कवी कृष्णाजी
कवी कृष्णाजी
"आज आपल्या गावाचं नाव साऱ्या महाराष्ट्रभर प्रसिध्द झालंय. आमच्या गावाचे सुपूत्र श्री. कृष्णाजी हे महाराष्ट्रभरच नाही तर संपूर्ण देशभर होत असलेल्या मराठी साहित्य संमेलनां मध्ये गाजत आहेत. त्यांनी आत्ता पर्यंत चारशे साडेचारशे प्रमाणपत्र मिळवले आहेत. अशा व्यक्तीचा आपल्या गावातर्फेही सत्कार व्हावा, त्यांना योग्य तो मान सन्मान मिळावा यासाठी आज आपण इथे जमलो आहोत. मी आपल्या गावाचे प्रथम नागरिक, आपल्या ग्रामसंसदेचे प्रमुख, सरपंच गंगाधर पाटील यांना अशी विनंती करतो की, त्यांनी कृष्णाजी यांचे शाल श्रीफळ आणि मानपत्र देऊन सत्कार करावा." असे म्हणताच श्रोत्रृवृन्दातुन टाळ्यांचा कडकडाट झाला. मंचावर सरपंच, पोलीस पाटील, मुख्याध्यापक श्री लेणेकर गुरुजी,आणि सत्कार मूर्ती श्री कृष्णाजी एवढेच लोक होते. सरपंच बाजीराव पाटील उठून उभे राहिले. स्टेजच्या एका कोपऱ्यात शाल श्रीफळ घेऊन उभे असलेल्या पोऱ्याला जवळ बोलावलं. तोवर सत्कार मूर्ती श्री कृष्णाजी सुद्धा खुर्चीतून उठून समोरच्या बाजूला येऊन उभे राहिले होते. सरपंचांनी फुलांचा हार कृष्णाजीच्या गळ्यात घातला, शाल पांघरली, श्रीफळा सोबत एक पुष्पगुच्छ हातात दिला. फोटोग्राफरला फोटो काढण्यासाठी एक छानशी पोज दिली. पुन्हा एकदा टाळ्यांचा कडकडाट झाला. सरपंच आपल्या खुर्चीत स्थानापन्न झाले.
"मी आपल्या गावचे पोलीस पाटील, भाऊराव पाटील यांना अशी विनंती करतो की, त्यांनी आजच्या सत्कार मूर्तीला मानपत्र बहाल करावे. तत्पूर्वी त्या मानपत्राचं वाचन करावे."
पोलीस पाटील उठून उभे राहिले. "त्ये मानपत्र का काय म्हणतात त्येचं वाचन दुसऱ्यानं कोन्ही करावं. म्या तसंच बोललू तर चालंन ना?" (खरं म्हणजे पोलीस पाटलाचं अन् शाळेचं काहीच पटलं नव्हतं. त्यामुळं त्यांना अक्षर ओळख कधी झालीच नाही. त्यांना मानपत्र वाचायला सांगून सुत्रसंचालकाने मागच्या एका घटनेचा वचपा काढायचा प्रयत्न करून पाहिला. परंतु पाटलांनी तो मोठ्या हिकमतीनं अयशस्वी ठरवला. मानपत्र वाचायचं म्हणजे मोठ्ठंच अवघड काम. आपलं भांडं फुटू नये म्हणून त्यांनी मोठ्या शिताफीनं ते टाळलं.)
"हो चालंल की." असं म्हणत सूत्र संचालकाने पोलीस पाटलाच्या हातात माईक दिला.
"लोकहो, आपलं किसनराव आता मोठ्ठे कवी झाल्येत. मला आज लै म्हंजे लैच आनंद झाला. गर्वानं छाती फुगून छपन्न इंच झाली. आता पतूर सारं गाव त्यायला किशना, किशना, म्हणून हाक मारत व्हत्ये. त्या साऱ्याईला म्या ईनंती करतो की त्यायनी आता त्याला किशनाजी म्हणून बोलावं.आपल्या किशनाजीची अशीच परगती व्हत राहो अशी म्या त्या पांडुरगाच्या पायी परार्थना करतो. आपल्या किशनाजीला खूप खूप शुबेच्छा देतो. आणि म्या आपली जागा घितो." असं म्हणत पोलीस पाटील आपल्या खुर्चीत जाऊन बसले. पुन्हा एकदा टाळ्या.
"आपल्या गावचे उपसरपंच गणपतराव यांना मी आमंत्रित करतो, त्यांनी कृष्णाजींचा शब्दसुमनांनी सत्कार करावा. उपसरपंच गणपतराव यांनी कृपया स्टेजवर यावे." असं म्हणत सुत्रसंचालकाने हातातला माईक स्टँडवर जोडून ठेवला.
समोरच्या रांगेतल्या एका खुर्चीतून उपसरपंच उठले, आपले कपडे झटकले. धोतराचा सोगा एका हातात धरून दमदार पावलांनी चालत स्टेजवर चढले. 'पुढचा सरपंच आपणच' हा त्यांच्या मनातील भाव त्यांच्या प्रत्येक पावलावर जाणवत होता.
"माननिय पोलीस पाटील, आपले आवडते सरपंच, आपल्या शाळेचे हेडमास्तर लेणीकर गुरुजी, (हेडमस्तरांचे नाव लेणेकर असूनही त्यांचा लेण्यांचा अभ्यास दांडगा असल्यामुळे उपसरपंच त्यांना लेणीकर याच नावाने हाक मारायचे.) आणि गावातल्या म्हाताऱ्या कोताऱ्या, तसेच जान जवान मंडळी हो, आपलं किसनराव लई मोठ्ठ झालं. त्याबद्दल त्याह्यचं खूप खूप अभिवादन. (अभिनंदन आणि अभिवादन याच्यातला फरक बोलणाराला आणि ऐकणाराला कुणालाच कळला नाही.)
किसनराव, तुम्ही आसंच लिहत राहा. नव्या पिढीला तुमच्या शब्दाईचे आमरुत पाजत राहा. मंडळी, त्येयच्या शब्दात लै म्हंजी लै जादू हाय. ती जरा कमी करा बरं. हाव ना मागच्या येळला त्याह्यची पिर्मावरची कविता वाचून पाटलाचं पोरगं आन सरपंचाची पोरंगीच पळून गेले. (उपसरपंचाच्या या वाक्यावर सरपंच आणि पोलीस पाटील उपसरपंचाला खाऊ की गिळू नजरेनं पहात होते. पण समोरच्या पब्लिकला बघून ते चूप बसले.) म्हणून म्हणतो, अशा कविता परीस दुसरं काय तरी लिहीत जावा. लै ईशय हायेत की लिव्हायला. लिव्हा खुप लिव्हा. माह्या साऱ्या परिवाराच्या बख्खळ शुबिच्या तुमच्या पाठीशी हायीत. कायबी काळजी करू नका. जय हिंद जय म्हाराष्ट्र!" असं म्हणत त्यांनी आपली खुर्ची गाठली.
"धन्यवाद गणपतरावजी, आता मी आपल्या गावच्या शाळेचे हेडमास्तर लेणेकर गुरुजींना मानपत्र वाचन करण्यासाठी आमंत्रित करतो. त्यांनी येऊन मानपत्र वाचन करून कृष्णाजींचा यथोचित सन्मान करावा. ही आमच्या सर्व गावकऱ्यांतर्फे विनंती. लेणेकर गुरुजी, या." सूत्र संचालकाने माईक गुरुजींच्या हातात सुपूर्द केला. पुन्हा एकदा टाळ्यांचा कडकडाट झाला. समोरच्या खुर्चांच्या मागे बसलेले पोरं पोरी टाळ्या वाजवण्यासाठीच असतात. इशारा केला की वाजव टाळी. अशा जय्यत तयारीत ते बसलेले असतात.
आपले नाव पुकारताच टापटीप कपड्यातील लेणेकर गुरुजी हातात माईक घेऊन मंचावर उभे राहिले. त्यांच्या समोर एक काचेच्या फ्रेम मध्ये मढवलेले मानपत्र गुरुजींना त्यावरील अक्षरे वाचता येतील अशा प्रकारे धरून इतर दोघेजण उभे राहिले. गुरुजी वाचू लागले. ....
"माननीय, आदरणीय, सन्माननिय, वंदनीय, पूजनीय (सन्मानदर्शक शब्द जेवढे जेवढे आठवतील तेवढे त्या मानपत्रावर लिहून टाकलेले होते.) आपल्या गावचे भूषण, आपल्या गावचे रत्न श्री. कृष्णाजी, उर्फ किसनराव, आपण आपल्या गावाचे नाव महाराष्ट्रभर गाजवत आहात. त्या बद्दल गावाला आपला अतिशय अभिमान वाटत आहे.
आपण जी गीतं लिहिता, कविता लिहिता, पोवाडे रचता, ती सारी आपल्या तरुणांच्या ओठावर सदैव रुळत राहतात. आपल्या शब्दांमध्ये एवढी जादू आहे, की प्रत्येकाला ती रचना आपली वाटते.
आपण यापुढेही अशीच आई सरस्वतीची सेवा करत राहावी. या साठीचा हा सारा खटाटोप केला जात आहे.
अभिमान वाटावा अशी आपली कामगिरी आहे. म्हणून आज सर्व गावकऱ्यांनी आपापल्या खिशाला कात्री लावून या सत्कार कार्यक्रमासाठी आपापले योगदान दिले आहे. (यात सत्कारमूर्ती कृष्णाजींचाही फार मोठा वाटा होता. हे वेगळं सांगणे न लगे. त्यांनी उसनवारी करून या सत्कार कार्यक्रमा साठी स्टेजला लागणारा खर्च देण्याची तयारी दर्शवली होती.)
आपण गावकऱ्यांनी केलेल्या या सत्काराचा स्वीकार करून आम्हाला उपकृत करावे. ही नम्रतेची विनंती." टाळ्यांच्या कडकडाटातच कृष्णाजीने ते मानपत्र स्वीकारले. कृष्णाजीच्या पत्नी लक्ष्मी मोठ्या अपेक्षेने कार्यक्रमाकडे पहात होती. आजही मानपत्रा सोबत एखादे पाकीट मिळेल अशी तिला अपेक्षा होती. तसे काही दिसले नाही म्हणून ती नाराज झाली होती. मानपत्रा सोबत शाल, श्रीफळ आणि पुणेरी पगडी सुद्धा दिली गेली होती. पण या साऱ्यांचा तिच्या संसाराला काय उपयोग होणार होता? तसंच मनाला मारून नाराजीनेच ती घरी आली.
"धन्यवाद गुरुजी. यानंतर मी आजचे सत्कार मूर्ती श्री कृष्णाजी यांना अशी विनंती करतो की, त्यांनी आपले मनोगत व्यक्त करून एक छानशी कविता ऐकवावी." सूत्रसंचालक.
"आदरणीय गुरुजी, पोलीस पाटील, सरपंच, उपसरपंच, तसेच आजच्या कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन करणारे सूत्र संचालक श्री. दामोदर पंत, आणि माझ्या गावकरी बंधू, भगिनींनो, सर्व प्रथम आपण सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो. मला आजवर चारपाचशे प्रमाणपत्र मिळालेत. शेकडोने माझे सत्कार झाले. परंतु आज खऱ्या अर्थाने मी कृत्य कृत्य झालो. गावच्या माता पित्यांचे प्रेम आजच्या सत्कारातून मिळाले. तुमच्या प्रेमाची ही ऊब मला पुढील वाटचाली साठी खूप प्रेरणा देत राहील. यात शंकाच नाही. यापुढेही असेच प्रेम राहू द्या. एवढीच अपेक्षा व्यक्त करून माझे दोन शब्द मी संपवतो." त्याने असे म्हणताच पब्लिकमधून "कविता sss, कविताsss" असा एकच जल्लोष उठला.
"आपल्या प्रेमाने मी खूपच भारावून गेलो आहे. त्यामुळे आज शब्द सुचने अशक्य वाटते. आपला आग्रह मोडवत नाही. म्हणून मी आपल्या समोर एक चारोळी ठेवतो. तेवढी गोड मानून घ्यावी. ही विनंती."
सदोदित तुमचे प्रेम मिळत राहो
ही घडी नेहमी अशीच येत राहो
लिहीत राहीन कविता पोवाडेही
प्रेम तुमचे नित्य प्रेरणा देत राहो
टाळ्यांच्या आवाजात श्री. कृष्णाजी खाली बसले. त्यानंतर श्रोत्यांच्या उठून जाण्याच्या घाईतच आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम उरकण्यात आला. आणि सर्व पब्लिक उठून गेल्यावर स्टेजवरील चार पाच लोकांसाठी चहापानाचा कार्यक्रम झाला. आणि सर्वजण आपापल्या घरी निघाले.
इकडे कृष्णाजीच्या घरी त्यांची पत्नी लक्ष्मी स्वयंपाक करायला लागली. 'या मानपत्रानं काय पोट भरणार आहे का? काय म्हणावं या माणसाला? जेव्हा पाहावं तेव्हा हातात कागद आणि पेन घेऊन बसायचं. कवडीचं काम करायचं नाही. अशानं कसं घर चालायचं? असं वाटतं की, सटकन सोडून द्यावं अन् निघून जावं माहेराला. पण तिथं जाऊन तरी काय उपयोग? तिथं काय जन्मभरा साठी थोडंच राहता येतं?' लक्ष्मी विचार करत होती. मनाची नुसती घुसमट होत होती. त्याची मिळकत तर काही नव्हतीच उलट संमेलनांना जाण्या साठीचा खर्च मात्र खिशातूनच होत होता. त्यातून आर्थिक परिस्थिती आणखीच बिघडत चालली होती. कृष्णाजीला समजत नव्हतं असं नाही. पण संमेलनाचा मोह मात्र सुटत नव्हता. 'मी पण काय विचार करत बसले? त्यांचा एवढा मोठा सत्कार झाला. दिवसभर कार्यक्रमाच्या रामरगाड्यात जेवण झालं नाही व्यवस्थित. आता तरी जेवायला करायला पाहिजे ना. थोडंस काही तरी गोड धोडही करायला पाहिजे.' घरात जे असेल ते घेऊन काय करता येईल ते तिने बनवले. शिरा करण्यासाठी रवा नसल्यामुळे तिनं गव्हाचंच पीठ भाजलं आणि त्यात साखर घालून त्याची लापशी बनवली.
कृष्णाजी खुशीतच घरी आला. आपल्याच गावात आपला सत्कार होणे. फार मोठी गोष्ट होती. एखादी व्यक्ती महान बनते तेव्हा चहू बाजूला प्रसिद्धी मिळते, परंतु गावाला त्याचं काही फारसं सोयर सुतक नसतं. गावा साठी ती एक साधीच व्यक्ती असते. मात्र जेव्हा चहू कडून प्रसिद्धीच्या बातम्या यायला लागतात तेव्हा गावाला त्या व्यक्तीचा अभिमान वाटायला लागतो. तसंच कृष्णाजीच्या बाबतीतही घडलं. सगळीकडून कौतुकाची थाप मिळते पण आईची, बापाची कौतुकाची थाप पाठीवर पडल्यावर जसं कृत्यकृत्य होतं, तसं आज त्याच्या जीवनात घडलं होतं. घरात आल्यावर त्यानं ते मानपत्र देवहऱ्या समोर ठेवलं. लक्ष्मीला सोबत घेऊन त्याची पूजा केली आणि ते भिंतीवर लावण्या साठी जागा शोधू लागला. भिंतीवर कुठेच जागा सापडली नाही.
"अहो, आणा ते इकडं. नंतर लावा. आधी जेवण करून घ्या. भूक नाही का लागली? दिवसभर काहीच खाल्लं नाही." लक्ष्मीने ते मानपत्र त्याच्या हातातून घेऊन पुन्हा देव्हाऱ्यात ठेऊन दिलं. तो हातपाय धुवून येऊन बसला. तिनं ताट वाढलं.
"अन् तुला? तुला नाही का जेवायचं?" एकच ताट वाढलेलं पाहून त्यां विचारलं.
"मी जेवले आत्ताच. खूप भूक लागली होती मला. तिनं खोटंच सांगितलं. कारण घरात जेवढं होतं. तेवढ्यात केवळ एकच माणूस जेवू शकत होतं. त्यानं पोटभर जेवण केलं आणि हात धुवून मोडलेल्या पायाच्या जागी विटांचा आधार असलेल्या पलंगावर बसला. तिनं आवरा आवर केली आणि त्याच्या जवळ येऊन बसली.
"अहो, या लोकांनी सत्कार तुमचा केला, माझा ऊर भरून आला. पण एक गोष्ट विचारू का ? राग नाही ना येणार?" लक्ष्मीने विचारलं.
"विचार ना. तुझा राग धरून कसं परवडेल मला?" त्यांनं परवानगी दिली.
"मी काय म्हणते, या मानपत्राला बनवायला आणि मढवायला बराच खर्च येत असेल नाही?"
"हो ना. तो सगळा मजकूर एखाद्या चित्रकारा कडून लिहून घ्यावा लागतो, नंतर तो मढवणे, त्याच्या सोबत शाल, श्रीफळ, पगडी असा बराचसा खर्च येतो. पण तो करावाच लागतो." त्यानं माहिती पुरवली.
"मला काय वाटतं, एवढा खर्च केल्यापेक्षा खर्चाची ती रक्कम त्या सत्कार मूर्तीच्या हातात दिली तर? बरं नाही का होणार? त्याच्याही घराला थोडाफार हातभार लागेल. नाही का?" तिच्या या निरागस विचारावर मात्र तो निरुत्तर झाला. त्याच्या मनाची घुसमट त्यालाच माहीत होती.
********
