Vishal Potdar

Romance

4  

Vishal Potdar

Romance

निवडुंगाचं प्रेम

निवडुंगाचं प्रेम

8 mins
346


"अरे कन्नड चॅनेल काय लावून बसलायस? लक्ष कुठं आहे तुझं आज??"


प्रितमने भानावर येऊन टीव्हीच बंद केला. आणि मोबाईलमध्ये डोकावला.


"काही नाही गं आज्जी. आज थोडा मूड ऑफ आहे."


"ते तर कळतंयच. आल्या आल्या आज लॅपटॉप नाही उघडून बसलास ते? आणि वर हे कन्नड चॅनेल लावून बसलायस? काय झालं माझ्या बाळाला?" आजीनं त्याच्या पाठीवर हात फिरवत काळजीचे सूर आळवायला सुरुवात केली.


पुण्यापासून जेमतेम ५०-६० किलोमीटरवर असलेलं राहीपूर हे त्यांचं मूळ गाव. घर तसं साधसुधं कौलारू होतं आणि मातीच्या भिंतींना मागच्याच वर्षी प्लास्टर करून घेतले होते. शहरात राहणे जमत नाही या कारणामुळे आज्जी गावात एकटीच राहायची. तसे तिला शहरातच राहायला भाग पाडण्याचा प्रयत्न प्रितम आणि त्याच्या पप्पानी बऱ्याचवेळा केला होता. पण ती जास्तीत ३ महिने राहिली की तिचं मन गावी ओढ घेऊ लागायचं. शेवटी तिनेच स्पष्ट केलं की जोपर्यंत हातपाय चालतायत तोपर्यंत तरी तिला गावात राहू द्यायचं. प्रितमची महिन्यातून एक-दोनदा तरी तिच्याकडं चक्कर असायची. गेल्या गेल्या आज्जीला घट्ट मिठी मारायची आणि कॉलेजमधल्या सगळ्या गमती तिच्याशी शेअर करायच्या हे ठरलेलं. 


तो आज इकडे यायला निघाला तेव्हा श्रद्धाला भेटला. बरेच दिवस त्यांच्यात धुमसत असलेला विषय निघाला आणि मग वाद शिगेला पोहोचला. तसं ते कपल टिपिकल भांडणाऱ्या गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडसारखं नव्हतं. कधीकधी झालेच वाद तर ते लुटुपटूचे आणि हक्काचे असायचे. तसे दोघंही एकाच ब्रँचमध्ये असले तरी त्यांचे इंटरेस्ट खूप वेगळे होते. ती बॅडमिंटन प्लेअर आणि तो क्लास टॉपर. पण दोघांचं सूत कसं जुळलं हे त्यांनासुद्धा कळलं नाही. 'ऑपोझिट पोल्स ऍट्रॅक्ट' असं असावं. इंजिनिअरिंगचा महाप्रवास संपायला आता फक्त 2 महिन्याचा अवधी राहिला होता. दोघांचं कॅम्पस सिलेक्शन वेगवेगळ्या कंपनीत झालं असलं तरी आनंदाची गोष्ट म्हणजे पोस्टिंग पुण्यातच होतं. कॉलेज संपले तरी दोघे विलग होणार नव्हती. अजून दोन-तीन वर्षे झाली की सेटल झालेले असू आणि मग लग्न करून मस्त पुण्यातच राहायचं. दोघांच्या आयुष्याचा पूर्ण प्लॅन त्याच्या मनात रेडी होता. पण आता त्या प्लॅनचा काहीच अर्थ नव्हता. आज कधी नाही ते त्याच्या रागाचा पारा चढला होता. विचारात गुंग झाला होता. आज्जी डिटेक्टिव्हसारखी हळूहळू चौकशी करू लागेल हे त्याला ठावूक होतं. ते टाळावं, म्हणून तो खिडकीतून बाहेर पाहत बसला. घरासमोरची हिरवाई पाहून त्याच्या मनाला नेहमीच एक शांतता लाभायची. पाहता पाहताच त्याने आज्जीला विचारलं..

"अगं आज्जी, आपल्या घरासमोर एवढी झाडं कुणी लावलीयत गं. ही फणसाची झाडं तर एवढी मोठी आहेत. खूप वर्ष झाली असतील ना?"


आज्जीने तोपर्यंत त्याच्या आवडीची तांदळीची भाजी निवडायला घेतली होती. तिनं आतूनच उत्तर दिलं, "तुझ्या आजोबांनी लावलीयत. पण का रे? मधूनच आज झाडांचा विषय?"


"काही नाही गं सहजच. पण तुला खूप आवडतो ना फणस? अच्छा.. अच्छा.. म्हणजे आजोबांनी फक्त तुला आवडतात म्हणून ही फणसाची झाडं लावलीत ना? प्रेमाचं गिफ्ट?"


"पिट्या काही पण बडबडतोयस काय रे? कॉलेजची हवा लागलेली दिसतेय. म्हणे प्रेमाचं गिफ्ट."


"अगं पण तसंच असेल तर हरकत काय आहे ना? आजोबांचं प्रेम होतंच ना तुझ्यावर?"


"होतं तर. म्हणजे खूप काळजी घ्यायचे माझी. बरं अजून तुझी खाण्याची फर्माईश आली नाही ती? तांदळीची भाजी आहेच. अजून काय करू?"


"आत्ताच तोंडाला पाणी सुटलं बघ. त्यासोबत मस्त भाकरी आणि पिठलं पण कर."


"फक्त अर्धा तास दम काढ. लग्गेच करते."


अजून त्याची नजर अंगणातल्या झाडांचा वेध घेत होती. मनाला चिअर करण्याचा प्रयत्न तर खूप करत होता पण मनात एकच प्रश्न यायचा. "ती अशी वागूच कशी शकते? दोघांचंही भवितव्य किती छान होऊ शकलं असतं एकत्र. खरंच मी ओळखायला चुकलो कदाचित."


मघापासून त्याचा थोडा रागीट पण रडवेला चेहरा पाहून आजी विषयाला हात घालायचा प्रयत्न करत होतीच. आज्जीला आता राहवलं नाही. 


"पिटु आणखी विचारात बुडालास काय रे? नुसताच खिडकीतून बाहेर काय पाहत बसलायस. आज काही वेगळंच गाणं दिसतंय तुझं. काय झालं?"


"काही नाही गं आज्जी. कॉलेजमध्ये मित्रांशी थोडा वाद. बाकी काही नाही. मला एक सांग, आणखी काय काय करायचे आजोबा तुझ्यासाठी?"


आज्जी त्याच्या शेजारी येऊन उभी राहिली. तिच्या चेहऱ्यावर हलकीशी स्माईल होती.


"अरे मुळात आमचं लग्न झालं तेव्हा जेमतेम तेरा वर्षांची होते. मनही खूप अल्लड, बालीश होतं. त्यांनी माझ्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट केली ती माझ्यातला अल्लडपणा समजून घेतला. मी आज जी काय आहे ती त्यांच्यामुळेच. अगदी जग जरी माझ्या विरुद्ध असेल तरी ठामपणे माझ्या बाजूला उभे असण्याची त्यांची तयारी असायची. अरे मी काय बडबडत बसले इथं. जेवण करायचंय अजून. आणि बोअर झाला असशील ना आज?."


"नाही गं बोअर होत. बोल ना आज्जी तू. किती छान बोलत होतीस."


"चला. आज खूप दिवसातून या म्हातारीचं बोलणं ऐकायला कुणीतरी स्वतःहून तयार आहे. अरे त्याकाळी नवरा-बायकोचं नातं खूप औपचारिक असायचं. बायकांना नवऱ्याशी बोलताना अदब ठेवायला लागायची. चारचौघात बोलणं, चेष्टा मस्करी तर लांबची गोष्ट. त्यात तुझे आजोबा स्वभावाने तसे अबोलच. पण त्यांचं जे काही प्रेम आहे ते कृतीतून दिसायचं. माझा कुणी अपमान केलेला त्यांना सहन नाही व्हायचा. एकदा तर असा काही प्रसंग घडला की, माझ्या आयुष्याला कलाटणीच मिळाली बघ. लग्नानंतरची दुसरी दिवाळी असेल. माझ्या नणंदबाई भाऊबीजेला आल्या होत्या. त्यावेळेस फॅक्टरी बंद पडून यांचं काम सुटल्यानं आर्थिक परिस्थिती अगदीच जेमतेम झाली होती. कशीबशी थोडीफार दिवाळी केली होती बघ. नणंदबाईंच्या घरचं तसं चांगलं होतं. चांगला पैसा बाळगून असायच्या. त्यादिवशी दारात गजरेवाला आला. त्यांनी मस्त टपोऱ्या मोगऱ्याचे गजरे विकत घेतले. मला मोगऱ्याचा गजरा म्हणजे जीव की प्राण होता. जवळ पैसे तर नव्हते. आणि मागून घ्यायला कसंतरी वाटत होतं. पण शेवटी पंधरा वर्षाची पोरच मी. नणंद बाईंकडे एक गजरा मागितला. नणंदबाई कुत्सितपणे हसल्या. आणि म्हणाल्या, 'अहो वहिनी, दिला असता तुम्हालाही गजरा, पण मला चांगले दोन-तीन गजरे असले तरच माळायला बरे वाटते बाई. हे बघा सगळे माळले. आणि हो.. म्हणजे कशाला सवय करून घ्यायची गजरा वगैरे.. आज मी दिला असता पण नंतर या परिस्थितीत दादाला हे लाड पुरवायला होणार का?' पिटु अरे आयुष्यात पहिल्यांदाच कुणाकडे तरी छोटीशी गोष्ट मागायची चूक झाली माझी. त्यांचे ते अपमानास्पद बोल ऐकून काळजात चर्रर्र झालं. डोळे पाण्यानं डबडबणार एवढ्यात मी स्वयंपाकघरात निघून गेले. माझ्या आवडत्या मोगऱ्याचाही मला तिटकारा वाटत होता. पुन्हा कधीही गजरा घालायचा नाही अशी मनाशी गाठच बांधून ठेवली. संध्याकाळी झोपताना माझा उदास चेहरा पाहून ते सतत चौकशी करत होते. पण त्या भावा-बहिणीत कलह नको म्हणून काही बोलले नाही. पहाटे पहाटे उठले आणि अंगणात सडा टाकायला आले, तेव्हा मला मोगऱ्याचा ईवलुसा वेल दिसला. एक छोटीशी कळी उमलण्याच्या तयारीत होती. मी नकळत खाली बसून त्या कळीला न्याहाळत बसले. तर यांचा मागून आवाज आला. "ह्यो मोगऱ्याचा वेल तुझा आहे. आणि त्याची येणारी फुलंसुद्धा फक्त आणि फक्त तुझीच. आणि ह्याला छान फुलवायची जबाबदारी तुझी." त्यांनी माझ्यासाठी चक्क रात्रीतच कुठेतरी जाऊन तो वेल आणून लावला होता. आयुष्यात पहिल्यांदाच माझ्या आयुष्यात कुणीतरी सुगंध पेरला होता. मग त्यांनी मला सविस्तर सांगितलं की कालचं त्यांच्या बहिणीचं ते बोल त्यांनी बाहेरूनच ऐकले होते आणि त्यांना ते सहन झालं नाही. ते म्हणाले, 'बायकोचा एवढा हट्ट पुरवायची धमक नसती तर कशाला लग्न केलं असतं.' अरे नंतर तो मोगऱ्याचा वेल दिवसेंदिवस फुलतच गेला. आजूबाजूच्या मुलीसुद्धा त्या मोगऱ्याची फुलं न्यायच्या. तुझ्या आजोबांना माझ्या आयुष्यात फक्त दहा वर्ष सोबत करता आली, काळाला हा दृष्ट लागण्याजोगा संसार बघवला नसावा. पण या कालावधीत त्यांनी मला शिक्षण पूर्ण करायला लावलं. मी त्यावेळची मॅट्रिक पूर्ण करून शिक्षिका झाले स्वतःच्या पायावर उभी राहिले. एकदा त्यांचा मित्र त्यांना मस्करीत म्हणाला, 'अरे तू असा अडाणी कामगार आणि तुझी बायको तर मास्तरीन आहे की रे. अशी कशी जोडी तुमची? तू निवडुंग आणि वहिनी म्हणजे मोगऱ्याचा वेल..' त्यावर ते फक्त हसले. मी त्यांच्या मित्राला म्हटलं, 'भाऊजी, निवडुंग साधा आणि काटेरी असला तरी त्याच्या मुळंच मोगऱ्याच्या वेलीचे रक्षण आणि जपणूक होते. त्याला त्याचं श्रेय मिळालं नाही तरी तो त्या मोगऱ्याच्या सुगंधातच खूष असतो. जसा तुमचा दोस्त आहे.' त्याक्षणी आयुष्यात पहिल्यांदाच मी त्यांच्या डोळ्यात अश्रू पाहिले. आणि तेही आनंदाचे होते, कारण आयुष्यभर अयशस्वीपणाचा ठपका स्वतःवर लावून घेतलेल्या व्यक्तीला मी नकळत त्याच्या आयुष्याचा अर्थच सांगितला होता."


प्रितमला आजीचं बोलणं ऐकून श्रद्धाची आठवण झाली. काल त्यांचं भांडण झालं ते मुळीच तिच्या एका निर्णयामुळे. तिला कॅम्पस सिलेक्शनमधून मिळालेला जॉब न करता दिल्ली मधल्या एका स्पोर्ट्स क्लबमध्ये 2 वर्षाचा बॅडमिंटन कॅम्प जॉईन करायचा होता. तिला बॅडमिंटनमध्येच करिअर करायचं होतं आणि त्यातून त्यांच्या वाटा खूप वेगळ्या होणार होत्या. म्हणजे तिनं चक्क दोघांच्या एकत्र आयुष्याऐवजी तिचा स्वार्थ निवडला होता. तिची इच्छा होती की त्यानं तिला यात सपोर्ट करावा. पण त्याला तर खूप राग आला होता. तिला तो नको नको ते बोलला. कधीही अपेक्षित नसलेला ब्रेकअपचा शब्द उच्चारला. ती खूप रडली. पण त्याला तर तो मेलोड्रामा नुसता मेलोड्रामा वाटत होता. तिथून तो सरळ आजीकडे निघून आला.


त्याचं लक्ष ताळ्यावर आलं. आजी अजून खिडकीतून बाहेर पाहत होती. जणू काही ती वेगळ्याच विश्वात हरवली होती. त्यानं तिला मुद्दाम हाक दिली नाही. तेवढ्यात आजीचे शब्द कानी आले. "माहिती नाही कसे पण या खिडकीत उभा राहिले की अजून त्या मोगऱ्याचा सुगंध येतो. पिटू तुला येतो का रे इथे सुगंध?" 


बोलता बोलता आज्जीच्या डोळ्यात अश्रू आणि ओठांवर हलकेसे हसू पण होते. प्रितमला माहिती होते की आजी आता वेगळ्याच जगात आहे. तो आज्जीला बिलगला. आज खूप दिवसातुन त्यालाही हुंदका आला होता.


"आज्जी मला नाही येत गं मोगऱ्याचा सुगंध. तुला येतो, कारण तो तुझ्या हृदयात आहे. आम्हाला खऱ्या प्रेमाचा अर्थ कळण्यासाठी अशा गोष्टी कळायला हव्यात. एकमेकांसाठी केलेला त्याग हेसुद्धा प्रेमच असतं हे विसरून गेलोय."


बोलता बोलत प्रितमसमोर क्षणभर श्रद्धाचा उदास चेहरा तरळून गेला आणि मनात पश्चात्ताप घेर धरत होता. काहीतरी विचार करून गाडीची चावी घेतली.


"आज्जी, मी जरा बाहेर जाऊन येतो. आज संध्याकाळी झोपायला इकडेच येईन आणि तुला माझी लव्हस्टोरीदेखील सांगेन."


"अरे, असाच कुठे चाललास. दोन घास खाऊन जा."


"नाही गं आज्जी. विनाकारण उशीर होईल. आता आल्यावरच जेवेन."


आज्जीने हसत त्याच्या गालाचा मुका घेतला. त्याने लपवलं असलं तरी त्याची लव्हस्टोरी तिच्या नजरेतून सुटली नव्हती. आज्जीला पहिल्यांदा जेव्हा श्रद्धाला भेटवलं होतं, तेव्हा फक्त 'मैत्रीण' अशीच ओळख करून दिली होती. पण तशी ओळख करून देताना दोघांची चलबिचल पाहूनच आज्जीला बरोबर काय ते उमगलं होतं.


त्यांच्या प्रेमकथेचा तीन वर्षाचा काळ म्हणजे इंजिनीरिंगच्या हार्डशिपमधील सुखद क्षण होते. क्लासमध्ये एकमेकांना सगळ्यांच्या नकळत स्कॅन करणे, संध्याकाळी संतोषी टपरीवरचा चहा, विकेंडला फिल्म किंवा ट्रेकिंग, प्रत्येक सबमिशनमध्ये त्याने केलेली मदत, पीएलमध्ये कॉलेजच्या व्हरांड्यात एकत्र केलेला अभ्यास हे सगळं एका चित्रफितीसारखं समोरून गेलं. एकदा तर तो आजारी असल्याचे समजल्यावर, त्याला भेटण्यासाठी मित्रांच्या मदतीने चोरीछुपे ती चक्क बॉईज हॉस्टेलला आली होती. वेड्यासारखी प्रेम करायची त्याच्यावर. सकाळी भांडण तो करत होता आणि तिच्या शब्दांत फक्त आर्जव होतं. स्वार्थीपणे मात्र तो वागला होता. 


प्रितम लगबगीने निघाला. त्याला प्रेम गमवायचं नव्हतं. श्रद्धाचा फोन ट्राय केला पण नेटवर्कच्या बाहेर दाखवत होता. नाराज असल्यावर श्रद्धा नदीच्या घाटावर जाऊन नदीच्या शांत प्रवाहाकडं पाहत बसायची. त्याने बाईक स्टार्ट केली आणि कृष्णेकडे जाणारा रस्ता पकडला.


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance