डॉ. मुक्ता बोरकर - आगाशे

Inspirational Others

4.2  

डॉ. मुक्ता बोरकर - आगाशे

Inspirational Others

# लढा लेकीसाठी...!

# लढा लेकीसाठी...!

3 mins
312


    "मी माझ्या मुलीची सुंता अजिबात होऊ देऊ देणार नाही." शिरीनने घरच्या मोठ्यांना अगदी निक्षून सांगितले होते. ती असा काही पवित्रा घेईल असे घरच्या कुणालाच वाटले नव्हते. पण शिरीनने तिच्या समाजातील या बुरसटलेल्या प्रथेला विरोध करायचाच हे मात्र अगदी मनोमन ठरवले होते.


     शिरीन, बोहरा मुस्लिम समाजात जन्माला आलेली. खरं तर शिरीनची आई सोफिया मूळची ख्रिश्चन पण या बोहरा मुस्लिम समाजातील असलेल्या तिच्या बाबांच्या प्रेमात पडली अन् त्यांचीच झाली. लग्न होऊन आल्यानंतर सोफियाला नव्या परिवारात रुळतांना खर तर खूप जड गेलेलं. आता पर्यंत अत्यंत व्यक्ती स्वातंत्र्यवादी विचारात वाढलेली ती! अन् आताचे तिचे जीवन यात बरीच तफावत होती पण नवऱ्यावर निरातिशय प्रेम असल्याने सगळे निभावूनच नेत आली होती ती.

      

        कालांतराने संसारवेलीवर कन्येच्या रुपात एक चिमुकली कळी जन्माला आली. आयेशा नाव ठेवले तिचे तिने. पाठोपाठ दोन वर्षांनी शिरीनचा जन्म झाला. सोफिया व तिच्या पतीने घरच्यांचा विरोध पत्करून पाळणा इथेच थांबवायचा निर्णय घेतला. दोघीही लेकी हळूहळू मोठ्या होऊ लागल्या. आयेशा तेव्हा ६-७ वर्षांची असेल, घरात अगदी दबक्या आवाजात आयेशाची सुंता करण्याची चर्चा होऊ लागली. सोफिया ही ख्रिश्चन असल्याने तिला या प्रकाराबद्दल काडीचीही कल्पना नव्हती. त्यामुळे घरच्यांनी तिच्या नकळतच आयेशाची सुन्नत करण्याचा निर्णय घेतला.


      एक दिवस आयेशाची आत्या माहेरी आली असतांना चॉकलेट घेऊन द्यायच्या बहाण्याने तिला घेऊन गेली. ती तिला घेऊन गेली ते खतना करणाऱ्या बाईकडे. त्या बाईने तिच्याकडे असलेले धारदार सूरी नामक शस्त्र आयेशाच्या गुप्तांगाच्या एका विशिष्ट भागावरून फिरवले अन् काही कळायच्या आतच चॉकलेट ऐवजी अतिशय दुखऱ्या वेदना घेऊन आयेशा घरी परत आली. तिचे ते अतिशय रडणे, लघवीला गेल्यावर त्या वेदनांचे अतिशय वाढणे, तिच्या निकरवर असलेले रक्ताचे डाग पाहून सोफिया हबकलीच! नेमके काय झाले? तिला कळेना. आयेशाने मात्र झालेल्या प्रकाराबद्दल तिला मोडक्या तोडक्या शब्दात कल्पना दिली.

    

   सोफियाने मग सरळ नणंदेलाच याबद्दल जाब विचारला. सासू-नणंद दोघींनीही तिला त्यांच्या समाजात असलेली सुन्नतची प्रथा सांगितली व रिवाजाप्रमाणे सारे केले असे सांगितले. हे ऐकून सोफिया मात्र सुन्न झाली होती. आयेशाची परिस्थिती तर अजूनच गंभीर झाली होती. एक तर वेदनेने तिचे विव्हळणे अन् झालेल्या प्रकाराने तिचा आत्या, आजी आदी सगळ्यांवरचा उडालेला विश्वास. तिचे सतत सोफियाला चिकटून राहणे, तिचे उध्वस्त झालेले बाल भावविश्व याने सोफिया खूप हळवी झाली. ती लगोलग तिला स्त्री रोग तज्ञांकडे घेऊन गेली.


