Vishal Potdar

Children

3  

Vishal Potdar

Children

कुरडई

कुरडई

4 mins
166


उन्हाळी सुट्ट्या मस्तपैकी हसत, खेळत, लोळत घालवणे सुरू होते. दुपार होत आली. मोहित आणि सुजय सोसायटीच्या पार्किंगमध्ये क्रिकेट खेळत होते. तिथे जवळच उन्हाच्या जागेत कदमआजीनी कॉटवर प्लास्टिक कागद टाकून त्यावर कुरडया घातल्या होत्या.


"आजी काळजी करू नका हं.. तिकडे बॉल येऊ देत नाही." सुजय.


"किती शहाणी बाळं आहेत ती.!" आजी.


पक्षी किंवा कुत्री वगैरे कुणीतरी त्यात तोंड घालेल म्हणून, आजी जातीने तिथे पाळतीला बसल्या होत्या. कधी एकदा त्या तिथून जातात आणि आपण एक-दोन तरी त्या ओलसर, खारट- खारट कुरडया गट्टम करायच्या, असा डाव त्यांच्या मनात पक्का झाला होता. कदम आजींना आता वरती त्यांच्या फ्लॅटमध्ये जायचं होतं. 


"पोरांनो, मी जरा वर जाऊन पडते बरं.. म्हातारीला आता जास्त वेळ कुठे बसवतं. थोडं बसाल का इथे. जरा नजर ठेवा, कुणी खाल्ल्या बिल्ल्या तर."


"हो आजी.. पाहतो ना थोडा वेळ." सुजय मोहितकडे विजयी नजरेने पाहू लागला. 


आजी जशा गेल्या रे गेल्या तेवढ्यात, दोघांनी दोन कुरडयांवर डल्ला मारला. मोहित दुसरी कूरडई चवीने खाणारच, इतक्यात त्याला त्याची आई येताना दिसली. ती नजरेस पडली रे पडली, तोच त्याने ती कुरडई अख्खी तोंडात कोंबली. 


"मोहित, बास आता खेळ.. सुटी आहे म्हणून भर उन्हात खेळायचं नाही. चल आधी वर."


आईला कळू नये म्हणून मोहितने तिच्या मागोमाग चालत कुरडई तोंडातल्या तोंडात संपवली. त्याला ती चवीने हळूहळू खायची होती, पण आईमुळे त्याला कुरडईचा आस्वादच घेता आला नाही. 


दुसऱ्या दिवशी आई म्हणाली, "मोहित~~ ओल्या कुरडया कोणाला हव्यात?"


"कुठायत? कुठायत... मला दे.." मोहित हॉल मधून धावतच आला. 


"अरे अशा रेडीमेड मिळतात का? बनवाव्या लागतात त्या."


'रेडीमेड मिळतात ना, दुसऱ्यांनी वाळत घातलेल्या.' मनात आलेलं हे वाक्य मोहितने आईसमोर येण्याआधीच गिळलं.


"बघ... मला जर करायला मदत केलीस तर हव्या तेवढ्या कुरडया खाऊ शकतोस."


"खरं?" रोहित मनसोक्तपणे कुरडया खातोय अशा स्वप्नात रमला.


"मी खोटं बोलेन का माझ्या बाळाशी. करणार ना मदत?"


"हो~~ सुजयला पण बोलवू?"


"बोलाव ना.. त्यालाही देऊ आपण.."


"तर हे बघ... हे गहू.. भिजत घाल बरं. पाणी ओतताना दाखव. मी सांगते किती घालायचं."


मोहितच्या एका हाकेत सुजय पळत आला आणि दोघांनी एका पातेल्यात गहू भिजत ठेवले. 


"आई.. किती मिनिट ठेवायचे?" 


आई हसली.. "अरे मिनिटात काय विचारतोस? दिवस विचार. तीन दिवस ठेवायचे."


"का~~~य? ती~~~न? इतके?"


"हो मग.. कदम आजी पण इतकेच वेळ ठेवतात. त्यांनीच शिकवलंय मला."


मोहितला तीन दिवस कधी जातात असे झाले होते. तो सारखा येऊन त्या गव्हाकडे पाहायचा.


"अरे सारखं पाहून काय होणारेय?" आई.


"दोन दिवस झाले ना.. पुढचं करू न आता. त्याला काय होतं एका दिवसाने?" मोहित.


"अरे बाळा.. लगेच होत असतं तर आम्हाला काय हौस आहे का उगाच तीन दिवस वाट पाहण्याची." 


कसेबसे तीन दिवस सरले. मोहित आणि सुजय आईपुढे हजर.


"काकू.. आता काय करायचं पुढे.." सुजय.


"आता ते मिक्सरमधून काढून घेऊ. मी करते हे."


मोहितचे बाबा आणि आजीला कळत नव्हतं की या पोरांना साधा चहा जमणार नाही, तिथे मोहितची आई का हा कुरडईचा शिवधनुष्य त्यांच्या हाती का कोंबत असेल. तरी प्रेक्षक म्हणून त्यांची मजा घेणे सुरू होते.


"मग आता झालं हे तयार?" सुजय.


"अरे... अत्ता तर अर्धं काम झालंय..?"


"अजून अर्धं बाकीय??" मोहितने डोळे विस्फारले.


"अरे मग... सोपं काही असतं का? खाताना कसं आपण.. एक सेकंदात जिभेवरून पोटात स्वाहा करतो आपण. अजून त्याचा चीक पिळून काढायचा. चिकाचे पाणी गाळून घ्यायचे. पुन्हा ते पाणी एक रात्र तसेच ठेवायचे."


"अजून एक रात्र?" मोहितचा संयम संपत चालला होता.


"हो~~ त्यानंतर मग ते मीठ घालून गरम करायला घ्यायचं. जोपर्यंत घट्ट होत नाही तोपर्यंत घोटत राहायचं. घोटत म्हणजे हलवत राहायचं. आणि मग ते शिजले की कुरडई करायचे पीठ तयार झाले."


मोहितला काहीतरी उमजू लागलं होतं. त्याचा चेहरा थोडासा विचारात पडू लागला.


"मला तर विज्ञानाच्या अख्ख्या पुस्तकात जितके प्रयोग आहेत तितके एकदम ऐकल्यासारखं वाटलं. कदम आज्जीनीही एवढं सगळं केलं असेल का गं? काल त्यांनीही कुरडई वाळवायला घातली होती."


"हो... अर्थात.. " 


"मग एवढा त्रास कशाला घेतात त्या? त्यांना नीट पायऱ्याही चढायला उतरायला येत नाहीत."


"करण्याची आवड असते ना.. तेव्हा तो त्रास नाही, तर हवीहवीशी गोष्ट वाटते. आणि माहीतीय? उलट त्या तर सगळ्या प्रकारचं तळण मुद्दाम जास्त प्रमाणात करून त्या सर्वांना थोडं थोडं देतात."


"तुला ओली कुरडई आवडते ना. हे बघ आजच्या घाण्यातलं थोडं पीठ आणून दिलंय तुझ्यासाठी."


आईने त्याच्या हातात कुरडईच्या चिकाची वाटी दिली. मोहितने सूजयकडे पाहिलं. दोघेही वरमले होते. मोहितने आईला मिठी मारली.


"आई..सॉरी... मी आणि सूजय ने...."


"माहीतीये मला.. आईच्या नजरेतून काही सुटत नसतं. आणि तोंड फुगेपर्यंत भरलेली कुरडईतर अजिबात नाही."


"पण इट्स ओके... तुला कळलं ना काय चुकलं ते.. बस्स.."


"मग काय करायला हवं होतं गं? आम्ही मागितलं असतं आणि त्यांनी नाही म्हटलं असतं तर?"


"नाही तर नाही... त्यात काय एवढं? असं खाली बघायला लागलं नसतं ना तुला.. काय माहित? कदाचित उलट अजून एखादी जास्तच कुरडई तुमच्या हातावर टेकवली असती त्यांनी. आणि बाळांनो तुम्हाला हेही वाटेल. की यात काय एवढं, एकच तर कुरडई घेतलीय. लाखोंचं नुकसान थोडीच केलंय आम्ही. पण त्या एकामागचे कष्ट पाहिलेस ना तू. ते कष्टही चोरलेस त्यांचे. चोरी एक रुपयाची की लाखो रुपयांची. चोरीच ती.!"


मोहितला चूक कळून आली होती. चेहऱ्यावर दोन क्षण वैचारिक भाव आणून आईला म्हणाला,


"आई~~~ एक काम करूया का गं.. ? आपण करून देऊया थोड्या कुरडया कदम आज्जीनांच! सरप्राईज देऊ त्यांना."


मूल एक पाऊल अजून समजूतदार झालं होतं. आई डोळ्याच्या कडा पाणावल्या. आणि कुरडया घेताना कदम आजींच्या चेहऱ्यावरचा आनंद अत्ताच दिसू लागला.



Rate this content
Log in

Similar marathi story from Children