Akash Kokate

Comedy Others

5.0  

Akash Kokate

Comedy Others

कथा Final Year Project ची..!

कथा Final Year Project ची..!

3 mins
17.1K


मित्रांनो,अभियांत्रिकी शिक्षणात ४ वर्षात ८ सेमिस्टर, १६ लेखी परीक्षा, ४० तोंडी परीक्षा, ४० ते ४५ विविध विषय हे सर्व करून अर्धमेल्या झालेल्या विद्यार्थांना पदवी मिळवण्यासाठी एक दिव्य पार करावं लागतं आणि ते म्हणजे 'Final Year Project'. अशा शिक्षणप्रणालीकडे पाहून 'रात्र थोडी आणि सोंगे फार' ह्या म्हणीची आठवण आल्याशिवाय राहत नाही. असो अजून तरी ह्या शिक्षण पद्धतीत बदल होण्याची शक्यता तशी विरळच वाटते.

अंतिम वर्षाच्या सुरुवातीला आम्ही (मी आणि 3 मित्र) एकत्र बसून 'आपला Final Year Project काय असावा' ह्याची खूप अभ्यासपूर्ण चर्चासत्र भरवत होतो (काही लोक त्याला 'सपक परिवार महाचर्चा' असे पण म्हणतात). पण विषय काही केल्या ठरत नव्हता. शेवटी आमची बुद्धीचातुर्य आणि हुशारी (?) Project Guide च्या लक्षात आली आणि आम्हाला त्यांनी मागच्या वर्षातील मुलांनी केलेल्या प्रोजेक्टचे रिपोर्ट देऊन कृतकृत्य केले.

Project चं नाव होतं 'Automation In Raisins (मनुके) formation' हे नाव ऐकूनच अनेकांचे डोळे विस्फारले होते आणि आम्हीही देशनिर्मितीत आम्ही आपलं योगदान देणार आहोत ह्या तोऱ्यात मिरवत होतोत. आम्हाला त्यासाठी एक air heater लागणार होतं आणि आम्ही त्यासाठी आमच्या Guide मॅडमकडे विचारणा केली तर त्यांनी आम्हाला जसं 'द्रोणाचार्यांनी अर्जुनाला धनुष्य दिलं होतं' त्या आवेशात त्यांनी आम्हाला त्यांचा जुना 'hair dryer' वापरायला दिला आणि गुरुदक्षिणा म्हणून त्याचा वापर झाल्यावर 'तो परत द्या' एवढंच त्या म्हणाल्या.

प्रत्यक्ष तो प्रोजेक्ट साकारण्याच्या अगोदर त्या प्रक्रियेचं प्रात्यक्षिक करणे गरजेचे होते. त्यामुळे आम्ही 2 महिने फक्त तो मुहूर्त काढण्यात (sorry विचारमंथनात) घालवले. शेवटी सर्व ग्रहमान जुळले आणि आम्ही प्रात्यक्षिकाला सुरुवात केली. आम्ही अर्धा किलो द्राक्ष घेतली आणि त्यावर hair dryer ने गरम हवेचे झोत देत होतो. अर्धा तास झाला काहीच फरक पडेना त्या द्राक्षात. फक्त द्राक्षांची संख्या मात्र थोडी खालावली होती. "अरे काय करताय??" असं विचारणाऱ्या प्रत्येकाने द्राक्ष फस्त करणे हे आपले आद्य कर्तव्य समजून हात साफ केला होता.

पाऊण तास झाला. संयम ढळत चालला होता. मग मात्र आमचे जावई शोध सुरू झाले. कोणी म्हणत होतं "द्राक्षांना मीठ लावून ठेवा"..कोणी म्हणत होतं "चुना(?) लावून पाहू, लागला तर लागला". आम्ही सर्व प्रयोग त्या द्राक्षांवर करत होतो. शेवटी साडेपाच वाजले आणि मग मात्र आम्हाला आमचे प्रयोग थांबवणे बंधनकारक होते. कारण आमची बस होती घरी जाण्यासाठी आणि त्यावेळी 'प्राण जाये पर बस ना जाये' अशी भीष्मप्रतिज्ञा जणू आम्ही घेतली होती. त्यामुळे आम्ही निघालो आणि द्राक्षांनी सुटकेचा निश्वास सोडला. दुसऱ्या दिवशी रविवार होता. आम्ही तो आमचा 'जावईशोध द्राक्षांचा बॉक्स' Lab मध्येच ठेवला.

आम्ही सोमवारी कॉलेजला गेल्यानंतर आम्हाला तो बॉक्स डिपार्टमेंटच्या कॉरिडॉर (मोकळ्या भागात) मध्ये आढळला. मग कोणीतरी माहिती पुरवली की त्या द्राक्षांचा सुवास(?) पसरला होता lab मध्ये म्हणून तो इथे फेकला गेला होता. आम्ही तो बॉक्स उघडला आणि आमच्या चेहऱ्यावर 'अल्लादिनने जादूचा दिवा घासावा आणि त्यातून जीन बाहेर यावा' असे भाव चेहऱ्यावर उमटले. शेवटी उन्हात वाळवून का होईना पण द्राक्ष थोडे फार मनुक्यासारखे दिसत होते.

आम्ही लगेच 'युरेका युरेका' म्हणत आमच्या Guide मॅडमना कागदातले मनुके दाखवले त्यांनी लगेच 'मी खाऊ शकते का?' असे विचारले. आम्ही एका सुरात ओरडलो "नको" आणि एकाने स्पष्टीकरण देताना "मॅडम त्या द्राक्षांना आम्ही चुना लावला आहे" असे सांगितले आणि त्यानंतर गोड द्राक्ष पाहून त्यांचा चेहरा आवळा खाल्यासारखा झाला होता आणि आमच्यात हशा पिकला होता आणि त्या प्रोजेक्टमध्ये आम्ही IR LEDs वापरले होते. हाही आमच्या बुद्धीचातुर्याचा भाग होता. त्या IR LEDs चं प्रयोजन असं होतं की त्यातून निघणारी किरणे द्राक्षाच्या बाहेरच्या आवरणाला भेदतील आणि द्राक्षाचा ओलावा बाहेर येईल. (हा विचार 'बिरबलची खिचडी' ह्या गोष्टीतून घेतला होता हे वेगळं सांगायला नको). अशाप्रकारे आम्ही कंटाळवाणा वाटणारा Final Yearचं प्रोजेक्ट पण मजेशीररित्या पूर्ण केलं आणि विशेष म्हणजे आम्हाला त्यावर्षीचा 'उत्तेजनार्थ' बक्षीस पण मिळालं. आता हे बक्षीस आमच्या मेहनतीला मिळालं की परीक्षकांनी थोडी द्राक्षं खाल्ली आणि त्यामुळे खाल्लेल्या द्राक्षाला जागल्यामुळे मिळालं हे आत्तापर्यंत न सुटलेले कोडं आहे.

आणि हो आम्ही ते Hair Dryer मॅडम ना परत केलं अगदी सुखरूप आणि त्यावेळेस आम्ही त्यांना मनुकेपण दिले. आमच्या प्रोजेक्टचे नाही विकत घेऊन दिले ड्राय फ्रुट्सच्या दुकानातून.

अजूनही खूप आठवण येते त्या दिवसांची. असं वाटतं की एखादं time machine मिळावं आणि त्यात बसून आपण पुन्हा त्या दिवसांची सफर करावी. खरंच 'मंतरलेले दिवस' होते.


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy