Vishal Potdar

Drama

3.1  

Vishal Potdar

Drama

पिठातली दुर्गा (रंग पांढरा)

पिठातली दुर्गा (रंग पांढरा)

6 mins
415


"अप्पा , फक्त ५०० रुपये द्याना."


"काय करायचं गं एका दिवसाच्या नखऱ्याला पाचशे रूपय." आईने मधेच निकाल दिला.


"गौरे... अगं मागची धा दिवस गिरणीचं नखरं चाललीत. एक पण दळण झालं का सांग. आज कुठं सुरवात होतीय. पुढच्या महिन्यात देतो पाचशे काय सहाशे रुपय." अप्पा.


"पण अप्पा आजच पांढरा रंग आहे ना. पुढच्या महिन्यात घेऊन काय करू. माझ्याकडं सगळ्या रंगाचे ड्रेस आहेत. पांढराच टॉप नाही. कशी मी वेगळीच दिसेन सगळ्यात." 


"काय नका देऊ. कसंकसं पैसं ठेवायचं महिन्याची गाठ घालायला आणि ह्यांना फॅशन करायचीय. काय नसतं ते रोजचा कलर बिलर.. नवरात्री म्हणजी काय तुमचं ते काय फॅशन शो आहे काय. लुटायचं डोहाळं नुसतं. असं पैसं उडवायचं आसल तर राहू दे कॉलेजला जायचं." आई काही अप्पांना या पोरीच्या घळी पडू देणार नव्हती.


आप्पानी तिच्याकडं प्रेमानं पाहिलं.


"गौरा... नाय बरं पैसं. हजारच हायत ते उपेगी येतील महिनाबर. आज कुठं गिरण एकतर चालू होतीय. आपण दिवाळीत घेऊ."


गौरीची नुसती तणतण झाली. गौरी... नुकतीच अंगाने लखलखत्या तारुण्यप्रदेशात प्रवेश केलेली मुलगी. मेहंदीच्या रंगाचे तपकिरी डोळे आणि नाक अगदी तिच्या अप्पांसारखं सरळ. चेहऱ्यावर नैसर्गिकरित्या एक जिव्हाळा दिसून येई. तशी समजूतदार पोर. पण नुकतेच इंजिनिअरचे पहिले वर्ष सुरू झालेले. अप्पांची गिरणीतून जेमतेम कमाई असल्याने, आजपर्यंत तिची प्रत्येक हौसमौज मनातच झाली होती. इंजिनिअरिंगचा खर्च वाढल्याने तर घरी काहीच पैसा वाचत नव्हता. यात नवरात्रीमधल्या रंगांचे ड्रेस विकत घेणे म्हणजे खूप मोठी गोष्ट होऊन बसली होती. समजूतदार असली तरी हे मखमली वय सध्या तिला शांत राहू देत नव्हतं. वणव्याची ठिणगी कुठून बाहेरून येत नाही. झाडांच्याच फांद्यामधूनच येते. आणि वणवा मात्र त्या झाडासकट सगळं राख करत जातो. हीच बंडखोरी या वयात वाढत राहते. हल्ली तिच्या मनात चमकून जायचं. आई आप्पा का गरीब राहिले असतील? ती अनू... तिच्या घरी गेलं तर आता तिला मत्सर होऊ लागायचा." प्रशस्त घर, सुंदर फर्निचर, शॉपिंग करताना आपल्याकडे पैसे किती शिल्लक आहेत हे पाहावे लागत नाही. हेच स्वातंत्र्य मी लहानपणापासून मिस केले का? आई अप्पांचं प्रेम आहेच पण पैसे? जाऊ दे.. असंच पुढेही मन मोडून जगायला शिकायला हवं. नवरात्रीच्या रंगातून मिळतो काहीतरी वेगळं खरेदी करण्याचा, स्वतःला नव्या रंगात पारखण्याचा आनंद. आईला कशाचं कळणार हे.!" मनाच्या खेळातून बाहेर आली आणि अप्पांशी त्वेषाने बोलू लागली.


"दिवाळीत तर घ्यायचाच होता आप्पा. मी आजचं बोलतेय. जाऊ दे. आज जातच नाही कॉलेजमध्ये उगीच गटात वेगळा शब्द दिसण्यापेक्षा.! "


"माझे गौराक्का... असं न्हाय रुसायचं. बरं जाऊ दे. हे घे."


अप्पांना खिशातून पाचशेची नोट काढताना तो पूर्ण मोकळा झाल्याची जाणीव झाली. त्यांना कित्येकदा हा प्रश्न पडायचा की नक्की खिशाला भोक पडलंय की नशिबाला. की आपलं कर्तृत्वच फक्त जेवढ्यास तेवढा संसार चालवण्याइतका आहे. आपले दोस्त काय काय व्यवसाय करून मोठे झाले. आणि आपण पिठं दळतोय. कित्येक वर्ष दळण चालूच आहे परिस्थितीचं आणि बायको पोरीचीही परवड.


"काय बाप नुसता भुलतो पोरीने तोंड बारीक केलं की. ही पण शहाणी शहाणी पोरगी म्हणत आता कॉलेजला गेली की फुशारल्या नुसती." आपलं तोंड सोडून आई तणतणत बाहेर निघून गेली. 


पण ती कितीही काहीही बोलली तरी गौरी आज मनासारखे करणारच होती. "दुपारी कॉलेजमध्ये जायचं तर अनूसोबत कपड्याच्या दुकानात जायला हवं लवकर." तिचा मनातल्या मनात हिशेब सुरू झाला. काल शिंदेंनी दहा किलोचं दळण आणून ठेवलं होतं. अप्पा ती पिशवी उजव्या हातांनी उचलू लागले आणि क्षणात त्यांच्या चेहऱ्यावर वेदना पसरल्या. प्रचंड वेदनेने त्यांनी क्षणभर डोळे मिटलेले गौरीने टिपले आणि तिच्या काळजात धस्स झालं. 


"अप्पा काय झालं?"


"काय नाय गं. जरा खांदा दुखतूय. परवा गिरणी दुरुस्ती चालली होती. जातं काढून फळीवर ठेवलंवतं. उठताना ते जातं लागलं ना खांद्याला."


असं म्हणून पिशवी डाव्या हाताने उचलली आणि शेजारच्या खोलीतल्या गिरणीत निघून गेले. गौरीला क्षणभर अप्पांची दयाच आली. आपल्याला काही झालं तरी दुखणं सांगणार नाहीत हे अप्पा.


या सगळ्यात दहा वाजले होते आणि तिला पटकन निघायचं होतं. तिने साधाच तपकिरी रंगाचा टॉप चढवला. आरशाला तोंड दाखवून स्वतःकडे स्माईल वगैरे केली. आणि अनूला फोन लावून निघतेय म्हणून सांगितले. 


तिची आई शेतात मजुरीला गेली होती, त्यामुळे घराबाहेर येऊन कडी घालून कुलूप घातले. चावी अप्पांना द्यावी म्हणून गिरणीबाहेर आली. गिरणीला असे कपड्याची घडी घालतो तसे फोल्डिंगचे दार होते. अप्पानी ते बऱ्यापैकी बंद करून एकच फळी उघडी ठेवली होती. गौरी दाराशी येण्याआधी ती फटीतून सहज नजर मारली. गिरणीचा पट्टा आवाज करत धावत होता. तो आवाज तिला नेहमीच आवडायचा.


अप्पा डाव्या हाताने पिशवी उचलत होते परंतु गिरणीच्या तोंडात ओतताना मात्र उजवा हात लावावा लागायचाच. त्यावेळी मात्र चेहऱ्यावर पुन्हा वेदना. पुन्हा ती कळ दिसायची. खूप खटपट करून काम चालू होतं. पण इतक्या दिवसांनी गिरण चालू झाल्याचा आनंदही चेहऱ्यावर होता. दळण चालू होतं. उडणारं पीठ हवेत सामावलेलं होतं. त्यांच्या मिशीवर आणि केसांच्या टोकाला पिठाचे कण येऊन बसले होते. गौरीला तिथून हलू वाटलं नाही. मघापासून दिवसातले पुढचे क्षण डोक्यात घुमत होते. ते जाऊन ती काळात मागे जाऊ लागली. तिला फ्रॉक घातलेली, अप्पांच्या कमरेला लागणारी इवलीशी गौरी दिसली. अप्पांच्या मिशीला आणि केसांना पीठ लागलेले पाहून टाळ्या पिटत उड्या मारत होती.


"अप्पा तुम्ही म्हातारे झालात. अप्पा म्हातारे.!" 


"ए येडाई... तूच आजीबाई आहेस माझी." असं म्हणून अप्पांनी थोडं पीठ घेऊन तिच्या गालावर लावले. ती अजूनच खुलली आणि अप्पांच्या अंगावर पीठ उडवून पळून गेली. अप्पा अगदी खळाखळा हसत होते.


गौरीने आता पाहिले तर समोर खरंच म्हातारे अप्पा होते. मिशी आता पीठाने नाही तर खरोखर पांढरी झाली होती. तिला हे इतके वर्ष जाणवलेही नाही. 


"अप्पा कधी म्हातारे झाले? मी मोठी होताना कुठेतरी त्यांचं दळण चालूच होतं. मला खांद्यावर घेऊन जत्रेत दिवसभर फिरणारे अप्पा. आता त्यांची हालचालही आता मंदावली होती. मला का दिसलं नाही हे सगळं. कुठे होते मी. पाय फुटले आणि त्यांच्या खांद्यावरून उतरले. नंतर फक्त आपल्यासाठी गरजा भागवायची गिरण झाले ते."


विचार करत करत ती दाराला टेकली. आता या वयात रडणं शोभत नाही म्हणून की काय कुणास ठाऊक. आत कुठूनतरी बाहेर पडू बघत असलेला हुंदका अडकून थांबला होता. तिने अनूला शॉपिंगला येत नसल्याचा मेसेज केला. दार उघडले. आणि गिरणीत आली.


"का गं गौरा.. गेली नाहीस अजून. सकाळपासनं ड्रेसचा जप चालू होता आणि तू हीतंच"


गौरी आत आली आणि अप्पांच्या घामाने चिकट झालेल्या खांद्यावरून हात फिरवला. 


"नाय गं लय लागलं. होईल बरा."


"मरूदे तो ड्रेस. मला दिसत नाही का किती लागलंय? सुजलाय बघा कसा. बसा बरं बाजूला. गव्हाची बारी चालूय ना. किती राहिलीत दळणं?" 


"चारच हायत. जा बरं तू. कॉलेज हाय ना."


"तुम्हाला म्हटलं ना बाजूला बसा." तिने डोळे मोठे करून हुकूम केल्यावर अप्पा बाजूला झाले.


तिने भरल्या मनानेच पुढची दळणे टाकायला घेतली. अप्पा समाधानाने पोरीकडे बघत होती. छोटीशी येडाई आता त्यांच्या कामाला हात लावत होती. वयोमानानुसार माणसाची ताकद कमी होते. पण त्या कमी झालेल्या ताकदीने एक जीव घडलेला असतो. 


तीन दळणे झाली आणि चौथ्या दळणाची छोटी पिशवी सापडत नव्हती. स्वतःवर होत असलेली चीडचीड तिथे शोधताना होऊ लागली. "आपण इतके स्वकेंद्रीत कधी झालो, याचीही शोधाशोध चालू होती. अनूच्या आणि कोणाच्या घरी काय काय असेल. माझ्या आयुष्यात हा बाप आहे. राबणारी आई आहे. आपण पोटाला खायचो इतकं पीठ रोज याच्या फुफ्फुसात जात असतं. त्यांच्या वाट्याला गरिबी होती, त्यातली आपल्याकडे काही अंशही आली नसेल."


इतक्यात तिला खाली दबलेली गव्हाची पिशवी दिसली. तिने ती खेचायचा प्रयत्न केला. आणि तिचा धक्का वरती दळून ठेवलेली एक पिशवी तिरकी झाली आणि झरझर पीठ तिच्या अंगावर बरसू लागले. ते पाहून अप्पा पटकन तिथे आले. पिशवी सरळ केली पण तोपर्यंत बरंच पीठ तिच्या अंगावर सांडलं.


"गौरा... कसं काम तुझं. पांढरी झालीस पुरी."


ती उठून पीठ झाडू लागली. केसांवर आणि पापण्यांवर पांढुरके पीठ जमा झाले होते. पूर्ण ड्रेस पांढरा झाला होता. डोळ्यात आसवं जमा होऊ लागली आणि मघापासून अडकलेला हुंदका बाहेर पडला. 


"हा काय.. मिळाला मला पांढरा ड्रेस अप्पा. खूप बोलले ना सकाळी तुम्हाला.!"


असं म्हणून ती क्षणात हसत अप्पांच्या गळ्यात पडली. दोघंही हसत होते. आणि मधूनच अप्पांच्या खांद्यावर तिची आसवं विसावत होती. 


(कथेसंदर्भात चांगले वाईट अभिप्राय जरूर कळवावेत. नावासहीत शेअर करण्यास हरकत नाही.)





Rate this content
Log in

Similar marathi story from Drama