Akash Kokate

Tragedy Drama

5.0  

Akash Kokate

Tragedy Drama

मैत्रीची शिदोरी

मैत्रीची शिदोरी

8 mins
874


"अन्या यार आज माझी प्रॉक्झी मारशील का गं?.. आज बिलकुल मूड नाही लेक्चर करायचा" सुकन्या जांभई देत म्हणाली.

"ये सुन्या जांभई नको ना देऊ..मला पण सुरू झाली बघ" अनन्या जांभई देत तोंडावर हात ठेवत पुटपुटली आणि क्लास बंक करायचा सर्वानुमते (त्या दोघींच्या मते) ठराव संमत झाला.. आणि त्या निघाल्या..


अन्या म्हणजे अनन्या आणि सुन्या म्हणजे सुकन्या.. अनन्यासाठी सुकन्या मधला 'क' सायलेंट होता आणि सुकन्यासाठी अनन्या मधला 'न' सायलेंट होता.. पण त्या दोघी मात्र तिळमात्र सायलेंट नव्हत्या.. मागच्या बाकावर बसून क्लास सुरू असताना चित्रविचित्र आवाज काढणे, फावल्या वेळात शिक्षकांची (त्यांच्या भाषेत 'मास्तरांची') मिमिक्री करून इतरांचे मनोरंजन करणे हे त्यांचे नित्याचे उद्योग होते. अन्या आणि सुन्या ह्या कित्तीही खोडकर असल्या तरी B.com च्या अंतिम वर्षातील अभ्यासातल्या सु'कन्या'च होत्या, आणि त्यांची मैत्री तर 'अनन्य'साधारण अशीच होती. त्यांच्या नावातील 'यमक' हे त्यांच्या जिवलग मैत्रीचे 'गमक' असल्याचा दावा तात्कालिक सखी सहेलींनी केला पण ते त्यांच्यासमोर म्हणायची 'धमक' त्यांच्यात कधीच नव्हती. तसा दाराराच होता दोघींचा.


B.com नंतर MBA Finance करायचं दोघींचंपण स्वप्न होतं. दोघीही अभ्यासात निपुण होत्या. अंतिम वर्षाच्या परीक्षा संपल्या होत्या. अनन्याची घरची परिस्थिती बेताचीच होती. वडील सोपानराव निवृत्तीच्या उंबरठ्यावर होते. त्यामुळे ते अनन्यासाठी स्थळे पाहत होते. वराकडची मंडळी मुलीला पाहण्यासाठी यायची आणि भगवंताने हुंडा मागण्याचे 'वर' प्रदान झाल्यासारखे तोंड 'वर' करून बेफाम हुंड्याची मागणी करायची आणि अनन्याचे वडील चांगलं स्थळ पुन्हा एकदा दाराशी येऊन गेलं ह्याची खंत करत बसायचे. असेच दिवस जात होते.


अनन्याचे वडील ज्या बँकेत क्लार्क म्हणून काम करायचे तेथे मॅनेजर पदावर काम करणारे तरुण तडफदार व्यक्तिमत्त्व म्हणजे सुधीर मोहिते. एकदा सोपानराव काही कामानिमित्त सुधीरच्या केबिनमध्ये आले. आपली मुलगी उपवर झाली की प्रत्येक बापाच्या कपाळावर ज्या विचारांच्या आठ्या असतात त्या सोपानरावांच्या कपाळावरपण स्पष्ट दिसत होत्या. सुधीरने त्यांना बसायला सांगत पाणी दिले आणि चिंतेचे कारण विचारले. सोपानरावांनी मोजक्या शब्दांत आपली व्यथा मांडली. सुधीरने त्यांना धीर देत तुम्ही तुमच्या मुलीचा फोटो मला द्या, मी बघतो तिच्यासाठी योग्य स्थळ, असे म्हटले. तेवढ्या बोलण्याने सोपानरावांना खूप हायसे वाटले. त्यांनी सुधीरला लिफाफ्यातील फोटो दिला. सुधीरने तो लिफाफा आपल्या सूटच्या खिशात ठेवला.


सुधीर घरी आला. त्याच्या आईने त्याला हातपाय धुण्यासाठी गरम पाणी काढून ठेवले होते. तो फ्रेश व्हायला गेल्यावर त्याची आई त्याचा सूट कपाटात ठेवण्यासाठी त्याच्या बेडरूममध्ये गेली. तिने सूट उचलला तेव्हा तिला तो फोटोचा लिफाफा दिसला आणि उत्सुकतेने त्याच्या आईने तो लिफाफा उघडून बघितला आणि जोरातच "मला मुलगी पसंद आहे" असं ओरडली. तो ओरडण्याचा आवाज ऐकून सुधीर धावतच आला. त्याच्या आईच्या चेहऱ्यावरील आनंद अवर्णनीय होता. "कोण आहे ही मुलगी? खूप सुंदर आहे. तरीच मला वाटलं तू arrange Marriage साठी नाही का म्हणत होतास..! कोण आहे ऑफिसमधली आहे का कोणी का कॉलेजमधली??" असा अगणित प्रश्नांचा भडिमार केला. सुधीरने आईला शांत केले आणि "मला आत्ताच लग्न नाही करायचं गं. आत्ता तर कुठे माझ्या करियरची सुरुवात झाली आहे." असं म्हणत तो लिफाफा स्वतःकडे घेत असताना त्याला अनन्याचा लाघवी चेहरा दिसला आणि तो पूर्ण फोटो पाहण्यासाठी त्याने फोटो बाहेर काढला. तिच्या तेजस्वी चेहऱ्याने सुधीरला दिपवून टाकले होते. त्याला अनन्या खूप आवडली. "आई, मी काय म्हणतो लग्न करूनच टाकतो एकदाचं, तुला पण कामात मदत होईल" सुधीर दाताआड जीभ चावत बोलला." आणि तुझं करियर रे??" आईने मिश्कीलपणे हसत आपल्या चिरंजीवाला लाडिक चिमटा घेतला.


सुधीरने अनन्याच्या घरी जाऊन तिला मागणी घातली. सुधीरने हुंडा न घेण्याचा निर्णय घेतला होता. सोपानरावांना तर आभाळ ठेंगणे झाले होते. अनन्याच्या मनात लग्न करण्याचा विचार नव्हता पण वडिलांच्या आग्रहाखातर ती तयार झाली होती. इकडे सुकन्याने MBA Finance ला एक प्रतिष्ठित कॉलेजमध्ये स्वतःच्या गुणवत्तेवर प्रवेश घेतला होता. तिने अनन्याच्या घरी जाऊन तिच्या आई-वडिलांना तूर्तास लग्न लावून न देण्यासाठी खूप समजावून सांगितले पण सगळे प्रयत्न व्यर्थ गेले.


लग्नाची तारीख ठरली. सनई चौघडे दारी वाजत होते. सोपानरावांनी मोठ्या थाटात आपल्या मुलीचे लग्न लावून दिले. अनन्या आणि सुधीरचा संसार सुरू झाला. अनन्याने आपल्याला पुढं शिकायचं आहे असं म्हटल्यावर तो फक्त हसला आणि "अगं माझा पगार आहेच की आणि तुला खरंच नोकरी करायची काही गरज नाही." संसाराची वृक्षवेल बहरली. अनन्या आणि सुधीरला दोन कन्यारत्ने झाली. सई आणि जाई. अनन्या पण संसारात रममाण झाली होती. सुरवातीच्या काळात पत्राद्वारे अनन्या आणि सुकन्या बोलायच्या पण नंतर काळाच्या ओघात ते पण बंद झाले. सुधीरचीपण भरभराट सुरू होती. वर्षामागून वर्षे सरत होती. सई आणि जाई अनुक्रमे 8 आणि 5 वर्षाच्या झाल्या होत्या.


एके दिवशी संध्याकाळी अनन्या सुधीरची वाट पाहात होती. सई आणि जाई शुभंकरोती म्हणत होत्या. तेवढ्यात टेलिफोन खणाणला. तो टेलिफोनचा आवाज त्या शांत संध्याकाळचा अंत करू पाहत होता.

"हॅलो मी सब इन्स्पेक्टर पाटील बोलतोय. तुम्ही मिस्टर सुधीरच्या कोण बोलत आहात?"

अनन्या गडबडली. पोलीस स्टेशनहून फोन. स्वतःला सावरत ती म्हणाली. "मी त्यांची बायको बोलतेय अनन्या... बोला ना साहेब काय झालं?"

"मिस्टर सुधीर ह्यांना बँकेत अफरातफर करण्याच्या आरोपाखाली आम्ही अटक केली आहे. हे सांगण्यासाठी फोन केला होता"

अनन्याच्या पायाखालची जमीन सरकली. ती मटकन खाली बसली. फोनचा रिसीव्हर तसाच हवेत लटकत होता. सई आणि जाई त्यांच्या आईला हाका मारत होत्या. पण अनन्या एकटक बघत होती. गंगाजमुनांनी डोळ्यातून बाहेर वाट काढली होती. थोड्या वेळानंतर ती भानावर आली. तिने पटापट सगळं आवरलं. घरी सई आणि जाईला सोडून ती पोलीस स्टेशनला गेली. तिथे गेल्यावर सुधीरला बघितल्यावर ती ओक्साबोक्शी रडली. सुधीर जेरबंद होता. सुधीरला सोडवण्यासाठी अनन्याने नामांकित वकील लावला. कोर्टात केस सुरू होती. तारखांवर तारखा मिळत होत्या. शेवटी दोन महिन्यांनंतर सुधीर घरी आला. पुरता खचला होता. कारचे हफ्ते थकल्यामुळे कार बँकवाल्यानी जप्त केली. अनन्या सुधीरला सावरण्याचा अतोनात प्रयत्न करत होती, पण सुधीर परिस्थितीसमोर हरला होता... घरावर असलेल्या कर्जाचे हफ्ते पण खोळंबले होते. एकेदिवशी घरावर पण जप्ती आली. अनन्या सुधीरला जॉबला परवानगी देण्यासाठी विनवत होती परंतु प्रत्येक वेळी सुधीरचा पुरुषी अहंकार आड येत होता. तो स्वतःपण काही काम करत नव्हता आणि तिला पण करू देत नव्हता. अनन्या सुधीरच्या नकळत नोकरी शोधण्याचं काम करत होती.


एके दिवशी तिला इंटरव्ह्यूचा कॉल आला. इतकी वर्षं कारमध्ये फिरणारी अनन्या आज बसमध्ये धक्के खात इंटरव्ह्यूला निघाली होती. इंटरव्ह्यू घेणाऱ्याने खूप प्रश्न विचारले. अनन्या मूळची हुशार असल्यामुळे ती प्रत्येक प्रश्नाचे अचूक उत्तर देत होती.

शेवटी इंटरव्ह्यू घेणाऱ्याने "तुम्हाला किती वर्षाचा कामाचा अनुभव आहे?", असे विचारले.

"सर आजपर्यंत मी नोकरी केली नाही त्यामुळे मला तसा कामाचा अनुभव नाही पण मला एक संधी द्या. मी नक्कीच चांगलं काम करून दाखवेन,"

"सॉरी मॅडम, आम्ही तुम्हाला हा जॉब नाही देऊ शकत. आम्हाला कमीत कमी 3 वर्षांचा अनुभव पाहिजे कामाचा."

अनन्या अक्षरशः गयावया करत राहिली.

"you may leave now... please" असं म्हणून इंटरव्ह्यू घेणाऱ्याने तिला बाहेर पाठवलं.


अनन्या खूप हताश झाली होती. पार कोलमडूनच गेली होती. निराशेचे मळभ चेहऱ्यावर घेऊन ती तशीच जड पावलांनी बस स्टॉपकडे निघाली. वाटेत मुसळधार पाऊस सुरू झाला म्हणून तिने एक झाडापाशी आडोसा घेतला. बाजूच्या पान टपरीवरील बड्या बापाच्या पोरांच्या अक्कलशून्य आणि वासनांध नजरा तिला स्पर्श न करता तिच्या शरीराचे लचके काढत होत्या. ती पदर सावरत होती पण तिला तिथं असुरक्षित वाटू लागलं आणि ती मागे बघत बघतच एका उच्चभ्रु लोकांच्या वसाहतीत शिरली. ते टवाळखोर, स्वयंघोषित रोमियो तिचा पाठलाग करत तिथपर्यंत आले होते. ती घाईघाईत एका इमारतीत शिरली. पळतपळत ती चौथ्या मजल्यावर आली होती. धापा टाकत ती तिथेच पायऱ्यांवर विसावली. 5-10 मिनिटांनंतर तिने स्वतःला सावरले. तिने बॅग उचलली आणि ती जायला निघणार एवढ्यात तिची नजर एका फ्लॅटच्या नामफलकावर जाऊन स्थिरावली. तिचा विश्वासच बसत नव्हता डोळ्यांवर ते नाव होतं... श्रीमती सुकन्या राहुल देशमुख. तिच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहत होते. तिला भेटण्याची उत्कंठा वाढत होती. तर तिचं दुसरं मन तिला स्वतःची परिस्थिती पाहून भेटण्यापासून परावृत्त करत होतं. दरवाजा थोडा उघडाच होता. एका लहान मुलाच्या रडण्याचा आवाज येत होता आणि त्या मुलाची आई स्वयंपाक घरातुन दूध घेऊन आली आणि म्हणाली "काय झालं ले माझ्या पिल्ल्याला.. कोण मालल ले.. उगीउगी.." त्या बाळाची आई दुसरी तिसरी कोणी नाही तर तिची प्राणप्रिय मैत्रीण सुकन्या होती. तिचे बोलणे ऐकून अनन्यालासुद्धा तिची लहान मुलगी सई जेव्हा रडायची तेव्हा एकूणच अनन्यासुद्धा अशीच बोबडी बोलायची..सईचं ते बाळाबरोबरचं बोलणं ऐकून मात्र ती स्वतःला रोखू शकली नाही. ती आत गेली. दोन मैत्रिणी जवळपास एका दशकानंतर एकमेकांना भेटत होत्या. दोघींनापण आनंदाश्रू अनावर झाले होते. दोघींनी एकमेकांची विचारपूस केली. खूप दिवसांनंतर गप्पा रंगल्या होत्या. कॉलेजच्या आठवणींनी मन न्हाऊन निघालं होतं. तेवढ्यात अनन्याचं लक्ष घड्याळाकडे गेले आणि ती उठून उभीच राहिली. दोघींच्या गप्पांमध्ये वेळ कसा निघून गेला हे दोघींना कळले नाही.


"चल सुन्या मी निघते, खूप उशीर झाला, मुली वाट बघत असतील आणि तुझ्या पिल्लूला घेऊन ये आमच्याकडे नक्की. पिल्लू बाय कल माऊला" सुकन्याच्या मुलीचे लाड करत अनन्या म्हणाली.

"अगं आमचा ड्रायव्हर सोडेल ना तुला. काळजी करू नको." सुकन्या उद्गारली.

तिने ड्रायव्हरला कॉल करून अनन्याला तिच्या घरी पोचवण्यासाठी सांगितले.

परत दोघी एकमेकांकडे बघून गोड हसल्या.

अनन्या दरवाजा बाहेर पडली होती तोच सुकन्याने तिला साद घातली "अन्या अगं थांब थोडी.. सई आणि जाईसाठी खाऊ देते."

अनन्याने पण मान डोलावली आणि दाराबाहेरच वाट बघत थांबली. सुकन्याला थोडा वेळ लागत होता तशी अनन्या जास्तच बेचैन होत होती, कारण तिला घरी पोहोचण्यासाठी चांगलाच उशीर झाला होता. तेवढ्यात हातात एक बॉक्स घेऊन सुकन्या आली आणि म्हणाली "यात मिठाई आहे. दे दोघींना पण..शिदोरी म्हण हवं तर" असं म्हणून हसली. अनन्याचे डोळे पाणावले होते पण तिने सुकन्याला कळू न देता पदराने पुसले आणि निघाली.


अनन्या कारमध्ये बसली आणि तिचे विचारचक्र सुरू झाले. तिला वाटत होते की आपल्या मैत्रिणीला आपली परिस्थिती सांगावी आणि काही मदत मागावी. पण दुसरं मन तिला एवढ्या दिवसांनंतर आपण भेटलो अशी कशी तिला मदत मागायची असा सवाल करत होतं. बाकी ती आपल्या मैत्रिणीचं वैभव पाहून मनोमन खुश झाली. सुकन्याने MBA Finance विशेष प्राविण्य मिळवून पूर्ण केले. तिला एका खाजगी कंपनीत मॅनेजर पदावर नियुक्ती मिळाली. तिथे ती अधिकाधिक मेहनत करत संचालक मंडळापर्यंत पोचली होती. आत्तातर तिने स्वतःची "आधार प्रा.ली." नावाची कंपनी सुरू केली होती.


त्या विचाराच्या तंद्रीत ती केव्हा घरी पोहोचली ते तिला कळलंच नाही. ती गाडीतून उतरली. घरात आली. घरी तिची वाट बघत मुली थांबल्या होत्या. आईच्या हातातला बॉक्स बघून त्या तिला बिलगल्या." आज की नाही मला तुमची मावशी भेटली होती. सुकन्या मावशी. तिने मला तुमच्यासाठी खाऊ दिला आहे, असं म्हणून तिने तो बॉक्स उघडला आणि बघते तर काय त्यात एक लिफाफा होता. त्या लिफाफ्यात "Appointment Letter" होतं आणि त्यात चक्क अनन्या सुधीर मोहिते असं लिहिलेलं होतं. ती भांबावून गेली. तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या. सोबत एक पत्रपण होते. त्या पत्रात लिहिलं होतं..


"प्रिय अन्या,

अभिनंदन..!! माझ्या किंबहुना आपल्या कंपनीत तुझं स्वागत आहे. तुझ्यासारखी हुशार Employee मिळायला पण भाग्य लागतं. खरंच मी खूप भाग्यवान आहे. मला माहित आहे तू आत्ता रडत असणार. रडकी कुठली... डोळे पुस बरं आधी.. आता तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर देते की मला कसं कळलं की तू अडचणीत आहेस आणि तूला मदतीची नितांत गरज आहे. ते झालं असं..तू जेव्हा फ्रेश व्हायला गेली होतीस तेव्हा मला तुझी Documents ची फाईल दिसली आणि मला कळलं की तुला नोकरीची नितांत गरज आहे आणि बाकीचं सांगायला सुन्या तुझे डोळेच पुरेसे होते... कित्ती बोलके आहेत गं ते. मग मी विचार केला की तुला पैसे द्यावे पण मला शाश्वती होती की तू ते स्वीकारणार नाहीस म्हणून मी तुला नोकरी देऊ करतेय... हीच माझ्याकडून तुला मैत्रीची शिदोरी.

                                                        तुझी हक्काची मैत्रीण,

                                                                   सुन्या"

पत्र वाचताना तो पत्राचा कागद अनन्याच्या अश्रूंनी तेव्हाच ओला झाला होता. तसाच तो घडी करून तिने उराशी कवटाळला. सुधीर दुरूनच तिला पाहत होता. त्यालापण ती आज नोकरी शोधायला जाणार होती हे कळलं होतं. त्याचा पुरुषी अहंकार स्त्री सामर्थ्य पाहून तेव्हाच विरघळला होता. त्याने तिच्या हातात पेढ्यांचा बॉक्स ठेवला आणि तिला मिठीत घेतले आणि तो एवढंच म्हणाला...

"उद्यापासून मी पण नोकरी..."

पुढचे शब्द सुधीरने आवंढयात गिळले...


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy