Akash Kokate

Others

4.9  

Akash Kokate

Others

बापमाणूस

बापमाणूस

4 mins
1.5K


आज दि.२६/०७/२००९,काल रात्री अक्षय चा डोळ्याला डोळा लागला नाही कारण त्याचा आज अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेचा निकाल होता..काल अक्षयच्या बरोबर अजून एक व्यक्ती रात्रभर जागली आणि ती म्हणजे त्याचे वडील बबनराव..


"अक्षय तू या नेट कॅफे वर बघ, मी दुसऱ्या बघतो.." बबनरावांची अगतिकता त्यांच्या बोलण्यावरून स्पष्ट लक्षात येत होती.

खरंतर आज अक्षयचा निकाल नव्हताच तो निकाल होता.. बबनरावांचा.. ज्यांनी २ वर्षापूर्वी गावाहून शहरात येण्याच्या घेतलेल्या निर्णयाचा.. सगळ्यांचा विरोध झुगारून आपल्या मुलासाठी जिद्दीला पेटलेल्या बापाचा.. अक्षयसारख्या 'शिक्षण' नावाच्या समाजात 'Lower Middle Class' असलेल्या पोरावर पोटतिडकीने मिळवलेले पैसे लावणाऱ्या ध्येयवेड्याचा..


आज निकाल बघायला आलेल्या विद्यार्थ्यांच्या गर्दीने सर्व इंटरनेट कॅफे फुलून गेले होते. इंटरनेटवाला सगळ्यांना रांगेत यायला सांगत होता.


बबनराव अक्षय जेमतेम ७ वर्षांचा असताना त्याच्यासोबत 'तिरुपती बालाजी' चे दर्शन घेण्यासाठी गेले होते. बबनराव आणि त्यांच्या बँकेतील सहकारी तिरूपती ला निघालेले होते. वडील प्रवासासाठी निघालेले असताना.. "पप्पा मला पण यायचंय तुमच्यासोबत" या लाडिक हाकेने बबनराव पुरते बाद झाले.शेवटी त्यांनी घरचे सर्वजण नकारघंटा वाजवत असताना अक्षयला उराशी धरून ते तिरुपतीला आले होते.


दर्शनासाठी खूप गर्दी होती. त्यामुळे अक्षयला हातात धरून नेणे त्यांना जमले नाही. त्यांनी त्याला आपल्या खांद्यांवर बसवले."व्यंकटरमणा गोविंदा" म्हणत हा 'वासुदेव' आपल्या 'बालकृष्णाला' गर्दीरूपी महासागरातून घेऊन जात होता.

"अरे यार..हट..नेहमीचा सर्व्हर Problem आहे यार ह्यांचा..आमच्या दिवट्यानं लावलेले दिवे बघायला आलो तर इथंच अंधार.." गर्दीतला एक जण पानाची पिचकारी मारत बोलला. तेव्हा बबनराव भानावर आले.."सर्व्हर चा Problem" बबनराव पुटपुटले.. हे शब्द बबनरावांनी २ वर्षापूर्वी अक्षयचाच दहावीचा निकाल बघण्यासाठी आल्यावर ऐकला होता.. वारकरी जसा आषाढी कार्तिकीला पंढरीच्या वारीला जातो तसे निकालाच्या दिवशीच बबनराव नेट कॅफेच्या वारीला येत.


दहावीला अक्षयला ७७% मिळाले होते. शेजारचे तर 'पोरगं वाया गेलं' असा शिक्कामोर्तब करून मोकळे झाले. अक्षयचे वडील त्याच्याजवळ आले. प्रेमाने त्याच्या पाठीवरून हात फिरवला. त्याला आपल्या कवेत घेतलं." अरे अक्षय ही तर सुरुवात आहे.. तू लंबी रेसचा घोडा आहेस.. इतक्यात हारायचं नाही.." आणि त्यांनी त्याला पेढा भरवला. अर्धा पेढा तोंडात आणि अर्धा बाहेर.. डोळ्यात अश्रूंच्या धारा.. आवंढा गिळताना गोड पेढा पण खारट झाला होता.. अश्रू पुसत त्याने त्याच्या पप्पाला मारलेली मिठी अजून घट्ट केली. बबनरावांनी पण अश्रूंना वाट मोकळी करून दिली. त्यांनी त्याची मिठी सोडवली. आत्ता बबनरावांच्या डोळ्यात विलक्षण तेज दिसत होते. कसलातरी निर्धार केल्यासारखे ते लगेच उठले... आणि घराबाहेर गेले.


गावाजवळ असलेल्या शहरात त्यांनी भाड्याचे घर शोधण्यासाठी खूप वाटा तुडवल्या. शेवटी एका गल्लीमध्ये त्यांना दोन रूमचे घर मिळाले .गावातील घरचे सामान आवरताना त्यांना बऱ्याच जणांनी 'बघ परत एकदा विचार कर..पैसे वाया घालतोयस' असा धमकीवजा सल्ला दिला.. पण बबनरावांना आत्ता फक्त एकच ध्येय दिसत होते.. ते म्हणजे मुलाला Engineer बनवायचं.. बस्स ते निघाले मग...


शहरात येताना चुलत्यांनी व भावंडांनी 'शिदोरी' म्हणून त्यांची मुले बबनरावांकडे शिकायला पाठवली.. दोन रूमच्या त्या खुराड्यात अक्षयला धरून ७ जण झाले होते. हॉल मुलांना अभ्यासाला आणि किचन बबनराव आणि त्यांच्या पत्नीला राहायला. अक्षयला नामांकित classes लावताना बबनराव कधीच मागे हटले नाहीत. त्यांनी त्यांची आत्तापर्यंत जमवलेली सर्व Savings अक्षयला सर्वोत्तम शिक्षण देण्यासाठी लावली. अक्षय पण सर्व बघत होता. तो त्याच्या परीने चांगला अभ्यास करीत होता. प्रवेश परीक्षा जवळ येऊन ठेपली होती. सर्व classes मध्ये सराव परीक्षा सुरू होत्या. अक्षयला २०० पैकी ११० ते १२० च्या रेंजमध्ये मार्क्स पडायचे. अक्षयने पण कधीही बबनरावांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला नाही. तो प्रामाणिकपणे जेवढे मार्क्स मिळायचे ते घरी कळवायचा. आई खूप संतापायची पण बबनराव मात्र ऋषी-मुनींसारखे स्थिर असायचे.


एके दिवशी अक्षयचे मन त्याला सतत कमी मार्क्स पडत असल्यामुळे अभ्यासात लागत नव्हते. हे बबनरावांनी बरोबर ओळखले.."अक्षय चल..." आणि अक्षय त्यांच्यासोबत निघाला.."ते त्याला शहरातील प्रसिद्ध Garden मध्ये घेऊन गेले. तिथे त्याला त्याच्या अवडीची भेळ खाऊ घातली. अक्षय गार्डनमधील बाकावर बसून भेळ खात होता. भेळ खाऊन झाल्यावर तो एकदम फ्रेश दिसत होता. बबनराव उठले, जमिनीवर पाय दुमडून त्याच्या पुढ्यात बसले." अक्षय नाराज होऊ नको. सर्व परीक्षा जेव्हा सुरू झाल्या होत्या तेव्हा तुला २०० पैकी ९० -१०० मार्क्स मिळायचे पण आत्ता तुला ११०-१२० मार्क्स मिळत आहेत. तुझ्यात निश्चितपणे क्षमता आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुला माहीतच आहे..तू कोण आहेस?"असं विचारून ते त्याच्याकडे पाहत होते.."लंबी रेस का घोडा..!!" अक्षय जवळपास उडीच मारत ओरडला.."पप्पा चला घरी.. "अक्षयचा उत्साह पाहून बबनराव मनोमन सुखावले. पाणावलेल्या डोळ्यांनी त्यांनी घरचा रस्ता धरला.


परीक्षेचा दिवस उजाडला. आई तर मुलाला यश मिळण्यासाठी साकडं घालण्यासाठी चालत 'सत्यगणपती'ला निघून गेली होती. अक्षय आणि बबनराव युद्धाला निघाले. परीक्षा केंद्रावर जाताना गणपतीचे मंदिर रस्त्यात लागले. एरवी कधीच देवासाठी वाट वाकडी करायची त्यांची सवय नव्हती. पण आज ते घडलं होतं. दर्शन घेत असताना तेथील पुजाऱ्याला "ह्याची खूप मोठी परीक्षा आहे आज, ह्याला आशीर्वाद द्या" असं बबनरावांनी विनंती केली. त्या पुजाऱ्याने अक्षयच्या डोक्यावर हात ठेवत "बाळ परीक्षा हॉलमध्ये जाताना उजवा पाय पहिल्यांदा टाक" असे सांगितले. अक्षयला सर्व सूचना बबनरावांनी दिल्या. अक्षय पेपरसाठी गेला. बबनराव हाताची घडी घालून एकदा घडीकडे तर एकदा परीक्षा केंद्राच्या गेटकडे बघत फेऱ्या मारत होते.


"अहो.. काका Roll No. सांगा" ह्या आवाजाने बबनरावांच्या विचारांचे विमान भूतकाळातील आभाळातून वर्तमान काळाच्या धावपट्टीवर लँड झाले.

खिशात घालून आणलेले हॉल तिकीट त्यांनी नेट कॅफेवाल्याला दिले. छातीत धडधड वाढली होती. घामाच्या धारा लागल्या होत्या. नेट कॅफेवाल्याने result काढला व तो result पाहून त्याने परत परत बबनरावांकडे पाहिले. एकदम साध्या पोशाखात असलेले बबनराव अधिकच चिंताग्रस्त झाले." अहो.. अभिनंदन काका.. तुमच्या मुलाला १५५ मार्क्स पडलेत. आत्ता Govt. Engineering ची सीट पक्की..!"

बबनरावांचा २ वर्षांचा वनवास फळाला आला होता. त्यांनी डोळे उघडे ठेवून बघितलेले स्वप्न पूर्ण झाले होते. बबनराव त्या गर्दीतून बाहेर पडत होते. समोरून अक्षय पेढ्यांचा बॉक्स घेऊन धावत येत होता."पप्पा..पप्पा.." बाकी शब्द तोंडातच विरघळले. बबनरावांनी अक्षयला घट्ट मिठी मारली आणि विचारले.

"खरं सांग उजवा पाय पहिल्यांदा टाकला होता की डावा?"

"पप्पा मला आठवतच नाही की मी कोणतं पाऊल टाकलं होतं. मला फक्त एवढंच माहीत होतं की, ज्या मुलाच्या हातात तुमचा हात आहे. त्याचं पाऊल नेहमी योग्यच पडेल..!"


Rate this content
Log in