लघुकथा
लघुकथा
मुख्य दरवाज्याशी बराच वेळ चाललेली खुडबुड थांबेना, तश्या त्या उठल्या. सुर्यकांतांच्या खोलीत डोकावून, त्या सुशीलच्या खोलीत डोकावल्या. त्याला शांत झोपलेलं पाहून मग त्याच मुख्य दरवाजा उघडायला गेल्या. दरवाजा उघडल्यावर ती अडखळत आत आली आणि म्हणाली,
"सुशील, लवकर का नाही आलास दरवाजा उघडायला? तुझी आई जागी झाली असती तर?"
"दरवाजा सुशीलच्या आईनेच उघडला आहे सुनबाई!". तशी तिने तटकन मान वर करून, खात्री केली. आणि मग आधीच जड झालेल्या जिभेमुळे तिला धड बोलता येत नव्हतं. आणि आता तर खूपच पंचाईत झालेली होती. नुकत्याच झालेल्या बऱ्याच चुका क्षणार्धात तिला आठवून गेल्या आणि ती अधिकच भांबावली.
त्यांनी मात्र शांतपणे तिला हाताला धरून तिच्या खोलीपर्यंत आणलं आणि सुशीलला हाक मारून उठवलं. त्याच्या स्वाधीन तिला करून त्या स्वतःच्या खोलीत निघून गेल्या. आणि आता मात्र त्यांना लगेच झोप लागली, तीसुद्धा निवांत.
तावातावाने येणारा आवाज ऐकून, शीतल-सुशीलची बायको, पटकन बाथरूममधून बाहेर आली आणि आवाज ओळखून धावतच तिने हॉल गाठला.
"एखाद्या वेळी झाली तिची चूक म्हणून लगेच मला बोलावून घेण्याची काय गरज होती? हाय प्रोफाइल जॉब आहे तिचा, अधूनमधून या गोष्टी होतात. मोठे म्हणून आपणच समजावून घ्यायला हवं. शिवाय हा तुमच्या घरातला प्रश्न आहे, तुमचा तुम्ही सोडवा. माझी मुलगी असली तरी मी त्यात पडणार नाही. आणि काय हो सुरेखाबाई, इथे तुमची सुहासिनी असती तर?" वैजयंती बाईंनी टोकाचा प्रश्न विचारला.
"तर ती असं कधीच वागली नसती आई!" आपल्याच मुलीच्या शांत आवाजातलं उत्तर ऐकून वैजयंतीबाई चमकल्या.
"अगं मी इथे तुझी बाजू घेते आहे आणि...."
"नको घेऊस! आणि तू म्हणालीस ते बरोबर आहे आई. हा आमच्या घरातला प्रश्न आहे. मी आणि माझी सासू सोडवू तो. अगदीच नाही जमला तर मी बोलावून घेईन तुला." हात जोडत शीतल म्हणाली.
"म्हणजे मी इथून जायचं आहे, हे सांगते आहेस मला?"
"हो!" मग त्या निघूनच गेल्या आणि शीतल सासूबाईंच्या समोर खाली मान घालून उभी राहिली. तिचं सर्वांग थरथर कापत होतं, मात्र सगळी हिंमत एकवटून ती म्हणाली,
"सासूबाई, सर्वात अगोदर मी तुमचा उल्लेख सुशीलची आई असा केल्याबद्दल सॉरी. आणि मागच्या दोन वर्षांत काल पहिल्यांदा तुम्ही पार्टीला जाण्याला मनाई केली, ही बाब दुर्लक्षित करून मी फार उद्धटपणा केला, त्याबद्दल ही सॉरी."
"तुला खरंच काही जाणवलं आहे की...?" प्रश्न अर्धवट सोडून सासूबाईंनी शंकीत स्वरात विचारलं.
"सर तिथे येणार आहेत आणि मी तुमची सून आहे हे त्यांना कळल्यावर माझ्यासोबत काही अनुचित घडू शकेल, या रास्त भीतीपोटीच तुम्ही मला अडवलं होतंत, एवढं माझ्या निश्चित लक्षात आलं आहे, पण आता, विचार केल्यानंतर." शीतल प्रामाणिकपणे म्हणाली.
"खरंय बेटा! तुझ्या या सरांनी माझ्यासोबत माझ्या अजाणतेपणाचा आणि माझ्या भावनांचा गैरफायदा घेतला आहे. ती जखम आज पूर्ण बरी झाली आहे, कारण सूर्यकांतरावांनी ते बळ मला दिलं. मला खंबीर बनवलं. माझी चूक नाही, हे पूर्णपणे मान्य केलं - सुशीलला स्वीकारून आणि सुहासिनीचा जन्म व्हायला हवा, सुशीलला त्याचं भावंड हवं, हे सांगून.
मी सावरले होते कारण माझाही विश्वास हाच होता की घडलं त्यात माझी काहीही चूक नव्हती. आणि सुर्यकांतरावांनी तो विश्वास दृढ केला. सुशील आणि सुहासिनीला आम्ही घडवलं-वाढवलं ते सगळ्या शक्यता गृहीत धरून. सुहासिनीला तयार केलं ते केवळ शारीरिक सबळता देऊन नव्हे, तर मानसिक घडण करून.
आणि तुझ्यासोबत त्या माणसाला अनेकदा बघून माझा जीव तडफडत होता की तुला या सगळ्या गोष्टींची जाणीव द्यावी. पण तुमच्या दोघातल्या नात्याचा अंदाज मला किंवा सुशीलला येत नव्हता. शिवाय तुझी आई त्याच्यावर बरीच विसंबून आहे, विश्वास ठेवून आहे. मात्र आमच्यावर, आमच्या घरावर, संस्कारांवर विश्वास ठेवण्याची तुमची तयारीच दिसत नव्हती, आताही नाहीये, हे तुझ्या आईच्या बोलण्यावरून जाणवलं मला.
मात्र आता अधिक वेळ दवडण्यात अर्थ नाही हे मी ठरवलंच होतं आणि आज तुझ्याशी सविस्तर बोलणारच होते. पण तूच माझा बोलावं कसं? हा प्रश्न सोडवलास." सुरेखाबाई शांतपणे म्हणाल्या. शीतलने दचकून आजूबाजूला पाहिलं तर सुर्यकांत, सुशील, सुहासिनी मंद हास्य चेहऱ्यावर ठेऊन अभिमानाने सुरेखाबाईंकडे बघत होते आणि मधूनच तिच्याकडे कटाक्ष टाकत होते. मग आश्चर्य कोंडून ठेवणं अशक्य होऊन तिने तीव्र स्वरात विचारलं,
"हे-हे सगळं या दोघांना माहिती आहे? स्वीकारलं आहे त्यांनी?"
"आमच्या स्वीकार-अस्वीकाराचा प्रश्नच उद्भवत नाही शीतल. आम्ही मुलं म्हणून कसे असायला हवे, यापेक्षा आम्हाला आईवडील म्हणून ही दोघे कशी हवीत, या प्राधान्यक्रमाने त्यांनी आम्हाला घडवलं ही आहे आणि घडण्याची संधीही दिली आहे. यातच सगळं सार आहे आमच्या कुटुंबाचं!" समाधानी स्वरात सुहासिनी म्हणाली.
"आपल्या कुटुंबाचं सुहासिनी! मी पूर्ण मेहनत घेईन माझ्या मानसिकतेत बदल करून इथे एकजीव होण्याची!" शीतल आपणहून म्हणाली.
"तुला स्वतःत काहीही बदल करायची गरज नाहीये सुनबाई. फक्त डोळसपणे जगाकडे बघ आणि स्वतःच्या विचारांनी स्वीकार-अस्वीकार ठरव!" सुरेखाबाई नेहमीच्या आवाजात बोलल्या आणि शीतलचा जीव भांड्यात पडला.
"पण तरीही, काल माझ्याबाबतीत काही अनुचित घडलं असतं तर?" शीतलने शंका विचारलीच.
"तर काय? याचा निर्णय मी एकट्याने घेतला असता आणि बाकीच्यांनी मान्य केला असता." सुशीलने उत्तर दिले आणि तो निर्णय काय असेल, हे शीतलच्या लक्षात आले. मग मात्र तिने क्षणाचाही विलंब न लावता म्हटले,
"दोन वर्षातल्या माझ्या सगळ्या लहानमोठ्या चुकांची मी आपल्या कुटुंबाकडे कबुली देते आहे, तिचा स्वीकार करून तुम्ही जी एक संधी मला उपलब्ध करून देत आहात तिचा मी उपयोग करून घेईन."
"मग तू 'स'फॅमिलीमध्ये पूर्ण मनाने आली आहेस!" आनंदी स्वरात सुरेखाबाई, सुशील, सुहासिनी एकदम म्हणाले आणि टाळ्या वाजवून सुर्यकातांनी आपले अनुमोदन दिले!