     त्यांनी सोफियाला सारा प्रकार समजावून सांगितला. सुन्नत किंवा खत्ना हा फक्त मुलांचा होतो एवढेच तिला माहित होते परंतु काही विशिष्ट मुस्लिम समाजात मुलींची पण खत्ना किंवा सुंता केली जाते. 


मुलींचा कामवासनेकडे लग्नाआधी ओढा जाऊ नये म्हणून मुलींच्या जननेंद्रियावरील बाह्य त्वचा एकतर काढली जाते. काही ठिकाणी तिथे असलेला clitoris नावाचा अवयव काढून टाकतात पूर्णत: किंवा अंशतः. कधी, कधी हा भाग शिवून छोटा सुद्धा केला जातो. आणि या सगळ्या गोष्टी अगदी अप्रशिक्षित हातांनी, अस्वच्छ पद्धतीने केल्या जातात. hygiene चे नाव दिले असले तरी याच्याशी याचा काहीच संबंध नसल्याचे डॉक्टरांनी सोफियाला सांगितले.


     आयेशाचे बदललेले भावविश्व बघून, तिला होणारा त्रास बघून शिरीनला मात्र सोफियाने या सगळ्यांपासून दूर ठेवले. आपल्या प्रेमाखातर आपण वाटेल ते सहन केले पण मुलींच्या बाबतीत सजग राहण्याचा निर्णय मात्र यावेळी सोफियानी घेतला. लहानगी शिरीन या साऱ्यांची साक्षीदार होती. पुढेही पाळीच्या वेळी आयेशाला होणारा त्रास. त्यांनतर आयेशाचे लग्न झाल्यानंतर ऐन समागमाच्या वेळी होणारी तिची कुचंबणा. त्यातून तिला मिळणारा आनंद उपभोगतांना येणाऱ्या अडचणी सारे सारे तिला बहीण म्हणून आयेशाकडून कळले होते. तिच्या भावविश्वाचा उडालेला गोंधळ आणि आईच्या सजगतेमुळे या साऱ्यातून वाचलेली ती!!!


 ऐन समागमाच्यावेळी शरीरातील उद्दिपित होणारे clitoris नामक अवयवाचा बळी देऊन काय साधले जाते? हा प्रश्न वारंवार तिच्या मनाला पडत होता. का स्त्रीला का मन नाही? तिला कां भावना नाहीत? की त्या सर्वोच्च क्षणाचा आनंद घेण्याचा तिला अधिकार नाही? हे सारे प्रश्न तिच्या मनाला नेहमीच सतावत होते. अन् आज जेव्हा तिच्या मुलींवर हा प्रसंग येऊ बघत होता तेव्हा मात्र तिने तिचा निर्णय अगदी ठामपणे सांगितला होता.


      कितीही विरोध करावा लागला तरी ती यासाठी ठामपणे लढणार होती. फक्त स्वतःच्या लेकीसाठी नाही तर इतरांच्याही लेकींसाठी! या प्रथेविरुद्ध शिरीनने आज अगदी रणशिंग फुंकले होते. येणाऱ्या मुलींच्या पिढीला या शारीरिक अन् मानसिक अवस्थेतून बाहेर काढण्यासाठी.....!

      

 (ही कथा समर्पित आहे सुन्नत विरुद्ध लढणाऱ्या त्या स्त्रियांसाठी. निशिरीन म्हणजे वरील कथेची नायिका आणि आणखी काही सन्माननीय स्त्रिया ज्यांनी मजल मारत हा लढा अगदी अंतिम स्टेजपर्यंत आणून ठेवला आहे.)


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational