एक स्वतंत्र व्यक्ती आहे.भौतिक , संसारीक ,,आर्थिक ,भावनिक गरजांच्या पलीकडे ही एक मोठी गरज असते ..बौद्धिक..ती पूर्ण झाली नाही तर होणारी घुसमट सांगताही येत नाही आणि सहनही करता येत नाही अशी असते मग मी विचार केला..मीच माझ्या व्यक्तिमत्वाला न्याय देऊ शकत नसेल तर माझं जगणं कशासाठी ...इतक्या वर्षात बदल नाही तर आता पुढेही ते बदलणे तुम्हाला शक्य आहे का..? "
" पण वेगळे होणे इतपत कोणताही वाद किंवा कारण नसताना हा निर्णय का"
"वाद नव्हता समीर..पण सुसंवाद तरी कोठे होता..तरी घरात भांडण झालेच नाही ..कारण मी तुझ्यात बदल होणार नाही हे समजून घेतलेले किंवा मी केलेल्या पूर्णपणे दुर्लक्ष...यामुळे आता बदल नाही...आपण आयुष्यभर किनारेच राहिलो रे ... दोन्ही किनाऱ्यांनाी नदीचा प्रवाह घडवला..त्याला दिशा दिली रूप दिले पण ते किनारे कधी एकत्र आले नाही येऊ शकत नाही तेच आपलं प्राक्तन होतं ..समोरा समोर असूनही एकमेकांत गुंतणं नाही कायमच एक अंतर राहिलं आपल्यामध्ये...!! "
असं म्हणता म्हणता नमिताने मान फिरवली..कदाचित पाणावलेले डोळे दिसतील म्हणून..शेवटी समीर निराश झाला म्हणाला, "ठीक आहे..मी आग्रह करणार नाही पण कधीही तुला यावसं वाटलं तर नेहमी माझं घर तुझ्यासाठी उघडत असेल.."" नमिता हसली आणि म्हणाली ,"अजूनही माझं घर म्हणतेस ना...असो..त्याचे काहीही गरज पडणार नाही..या आयुष्यात ही नमिता फक्त एक भूतकाळाचे असेल..म्हणून ती समुद्राकडे वळून पाहू लागली...मागे वळून समीर गेला की नाही हे पाहण्याची तिची इच्छा सुद्धा झाले नाही ..तेवढ्यात तिचा फोन वाजला.
"हॅलो ..मिस नमिता साने...?"पलीकडचा आवाज.!
"हो बोलते..बोला."
"मी टाटा कॅन्सर हॉस्पिटल मधून बोलते..मॅडम उद्या तीन वाजता तुमची शेवटची केमो असेल.. "
"ओके मॅडम ..आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद..उद्या मी दोन वाजता दवाखान्यात असेन"..तिने फोन ठेवला.
नमिता समुद्राकडे पहात होती .लाटेचे आवाजात ती हळूहळू विरघळून जात होती.. समुद्राच्या लाटा तरंग निर्माण करत होत्या...सुंदर गाज मोहवत होती ...पण नमिता मख्ख बसली होती ...त्या थिजलेल्या आणि गोठलेल्या अंतरंगाला एकच जाणीव समाधान देत होती. ..तिच्या स्वतःच्या अस्तित्वाची ....स्वतःच्या आदिम, मुक्त जगण्याच्या प्रेरणेची....!!!!
