Vishal Potdar

Drama

3  

Vishal Potdar

Drama

हिरवं सुख (नवरात्री कथा)

हिरवं सुख (नवरात्री कथा)

3 mins
142


आज महिलामंडळाच्या भिशीचा दिवस. यंदा त्यांच्या ग्रुपमध्ये सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असणाऱ्या बायकांनी नवरात्रीचा हिरवा रंग सेलिब्रेट करायचा ठरवला आणि भिशीला जमताना सगळ्या बायकांनी हिरव्या रंगाची साडी नेसून येण्याची घोषणा केली. शेजारच्या सुनंदेने ही गोष्ट सांगताच, अलकेच्या डोळ्यापुढं आईची जपून ठेवलेली साडी तरळली. पोक्त झाडाला पालवी फुटते तो रंग, काठ जांभळे आणि सोनेरी, अगदी आईसारखीच मऊ असलेली सुती साडी.. जायच्या २ महिने आधी आईकडून आणली होती. ती देताना आई गोड हसली होती. म्हणून ती साडी पाहिली की तिला मरणाच्या दारातील कृश आई न आठवता हसरी आई आठवायची. 


अलका.. शरीरकाठी अगदी वेलीसारखी बारीक असली तरी शेतातल्या कामात मात्र कुणी तिचा हात धरायचे नाही. टोकणी करताना बाकीच्यांच्या दुप्पट पळायची. दिसायला अगदी गौरीचा मुखवटा असावा अशी सालस..! तिच्या रुपात तिच्या आईचाच तोंडावळा आला होता. फरक इतकाच की आईला ठसठशीत कुंकू आवडायचं तर हिला नाजूकशी चंद्रकोर..! ती छोटीशी चंद्रकोर तिचं कपाळ सजवून टाकायची. हिरवी साडी, चंद्रकोर आणि नथ.. असं सजणं झालं की मग तिचा संतूही तिच्याकडे नुसता पाहत बसायचा. 


तिच्या मनात सारखी हिरवी साडी घोळत होती. लहान मुलीच्या उत्साहात , तिने लगोलग वर ठेवलेली जाडसर बॅग खाली घेतली. आतले ठेवणीतले कपडे पटापट उचकटले. एकदम तळाशी हाताला तो मऊ साडी लागली. धागे विरून गेले होते. एखादं माणूस शेवटी शेवटी इतकं हळवं होतं की राई एवढी गोष्ट डोळ्यात पाणी आणते. तसंच त्या साडीचंही झालं होतं. तिने साडी बाहेर ओढली पण काढताना बॅगच्या चेनमध्ये अडकून टर्रकन फाटली. एका क्षणात आनंदाच्या ओल्या रानात दुष्काळ दिसावा असं काहीसं झालं. अलकाचं तोंड काळंठिक्कर पडलं. काहीक्षण तशीच शुन्यात पाहत बसली आणि उदासीने स्वतःशीच हसली. इतक्यात करपल्या वासाने आपण तयार झाल्याचा निरोप भाजीने तिच्यापर्यंत पोहचवला. ती चमकून उठली. पटकन पुन्हा ती बॅग भरली आणि स्वयंपाकघरात आली.


पटपट भाकरी थापली आणि संतूचा डबा भरु लागली. तब्बल महिन्याभर तहानलेल्या त्यांच्या शेताला विहिरीचं पाणी पाजण्यासाठी आज नंबर आला होता. मग उजेडतं न उजेडतं तोच, संतू रानाकडं पसार झाला होता. तरी तो निघताना म्हटलाच, "अलके, आज डबा आणत बसू नको. मी खायन हौसामावशीकडं काहीतरी. आज माझी बायकू नटून थटून मिरवणार, मैतरणींच्या घोळक्यात. मग चिखलात माखायला येऊ नको तिकडं. आराम कर." अलकेला कशाचं रहावतंय. भराभरा जेवण बनवून, डबा पोहचवून लगेच भिशीला मागे येऊ, याचं घड्याळ मनात चालवून तयारीलाही लागली.  


असं नाही की खूपच मोठं दुःख करण्याची ही गोष्ट होती. पण अस्वस्थपणाची सूक्ष्मशी सुईच जास्त टोचणी देत असते. असंच काहीसं होतं. अस्वस्थ तंद्रीतच तिने डबा भरला आणि शेताच्या वाटेला लागली. त्यांचा मळा तसा घरापासून दीड दोन किलोमीटर लांब. राहून राहून हिरवी साडी तिच्या मनात डोकावत होती. काळाच्या कात्रीत कातरलेल्या साडीने तिचं मन दाटून आलं होतं. तशी ही बया लहानपणापासूनच समजूतदार असल्याने, एखादी गोष्ट मिळत नसली की तिला मनातून पुसून दुसऱ्या गोष्टीवर आनंद मानायचा यात पटाईत होती. आज मात्र सगळा समजूतदारपणा कुठेतरी गुडूप झाला होता. आईची साडी होती ती.! आईने श्वास सोडल्यानंतर, अलकासाठी तिचं असणं या साडीमुळे होतं. अस्वस्थतेचे कितीही पापुद्रे काढले तरी आत तितकंच दुःख न मरणाऱ्या राक्षसाप्रमाणे पुन्हा पुन्हा उभं राहत होतं.


वाटेत दोन बायका भेटल्या आणि त्यांनीही तिला भिशीला टायमिंगवर यायला सांगितलं. दोघीही किती खूष होत्या.! आज अलकेला, ती सोडून सगळं जगच खूष वाटत होतं. मनातल्या मनात मुसमुसतच मळ्याकडे आली. तिचा नवरा पाणी पुढे जाण्यासाठी दारे धरत होता त्यामुळे तिची हाक काही तिथंपर्यंत पोहचतच नव्हती. त्याला हाका देता देता क्षणभर तिची नजर शेतात दाटलेल्या हिरव्या श्रीमंतीवर स्थिरावली. प्रेमाने वाकलेली मक्याची पानं कणसाला गोंजारत होती. वारा आला की डुलत होती. रानओव्या म्हणत नाचत होती. रोजच्या पाहण्यातली गोष्ट कधीकधी भलं मोठं रूप घेऊन समोर लख्ख दिसते असंच काहीसं घडत होतं. 


भारावल्या अवस्थेत पानांना गोंजरत ती संतुकडे निघाली. लोण्यागत मऊ चिखलात पाय रुततील तसं मनातलं वादळ शांत होऊ लागलं. अलका आत आत जात राहिली. आणि काळी माय तिला हिरव्या शालूत लपेटत होती. ती नकळत सुखदुःखाच्या पल्याड पोहचत होती.


(वरील कथेचे हक्क लेखकाअधीन आहेत. नावासहित शेअर करण्यास करण्यास काही हरकत नाही.)


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama