पोरका....!!
पोरका....!!
अन्या आज सकाळीच लवकर गावाकडं जायला निघाला व्हता. रात्री त्याचा मित्र सुज्या न त्याला फोन केला व्हता की सोनबादादाला जरा जास्तच झालयं तवा लगीच निघ म्हणून.. तो गाडीला बसला आणि प्रवास सुरु झाला. पण त्याचा रस्ता काय संपना... आज त्याला एक विचित्र हुरहूर लागली व्हती.. याच्या आधी असं कधी झालं न०हतं.. गाडीत बी कुणी जास्त न०हतं... प्रवासात कुणी वळकी चं नसलं की एक बरं असत. समद्या आठवणी, इचार आपल्या भवतीचं पिंगा घालत्यात.. चांगल्या बी आणि वाईट बी ..!
त्याला आठवतुया तसंसोनबादादांची एकच छबी.. सोनबा त्याचा वडील... पण त्यानं ' बा' शिवाय कधी हाक मारली नाही. त्याला कुणी बदल म्हणून सांगितलंबी नाही.. तसा तो एकाच पोशाखात दिसायचा... पांढरा सदरा नि पाय घोळ धोतर.. त्ये धुतलेलं बी कळायचं न्हाई आणि मळालेलं बी .. पण पांडुरंगाचा बुक्का मात्र कायम कपाळावर... बाकी पांडुरंगांचा नि त्याचा संबंध फक्त देवळापुरता... त्याच देवळाच्या परिसरात तो राहायचा. अन्याचा तो बा असला तरी गावच्या सोनबादादा च्या हाके नं तो बी त्येला दादाच म्हनत ०हता. तसा मागपुढं लई पसारा न०हता त्येचा.एकमेकाला ,जीवाला ती दोघंच.सोनबा दादाच दिवसभरात एकच काम.पांडुरंगाच्या देवळाचा परिसर झाडून लख्ख करणे..त्याबदल्यात देवळाच्या समितीकडून एक खोपटं त्यांना दिलं होतं.त्यातही दोघंबी राहायची.जेवायचं म्हणाल तर डाळ भात उकडता येत होता तो दोघास्नी...कधी पाटलाचा वहिनी कडून ताट यायच तर कधी पुजारी निवदाचं ताट दयायचा..
पण अन्याला यातलं काही आवडायचं नाही..बा म्हणून त्याच्या परिसरात नव्हताच.झाडताना एकाद शाळकरी पोरगी त्याला अडवायचं.."हे सोनबा दादा नीट झाड की ..अंगावर माती येत्या..."बिचारा सोनबा दादा कधीतरी जागा बदलून झाडायचा नाही तर सकाळी लवकर उठून .!पैसा करताना बघितला की नाही अशी शंका यावी.दोन येळचंपांडुरंग देतो ते बक्कळ आहे असं म्हणायचा.. अन्या लई चिडायचा. दादा दुसरं काम बघ की म्हणून धोशा लावायचा. खपाटीला गेलेलं पोट बघत दादाच उलट इचारायचा.."हे . काम काय वंगाळ हाय का?"" तसं न्हवं पन साळत मला समदी चिडव त्यात.. तुझा बा देऊळ झाडतु या त्वा तुबी साळा झाड अस म्हन्यात.. कुनी काय बी दिलं की मुकाटयानं घितु या स... त्यानच आपण भागवतु या... असं किती दिवस भिकाऱ्यासारख राहायच ?" अन्या वैतागून बोलला. तसा केविलवाणा होत सोनबा बोलला," असं गावाचा राग राग नको करूस.. आज ना उदया त्येच तुला आधार देत्याल. आता दुसरं काम मला जमल असं काय वाटत न्हाय.जवर पांडुरंगाची कृपा हाय तवर जमल... पर नंतर काय खरं न्हाय गडया.." तसा अन्या चपापला.." तसं काय न्हाय... पर मी काय हित राहायचा न्हाय.. आन तु बी चल माझ्या संगं... तसं बी तुला नी मला कोन हाय गावात? काय करायचं हितं..?" ." आरं पन समद्याचं गोष्टी लगेच न्हाय उमगत... येळ आल्यावर तुला बी कळलं ... आपल काय बी चुकत न्हाय.. शेवटी तू तुझ्या कर्माचा नी मी माझ्या कर्माचा...!"
सोनबा म्हनत हुता ते बी खरचं हुतं... अन्या सारखा विचार करायचा ... समद्यास्नी नाती गोती गोतावळा हाय... पर कळायला लागल्यापासनं आम्ही दोघचं हाय...पर दोघा बापलेकात लई काय जमलं नाही. दहावी झाली तसा अन्या शहरात गेला. कधीमधी गावात आला तर म्हनायचा ," तिथं मी जमवतोय हळूहळू .. आनी तुलाबी मी तिथच घिऊन जाईन.." पर सोनबा नुसतचं केविलवाणं हसायचा. ते हसणं अन्याच्या जीवावर यायचं त्याला त्याच्याच जीवाची तगमग कधी कळली नाही... आनी बा ची घालमेल तर लईच न्यारी .. बा म्हणून त्यो त्याच्या कधी जवळ गेला न्हाई पन जीवाला आधार म्हनून त्योच पहिला समोर यायचा..सारे बालपण त्यानं अशी तगमग... घालमेल आणि गावाची तिरकी नजर झेलत सारलं होतं... जसा तो शहरात गेला तसा सावरला. चांगल्या माणसांच्या मित्रांच्या संगतीत राहिला... बारावी झाली तशी त्यानं भाजी विक्रीचा धंदा काढला .जम बसवत बसवत घराचं बी बघू लागला... मधनं मधनं त्येला बातमी कळायची... सोनबा लई थकलाय... आठवडयात नं चार दिस झोपूनच असतु ... वाटायचं गावाकडं जावून येऊ या .पर आता महिनाभरात खोली घ्यायची ...त्याला आनु इकडच... पर जरा आधीच कमी असलेला उमाळा अजून आटला होता.. त्येला कळतच न०हतं की सोनबाच्या बाबतीत असं का हुत ते... बापाची वढ न्हाई म्हणावं तर त्येची सय आल्या बिगर एक दिसबी जायचा न्हाई... एकांद देऊळ बघितलं की हटकून दारात सोनबा दिसायचा... हातात झाडू आनी कपाळाला बुक्का... पांढरे पिंजारलेलं केस आणि केविलवाणं हसू... असं दोन महिने गेलं आणि काल सुज्याचा फोन आला की सोनबादादाला जास्त झालय... अन्या लगेच निघाला..
पन अन्या गावात आला तसा मानसं तिरक्या नजरेनं त्याच्याकड बघू लागली. बाया मानसं . म्हातारी केातारी म्हनू लागली..." जा बाबा आता लवकर देवळ कडं".. तसा त्यो भरभर देवळाकडं निघाला तर सारं संपलं होतं .. गावातली मानसं सोनबा भवती गोळा झाली हुती.. त्येला कायचं उमग ना.. मख्ख बसून राहिला . मग सुरू झाली ती ओळखीची , लहानपणापासूनची तगमग... जीव कासावीस... घशाला कोरड.. पण सांगणार कुणाला... आणि विचारणार काय? तसा पाटलांचा तात्या पुढं आलं आणि म्हनाल.." अन्या , ऊठ आता...आरं काय राह्यलं न्हाय... पण समदं आवरायला हवं.." घाटावरचे सगळे विधी मख्ख तोंडानं आणि कोरडया डोळ्यानं पार पाडले.. हळूहळू समदी मानसं पांगली... तात्या आणि अन्या दोघचं उरली.." लई मवाळ राहिला सोनबा आयुष्यभर.. पोटच्या पोरासारख केलं लेकरा त्यान तुझं..." अनोळखी धक्क्यानं आणि भरून आलेल्या काळजानं डोक्याचा नुसता भुगा झालेला आणि त्यात तात्याचे हे शब्द अन्याच्या जीवाला घरं पाडून गेले ." असं का वं बोलता तात्या?बा चं हुता की त्यो माझा..!"
" नाय पोरा!एकादं वरसाचं लेकरू असताना तुला देवळाकड कुणी सोडून दिलं . आठ दिवस समद्या गावानं शोध घेतला पर कुणी फिरकलं बी न्हाई . तवा सोनबा म्हनाला " तात्या पोर राहू दे माझ्या जवळ... जगल कसं बी माझ्या संगं"... सोनबानं पोर जगवायला घेतलं खरं पन नंतर म्हनाला,' तात्या , बा भीक मागतु या म्हणून पोराला लाज नगं वाटायला.. एकादं जमल असं काम दया..' आरं . जल्माच्या दम्यान त्येची फकस्त हाडं राहिली हुती त्येला काय काम दयायच... तवा पुजारी म्हणालं... देवळाचा परिसर झाडू द्या... पोटाला पांडुरंग काय उपाशी ठेवायचा न्हाई.. त्यापासुन तुला ह्योच बाबा आनी हीच आई..!तू त्याचा राग राग करायचा.. तवा यायचा माझ्या जवळ .. सांगून दोन चार टिप गाळायचा... पर त्येला काय सांगू नगा म्हनायचा.. बाकी काय जमलं न्हाई त्येला... पर अन्या त्येच्या या कर्मानं त्येच्या जीवाचं सोनं केलं बघ...!"
अन्याच्या पायाखालची जमीनच सरकली... आता काय तरी अक्रीत घडावं आणि बा नं हाक मारावी' " अन्या , भात रांधलाय... चल जेवायला .." अन्याची घालमेल तगमग संपली आनी त्येच्या काळजातून हुंदका बाहेर पडला... जीवाच्या आकांतानं रडताना तात्या जवळ आलं आणि त्याला थोपटू लागलं... शांत स्तब्ध नदीच्या प्रवाहात सूर्य मावळतीला जात हुता... पण अन्याच्या आयुष्याची ओंजळ रिकामी करून..!
