'क्युट ' लफड !
'क्युट ' लफड !
नेहमीप्रमाणे मी मुडक्याच्या टपरीवर चहाचे घुटके घेत होतो. शाम्या आपला 'खारीचा ' वाटा संपवत होता. आत्तापर्यंत त्याच्या खारीनी दोन कप चहा पिऊन टाकला होता. तिसऱ्या कपात शाम्या शेवटची खारी मोठ्या तन्मयतेने बुडवत होता.
"सुरश्या, तुमच्या चहाचे बिल माझ्याकडे! मुडक्या मला कॉफी आण!" जमिनीत मुंडी खुपसलेल्या शहामृगासारखा, मोबाईलमध्ये खुपसलेली मुंडी तशीच ठेवून वश्या माझ्या शेजारी बसला.
०००
आता येथे वश्याचा अल्प परिचय करून देणे क्रमप्राप्त आहे. (जेसे जसे तुम्ही आमच्या सोबत रहाल तसे तसे त्याचा दीर्घ परिचय होईलच ! ) याचे नाव वसंत जोशी . आम्ही याला वश्याच म्हणतो. (आणि म्हणत राहणार . तो त्याच लायकीचा आहे ! ) तो भरमसाट किमतीचे कळकट कपडे घालतो. कारण तो स्वतःला आधुनिक (त्याच्या भाषेत मॉड !) समजतो. ठीगळाचे शर्ट , मुंडीछाट टी-शर्ट ,फाटक्या , विटक्या रंगाच्या जीनच्या पॅंटी , त्याच्या भाषेत 'कूल 'असतात ! आम्हाला, म्हणजे मला अन शाम्याला हा 'कंट्री'समजतो . आमच्या वश्याचे (आता मित्रच कि, मग त्याला परका तरी कस म्हणायचं? ) दोन वीक पॉईंट आहेत . एक हा मोबाईल आणि ..... बाईल ! म्हणजे हा थोडासा त्या बाबतीत हा .... आहे . हा कुठेही, कोणाच्याही , अन कसाही तो प्रेमात पडू शकतो ! (आज पर्यंत तो खूपदा पडलाय ! काही वेळेला गुडघे ,कोपर सडकून निघालेत ! पण गडी ऐकत नाही !) कोणती हि 'ती ' त्याला 'क्युट'च दिसते ! याबाबतीत तो काळ ,वेळ , वय (त्याचे आणि तिचेही !), प्रत्यक्ष ,अप्रत्यक्ष कसाही प्रेमात पडू शकतो . म्हणजे नुसत्या फोटो वरून सुद्धाप्रेमात पडू शकतो ! पण अजून पर्यंत याचा पदरी काहीच पडलेलं नाही . अन पडणार कस ? बहुतेक वेळेला त्याची 'एक तर्फी ' वाहतूक असते ! समोरून येणारी 'ती'दिसते ,त्याचाच दिशेने येत असते ,पण रोड डीव्हाडर मुळे ' ती 'भुरकून पास होऊन जाते !एकूण काय? तर,वश्याच्या 'सादा ' ला काही 'प्रतीसाद' मिळालेला नाही ! श्याम्याने याच्या जन्माच्या वेळीचा किस्सा सांगितलाय . वश्या जन्माला तेव्हा त्यानं भोकाड पसरलं म्हणे . काही केल्या थांबेना . डॉक्टरांनी हात लावल्यावर तर यान आपला स्वर अधिकच तीव्र केला ! पण जेव्हा जवळच्या तरुण नर्सने घेतले ,तेव्हा तो चटकन रडायचा थांबला ! शाम्या न ड्याम्बीस आहे . त्याने हा किस्सा वश्याच्या आईच्या नावावर बराच खपवला आहे !
"खरं सांगतो सुरश्या , हा किस्सा खरा आहे !मला काकूंच म्हणाल्यात ! त्यांनी अजून एक गम्मत सांगितलीय !"
"कोणती ?"
" लहानपणी वश्याला याची आजी गुटी घालायची . याचे आजोबा ,तिंबूनाना पण वल्ली . त्यांनी मुरुडशेंगे सोबत शिलाजीतची मुळी या गुटीच्या डब्बीत ठेवून दिली ! मग काय? रोज एक वेढा सहानेवर या मुळीचा पण पडायचा !म्हणून हा बालपणापासूनच बहकलाय !"
तुम्ही नका या शाम्याचा नादी लागू . येथे वश्याचे अल्प परिचय सम्पन्न होतंय .
०००
"काय वश्या आज एकदम 'करंट'मधी ? क्या बात है ?" शाम्याने नवीन खारी मागवत विचारले .
"यार ,आज आपण एकदम खुश मड मध्ये आहोत . "
"का ?काय झालाय ?"
मुडक्याने आणून ठेवलेला गरम कॉफीचा कप वश्याने तोंडाला लावला .
"आई SSS ग !"
वश्याचे असेचआहे . सगळे चहा घेत असतील तर हा कॉफी मागवतो . का? तर 'मी तुमच्या पेक्षा वेगळा आहे' हे दाखवण्या साठी ! त्याला चहा -कॉफी बशीने पिणे गावंढळ पणाचे वाटते ! नको ते करतो आणि फजित पावतो . आत्ता सुद्धा अदमास न घेता गरम कॉफीचा कप तोंडाला लावला आणि जीभ भाजून घेतली !
"वश्या , काय भानगड आहे ?" मी गंभीरपणे विचारल्यावर त्याची कळी खुलली .
"काय सुरश्या , तुला तर माहीत आहे !आपण कसे आहोत ते ! एकदम दिलदार !"
"मायला, सटी -सहामाही ला येतोस आणि चहाचे बिल दिले कि झालास का दिलदार ? बियर फियर पाज मग हवं तर दिलदार म्हणू !"शाम्या भडकला.
"शाम्या भडकू नकोस !आपल्याला वश्या नवा नाही ! हा, तू बोल वश्या . काय विशेष आहे ?का इतका खुश आहेस ?"
"काही नाही , नेहमीचंच ! गेल्या चार -सहा दिवसा पासून 'ती' सारखे मेसेज करतीयय !"थोडासा लाजत तरी आड्यातखोर पणे वश्या म्हणाला .
"कोण 'ती '?" शाम्याने खारीखाण्यातून सवड काढून विचारले .
"आहे एक ! स्वीट हार्ट !"
स्वीट हार्ट ! म्हणजे वश्याच ब्र्यांड न्यू लफडं !
"वश्या , काय ?काय ?डिटेल वार सगळं सांग ." शाम्याने इंटरेस्ट दाखवायला सुरवात केली . म्हणजे जे काय असेल त्याचा शाम्या पार इस्कोट करणार !
थोडक्यात बातमी अशी होती कि , रोज संध्याकाळी सात वाजता वश्याला एक मेसेज येतोय . I LOVE YOU ! I AM WAITING FOR U !फोन नंबर आणि सोबत एक ' क्युट' फोटो! आता पुढे काय करावे? या बद्दल आमचा ,म्हणजे माझा आणि शाम्याचा ,सल्ला घेण्या साठी वश्या येथवर आला होता !
"वश्या ,या लफड्यात पडू नकोस! हे खरे नसते !" मी माझे प्रामाणिक मत दिले .
"सुरश्या , तू न एकदा तिचा डिपी पहा ! मग बोल ! यार कसली क्युट ब्युटी आहे !"
"वश्या , तेथे कायपण टाकता येते ! या शाम्याने नाही का मारुतीचा फोटो डीपी म्हणून टाकलाय !"
"तू न खूप निगेटिव्ह आहेस ! ती माझ्या राजबिंड्या(हा हि एक वश्याचा स्वतः बद्दलचा भ्रम !) डी पी वर विश्वास ठेवून मला लव्ह करते . आणि तू म्हणतोस हे खर नसत ! मला खर कारण माहित आहे! तुम्ही माझ्या लक वर जळतय ! सुंदर पोरगी मिळतीय ,अन तीही या वसंताला !कस बघवेल ? तुम्हाला माझी प्रगती ,भरभराट पहावत नाही ! तुम्हाला मित्र म्हणायला मला लाज वाटते !----"
"वश्या ,नवटंकी बस झाली ! . मला तुझी काळजी वाटते म्हणून तुला सल्ला दिलाय !"
"वश्या , तू त्या सुरशाकडे नको लक्ष देऊस ! तो नेहमीच पुढे जाणाऱ्यांनचे पाय मागे ओढतो ! मला जर विचारशील तर -----"शाम्याने थोडा पॉज घेतला .
"तर -- तर काय ?"वश्याने अधिरतेने विचारले .
"तर मी हि हेच म्हणेन कि तू नको या लफड्यात पडू !"
"अरे पण का ?"
"का ?काय ? वश्या तुझ्यात ते डेअरिंग नाही ! तू ऐत्यावेळेस ढेपाळतोस !तुला सिचुएशन सांभाळता येत नाही !मागे माधवीच्या वेळेस असेच झाले होते !"
"काय झाले होते ?"
"विसरलास ? बागेत भेटायला बोलावले होतस तिला . बाप आणि भावाला घेवून आली ! शर्टाचे जावूदे बनियन फाटेस्तोवर बदडला होतो तुला त्यांनी ! मी अन सुरश्याने कशी बशी तुझी सुटका केली होती !"
" नको रे त्या वाईट आठवणी काढूस ! पण नेहमीच असे होत नसते ! बी पॉझेटीव !"
शेवटी शाम्या पण वैतागला .
"ते मरू दे . तुझ्या मानत काय आहे ?"शाम्याने विचारले .
"मी म्हणतो ट्राय मारावा !"
"मार ! पण वश्या आम्हाला वाटते तूच निर्णय घ्यावा आणि परिणाम हि तूच भोगावे !आम्ही त्यात नाहीत !"मी वश्याला निर्वाणीचा सल्ला दिला .
"वश्या ,तू नको सुरशाच एकू ! हाण फोन ! दाखव डेअरिंग ! कुठ भेटती विचार !"शाम्याने शेवटचा घाव घातला .
वश्याने फोन लावला . ठिकाण ,वार ,वेळ ठरली !
000
चार दिवसांनी वश्या ' देवदास ' होवून मुड्क्याच्या टपरीवर आला . त्याच्या चेहऱ्यावरून काही तरी सॉलिड गोची झाल्याचे स्पष्ट जाणवत हाते .
"काय वश्या भेटलीकारे ' ती ' ?" शाम्याने विचारले .
वश्या गप्पच .
"वश्या नसेल सांगायचे तर नको सांगूस ! बनियन शाबूत आहे ना ?"मी हळूच विचारले .
"सुरश्या तू अन शाम्या मला का छळताय ? साला मी कसल्या दुखाःत आहे ?ते विचारायचं सोडून चेष्टा कसली करताय ?"
"वश्या ,चिडतोस कशाला ? आम्ही तेच तर विचारतोय ? त्या दिवशी तू 'ती 'ला भेटायला गेला होतास का ?"श्याम्याने नरमाईचा सूर लावला .
"हो !"
"मग ' ती ' भेटली का ?"
वश्या पुन्हा गप्पच .
"मायला ,वश्या काय झाल त्यादिवशी हे तू नाही सांगितल तर ,आम्हाला कस कळणार ? अन आम्हाला नाही कळल तर आम्ही काय डोम्बल मदत करणार ?"श्याम्याचा आवाज थोडा वाढलाच . त्यामुळे झाले काय कि मुडक्या गल्यावरून ऊठला अन आमच्यात सामील झाला !
"तू तर बोलूच नकोस शाम्या !तूच 'कर डेरिंग'म्हणून भरीस घातलेस ! तिथच सगळा घोळ झाला !"
"हा खरय !मग काय करू ? नको म्हणतो तर तूच 'ट्राय मारतो ' म्हणालास ! अबे , पण पुढे झाल काय ते तर सांग ?"
"कसच काय ? तेथे गेलो तर -----"
"तर ?तर काय "
"मायला ,' ती ' एक तो दाढीवाला बाबा निघाला ! "
इतका वेळ, सत्यनारायणाची पोथी एकवी तश्या तन्मयतेने ऐकणारा मुडक्या टायर फुटल्या सारख हसला . त्याच हु SSS , हु SSS हसण बराच वेळ उसवत राहील . मी अन वश्या आश्चर्यचकित होवून हसत राहिलो . एखाद्या कॉल गर्लच झेंगट असाव असा आमचा कयास होता ,पण इथ तर ----वेगळच निघाल!
"गपा रे गधड्यानो ! काय गाढवा सारख खिदळताय ! "वश्या ओरडला .
पिन ड्रोप सायलेन्स झाला !
"वश्या आम्ही नकोच म्हणत होतो . तू ऐकल नाहीस . पण झाल ते झाल . आता आमच्या कडून तुझी काय अपेक्षा आहे ?" शाम्याने विचारले .
"शाम्या , मला न या LOVE U च्या मेसेज पासून सुटका पाहिजे !"
"मला बियर पाजणार ?"
"देतो !पण पुनःपुन्हा हा मेसेज यायला नको !"
"वश्या, अबे तो नंबर ब्लोक कर ना ! कशाला या शाम्याला बियर साठी सोकावून ठेवतोस ?"मी सजेस्ट केले .
"तू मला बेकुफ समजतोस काय ? दोन दिवसा पूर्वीच ते करून पाहिलं !"
"मग ?"
"मग ,काही नाही . दुसऱ्या नंबर वरून तोच मेसेज येतोय !"
आता मी हि कोड्यात पडलो.
शाम्या कसा काय इन कमिंग मेसेज थांबवणार ?
" तर मग ठरल ! बियर पार्टी ! काय वश्या ?"
"ठीक आहे !"मलूल आवाजात वश्याने कबुली दिली .
"वश्या ,आण तुझा तो मोबाईल . "
शाम्याने वश्याच्या मोबाईल वर मेसेज टाईप करायला सुरवात केली .
"HALLO, DARLING, I LOVE U TOO!! I HAVE A SPECIAL AND PERSONAL NUMBER FOR THIS SWEET PURPOSE! CONTACT ME ON THE FOLLOWING NUMBER ONLY, HEREAFTER!"
"वश्या , तुझ्या त्या टकल्या साहेबाचा फोन नंबर सांग !"
"ते ,बेन ,इब्लीस आहे !तुला कशाला त्याचा नंबर पाहिजे ?"
"पाय धू म्हणल कि धुवावे ! बाकी इचारू ने !"
वश्याने नंबर दिला . शाम्याने तो नंबर त्या मेसेज मध्ये घालून तो LOVE Uला फॉरवर्ड करून टाकला !
वश्या निघून गेला होता .
"शाम्या ही डोकेबाजी कशी काय जमती रे तुला ?"
"त्यात काय डोक्यालिटी ? तुला म्हणून सांगतो सुरश्या, हे SMS मलाच येत होते ! मीच वश्याचा नंबरवर डायव्हरट केले ! या पुढे सारे मेसेज वश्याच्या 'इब्लीस 'साहेबाना छळणार ! "
मी त्या दिवशी श्याम्यासाठी चहा -खारीची पार्टी दिली !