मावळतीचा सूर्य
मावळतीचा सूर्य


ऑक्टोबरचा महिना होता.. थंडीचे दिवस होते... निसर्गाने थंडीची गुलाबी चादर ओढली होती.. सुरेशराव आज नेहमी पेक्षा जास्त उत्साहात दिसत होते.. सुरकुत्या पडलेल्या त्यांच्या चेहऱ्यावर हास्याची एक अस्पष्ट लकेर निश्चित जाणवत होती.. दररोज Morning Walk हुन परत येताना त्यांचे पाय उत्तर देऊ लागतात पण आजची गोष्टच वेगळी होती.. त्यांनी त्यांच्या सोबतच्या दासराव आणि श्यामराव ह्यांना खूप मागे सोडलं होतं.. दासराव धापा टाकत मागून आले आणि म्हणाले 'काय रे सुरेश 'जाम' खुशीत दिसतोयस, वहिनींनी गुलाब'जाम' खायला permission दिली वाटते?' दासरावांचा तो शब्दांचा केलेला 'खेळ' पाहून सुरेशरावांचा चेहरा ट्राफिक 'जाम' मध्ये अडकल्यासारखा झाला होता.. तरी स्वतःला सावरून ते एवढेच म्हणाले "नाही रे दासा, आत्ता शुगर एवढी वाढलीय की आमच्या गृहलक्ष्मीने माझाशी गोड बोलणेसुद्धा वर्ज केले आहे.. आणि ह्या मॉर्निंग walk च्या अट्टाहासासाठी 'साखर'झोपेला सुद्धा तिलांजली द्यावं लागतेय.. आणि तू गुलाबजाम म्हणतोयस.." दोघेही हसत सुटले व तो विषय तिथेच संपला..
सुरेशराव घरी आले तर पाहतात की अंगणात एक साधीच पण सुरेख रांगोळी सुमतीताईंनी रेखाटली होती.. सुमतीताई म्हणजे सुरेशरावांच्या पत्नी, आजपर्यंतच्या सर्व सुख दुःखात सुरेशरावांची सावली बनून वावरलेल्या.. सुरेशरूपी समुद्रात सुमतीताई मधुर पाण्याच्या सरितेसारख्या मिसळल्या होत्या.. घरात आल्याबरोबर चहाच्या कपाबरोबरच एक किराणा सामानाची लिस्ट पण सुपूर्द केली.. "अहो आज संग्राम कित्ती दिवसांनी घरी येतोय.. त्याच्यासाठी काही गोड धोड नको का करायला?" सुरेशरावांनी तो 'बिनसाखरेचा' चहा नातवाला 'गोड'धोड खाऊ घालण्यासाठी घशाखाली उतरवला.. चहाचा कप बशीमध्ये ठेवताना थरथरणारे हात हे थंडीमुळे आहेत की वाढत्या वयामुळे हा पेच मात्र थंडी सुरू झाल्यापासूनचा आहे.. तेवढ्यात सुरेशरावांचे लक्ष त्यांच्या Family Photo कडे गेले, त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाला मोठ्या हौशेने संग्रामने त्यांना ती फोटो फ्रेम गिफ्ट केली होती.. त्यातील प्रत्येक चेहरा त्यांना त्यांच्या भूतकाळातील घटना यथासांग त्यांच्या नयन पटलावर आणत होता..
सुरेशराव लहानपणी खूपच गरिबीत जन्माला आले होते.. हालअपेष्टा सहन करत त्यांनी त्यांचे उच्चशिक्षण पूर्ण केले व एका सरकारी कचेरीत क्लार्क म्हणून चिकटले.. सुमतीताईसोबत विवाह करून ते नोकरीच्या ठिकाणी वास्तव्यास आले.. संसाराची वृक्षवेल बहरत होती.. सुरेशरावांना एक मुलगा आणि दोन मुली होत्या.. काळ वेगाने पुढे सरकत होता.. काल परवा अंगणात दुदुदुडू धावणारा "राघव" मीसुरडे फुटलेला महाविद्यालयीन तरुण झाला होता.. सरकारी कचेरीत काम करताना मिळणाऱ्या तुटपुंज्या पगाराची झळ सुरेशरावांनी कधीच त्यांच्या लेकरांना जाणवू दिली नाही.. त्यांच्या रक्ताचा प्रत्येक थेंब त्यांनी घामामध्ये आटवला.. स्वतः रोज 3 किमी पायी प्रवास करून आपली चप्पल झिजवणाऱ्या सुरेशरावांनी राघवच्या वाढदिवसाला मात्र हिरो होंडाची गाडी घेऊन दिली होती.. दाढीच्या ब्रश वापरून वापरून त्यावर मोजता येतील एवढेच नायलॉनचे धागे शिल्लक असतानासुद्धा ते त्यांच्या मुलीला मेकअपचे सामान आणण्यासाठी पैसे न चुकता तयार ठेवायचे..
नंतर दोन्ही मुलींची लग्न झाली.. लग्नात जावयाचे सगळे हट्ट पुरवता पुरवता कर्जाचा डोंगर माथी झाला होता.. सुमतीताई ढळाढळा अश्रू काढत होत्या अन सुरेशराव एकट्यात बसून रडण्याचा आवाज येणार नाही असे रडत होते.. कोणी पाहिलं तर फटाक्यांचा धूर डोळ्यात गेला असं सांगत होते..
राघवचे लग्न जुळले महाविद्यालयातील एका मुलीसोबत त्याचे प्रेम जुळले आणि सुरेशरावांनी तो खुश राहावा ह्यासाठी मनात नसतानासुद्धा होकार कळवला..
सुमतीताई सुनेचे नखरे राघवसाठी झेलत होत्या.. काळ पुढे सरकत होता.. राघवला 'संग्राम' नावाचा मुलगा झाला.. परिवारात आनंदाची एक लहर पसरली.. संग्राम मोठा होत होता.. "तुम्ही संग्रामचे जास्त लाड करून त्याला आमच्यापासून वेगळा करण्याचा कट रचताय" असं जेव्हा सून म्हणाली तेव्हा मात्र सुमतीताईंचा बांध फुटला.. घर दुभंगलं.. ज्यांच्यासाठी हे सर्व केलं तेच माणसे आत्ता त्यांना सोडून जाणार होती.. त्यादिवशी सुरेशराव दासरावांना मिठी मारून ढसाढसा रडले..
कसेबसे दिवस ढकलत.. दोघांचा संसार चालला होता.. Retirement पण जवळ येऊन ठेपली.. संग्राम कधी कधी बोलायचा. त्यांना खूप बरं वाटायचं.. त्यांना त्याच्या रुपात बालपणीचा राघव सापडला होता.. त्याची अधून मधून भेट व्हायची.. आत्ता तो पुण्याला वैद्यकीय शिक्षण घेत होता..
शेवटी तो दिवस उजाडला.. सुरेशराव जड पावलांनी ऑफिसमध्ये शिरले.. "निरोप समारंभ" हे शब्द वाचूनच ते गहिवरून गेले होते.. मंचावर चढताना नकळत अश्रू ओघळले.. ते सुरेशरावांनी रुमालात अचूक टिपले.. समोर प्रेक्षकांमध्ये सुमतीताई पुढच्या रांगेत नऊवारी नेसून बसल्या होत्या.. ज्या साहेबांनी त्यांना आत्तापर्यंत फक्त बोलणी ऐकवली होती.. त्यांनी आज सुरेशरावांच्या चांगुलपणाचा पाढा वाचला.. समारंभ संपला.. दोन तीन दिवसात त्यांना Provident Fund(PF) चा चेक मिळाला..
आणि काय चमत्कार.. राघव.. आणि त्याच्या दोन बहिणी सेवेसाठी हजर..
आयुष्यभर परिस्थितीने लचके काढल्यावर.. मेल्यावरसुद्धा मृत शरीराचे लचके काढणाऱ्या कोल्ह्यासारखी सुरेशरावांची मुले त्यांना भासत होती.. प्रत्येकजण आपला हिस्सा मागत होता.. पण त्या माय बापाच्या मनाचा विचार कोणीच करत नव्हते..
सुरेशरावांचा राग अनावर आला आणि त्यांनी सगळ्यांना घराबाहेर काढले.. तरी ते सगळे कोल्हे आयुष्यभर त्यांचे लचके काढतच राहिले.. कधी दिवाळी म्हणून.. कधी नवीन व्यवसाय सुरू करायचा म्हणून..
"अहो जाताय ना अंघोळीला..." सुमतीताईंची हाक ऐकून सुरेशराव भानावर आले.. आणि मनात एवढेच म्हणाले..
मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे !
आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे !!