Akash Kokate

Comedy

5.0  

Akash Kokate

Comedy

'कडू' वाटणारा 'साखर'पुडा

'कडू' वाटणारा 'साखर'पुडा

3 mins
1.7K


काल दूरच्या पाहुण्यांच्या साखरपुड्यासाठी गेलो होतो. 'शाल अंगठी' हा शब्द मुद्दामच टाळला कारण 'साखरपुडा' ह्या शब्दातील साखरेमुळे शब्द अधिक वजनदार वाटतील म्हणून...


आम्ही नवरदेवाच्या बाजूने असल्यामुळे आमचा थाट काही औरच होता..पाय धुवायला पाणी काय.. अन् लगेच हातात टॉवेल काय.. राजेशाही सगळं. तेवढ्यात मला तिथे रंगीत पाणी वाहत आहे असं दिसलं आणि मी त्याचे कारण शोधण्यासाठी त्या पाण्याचा उगम पहिला..पाय धुतलेले पाणी हे रांगोळीलाला घेऊन जात होते त्यामुळे ते पाणी रंगीत झाले होते.. अन् ज्यांनी खूप मेहनतीने रांगोळी काढली होती त्यांच्या चेहऱ्याचा रंग उडाला होता..


कार्यक्रमासाठी मंडप सजला होता.. प्रवेशद्वाराजवळ असलेले सुवासीत अत्तराचे फॅन दुपारच्या रणरणत्या उन्हात शरीराला व मनाला सुखावून टाकणारे होते.. मी मंडपात जात होतो.. व 'अरे हा मित्र कुठं राहिला?' त्याला बोलवायला म्हणून बाहेर जात होतो आणि लगेच आत येत होतो. हे माझे आत येणे आणि बाहेर जाणे हे 'त्या फॅन समोरून जास्तीत जास्त वेळा जाता यावं' यासाठी केलेला प्रयत्न काही पाहुण्यांनी हेरला व त्यांच्या कुत्सित नजरांनी मला स्थान ग्रहण करण्याचा हुकूम देऊन माझ्या मनसुब्यांना 'ग्रहण' लावले व मी आत जाऊन बसलो.


family function मधली सगळ्यात नको असणारी गोष्ट म्हणजे आत्याच्या नवरे, मावशीचे नवरे, दूरचे काका ह्यांची होणारी भेट.. ही भेट कमी आणि 'आरोपींची कोर्टात पेशी' जास्त वाटते.. हे दूरचे काका नेमके ह्या वेळेस कसे काय 'जवळ' येतात हे न उलगडलेलं कोडंच आहे.. ह्या पाहुण्यांमुळेच युवकांची संख्या अशा कार्यक्रमाला सातत्याने कमी होत आहे हे मनोमन पटले..

"सध्या काय करतोयस?"

ह्या प्रश्नांचे दोन भागात वर्गीकरण करता येईल.


A)युवक नोकरी करत असल्यास:

१.अरे वा कोणत्या कंपनीत?

२.पगार किती मिळतो (हातात/In Hand)?

३.अरे आमच्या बंटीला तर जास्त मिळतो तुला कमी कसा?

४.लग्न कधी करणार आहेस?

५.कशी मुलगी पाहिजे? माझ्या बघण्यात आहे दाखवू का?

.

.

.

असे असंख्य जोपर्यंत आपल्याला कोणी बोलवत नाही तोपर्यंत.

आणि अशा प्रश्नांचा दुसरा प्रकार म्हणजे:


B)युवक नोकरी करत नसल्यास किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करत असल्यास:

१.आमच्या बंटी ला Resume पाठवून बघ... पाठवशील ना?

२.अभ्यासात मन लागत नाही वाटते?

३.इंग्लिश बोलता येते ना?

४.कुठे कुठे apply करत आहेस?

.

.

.

हे प्रश्न तोपर्यंत सुरू असतात जोपर्यंत आपल्या संयमाचा बांध फुटत नाही.


कार्यक्रमाची सुरुवात होते ती एका आवाजाने... "सर्व पाहुणे मंडळींचं अमके परिवार आणि टमके परिवाराच्या वतीने सहर्ष स्वागत..." हा आवाज असतो त्या गावातील जिल्हा परिषदेतील प्राथमिक शाळेतील मास्तरांचा...

शाळेत पोरांना वाऱ्यावरती सोडून या कार्यक्रमात गुरुजी हवेत शब्दांचे महल उभे करतात.

"साखरपुडा म्हणजे दोन अनोळखी व्यक्तींनी जन्मोजन्मी साथ देण्याची घेतलेली शपथ आहे"

"ह्या ऋणानुबंधाच्या रेशीमगाठी आहेत"

"नवरी सासुराशी जाये, मागे परतुनिया पाहे"

हे शेवटचं वाक्य ऐकून मास्तरांच्या बाजूला बसलेला एक जण "मास्तर आज फक्त साखरपुडा आहे... लग्नाला वेळ आहे अजून... आणि तोपर्यंत नवरी माहेरीच असणार आहे..!

तेव्हा मास्तर शब्दांच्या 'पुड्या' बांधणं बंद करून साखर'पुड्या'कडे वळतात.


कार्यक्रमाच्या सुरुवातीला नवरा मुलगा एकटाच स्टेजवर बसलेला असतो. समोरचा सगळा जमाव सांत्वन देणाऱ्या नजरेने त्याच्याकडे बघत असतो आणि नवऱ्या मुलाला खाटकाच्या दुकानाबाहेर बांधलेल्या बकरीसारखी feeling येते. मग तो वरच्या मंडपाच्या कापडावरील डिझाईनकडे बघत समोरच्याच्या नजरा टाळत असतो.


नवरीकडची मंडळी आपली बाजू कशी वजनदार आहे हे पटवून देण्यासाठी जास्तीत जास्त वजनाचा हार नवरदेवाच्या गळ्यात अडकवतात.

तेवढा वजनदार हार गळ्यात अडकवून फोटोमध्ये हसरा चेहरा करणाऱ्या त्या नवऱ्या मुलाला 'राष्ट्रीय शौर्यपदक' मिळाल्यास मुळीच नवल वाटू नये.

मूळ कार्यक्रम आटोपल्यावर वेळ होते ती ग्रुप फोटो सेशनची. 'सतरा-अठरा' लोकांना एका फ्रेममध्ये घेण्याचं शिवधनुष्य पेलण्याचं काम करताकरता फोटोग्राफरच्या नाकी 'नऊ' येतात. सगळ्यांना एका फ्रेममध्ये घेण्यासाठी डावीकडील व उजवीकडील मंडळींना 'आत या, आत या' असं म्हणत तो मात्र स्टेजच्या 'बाहेर' जाण्याच्या मार्गावर असतो.


सेल्फी घेणाऱ्यांच्या पण वेगळ्या तऱ्हा असतात. त्यातल्या त्यात हात लांब असलेल्या व्यक्तीला by default 'सेल्फी स्टिक'ची भूमिका मिळते.

फोटो सेशन पार पडल्यानंतर वेळ येते ती जेवणाची. पोटात कावळे ओरडून ओरडून केव्हाचे दमलेले असतात. गावात कार्यक्रम असल्यामुळे जेवणाची पंगत बसली होती. पत्रवाळीत जे काही वाढलं ते लगेच हाताने सावरून सावरून प्रत्येक पदार्थाला पत्रावळीत योग्य जागा मिळवून देणे हे जेवणाऱ्याचे आद्यकर्तव्य आहे याचा प्रत्यय तेथे येत होता. वरण भातात टाकत असताना त्याला कितीही बांध घातले तरी वरण नेहमी पूर्ण पत्रावळीची सफर करून घेते हे त्रिकालाबाधित सत्य आहे.

तरी असे functions सर्वांनी निश्चित अनुभवावे व ह्या सर्वांचा त्रागा न करता त्यात हास्याचे क्षण शोधायला पाहिजेत. तुम्हाला कुठल्याही लाफ्टर क्लबची आयुष्यात गरज भासणार नाही.


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy